आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिका वैद्यकीय जनुकीय शास्त्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकजनुकीय शास्त्रात रोजच काहीतरी नवीन घडत असल्याचे आपण वर्तमानपत्रांमधून वाचत असतो. दूरचित्रवाणीवर ऐकत असतो. गेल्या काही दशकांमध्ये जनुकीय शास्त्रात झालेल्या अफाट प्रगतीमुळे मानवी जीवनाशी आणि आरोग्याशी जनुकांचा असणारा संबंध आपल्याला लक्षात आला आहे. 2003 मध्ये मानवी जनुकीय आराखडा पूर्ण झाला आणि माणसाच्या जीवनाविषयीची निसर्गाने लिहिलेली संपूर्ण भाषाच जणू आपल्याला कळायला लागली. या जनुकीय भाषेत काही अनपेक्षित बदल झाल्यास मानवाच्या संपूर्ण अस्तित्वावर काय परिणाम होतो हे आपल्याला वेगवेगळ्या आजारांचा अभ्यास करून लक्षात आले. जन्माला येणा-या दर 100 बाळांपैकी 2 ते 3 बाळांमध्ये थॅलसेमिया, सिकल सेल अ‍ॅनिमिया, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, हिमोफिलिया, डाउन सिंड्रोम यासारखे जनुकीय विकार असतात. तसेच प्रौढांमध्येही वाढत्या वयासोबत होणा-यामधुमेह, उच्च रक्तदाब, स्मृतिभ्रंश, कर्करोग, यासाख्या बहुतांशी आजारांसाठी जनुकीय दोष कारणीभूत असल्याचे आपल्याला आज माहिती आहे. उतारवयात मात्र हेच प्रमाण 60 टक्के व्यक्तींमध्ये आढळते.

वातावरणातील घटकांमुळे होणा-याआजारांवर उपचारांसाठी वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित होऊन हे आजार आपण ब-यापैकी आटोक्यात आणले. जंतुसंसर्ग, कुपोषण, अपघात यासाठी मोठ्या प्रमाणात उपचार उपलब्ध आहेत. मात्र जनुकांमध्ये दोष असल्यामुळे होणा-याआजारांसाठी आपल्या देशात अतिशय तोकडी अशी व्यवस्था आहे. प्रगत देशांमध्ये जनुकीय आजारांचे निदान आणि उपचारांसाठी फार मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध असून जनुकीय आरोग्य सेवा देणा-यासंस्थांची आणि डॉक्टरांची संख्या खूप आहे. आपल्या देशात मात्र जनुकीय आजारांसाठी सेवा देणा-यासंस्था अगदी बोटावर मोजण्यासारख्या आहेत.

जनुकीय तज्ज्ञांची संख्यासुद्धा फारच कमी आहे. याचे मूळ कारण म्हणजे जनुकीय शास्त्रावरील अभ्यासक्रम भारतात उपलब्ध नाहीत. परिणामी जनुकीय आजार असलेल्या व्यक्ती आणि कुटुंबांना उपचाराअभावी प्रचंड त्रासाला आणि दुर्दशेला सामोरे जावे लागते. भरीस भर म्हणून अशा व्यक्तींना अनावश्यक उपचार मिळतात. वेळ आणि पैसा खर्च होतो आणि शेवटी निराशा पदरी पडते. योग्य वेळी योग्य जनुकीय सल्ला आणि उपचार मिळाल्यास अशा व्यक्तींना आणि कुटुंबाना दिलासा तर मिळतोच, पण भविष्यातील दुष्परिणामही टाळता येतात. जनुकीय शास्त्राचे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. जनुकीय शास्त्राचे ज्ञान हे प्रत्येकच शाखेमध्ये आज महत्त्वाचे ठरत आहे. डीएनए, जनुके आणि गुणसूत्रांशी संबंधित तंत्रज्ञान वापरून जैविक शास्त्र, प्राणिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र, जैविक तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन करता येऊन त्याचा उपयोग मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी होतो आहे. त्यामुळे जनुकीय शास्त्रावरील अभ्यासक्रम सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे बनले आहेत.

वैद्यकीय जनुकीय शास्त्रात ज्यांना पुढे सेवा द्यायची आहे, त्या डॉक्टरांसाठी हा अभ्यासक्रम पहिली पायरी ठरणार आहेत. तसेच जीआरई, प्लब, एफएमजी यासारखा आंतरराष्‍ट्रीय स्तरांवरील परीक्षांसाठी हा अभ्यासक्रम अतिशय फायदेशीर ठरणार आहे. वैद्यकीय सेवेतील डॉक्टरांसाठी या अभ्यासक्रमामुळे जनुकीय रुग्णांना सेवा पुरविणे सोयीचे होणार आहे. नजीकच्या भविष्यात जनुकीय उपचार, पेशी आधारित उपचार, मूळपेशी संशोधन आणि उपचार हे नियमित उपचार पद्धतीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग बनणार आहेत हे आपण जाणतो. यासाठी आपल्याला जनुकीयद्रष्ट्या शिक्षित वैद्यकीय तज्ज्ञ आणि अनुवांशिक सल्लागारांची फार गरज भासणार आहे.
वैद्यकीय आणि प्रजननीय जनुकीय शास्त्राला क्रमिक वैद्यकीय अभ्यासक्रमात हवे तेवढे स्थान अजून दिले गेलेले नाही. वैद्यकीय जनुकीय शास्त्राची आवश्यकता आणि उपलब्धता यातील फार मोठी दरी भरून काढण्यासाठी महाराष्‍ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला संलग्न असे जनुकीय शास्त्रातील दोन अभ्यासक्रम या वर्षापासून नाशिकमधील ‘जेनेटिक हेल्थ एंड रिसर्च सेंटर’, येथे सुरू होत आहेत. महाराष्‍ट्र ातील अभ्यासकांसाठी आणि जनतेसाठी ही फार मोठी संधी आहे.

जनुकीय शास्त्रातील हे अभ्यासक्रम करणा-याविद्यार्थ्यांना जनुकीय शास्त्रातील मुलभूत तत्त्व, वैद्यकीय क्षेत्रातील त्याचे महत्त्व, भविष्यात होऊ घातलेल्या जैविक तंत्रज्ञानातील आणि जनुकीय शास्त्रातील घडामोडी, मोलेक्युलर बायोलॉजीमधील तंत्रज्ञानाविषयी सखोल ज्ञान तर मिळणार आहेच; शिवाय आनुवंशिक सल्ला, जनुकीय आजारांचे निदान व उपचार यासाठी आवश्यक ते शिक्षण मिळणार आहे. जनुकीय शास्त्रात संशोधन करण्यासाठी संधीही यातून उपलब्ध होऊ शकणार आहेत. सहा महिन्यांचा हा अभ्यासक्रम इंग्रजीमधून असून दर आठवड्याला शनिवारी दिवसभर वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. ‘सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल जेनेटिक्स’ आणि ‘सर्टिफिकेट कोर्स इन रिप्रॉडक्टिव्ह जेनेटिक्स’ अशा ह्या दोन वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी दर सहा महिन्यांनी प्रत्येकी 30 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहेत. 30 जानेवारी 2013 अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख असून अभ्यासक्रमाविषयीची सविस्तर माहिती www.geneticsindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अभ्यासक्रमाच्या शेवटी यशस्वी विद्यार्थ्यांना महाराष्‍ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. अ‍ॅलोपथी, डेंटल, आयुर्वेद, होमिओपथी चे पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थी; जीवशास्त्राचे पदवीधर, र्नसिंग, फिजिओथेरपी, मानसोपचार तसेच सामाजिक कार्यातील पदवीधर या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकतात.

जनुकीय शास्त्रातील अभ्यासक्रम
यात मूलभूत तत्त्व, भविष्यात होऊ घातलेल्या जैविक तंत्रज्ञानातील आणि जनुकीय शास्त्रातील घडामोडी, मोलेक्युलर बायोलॉजीमधील तंत्रज्ञानाविषयी सखोल ज्ञान; शिवाय आनुवंशिक सल्ला, जनुकीय आजारांचे निदान व उपचार यासाठी आवश्यक ते शिक्षण मिळणार आहे.

drchopade@hotmail.com