आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकटेपणाचे प्रश्‍न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रुग्णालय कर्मचा-यांसाठी असणारं एक सत्र संपवून मी केंद्रात परतले. हॅलो मॅम! पुस्तकात खुपसलेलं डोकं वर काढून प्रीतीने उत्साहात विश केलं. मीही हसून तिला प्रतिसाद देत आत शिरले. नंतर आलेल्या एक-दोन पेशंटशी बोलून मी जरा मोकळी होत्येय न होत्येय तोच प्रीती आत आली. तुम्ही इथे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पेशंटना पण समुपदेशन करता? तिने विचारले. हो गं, मी उद्गारले.

मग थोडा वेळ ती त्याबद्दलच इकडचं तिकडचं बोलत राहिली. चौकसपणे प्रश्न विचारता विचारता मधेच एकदम गंभीर होत म्हणाली, मॅम, खरं तर आज तुम्ही एकट्याच आहात म्हणून मुद्दामच मी बोलायला आले. मला पण याच बाबतीत तुमचा सल्ला हवा आहे. माझा हात घट्ट पकडत ती म्हणाली, मॅम, मला खरंच मरावंसं वाटतं, जगावंसं नाही वाटत मला! सगळं निरर्थक, भकास, वैराण वाटतं. बोलता बोलता ती रडायलाच लागली. सरळ सुंदर रस्त्यावरून चालता चालता अचानक खड्ड्यात पाय पडून तोंडावर पडावं तसं माझं झालं. मला इतका धक्का बसला होता की मी स्तब्धच झाले.

प्रीतीकडून असल्या बोलण्याची मी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. स्वत: डॉक्टर असलेली, प्रथितयश संस्थेतून डीएचएचा कोर्स करणारी, दिसायला सुंदर, वागा-बोलायला अत्यंत लाघवी, श्रीमंत. कुणालाही हेवा वाटावी अशी मुलगी! तिच्या मनात इतकी खळबळ चालू असेल अशी पुसटशी शंकाही मला तोपर्यंत आली नव्हती! हळूहळू तिच्याशी बोलून तिला शांत करत मी तिची माहिती घेतली आणि तिच्या मनात सतत किती उलथापालथ होत असेल याची स्पष्ट कल्पना आली. आत्तापर्यंतचा तिच्या आयुष्याचा प्रवास कोणालाही भावनिकदृष्ट्या थकवणाराच होता! तिचे वडील दुबईतील एक अत्यंत यशस्वी उद्योजक! घरात पाण्यासारखा पैसा वाहत होता. तो पैसा खर्च करण्यात तिची आई अत्यंत बिझी असायची. प्रीती अन् तिची लहान बहीण या दोघी आपल्या आईवडिलांची सततची भांडणं पाहतच मोठ्या होत होत्या. या भांडणाची झळ त्यांनाही बसत होतीच. त्यातच तिचे एक काका नेहमी त्यांच्या घरी येत असत. त्यांच्याकडून तिने लैंगिक शोषणाचा भयंकर अनुभव घेतला. तिने याबाबत काही तोंड उघडून सांगण्याचा प्रश्नच नव्हता, पण एक दिवस तिच्या आईनेच ते पाहिले. त्यानंतर त्या काकांचे घरात येणे बंद झाले. मात्र त्यानंतर प्रीतीच्या गोंधळलेल्या, घाबरलेल्या मनावर हळुवार फुंकर घालणे तिच्या आईला काही जमले नाही. या वातावरणामुळे प्रीती शाळेत, मित्रमैत्रिणींत जास्त रमू लागली. तिची हुशारी, तिचं सौंदर्य, तिचा स्वभाव यामुळे ती सर्वांना हवीशी वाटत असेच! तीही जिथे कुठे थोडासा मायेचा ओलावा मिळेल तो टिपून घेऊ लागली. मायेचा ओलावा शोधायच्या नादात भरकटू लागली. यातूनच कुणीतरी तिचा गैरफायदा घेतला आणि ती किशोरावस्थेतच गरोदर राहिली. काहीच न सुचून तिने राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

दुर्दैवाने यानंतर तिची रवानगी भारतात करण्यात आली. बहिणीशी असलेला तिचा भावबंधही तुटल्यासारखा झाला. उत्तम शाळेत ती शिकू लागली. तिनेही आपले मन पूर्णपणे अभ्यासात रमवले. हुशार तर ती होतीच! तिने मेडिकलला प्रवेश घेतला. आता तिने अभ्यासातच मन रमवले. डॉक्टर झाली! यादरम्यान तिचे एक-दोघांशी सूर जुळत होते, पण तेही वेळ येताच बाजूला सरले होते. आता ती स्वतंत्र घर घेऊन एकटी राहत होती, काम होतं, पैशाचा तर प्रश्नच नव्हता. पण दिवसभराचं काम संपलं की सोबतीला फक्त एकटेपणच होतं! यातूनच ती पुन्हा एकदा प्रेमात पडली. पण दुर्दैव! हा माणूस तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता, विवाहित होता आणि आपला संसार आपण सोडू शकत नाही, असे त्यानं तिला आधीच सांगितलं होते. सुरुवातीला तिला याचे फारसे काही वाटले नाही, पण आता मात्र या नात्यातली असुरक्षितता आणि फोलपणा तिला जाणवायला लागला होता, एकटेपण पुन्हा डोकं वर काढू लागलं होतं आणि ती पुन्हा मनाने खचली होती. तिची कहाणी ऐकून मी थक्कच झाले! तिने सांगितलेल्या घटनांपैकी एक घटनादेखील एखाद्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यास किंवा नैराश्याच्या खाईत लोटण्यास पुरेशी होती. इथे ही उणीपुरी पंचविशीची मुलगी मात्र इतक्या सगळ्या गोष्टींचा सामना एकटीच करत होती. मला खरंच तिचं कौतुक वाटलं!
(ती हा सामना कसा करत होती आणि तरीही तिला माझी मदत का घ्यावीशी वाटली, ते पाहूया या लेखांकाच्या पुढच्या भागात.)

mrudulasawant13@gmail.com