Home | Magazine | Madhurima | Raghu Vyavahare Writes About Military recruitment

मिल्‍ट्रीतल्‍या भरतीची गोष्‍ट

रघू व्यवहारे | Update - Oct 03, 2017, 12:00 AM IST

लष्करात भरती होण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. घरचेही या स्वप्नात सहभागी असतात. या स्वप्नाच्या पूर्तीसाठी वडलांसोबत घा

 • Raghu Vyavahare Writes About Military recruitment
  लष्करात भरती होण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. घरचेही या स्वप्नात सहभागी असतात. या स्वप्नाच्या पूर्तीसाठी वडलांसोबत घालवलेलेे दोन दिवस बरंच काही शिकवून गेलेत या लेखकाला.
  मी बीएस्सी फर्स्ट इयरला असताना मिल्ट्रीत भरतीसाठी गेलो होतो. सरळ भरती असायची, शारीरिक पात्रता आणि मैदानी कसोटी असावी बहुधा. मी सकाळीच चहापोळी खाऊन निघालो. सोबत दादा (वडील) होते. ते सकाळी काही खात नसत. दादा फक्त चहावर. भरतीसाठी प्रचंड गर्दी! आम्हाला छावणी परिसरात वडाच्या झाडाखाली बसवलं. दादा गेटबाहेर उभे. एप्रिल महिना होता. एकएक करत प्रत्येकाचे मोजमाप चालू होते. ऊन हळूहळू वाढायला लागलं. दादा गेटवर अजूनही उभे होते. नजर माझ्याकडेच होती. आसपास बसायला सावलीदेखील नव्हती. माझा नंबर कधी येईल म्हणून ते वाट पाहत होते. माझ्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. आम्ही सावलीत असूनही ऊन लागत होते. भूकही लागली होती. दादांच्या गेटवर येरझारा चालू होत्या. भूक त्यांनाही लागली असावी.
  आता सूर्य चांगलाच वर आला होता. मला प्रचंड भूक लागली होती. माझी नजर गेटकडे वळली. दादा तिथं नव्हते. माझा नंबर यायला अवकाश होता. माझ्या बाजूच्या मुलाने मला खांद्याला हात लावून दादा बोलवत असल्याचं सांगितलं. मी पाहिलं, दादांच्या हातात कसला तरी पुडा होता. पण रांगेतून निघून जावं तर नंबर जाईल आणि असं जाताच येणार नाही म्हणून मी नाही म्हणून हात हलवला. दादा गेटवर त्या शिपायाकडे विनवणी करू लागले. थोड्या वेळाने तो शिपाई आत ऑफिसमध्ये गेला ते पाहून दादा धावत पळत आत मैदानावर आले आणि भज्यांचा पुडा माझ्या हातात ठेवून परत धावत गेले. आजूबाजूची मुलं हसायला लागली. मला थोडी लाज वाटली. धोतर आणि पांढऱ्या कुर्त्यात धावणारे वडील माझ्या काळजीने कासावीस झाले होते. स्वत: काही न खाता माझ्यासाठी; केवळ माझ्यासाठी उन्हातान्हात उभे होते! मी आणि मागे असलेल्या मुलाने मिळून भजी खाल्ली. पोटाला आधार वाटला. शेवटी साडेतीन वाजता माझा नंबर आला. सहा वाजता मी गेटबाहेर आलो.
  मी सैनिक होणार या खुशीत दादा गप्पा मारत होते. आम्ही चालत चालत दीड तासानंतर बसस्टँडवर आलो. मला भूक लागली होती. तिथं समोर गाडीवर एक डझन केळी घेतली. मी दादांना आग्रह करून खायला लावली. दोघा बापलेकांनी रात्री आठची गणोरी मुक्कामी जाणारी गाडी पकडली आणि मी सैनिक होणार या विचारांत घरची वाट धरली!
  मिल्ट्रीत भरतीचा आज दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही बापबेटे छावणीत मैदानावर हजर. आज माझी शारीरिक चाचणी होती. कालचा अनुभव पाठीशी असल्याने आज सोबत डबा घेऊन आलो. डब्याची पिशवी दादांकडे ठेवून मी आत वडाच्या झाडाखाली रांगेत उभा राहिलो. आज धावणे, लांब उडी, ऑबस्टॅकल, भिंत पार करणे, अशा विविध चाचण्या होणार होत्या.
  दादा गेटच्या बाजूला बसलेले. आज माझ्या आग्रहाखातर दादा छत्री घेऊन आलेले. पण अजूनही छत्री उघडली नव्हती.
  आमची नावं पुकारली क्रमाने. आम्हाला तिथून पडेगाव रोडच्या इकडे घेऊन आले. दहादहाचे गट पाडून एकएक चाचणी चालू होती. इकडे आम्ही दिसेना कुठे नेलं असावं याचा विचार करत दादा सगळा परिसर पिंजून काढत बसले. व्यवस्थेतील लोक किती कोडगे असतात, तो गेटवरचा शिपाई सांगू शकत होता, पण त्याने तुसडेपणाने दादांना तिथून हाकलून लावायचा प्रयत्न केला.
  दुपारी दोन वाजता थोडा वेळ ब्रेक मिळाला. मी धावत आलो तर दादा तिथं नव्हते. त्या शिपायाला विचारलं. तो म्हणाला, मी काय राखण बसलो काय? अत्यंत उद्धट आणि गचाळ भाषेत प्रत्युत्तर देत होता. मी भुकेने व्याकूळ झालो होतो. तोच दुरून रस्त्याने दादा येताना दिसले. माझ्या जिवात जीव आला. दादा मला शोधत भटकत होते. आम्हाला जिथं नेलं त्याच्या दुसऱ्या गेटवर दादा थांबले होते. आता बाकी मुलं दिसली पण मी दिसेना म्हणून परत इकडे आले होते. ठेचा, भाकरी आणि पिठलं खाऊन परत आलो. सकाळचं कॅनमधलं पाणी गरम झालं होतं एव्हाना! दादांच्या बुटाचा एक खिळा वर आला होता. पायाला टोचून टोचून पाय हुळहुळा झाला होता. दादाने एक दगड घेऊन तो खिळा ठोकायचा प्रयत्न केला, पण तो खिळा काही आत गेला नाही. दादांनी बूट काढून पिशवीत ठेवला. भर उन्हात अनवाणी ते मला सोडायला परत तिथपर्यंत आले. डांबरी सडक तापलेली. पायाला चटके बसताहेत तरी दादा शांतपणे चालत होते. मी सैनिक होणार, आयुष्याचा प्रश्न सुटणार. अशी अनेक स्वप्नांची रास डोक्यात गारवा निर्माण करत होती.
  सगळ्या चाचण्या संपवून आम्ही सहा वाजता परतीच्या मार्गाला लागलो. आठ दिवसांनी निवड झालेल्या उमेदवारांची यादी लागणार होती. मी आणि दादा दोघंही स्वप्न रंगवत यादी लागायची वाट पाहत होतो.
  पुढे यथावकाश निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली. माझं नाव त्यात नव्हतं. कुणाला फारसं काही वाटलं नाही. दादांनी तसं काही दाखवलं नसलं तरी ते निराश झाल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. पुढच्या वेळी आपण आणखी प्रयत्न करू, असं मी मनोमन ठरवलं. पण आपण ठरवू त्याच दिशेने वाटचाल होईल हे प्रत्येक वेळी शक्य नसतं. नियती ठरवेल ते स्वीकारण्याशिवाय आपल्या हातात काय असतं! पण अत्यंत साध्याभोळ्या प्रामाणिक आईवडलांचे संस्कार आत खोलवर रुजलेत. आसमंतातील प्रामाणिकपणा हा श्वासागणिक आत पोहोचला. दुर्दैवाने मी सैनिक होऊ शकलो नाही; पण यशस्वी मात्र झालो. प्रत्यक्ष सीमेवर देशसेवा न करता, प्रामाणिकपणे कष्ट करून व्यक्तिगत पातळीवर शक्य होईल ते सगळे नियम, कायदे पाळून, स्वच्छता राखत आपली भूमिका पार पाडतोय.
  साधं सिग्नलवर तीस सेकंद थांबायचंच असतं, हे कळतं मला.
  . रघू व्यवहारे, औरंगाबाद raghu.vyavahare@gmail.com

Trending