आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाईट दांडगोबा लांडगा.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘लिटील रेड रायडिंग हुड’ नावाची युरोपात १४ व्या शतकापासूनची एक लोककथा आहे. ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये शतकानुशतके वेगवेगळ्या भाषांमधून, देशांमधून पुन:पुन्हा येत राहिली आहे. असे काय आहे या रेड रायडिंग हुडमध्ये? एक कॉमन फॅक्टर आहे. त्यामधील खलनायक ‘बिग बॅड वुल्फ’- ‘वाईट दांडगोबा लांडगा.’
लिटील रेड रायडिंग हुड नावाची युरोपात १४ व्या शतकापासूनची एक लोककथा आहे. ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये शतकानुशतके वेगवेगळ्या भाषांमधून, देशांमधून पुन:पुन्हा येत राहिली आहे. या कथेवर अनेक चित्रपट, नाटके, बॅले, म्युझिक अल्बम, सर्व माध्यमांतून सर्व प्रकारे आविष्कार झाले. असे काय आहे या रेड रायडिंग हुडमध्ये? एक कॉमन फॅक्टर आहे. त्यामधील खलनायक ‘बिग बॅड वुल्फ’- ‘वाईट दांडगोबा लांडगा.’

गोष्ट सरळ साधी आहे. एका गावामधील लहान मुलगी दूरवर राहणाऱ्या आपल्या आजीसाठी जेवण घेऊन जाणार असते. (वेगवेगळ्या प्रांतानुसार तिचे पदार्थ बदलत राहतात) द्राक्षाचा रस, फळे, काही ब्रेड, केक, चीज वगैरे वगैरे. या मुलीला तिची आई थंडी लागू नये म्हणून लाल रंगाचे टोपडेही डोक्यावर बांधून देते, हेच ते ‘रेड हुड’. या तिच्या प्रवासात मध्ये जंगल लागणार असते, म्हणून तिची आई तिला सूचना देते की रस्ता सोडून कुठेही भरकटू नकोस, सरळ नाकासमोर चालत जा. मुलगी प्रवासाला निघते आणि जंगलामध्ये गेल्यावर तिचा पाठलाग एक दांडगोबा काळा क्रूर लांडगा करू लागतो, त्याला तिच्याकडील खाद्य आणि त्या निरागस मुलीलाही खायचे असते. अत्यंत मधाळ आवाजात तो तिची चौकशी करतो आणि ती त्याला आपण आजीकडे खाणे घेऊन चाललो आहोत, असे सांगते.

तो तिला म्हणतो, ‘तू फक्त खाणे घेऊन का चाललीस? जंगलामध्ये जा आणि काही रानफुलेही तोडून ने ना. आजीला बरे वाटेल.’
मुलगी अजाणतेपणी जंगलामध्ये फुले आणण्यासाठी जाते आणि लांडगा तिच्या आजीच्या घरी जाऊन तिला मारून तिच्याकडचे कपडे घालून तिच्याच पलंगावर चादर ओढून झोपतो.
इकडे ही मुलगी खाद्य आणि फुले घेऊन आजीच्या घरी येते. आजीला हाक मारते. आजी ‘ओ’ देते. तेव्हा तिच्या लक्षात येते, आजीचा आवाज बदललेला आहे. खाद्य घेताना तिचा हात मोठा झालेला आहे. नेहमीपेक्षा डोळे मोठे वाटत आहेत. तोंडही मोठे दिसत आहे. तिच्या या शंकांना थातुरमातुर उत्तरे देत लांडगा प्रथम जेवण जेवतो आणि मग त्या पोरीलाही खातो. (बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांची मारामारी होते) एवढे जेवण झाल्यावर त्याला ग्लानी येते आणि तो झोपतो. त्यानंतर लाकूडतोड्या काका येतो आणि त्या लांडग्याचे पोट कापून त्या दोघींना बाहेर काढतो.

याच गोष्टीचे १४ व्या शतकापासून आजतागायत अनेक अवतार झाले. ‘पिटर अँड वुल्फ’, ‘द वुल्फ अँड सेवन किडस्’, ‘जोन अँड व्हेल’, ‘लाइफ ऑफ सेंट मार्गारेट’ अशा वेगवेगळ्या नावाने ते युरोपात प्रसिद्ध झाले.

मात्र या सर्वात कॉमन फॅक्टर राहिला तो क्रूर, हिंसक, काळा लांडगा; खलनायक. या गोष्टी अनेकांच्या नावावर खपल्या तरी आद्य प्रकाशक होता ‘चार्स पेरुंट’.

एक सरळ साधी लोककथा आणि त्यामधील क्रूर लांडगा जगभरात इतका का बरे प्रसिद्ध झाला? त्याची अनेक कारणे आणि स्पष्टीकरणे लोक देतात. गावातील, समाजामधील सुरक्षा सोडून बाहेर पडणाऱ्या स्त्री किंवा मुलीला काय काय गोष्टींचा सामना करावा लागतो? आपल्या प्रेमाच्या आई-वडलांनी काळजीपूर्वक सांगितलेला सरळ मार्गाचा सल्ला नकळत का होईना न पाळल्यामुळे रस्ता सोडून जंगलात जाण्यामुळे काय आपत्ती ओढवतात?

काही गोष्टींमध्ये अधिक हिंसाचाराचीही वर्णने आहेत. मुलीला आजीचे मांस खाण्यास देणे, तिची हाडे शेकोटीमध्ये वापरणे आदी. त्याचबरोबर रेड हुड म्हणजे सूर्य, काळा लांडगा म्हणजे रात्र आणि पोट फाडणे म्हणजे पहाट, असे कालचक्राचे प्रतीकही या गोष्टीला मानले गेले. शरद ऋतू ‘मे’ महिना आणि पुन्हा हिवाळा असे ऋतूचक्रही या गोष्टीतून दिसते, असे मानतात. या रेड हुड किंवा लाल टोपीला हे अनेक अर्थ बहाल केले गेले. अजाण कुमारिका या अन्यायातून किंवा या बाहेरील जगाच्या अनुभवातून गेल्यावर कुमारिकेची बाई होते. तिला पदर येतो, त्याचे हे लाल प्रतीक आहे. किंवा लाल रंग रक्ताचा आहे आणि तो तिच्या प्रियकराच्या पहिल्या संबंधाचा आहे. लाल रंग पहाटेचे रक्त सूचित करते. एवढंच काय, त्याला रोमँटिक टच देण्यासाठी ‘रायडिंग हुड रेड’ नावाची लिपस्टिक शेडही बाजारात आणली गेली. यातील प्रमुख पात्र म्हणजे काळा क्रूर लांडगा. हा मात्र सतत आणि सर्वत्र राहिला. सर्वव्यापी खलनायक वेगवेगळ्या रूपात प्रकटणारा.

दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरण आठवते? दिवसाढवळ्या गावातील सुरक्षित वातावरणात चालत्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार होतो. तिच्या गुप्तांगावर प्रहार केले जातात. नंतर चालत्या बसमधून बाहेर फेकले जाते आणि ती मदतीसाठी अर्ध्या तासाहून जास्त वेळ रस्त्यावर तळमळत असते, हे काय दर्शवते? शहराच्या सुरक्षित वस्तीमध्ये- जंगलामध्ये नाही- असा अत्याचार होतो आणि तो करण्याचे बळ आधुनिक लांडग्यांना कोठून येते? कारण ही प्रवृत्ती आहे. ती जिथे जिथे जंगलासारखी अव्यवस्था आहे, अनागोंदी आहे, तेथे तेथे डोके वर काढणार! खरं तर या शहरात राजरोस फिरणार्‍या लांडग्यांना, खलनायकांचे पोट फाडून निरागस कुमारिकांना भीतीच्या सावटाखालून मुक्त केले पाहिजे. चौदाव्या शतकापासून चालत आलेल्या या लिटील रेड रायडिंग हुडची आणि तिच्या खलनायकाची गोष्ट सांगण्यामागे एकच उद्देश होता. कोणीतरी या २१व्या शतकामध्ये गोष्टीमध्ये आला तसा लाकूडतोड्या किंवा बंधनतोड्या यावा आणि त्याने निरागसतेला मुक्त करावे, विमुक्ता म्हणून त्या मुलीने निर्धास्तपणे मोकळ्या अवकाशात झेप घ्यावी. असा कोणी बंधनतोड्या आला तर आजपर्यंत खलनायकांची कामे करून आयुष्याची काळी बाजू रंगवणारे प्रतिभावंत कलाकार आपल्या प्रयत्नांना योग्य न्याय मिळाला म्हणून स्वत:ही मोकळा श्वास घेतील.
(raghuvirkul@gmail.com)