आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pushpa Kotkar Article About Running A Plant Nursery,Divya Marathi

छंदातून साकारला उद्योग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी फुलांचे वेड असलेली गृहिणी. धुळ्याला असताना गच्चीवर विविध फुलांची जोपासना केली होती. गच्चीवरील बागेची पारितोषिकेही मिळाली होती. कालांतराने नाशिकला स्वत:च्या बंगल्यात राहायला आल्यानंतर ही आवड अधिकच जोर धरू लागली. बंगल्यासभोवती असलेल्या मोकळ्या जागेत विविध रोपे वाढवायला सुरुवात केली. धुळ्याहून येताना सर्व कुंड्या आणल्या होत्याच. गुलाब, जास्वंद, शेवंती, मोगरा, सोनचाफा या विविध रोपांनी जागा भरून गेली. सोबत विविध इनडोअर-आउटडोअर झाडंही विकसित केली. बोन्सायची आवड निर्माण झाली. मुंबईस जाऊन प्रशिक्षण घेतले. मुक्त विद्यापीठात बागकामाचा अभ्यासक्रम केला. कुंड्या ठेवण्यासाठी स्वतंत्र स्टँड करून घेतले. दररोज झाडांना पाणी घालणे, देखभाल, खते, औषध फवारणी यांवर खूप खर्च होऊ लागला. खर्च भागवण्यासाठी रोपांची, तयार कुंड्यांची विक्री करावी हा विचार मनात येताच नर्सरी उद्योगाची संकल्पना उदयास आली.

बंगल्याच्या नावावरूनच ‘तृष्णा नर्सरी’ नामकरण निश्चित झाले. बोन्सायसाठी सिरॅमिक पॉट्स आणून नवीन बोन्साय तयार केले. बोन्सायची आवड असणा-यांना ते तयार करण्याबद्दल मार्गदर्शन केले. आज माझ्या संग्रही २५ ते ३० वर्षे वयाची बोन्साय आहेत. हळूहळू नर्सरीचा व्याप वाढतच गेला. त्यासाठी लागणारी खते, औषधे, प्लास्टिक व सिरॅमिक पॉट्सही विक्रीस ठेवले. नाशिक महानगरपालिकेतर्फे होणा-या पुष्पप्रदर्शनात सहभागी होऊन पारितोषिके मिळवली.
सकाळपासून सायंकाळपावेतोचा वेळ, घरातील सर्व कामे सांभाळून, बागेत झाडांच्या व्यवस्थापनात व्यग्र असते. दिवसभर माझा वेळ माझ्या ग्राहकांशी हितगुज करण्यातच जातो. या निमित्ताने फार मोठा परिवार मी निर्माण करू शकले.

‘तुमची झाडे खूप छान निघालीत,’ हे शब्द ऐकले की खूप प्रसन्न वाटते. मी माझ्या झाडांवर, रोपांवर खूप प्रेम करते, त्यांची देखभाल करते, त्याचेच हे फळ आहे असे मला वाटते. अशा या छंदातून साकारलेल्या उद्योगामुळे मी माझे वृद्धत्व पार विसरले आहे.