आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Queries Regarding Higher Education In America And Their Solutions

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काही शंका काही उत्तरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेख लिहिताना काही प्रश्न जे विशेषत: पालकांचे असतात ते पुन्हा पुन्हा ई-मेलद्वारे येत असतात. अमेरिकेतील शिक्षणाविषयी काही टिपिकल समजांना दिलेली ही उत्तरे

शिक्षणाचा खर्च

अमेरिकेतील शिक्षण खूप महागडे असते आणि ते आपल्याला बिलकुल परवडणारे नाही असा समज अजूनही बर्‍याच पालकांच्या मनात घर करून आहे. त्यातल्या त्यात मोठय़ा शहरांमध्ये हा समाज बर्‍यापैकी नाहीसा झालाय; पण छोट्या शहरांमध्ये मात्र अजूनही खर्च झेपेल का ही शंका तग धरून आहे. यामुळे बरेच पालक पुढे योग्य ती चौकशी न करताच अमेरिकेत शिकण्याचा विचार थांबवतात. यामुळे शक्य असूनही निव्वळ गैरसमजातून हे असे घडते. बरे मग खर्च किती होऊ शकतो? याचे उत्तर असे आहे की जर काळजीपूर्वक विद्यापीठे निवडली तर खर्च 20 लाख रुपयाच्या आत होऊ शकतो. 20 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची उपलब्धता बँकेकडून करून दिली जाते. अर्थात स्कॉलरशिप मिळाली तर तो अजूनही कमी होईल. बरे असेही नाही की स्वस्त असलेले विद्यापीठ चांगले असेलच. त्यापेक्षा थोडे महाग वाटणारे; परंतु संशोधनाच्या उत्तम संधी असलेले, जिथे स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता फार आहे ते विद्यापीठ अत्यंत योग्य ठरू शकते. यामुळे सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा.

शिक्षणानंतरच्या संधी

अमेरिकेतील मंदीनंतर बर्‍याच पालकांच्या मनात ही शंका घर करून असते जी रास्तही आहे. कारण पैसे खर्च केल्यानंतर ते पैसे परत मिळणे (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट) तितकेच महत्त्वाचे आहे. याचे उत्तर म्हणजे चांगल्या विद्यार्थ्याला उत्तम संधींची कमतरता नसते. यासाठी मग विद्यार्थ्याचा त्या विद्यापीठातील अनुभव, त्याचे गुण, त्याचे नेटवìकग या गोष्टी अमेरिकेत नोकरी मिळवण्यास उपयोगी ठरतात. अर्थात काही विद्यार्थ्यांना नोकरी मिळणे थोडे अवघड होऊन बसते. अशी परिस्थिती कमी गुणवत्तेच्या विद्यापीठातून शिकणार्‍या विद्यार्थ्याच्या वाट्याला येते. या गोष्टीची काळजी अमेरिकेला जाण्याआधीच घेता येऊ शकते. विद्यापीठाबद्दल सखोल माहिती असल्यास करिअर करणे सोपे होते.

मास्टर्सनंतर परत यावे की अमेरिकेत राहावे?

हा खरेतर प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. गेली 2-3 वष्रे मी बघतोय की मास्टर्स झाल्यावर काही मुले परत यायचादेखील विचार करतात. हा निर्णय अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये उपलब्ध असलेल्या संधीनुसार ठरते. जर भारतामध्ये 12-15 लाख रुपये वर्षाला मिळत असतील तर मुले भारतात येऊन करिअर करायचा विचार गांभीर्याने करताना दिसतात. माझ्या मते तुमची पदवी संपल्यावर थोडा अनुभव घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मग पुढे कुठे करिअर करायचं आहे याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

विद्यापीठाचा रँक कितपत महत्त्वाचा ?

मी आधी लिहिलेल्या काही लेखांमध्ये ह्या विषयाचा उल्लेख केलेला आहे. माझे मत आहे की, विद्यापीठाचे रँकिंग ठरवताना बरेचसे निकष लक्षात घेतले जातात. त्यावरून रँकिंग दिली जाते. पण विद्यापीठ ठरवताना फक्त रँकिंग हा एकच निकष लावणे चुकीचे आहे. विविध संस्था विद्यापीठांचे रँकिंग ठरवत असतात. त्यातल्या त्यात यूएस न्यूजचे अहवाल विश्वासार्ह मानले जातात. वरच्या क्रमांकावर दिसणारे विद्यापीठ बाकी सर्व विद्यापीठांपेक्षा सर्वच बाबतीत सरस असेल असे बिलकुल नाही. त्यामुळे रँकिंग हा अनेक निकषांपैकी एक निकष असावा. अंतिम निकष नव्हे.

बारावीनंतर जावे की पदवीनंतर ?

बारावीनंतर पदवी शिक्षण देणार्‍या काही चांगल्या संस्था भारतात उपलब्ध आहेत. त्यामानाने पदव्युत्तर शिक्षणाची फारशी चांगली विद्यापीठे आपल्याकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मास्टर्स अमेरिकेत जाणे हे तसे रूढ मानले जाते. आता बारावीनंतर शिक्षणासाठी स्पर्धा वाढल्याने पण त्या प्रमाणात अत्यंत चांगल्या दर्जा असणार्‍या संस्था न वाढल्याने विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेण्याचा विचार करतात. बारावीनंतर शिकण्यासाठी अमेरिकेला जाणे हा आयआयटीजेईई किंवा सीईटी किंवा तत्सम पर्यायांपैकी एक पर्याय असावा. आणि शेवटी जो पर्याय उत्तम असेल तो निवडावा. कारण उत्तम करिअर करणे हे जास्त महत्त्वाचे.