आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोगॅम्बो खुश हुआ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1985 हे ते वर्ष होतं. माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटामधील एका रोलसाठी मी अमरिश पुरींच्या (22 जून 1932 - 12 जानेवारी 2005) सांताक्रुझच्या जुन्या घरी गेलो होतो. रोल त्यांना आवडला होता, पण गाडी पैशावर अडकली. माझे तेव्हाचे बजेट नव्हते आणि ते मानधन कमी करत नव्हते. ‘माझ्याऐवजी तू अनुपम खेरला घे. तो हा रोल चांगला करील’ म्हणून त्यांनी सुचवले. मी विचार करतो, म्हणालो आणि निघालो. तेव्हा घराच्या दारात अमरिशजी म्हणाले, ‘मला सतत तुला कुठे तरी पाहिल्यासारखे वाटते आहे.’ मी म्हणालो, ‘यस सर. मला तुम्ही छबिलदासमध्ये नाटकाच्या वेळी पाहिले असणार. कारण, तुमची नाटके मी तिथेच पाहिली आहेत आणि काही वेळा तर मोजून सात-आठ प्रेक्षक असताना, मी चक्क सतरंजीवर आडवा पडून नाटकं बघत असे.’ तेव्हा ओळख पटल्यागत ते म्हणाले, ‘अरे हां, रंगमंच की तरफ पैर फैलाकर सोकर नाटक देखनेवाले आप ही हो। देखो रघु, छबिलदास में नाटक का टिकट तीन रुपया था। मै आज भी वही, अ‍ॅक्टिंग करता हूँ, मगर उसके लिये मुझे तीन लाख मिलते थे। हां, आज यहाँ तक आन के लिये मुझे चालीस साल लगे है।’
खरं होतं ते. वयाच्या चाळिसाव्या वर्षी अमरिश पुरी फिल्म्समध्ये ओळख निर्माण करीत होते. तोपर्यंत सत्यदेव दुबे, गिरिश कर्नाड यांची नाटकं, 1970च्या दशकांत मुंबईच्या प्रायोगिक रंगमंचावर सादर करणे आणि ‘एम्प्लॉइज स्टेट इन्श्युरन्स कॉर्पोरेशन’मध्ये नोकरी करणे, हेच त्यांचे आयुष्य होते. तिथेच उर्मिला दिवेकर नावाच्या मराठी तरुणीशी, त्यांचा विवाह झाला होता.
मोठे दोघे भाऊ मदनपुरी आणि चमन पुरी दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये व्हिलनची कामे करीत असत. सिमल्याच्या बी. एम. कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाल्यावर ते मुंबईत नोकरीसाठी आले. नाटक अंगात भिनलेले होते. भरदार शरीरयष्टी आणि दमदार आवाज यांच्या जोरावर हिंदीमध्ये हिरो बनण्याची आशा घेऊन ते झगडत होते.
मी त्यांना प्रथम ‘काडू’ या चित्रपटामध्ये कानडी गावक-याच्या भूमिकेत कॅपिटल सिनेमागृहात पाहिले होते. हिंदीशिवाय कन्नड, मराठी, पंजाबी, मल्याळी, तामिळ अशा अनेक भाषांत त्यांचे काम चालू होते. कोंडुरा, भूमिका, आक्रोश, सूरज का साँतवां घोडा अशा ‘ऑफबिट’ सिनेमांमधून ते दिसत. ‘सूरज का सातवाँ घोडा’मधील भूमिकेसाठी त्यांना सिडनी फिल्म फेस्टीव्हलमध्ये बेस्ट अ‍ॅक्टरचा पुरस्कारही मिळाला होता. त्या आधी 1979ला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांच्याकडे चालून आला होता. पुरस्कार म्हणावे तर अनेक होते; ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ही त्यांच्या घरात झळकत होता. आयुष्यभरात जवळपास 400 फिल्म्स त्यांच्या नावावर जमा होत्या. त्यामध्ये अ‍ॅटनबरोच्या ‘गांधी’मधील ‘खान’ ही व्यक्तिरेखा त्यांना हॉलीवूडचे दार उघडून देणार होती.
1982 सालच्या या चित्रपटानंतर त्यांना स्टिव्हन स्पिलबर्गच्या ‘इंडियाना जोन्स, अँड टेंपल ऑफ डुम’मधील मोलारामची महत्त्वाची भूमिका मिळाली. तांत्रिक पुजा-यांच्या भूमिकेमध्ये नरबळीचे रक्ताने माखलेले हृदय हाताने खेचून काढणा-या अक्राळविक्राळ खुनशी मोलारामने जगभरातील बच्चे कंपनी आणि प्रेक्षकांच्या हृदयालाच हात घातला होता. भीतीने पोरं थरथरत असत. शेकोटीच्या लाल, पिवळ्या ज्वाळा, त्यांचा पसरलेला ऑरेंज प्रकाश आणि त्या खालून वर पसरणा-या प्रकाशामध्ये पहाडासारखा देह आणि गडगडाटी आवाज असणारा मोलाराम विसरणे कठीण आहे. स्वत: स्टिव्हन स्पीलबर्गने मान्य केले होते, आणि म्हटले होते, ‘बेस्ट व्हिलन इन द वर्ल्ड.’
पण आपल्या सेन्सॉरच्या बिनडोक कारभारामध्ये हा चित्रपट अनेक ठिकाणी कापला गेला किंवा म्हणावा तसा दाखवलासुद्धा गेला नाही. त्या काळी आजच्यासारखी सिनेमा सहज डाऊनलोड करण्याची सुविधाही नव्हती. नाही तर मोगॅम्बो येण्याआधीच, अमरिशजी घराघरांत पोहोचले असते. पण त्यासाठी 1987चा शेखर कपूरचा ‘मि. इंडिया’ यावा लागला.
‘मोगॅम्बो खुश हुआ’ हा तकिया कलाम, डोक्यावर टक्कल, हे टक्कल त्यांनी मोलारामच्या भूमिकेसाठी केले होते आणि तीच त्यांची आयडेन्टिटी बनून गेली होती. चित्रपटाच्या कामाव्यतिरिक्त ते नेहमी मोठी काऊबॉय हॅट वापरत असत. मोठमोठ्या डोळ्यांचे गरगर फिरणे, जाड जाड भुवया, बँडवाल्यासारखे चित्रविचित्र खांद्यावर पट्ट्या असणारे कोट, खाली तंग विजार, त्या काळ्या-निळ्या विजारीवर सोनेरी पट्ट्या, पायात उंच टॉक् टॉक् आवाज करणारे बूट, हातात प्रत्येक बोटामध्ये मोठेमोठ्या खड्यांच्या अंगठ्या आणि मानवी कवटीसदृश सिंहासनाच्या हाताच्या कोप-यावरील गोलावर पंजा फिरवत विचार करत शांतपणे खुनशी कल्पनांनी ओठांवर फुटलेले हसू.
हा सारा अवतार हिंदी चित्रपटामधील व्हिलनचा अर्क म्हणता येईल. त्यात भर म्हणून हसत हसत ‘मोगॅम्बो खुश हुआ’ हा तकिया कलाम म्हणजे, कळस होता. हे खूश होणं खरं की खोटं? का या खूश होण्यामागे कुणाचा, तरी गळा कापण्याचा उग्र विचार आहे? का कुणाला मगरीच्या तोंडी देणे आहे, हे कळेनासे होते. आपल्या या चेह-यावरील हसण्याच्या भावामागे प्रेक्षकांच्या मनात भीतीची लहर उठवण्याची किमया अमरिश पुरीच करू जाणे.
वास्तव आणि फॅन्टसी. सत्य आणि विचित्र विश्व यांच्या सीमारेषांवर सतत रेगांळणा-या, रंगीबेरंगी केसाचे हिरवे, पिवळे, सोनेरी विग घालणा-या हिंदी चित्रपटामधील व्हिलनला चांदोबामधील काल्पनिक विश्वात नेऊन बसवणा-या या मोगॅम्बोला टाळून हिंदी चित्रपटाचा इतिहास लिहिताच येणार नाही.
अमरिशजींनी केवळ मोगॅम्बो केला असता तरी त्यांना दुसरे रोल करावे लागले नसते; पण कलावंत नेहमीच अतृप्त असतो. समांतर सिनेमामधील आव्हानात्मक भूमिका करीत प्रवास करणा-या अमरिशजींनी हिंदी व्यावसायिक सिनेमात वेगवेगळ्या भूमिका केल्या. वेगवेगळे गेटअप, वेगळ्या लकबी ही त्यांची खासियत होती. ‘दामिनी’ चित्रपटामधील वकील उभा करताना कपाळावर येणारी केसांची बट मागे सारत बलात्काराच्या वेळच्या बारीकसारीक तपशिलात जाऊन प्रश्न विचारण्याची किळसवाणी नजर, घृणा निर्माण करणारा वकिलाचा हलकटपणा त्यांनी उत्तम साकारला. हिंदी भाषेवरील प्रभुत्व, नाटकांचा अनुभव, लंबेचवडे डायलॉग पाठ करण्याची सवय, आदी गुणांमुळे त्यांच्या वाट्याला कोर्टात वादावादी करणा-या वकिलाचे रोल खूप आले. ‘चाची 420’सारख्या काही चित्रपटांमधून त्यांनी विनोदी भूमिका करण्याचा प्रयत्न केला; पण हा विनोद मुख्यत: प्रसंगनिष्ठ किंवा गैरसमजातून निर्माण होणारा होता. अशा प्रसंगात त्यांचे उंचेपुरे रूप आणि चेह-यावरील बावळट हाव किंवा ट्यूब न पेटल्याचा आविष्कार हशां निर्माण करीत असे.
छबिलदासची चळवळ, विविध भाषांतील चित्रपट, चारशेपेक्षा जास्त हिंदी फिल्म्स, हॉलीवूडमधील दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम, अनेक पारितोषिके, आदी सर्व लौकिक मागे ठेवून अमरिशजी 12 जानेवारी 2005 रोजी अनंतात विलीन झाले.
त्यानंतर बराच काळ गेला तरी अजून ते आहेतच, असे वाटत होते. माझ्या ‘मोहरे’ या हिंदी चित्रपटामध्ये अनुपम खेरने त्यांना देऊ केलेला रोल उत्तम साकारला; पण अजून मनात रुखरुख आहे, अमरिशजींनी वेगळी मजा आणली असती...
raghuvirkul@gmail.com