आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे साहित्योत्सव गमावलेली संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिल्या पुणे आंतररा्ष्ट्रीय साहित्य महोत्सवाला पुणेकरांचा थंड प्रतिसाद लाभला. पुण्याबाहेरील म्हणजे उर्वरित महाराष्ट्रातील, देशांतील साहित्यप्रेमींचा सहभाग तर शून्यच होता. केवळ एक अपवाद वगळता कोणतेही आंतरराष्ट्रीय साहित्य अथवा साहित्यिकांची उपस्थिती नव्हती. वाचकाने या महोत्सवाची दखल घेतली नाही.
* उर्वरित महाराष्ट्रातील आणि देशांतील साहित्यप्रेमींचा सहभाग शून्यच
पुण्यात नुकताच पहिला आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव संपन्न झाला. संपन्न झाला असं म्हणण्यापेक्षा तो पार पडला, असं म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल असंच या महोत्सवाचं स्वरूप होतं. ज्या पद्धतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं त्यावरून याला सार्वजनिक महोत्सव म्हणण्यापेक्षा खासगी प्रायोजित महोत्सव म्हणणं अधिक उचित ठरावं. साहित्य आणि साहित्य व्यवहार यात पुण्याचं पूर्वापार ते आजपर्यंतचं स्थान आणि कर्तृत्व लक्षात घेता ज्या थंडपणे या महोत्सवाला पुणेकरांचा प्रतिसाद लाभला त्यामागची कारणं संदिग्ध आहेत. पुण्याबाहेरील म्हणजे उर्वरित महाराष्ट्रातील आणि देशांतील साहित्यप्रेमींचा यातील सहभाग तर शून्यच होता. शिवाय आंतरराष्ट्रीय असं नामकरण करण्यात आलेल्या या महोत्सवात केवळ एक अपवाद वगळता कोणतेही आंतरराष्ट्रीय साहित्य अथवा साहित्यिकांची उपस्थिती नव्हती. कोणत्याही सामान्य वाचकाने या महोत्सवाची दखल घेतली नाही, याला वाचकांपेक्षा आयोजकांचं गलथान आणि ढिसाळ आयोजन जबाबदार होतं. आपण सर्वांनीच गमावलेली एक चांगली संधी, असं या महोत्सवाचं वर्णन करता येईल.
* साहित्य महामंडळ आणि मसापला सहभागीच करून घेतलं नाही
ही जर एक गमावलेली संधी होती आणि साहित्यप्रेमींचा आणि साहित्यिकांचा या महोत्सवाला जराही प्रतिसाद लाभला नाही, तर त्याबद्दल काही लिहिण्याची गरज का भासावी असा प्रश्न कुणालाही पडेल. त्याची काही कारणं आहेत. जी एकंदरीतच आपल्या मराठी आणि भारतीय साहित्य आणि साहित्यिकांच्या मानसिकतेशी, वर्तमान आणि भविष्याशी निगडित आहेत. हे कदाचित काहीसं धाडशी विधान वाटण्याची शक्यता आहे, पण ही सत्य गोष्ट आहे. पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणा-या शहराला आणि इथल्या मराठी साहित्याला या महोत्सवात फारसं स्थान नव्हतं. काही कार्यक्रम निश्चितच झाले, पण ते मराठी साहित्याचं प्रतिनिधित्व करणारे निश्चितच नव्हते. सर्वांत खटकणारी बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्‍ट्र साहित्य परिषद अशा मराठी साहित्याच्या दोन महत्त्वाच्या संस्था पुण्यात असूनही त्यांना या महोत्सवात सहभागी करून घेतलं नाही.
* लेखक, प्रकाशन संस्था मराठीपेक्षा इंग्रजी साहित्याशी जास्त संबंधित
काही लेखक, जे पुन्हा मराठीपेक्षा इंग्रजी साहित्याशी जास्त संबंधित होते ते आणि काही प्रकाशन संस्था ज्या या महोत्सवाचे प्रायोजक होत्या त्यांची पुस्तकं (ज्यात अनुवादित पुस्तकांचाच समावेश होता) वगळता मराठी साहित्य किंवा साहित्यिकांचा इथं गंधही नव्हता. मराठी रसिकांबाबत बोलण्याची गरजही नाही. जगातील एक प्रमुख भाषा असलेल्या मराठीला नेहमीप्रमाणे इंग्रजीच्या तुलनेत इथं डावलण्यात आलं होतं, पण याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय म्हणवणा-या या महोत्सवात इंग्रजी वगळता अन्य भाषांचा अभावच होता. हीच गोष्ट साहित्यिकांच्या बाबतीतही होती. जे होते ते भारतातील इंग्रजी लेखकच होते. आणि त्यातही मोठ्या प्रमाणात व्यापारी ललित साहित्य लिहिणा-या लेखकांचाच समावेश होता.
* भारतीय इंग्रजी लेखकांचीच वर्णी, प्रादेशिकसह अन्य भारतीय भाषांचाही अपमान
महोत्सवाचं हे एकंदरीत स्वरूप फक्त प्रादेशिक भाषेचा अपमान एवढ्यापुरतच मर्यादित नव्हतं तर अन्य भारतीय भाषांचाही अपमान करणारं होतं. आंतरराष्ट्रीय शब्दाच्या बुरख्याखाली केवळ भारतीय इंग्रजी लेखकांचीच यात वर्र्णी लावण्यात आलेली होती. आणि हे लेखक जे लिखाण करतात त्याला व्यापारी महत्त्वापेक्षा अन्य महत्त्व नाही असं खेदानं म्हणावं लागतं. गुन्हेगारी, पौराणिक व ऐतिहासिक कथा, प्रेम आणि वजन कमी करण्याचे उपाय या पलीकडे या साहित्याची मजल जात नाही. बाजारात काय खपतं त्यानुसार झटपट रेसिपी करून फास्ट फूडच्या धर्तीवरचं हे सारं साहित्य आहे.
* स्वस्त, खपाऊ साहित्य येतंयचा आरोप, पण तरुण वाचक वाढलाय हेही सत्य
सोप्या इंग्रजीत मांडण्यात येणा-या या कादंबरींना साहित्याचा दर्जा द्यावा की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण या साहित्यामुळे भारतात एक मोठा तरुण वाचक वर्ग निर्माण झाला आहे ही बाबदेखील दुर्लक्षित करून चालणार नाही. सुदैवाने या लेखकांनाही आपल्या या मर्यादांची जाणीव आहे. त्यामुळे एकीकडे त्यांच्यावर स्वस्त व खपावू साहित्य निर्माण करण्याचे आरोप होत असले तरी देशात मोठा वाचकवर्ग निर्माण करण्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. पण जेव्हा अशा साहित्यावर वाचकांपेक्षा प्रकाशकांचं नियंत्रण असतं त्या वेळी भविष्यकालीन साहित्य रचनेबाबत ती मोठी धोक्याची गोष्ट ठरू शकते. प्रेमावरच्या कादंब-या खपतात म्हणून सध्या मोठ्या प्रमाणात अशा कादंब-या लिहिल्या व छापल्या जात आहेत. त्यांना वाचकांचाही मोठा प्रतिसाद मिळतो, पण पुढे जाऊन याचे विपरीत परिणाम होऊन साहित्य म्हणून त्यांचा दर्जा अधिकाधिक खालावला जाऊ शकतो.
अनेक कारणांनी हा महोत्सव संस्मरणीय ठरू शकला असता, पण तसं ते होऊ शकलं नाही. पुण्यात गेली बारा वर्षे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवण्यात येतोय आणि त्याला चांगला प्रतिसादही लाभतो. त्यामुळे तशाच प्रकारचा साहित्यिक महोत्सव घडणं हे गरजेचंच होतं. ती गरज या महोत्सवानं पूर्ण केली. त्यासाठी या महोत्सवाचे सल्लागार शशी देशपांडे, शोभा डे, सिद्धार्थ जैन तसेच संयोजक मंजिरी प्रभू आणि सोन्जा चंद्रचूड यांना धन्यवाद द्यायलाच हवे, पण आता त्यापलीकडे जाऊन यावेळेसच्या चुका टाळून अधिक समावेशक महोत्सवाचं आयोजन करण्याची जबाबदारी या आयोजकांवर आहे. अशा महोत्सवाचा उपयोग इंग्रजीसोबतच मराठी आणि अन्य प्रादेशिक भाषा साहित्यालाही आंतरराष्ट्रीय पटलावर आणण्यासाठी झाला तर या महोत्सवाचं महत्त्व अधिक वाढेल. पुढच्या वेळी ते पूर्ण होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. अन्यथा आणखी एक आपल्याच कोषात फिरणारा इंग्रजी साहित्य महोत्सव यापलीकडे याला महत्त्व उरणार नाही. पर्यायाने कागदावरील एका नोंदीपेक्षा जास्त महत्त्व या महोत्सवाला मिळणार नाही आणि पुण्याच्या साहित्यिक संस्कृतीला ही बाब फारशी भूषणावह ठरणार नाही.
* जयपूर लिटररी फेस्टिव्हलचं मॉडेल घेतलं खरं
पण गुणात्मक-संख्यात्मक फरक प्रचंड
जयपूर लिटररी फेस्टिव्हलच्या धर्तीवर हा महोत्सव आयोजित करण्यात आला असला तरी दोन्हींमध्ये प्रचंड प्रमाणात गुणात्मक आणि संख्यात्मक फरक होता. महोत्सवाचं हे केवळ पहिलंच वर्ष आहे असा बचाव करणंही आयोजकांना शक्य नाही. कारण या महोत्सवाला माईर्ससारख्या शैक्षणिक संस्थेचं सहआयोजकत्व लाभलं होतं. शिवाय अन्य महत्त्वाच्या संस्थांनीही प्रायोजकत्व स्वीकारलं होतं. असं असूनही महोत्सवाची अत्यंत अपु-या स्वरूपात झालेली जाहिरात यामुळे अनेकांना अशा प्रकारचा काही महोत्सव सुरू आहे याचीच माहिती नव्हती. हे अनवधानानं घडलं की जाणीवपूर्वक असो त्यामुळे या महोत्सवाचा उद्देश पूर्णपणे फसला हे मात्र नक्की. पुण्यातही आता मोठ्या प्रमाणात नवीन लिखाण करणारा साहित्यिकांचा आणि वाचकांचा वर्ग आहे. जो इंग्रजी इतकाच मराठी साहित्याला प्राधान्य देतो, पण या दोन्ही वर्गांची या महोत्सवात नाममात्र उपस्थिती होती. अनेक मान्यवर इंग्रजी प्रकाशकांची इथे उपस्थिती होती आणि त्यांच्याकडून प्रकाशनाच्या बाबतीत अनेक गोष्टी प्रत्यक्ष शिकण्याची संधी होती जी फारच थोड्या लोकांना साधता आली. मुख्य म्हणजे साहित्याशिवाय चित्रपट, रेडिओ, जाहिरातक्षेत्र, अ‍ॅनिमेशन, लघुपट अशा विषयांवरचे कार्यक्रमही इथे होते. नव्हता फक्त त्यांचा लाभ घेऊ शकतील असा प्रेक्षकवर्ग.