आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोट भरल्यानंतरचे प्रश्‍न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशीच परवा कुठून तरी येत होते, दुपारी! लोकलमध्ये एक खूपच म्हातारी बाई भीक मागत होती. आता काय असतात भिकारी सगळीकडे, वाईट पण वाटतं आपल्याला, पण नाहीतरी एकाला देऊन संपणारे का प्रॉब्लेम? बरं, या मुलांना पैसे द्यायचेच नसतात, काय अफू नि ड्रग्जमध्ये अडकलेली असतात, असे सगळे ऐकून असतो आपण.
बाकी त्या म्हातारीच्या डोळ्यात खूपच प्रचंड भूक दिसली. जिवाच्या आकांताने एक वेळच्या खाण्यासाठी असे करायची वेळ यावी न एखाद्यावर हे अत्यंत दारुण आहे! आता यासारख्या अनेक दुर्दैवी नि दारुण घटना आपल्याला आजूबाजूला दिसत असतात, आपण हळहळत असतो, अरेरे वगैरे म्हणतो नि लागतो आपल्या कामाला. नशीब, भोग, जागतिक आर्थिक सामाजिक घडामोडी, आयपीएल, सगळं ठीके हो, नि आपण करून किती करू शकणार हे तर तोंड उघडण्याआधीच मान्य आहे. पण विरोधाभास किती असावा, तफावत किती असावी जगण्यात एकेकाच्या? पूर्वी गोष्टींच्या पुस्तकात कसे सोपे होते, प्रजेला सुखी ठेवणे राजाची जबाबदारी. तो आपला रात्री वेश बदलून बघायचा काय हालहवाल आहे ते. आता जरा गोंधळ आहे, लोकशाही असल्यामुळे प्रजेला सुखी ठेवणे ही जबाबदारी कोणाची, याबाबतीत मोठा गोंधळ आहे.


खरी आम जनता कोण याही बाबतीत जरा घोळ आहे. मला वाटतं, कांदा महाग झाल्यावर ज्यांचे वांधे होतात नं, ते आम पब्लिक. नि त्यांच्या खाली जगण्याचा एक वेगळा थर नि पातळी असते आम जनतेनेही न अनुभवलेली! ती म्हातारी त्या पातळीतली होती. खायला द्यायला काही नव्हते, पैसे दिले जरासे. माझा अर्थशास्त्राचा अभ्यास वगैरे नाहीच, पण प्रश्न पडतात बुवा काही. कम्फर्ट, एक्सक्लुझिव्हनेस याबद्दलच्या शंका. रस्त्यावरची पाणीपुरी प्लेट अजून 10 रुपयांत मिळते नि मॉलमध्ये 80 रुपयांत? (तीही बेचव!)


करिना कपूर किंवा सोनम कपूर चार लाख रुपयांची पर्स घेऊ शकतात, घेऊद्यात बापड्या. त्याबद्दल काही म्हणणे नाहीच, फक्त जर प्रजेला सुखी करायचे थोडेसे प्रयत्न करावेत म्हणून पर्स न घेता त्यांनी सत्पात्री दान करायला काय हरकते?


असे मी एकदा माझ्या एका मित्राला म्हणत होते, एका टप्प्यानंतर म्हणजे हे हजारो करोड कमवून झाल्यानंतर, लोक जे पैसे कमावतात ते त्यांनी वाटावेतच की. त्यावर तो असे म्हणाला होता, दुस-यांच्या पैशाचे काय करावे ह्याचे प्लॅनिंग करणे सोपेच असते.


आम जनतेलाही शक्य अशा पद्धतीचे अनेक उपाय आहेत, जे या भयाण परिस्थितीत जगणा-या लोकांना जरा मदत करू शकतात. पण एनजीओ असतातच नं, आणि आम्ही देणग्या देतो घरी ती मुले अनाथाश्रमासाठी मदत मागायला येतात तेव्हा.


ती एक गोष्ट आहे नं. तळ्यातले बेडूक असतात, त्यांना राजाच नसतो. मग ते देवाकडे राजा मागतात, देव एक ओंडका देतो. ते आधी खूश पण नंतर बोअर होतात. कारण च्यायला राजाच्या अंगावर उड्या मारल्या तरी त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. असे कसे? राजाचा कसा वचक पाहिजे. मग ते पुन्हा दुसरा राजा मागतात देवाकडे नि देव साप पाठवतो. अर्थात बेडकांचा नायनाट वगैरे होतो. मला ही गोष्ट कळली नाहीच कधी. कारण ओंडका राज्य चालवत असला तर आनंदीआनंद गडे की साप चालवायला लागल्यावर आनंदीआनंद गडे म्हणायला आपण असूच याची काय खात्री?


अशी परिस्थिती सगळीकडे आहे. जसे आपण नुसतेच बोलणारे नि हळहळणारे लोक असतो, तसेच न बोलून खूप काही करत असणारे लोक असतात नि खूप बोलून न करणारेही लोक असतात. आपले जुने कपडे कामवालीला द्यावेतच, पण कधीतरी मुद्दामून नवीन पण घेऊन द्यावेत. (दिवाळीला देतोच की असे म्हणण्यात काही पॉइंट नाही.)
आणि हे खूप करणारे नि न बोलणारे लोक असतात नं, त्यांनी आमच्यासारख्यांची शाळा घ्यावी. असे सोपे सोपे उपाय असतीलच की, ज्याने सगळे करिना कपूरसारखी साडेतीन लाखांची पर्स किंवा चप्पल घेऊ नाही शकणार, पण तीन वेळचे नक्की खाऊ शकतील. असेलच की काहीतरी!


ते काहीतरी करावे असे वाटणेच हरवलेय का आपल्यातले? किंवा असे काही डोळे भरून येईल असे वाचले, पाहिले नि ऐकण्यापुरते मर्यादित राहिलेय? आपल्या तथाकथित गुंतागुंतीच्या समस्यांच्या नादात?
चित्रपटातले हॅपी एंडिंग नि पुस्तकातली ‘साठा प्रश्नांची सुफळ कहाणी’ कायमच काल्पनिक होती, नै?