आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपस्तंभ ‘षांताराम’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रकला, जाहिरात, नाटक, सिनेमा, साहित्य आदी क्षेत्रांत नाममुद्रा उमटवलेल्या कलावंतांना घडवण्यात सिंहाचा वाटा उचलेले निवृत्त कलाशिक्षक षांताराम पवार यांचा ‘कमर्शियल आर्टिस्ट गिल्ड’ संस्थेतर्फे नुकताच ‘गुरू ऑफ गुरूज’ हा किताब देऊन सन्मान करण्यात आला. त्यानिमित्त पवार यांच्या बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणारा हा लेख...
‘षांताराम पवार’ या पोटफोड्या ‘षांतारामा’ने अनेक समज, गैरसमजाच्या भिंती आयुष्यात फोडल्या आहेत. जन्मजात बंडखोर चित्रकार आणि मास्तर असल्यामुळे ‘गुरू’जी, ‘मास्तर’ असल्या ठरावीक साच्यामधल्या प्रतिमांना सुरूंग लावत षांताराम पवारांनी जे. जे. इिन्स्टट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट‌्सच्या प्रांगणात अक्षरश: राज्य केले.
आम्ही १९७४च्या जूनमध्ये अॅडव्हान्स कोर्सच्या वर्गात प्रवेश केला, तेव्हा आपल्या वर्गावर षांताराम पवार नावाचे वादळ येणार आहे, हे आम्हाला आधीच कळले होते. पूर्ण फिनिश केलेले वर्क स्टुडन्टसमोर फाडून टाकतात किंवा त्या स्टुडन्टलाच फाडण्यास सांगतात आणि वर हेही एकवतात, ‘का फाडले आहे हे लक्षात ठेव. पुन्हा अशी चूक करू नकोस.’ किंवा बिनधास्त कॉलेजच्या आवारात ‘चारमिनार’चा धूर काढत असतात. त्यांच्या केबिनमध्ये अॅश ट्रे म्हणून चक्क चांगली एक फुटाची झाडाची रिकामी कुंडीच ठेवण्यात आली होती.

अशा जमदग्नीबरोबर सामना होणार, म्हणून आम्ही दहा-बारा पोरं सुट्टीमध्ये दाढ्या, मिश्या वाढवून, लुंगीच्या कापडाचे झब्बे आणि घोट्यावर फाटलेल्या बेल बॉटम जीन्स््, पायात पुणेरी लाल जोडे वगैरे खास गंजडी, हिप्पी छाप वेषामध्ये वर्गात हजर होतो. मास्तरची एन्ट्री झाली आणि वर्गातील ५०-६० पोरांमधून बरोबर आम्हालाच वेचून काढून त्यांनी ‘गेट आऊट, माझ्या वर्गात बसायचे नाही', म्हणून वर्गाबाहेर काढले. ४०-४५ मिनिटांच्या लेक्चरनंतर बाहेर व्हरांड्यात येऊन माझ्याकडे "चारमिनार' मागत सांगितले, ‘हे वर्गात बसलेले विद्यार्थी आहेत ना, त्यांना शिकायचं आहे. त्यांना निवांत शिकू द्या. आपण सर्व मवाली वर्गाबाहेरच शिकू.’ हा मास्तर आपल्यातील आहे, ही ओळख तेव्हाच पटली आणि पहिल्या दिवशी बाहेर काढलेले आम्ही म्हणजे ‘आउटस्टॅन्डिंग’ स्टुडंट खरोखरीच ‘आऊटस्टॅन्डिंग’ कधी झालो, समजले नाही. ज्याने आम्हाला वर्गाबाहेर काढले, त्याच मास्तरने आम्हाला फायनल वर्षी प्रोजेक्ट वर्क करण्यासाठी अख्ख्या कॉलेजच्या चाव्या अत्यंत विश्वासाने हातात दिल्या.
एवढेच नव्हे, तर रात्री काम संपल्यावर त्यांच्याच केबिनमध्ये आम्ही वॉचमन आणि प्यूनकडून घेतलेल्या गोधड्या, घोंगड्या अंगावर घेऊन झोपत असू. एक-दोन दिवस नाही तर पूर्ण महिनाभर.दुपारी तीन वाजले की, ‘रघ्या वर्गात काय करतोस? कॅन्टीनमधल्या भज्यांचा वास आला बघ,’ म्हणून कॅन्टिनमध्ये हाकलणारे मास्तर, स्वत: हातात ब्रश घेऊन काम करून दाखवताना घरात झाडू मारत जा, म्हणजे झाडू मारणे आणि ब्रशने रंग लावणे फारसे वेगळे नाही हे समजेल, असे म्हणत. प्रत्येकाचा स्ट्राँग पॉइन्ट लक्षात घेऊन त्याची दिशा दाखवत असत.
मी माझ्या कॅम्पेनच्या काही स्लोगन दाखविल्यावर ते सर्व काम बाजूला ठेवत म्हणाले होते, तुझी कवितांची वही कुठे आहे? मी कविता करतो, हे मी कुणालाच सांगितले नव्हते; मग यांना कसे माहीत झाले, अशा विचाराने मी त्यांना विचारले, ‘कोणी सांगितले तुम्हाला मी कविता करतो म्हणून?’ तर ते हसत म्हणाले, ‘कोणी कशाला सांगायला पाहिजे, या चार स्लोगन वाचून कळतं ना! उद्या आण तुझी चोपडी आणि नंतर आर्टवर्क वगैरे करण्याच्या भानगडीमध्ये पडू नकोस. सर्व वर्गाच्या स्लोगन आणि कॉपी लिही. तेवढे पुरे आहे...'

मला सिनेमाकडे ढकलणारे, पुरु बेर्डेला नाटकं, एकांकिका लिहिण्यास भाग पाडणारे, दुसऱ्या कुणाला फोटोग्राफी कर म्हणून सांगणारे, एखाद्याला इलेस्ट्रेशन कर म्हणून मागे लागणारे सर. कित्येक वर्ष ‘गुरू ऑफ द इयर’ हा किताब सतत नाकारत होते. कारण त्यांचेच कित्येक विद्यार्थी ‘कॅग’ म्हणजेच, कमर्शियल आर्टिस्ट गिल्टचा हा सन्मान घेऊन मोकळे झाले होते. शिष्यांना दिलेला सन्मान मास्तरला, हे खरे नव्हते. तेव्हा त्यांच्यासाठी खास ‘गुरू ऑफ गुरूज’ हा सन्मान निर्माण केला गेला.

त्या १६ मार्च २०१५च्या संध्याकाळी मास्तरने हात धरून मार्ग दाखवलेले त्यांचे अनेक नामांकित शिष्य आपापल्या गाड्या घेऊन कॉलेज आवारात येत होते. प्यून आणि वॉचमनच्या घोंगड्या पांघरून काम करून झोपलेली पोरं आता आर्ट डायरेक्टर, कॉपी रायटर, नंबरवन फोटोग्राफर, फॅशन डिझायनर, प्राध्यापक, प्रिन्सिपॉल झालेली पाहणे मास्तरांसाठी अत्यंत आनंददायी होते. व्हिलचेअरवर बसलेल्या ‘षांताराम पवार’ या व्यक्तीच्या पाया पडून गप्पागोष्टी होत होत्या. दिनकर गांगल, अरुण साधूंसारखी ग्रंथालीची सर्वेसर्वा माणसेही आवर्जून उपस्थित होती. सुदेश हिंगलासपूरकर, दीपक घारे आदी आताची फळीसुद्धा मास्तरांना ‘सर’च म्हणणारी.
कॉलेजमधल्या आताच्या तरुण विद्यार्थ्यांना हे सारेच नवीन होते. केवळ नाव ऐकलेली कलाकार मंडळी एका मास्तरसाठी कामधंदा सोडून एकत्र येतात, हे विलक्षण होते. प्रत्यक्ष विद्यार्थी नसलेला गंगाधरन मेनन टॉपचा कॉपी रायटर आणि सुनील महाडिकसारखा फ्लॅगशिप नावाच्या नामांकित एजन्सीचा क्रिएटिव्ह डायरेक्टर, मालक यांच्या प्रयत्नामुळे हे प्रत्यक्षात येत होते.

सरकारी आरक्षणाच्या आणि कलेकडे दुर्लक्ष करण्याच्या धोरणामुळे आजची आमची आर्ट स्कूल्स थडग्यासारखी झालेली आहेत. अशा वातावरणामध्ये षांताराम पवारसारखी माणसेच ‘जिवंत संस्था’ म्हणून उभी असतात. आज चाळीस वर्षांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा कॉलेजमध्ये खेचून आणण्याची ताकद आता किती जणांमध्ये उरली आहे?

सरांवरील माझा एक लेख वाचून प्राध्यापक पुष्पा भावे मला म्हणाल्या होत्या, काय सुंदर नातं आहे हे तुमचं तुमच्या मास्तरांशी. हेवा वाटतो बघ. आमचं नातंच तसं होतं आणि आहे. गुरू- शिष्याच्या नात्याच्या पलीकडे जाणारे पवार मास्तर तसे रंगाने काळे, पण आता गोरेगावात राहणारे, तेव्हा ‘कुणी घेतलं तुम्हाला "गोरे'गावात?’ विचारले तर खळखळून हसत साला चावट आहेस, असे म्हणून टाळी देणारे. आम्हाला आमच्यासारखे ‘मवाली’ मास्तर मिळाले, हे आमचे भाग्य. योग्य वेळी योग्य माणसे भेटण्यालाच नियती म्हणत असावेत.

पवारांचे काही हट्ट लहान मुलांसारखे असतात. आग्रह आकलनाच्या पलीकडले असतात. त्यांचे वर्णन नाटककार कै. मनोहर काटदरे यांनी योग्य शब्दात केले होते. ‘ही इज चाईल्ड लाइक, बट नॉट चाइल्डिश.’

त्यांचा आग्रह किंवा हट्ट किती योग्य होता, हे कळण्यासाठी अनेकांना चाळीस वर्षे थांबावे लागले असेल का?
मास्तरांनी फाडलेले पोस्टर किंवा लेआऊट का फाडले, हे आता समजत असेल का?
कॉलेजच्या असेंब्ली हॉलच्या स्टेजवर ‘आमच्या नाटक मंडळीचा श्री गणेशा झाला.’ याच हॉलमध्ये त्या काळी गहजब निर्माण करणाऱ्या, लीला गांधी आणि पार्टीचा तमाशा झाला होता. ‘कॉलेजमध्ये तमाशा?’ वगैरे मथळ्याच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये आल्या होत्या. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा रे, म्हणणारे हेच मास्तर.
श्रीमती शोभा गुर्टूच्या ठुमरी कार्यक्रमाच्या वेळी पोरं वेगवेगळ्या गाण्याची फर्माइश िचठ्ठ्या पाठवून करू लागली होती. त्यामध्ये ‘नथनीयाने हाय राम बड़ा दु:ख दिया’ ही ठुमरी आल्यानंतर बाई मास्तरांना म्हणाल्या होत्या, ‘ही जरा शृंगारिक ठुमरी आहे. या पोरांसमोर म्हणायची?' तेव्हा "काही हरकत नाही. त्यांच्याचकडून आली आहे ना फर्माइश, होऊन जाऊ द्या. आमच्या इथे आर्ट स्कूलमध्ये न्यूड पेंटिंग करतात.' असं त्यांनी म्हटल्यावर अख्खा अॅसेब्ली हॉल शिट्ट्या आणि ओरड्याने दणाणला होता.

कुंपणाबाहेर जाऊन जगाची ओळख करून देण्याची वृत्ती, प्रत्येक विद्यार्थ्याला जगात स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी क्षणोक्षणी उपयोगी पडत असे. केवळ चित्रकलाच नव्हे तर नृत्य, गाणे, चित्रपट, नाटक, साहित्य, कविता, तमाशा, खेळ, जेथे जेथे सृजनशीलता जिवंतपणे उमलत असेल, त्या प्रत्येक स्पंदनाला मास्तर साद घालत. नाटकांमधील माधव वाटवे, रमाकांत देशपांडे, ईशाद हाश्मी, अमोल पालेकर, मनोहर काटदरे यांचा वावर मास्तरांच्या केबिनमध्ये सतत असे. सोबत दामू केंकऱ्यांसारखा नाट्याचार्य, अशोक शहाणे, भाऊ पाध्ये, नामदेव ढसाळ, मन्या ओक, विजय तेंडुलकर, अशोकजी परांजपे यांच्या गप्पा, कविता सरांमु‌‌‌ळेच आमच्या कानावरून गेल्या.

हेच ते आमचे जातक आणि नियतीचे नातं.
आजची कळा गेलेली कॉलेजेस आणि त्याहून कळकट मास्तर या परिस्थितीमध्ये उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या आजच्या विद्यार्थ्यांना ‘षांताराम पवारां’सारखा दीपस्तंभ लाभो, हीच इच्छा!

raghuvirkul@gmail.com