आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खलनायक नव्हे,'खलु'नायक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नायक किंवा नायिकेच्या अवताराला परीक्षा देण्यास भाग पाडणारा किंवा त्यांच्या चारित्र्याला आणि व्यक्तिमत्त्वाला झळाळी देणारा, विविध पैलू पाडणारा जर कोणी असेल तर तो खलनायकच असतो. ही प्राप्त भूमिका करताना त्याची स्वत:ची प्रतिमाही रंगतदार झालेली असते.
अगदी रामायण, महाभारताची साक्ष काढली तरी ही मंडळी आपले अस्तित्व ठामपणे दाखवून देतात. मग तो रावण असो, शूर्पणखा असो, कुब्जा, कैकेयी; किंवा दुर्योधन, कंसमामा, शकुनी, पुतना मावशी; किंवा अनेक चित्रविचित्र राक्षस असोत. अलीकडच्या कार्टून नेटवर्कवर चालणा-या छोट्यामोठ्यांच्या सिरियलमध्येसुद्धा आलीसिस्टर्स, (सिंड्रेलामधील) क्रयुयेला (101 डायमेशियनमधील) जंगलामधील बिग बॅड बुल्फ, शिवाय बॅटमॅनमधील ‘जोकर’ ही व्यक्तिरेखा तर जॅक निकलसनसारख्या नटाने हॉलीवूडमध्ये अजरामर केली आहे आणि तीच भूमिका ‘हिथ लेजर’ या नटाने आपल्या अप्रतिम अभिनयाने नंतर आलेल्या ‘डार्क नाइट’ या चित्रपटामध्ये साकारून या जगातूनच एक्झिट घेतली. जॉनी डेपचा ‘कॅप्टन स्पॅरो’ हा ‘पायरेट्स ऑफ कॅरॅबियन’मधील रोल मित्रांचाही पापणी न लवता किंवा क्षणाचाही विचार करता गळा कापणारा आहे. ‘आर्यन 3’मध्ये बेन किंग्जलेने साकारलेली ‘मॅडरिन’ची भूमिका पाहिल्याबरोबर पाठीच्या कण्यातून भीतीची लहर गेली पाहिजे. मात्र याच्या बाह्य रूपाच्या आत एक घाबरलेला, असुरक्षित, स्ट्रगल करणारा कलाकार वास करत असतो. साचा बॅरनने ‘अल्लादीन’ नावाचे पात्र विनोदी पद्धतीने दुष्ट प्रवृत्तींना झाकत उत्तम साकारलेले आहे. असे वरून वेगळेच रूप वागवत काळी कृत्ये करणारी पात्रे रंगवताना पुरुषाप्रमाणे आघाडीच्या नट्याही मागे राहात नाहीत.
जेनिफर अ‍ॅनिस्टनने ‘हॉरिबल बॉसेस’ चित्रपटामध्ये आपल्या मदमस्त सौंदर्याचा आक्रमक वापर करत व्हॅम्पची भूमिका उत्तम साकारली होती. आपल्या असिस्टंटचा छळ करण्याच्या तिच्या कृत्यामुळे थिएटरमध्ये हशा उसळत असे. अशा प-यांच्या रूपातील चेटकिणी आपल्याला वारंवार भेटत असतात. खलनायकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवावे आणि त्या भूमिकेसाठी पब्लिकने वारंवार थिएटरमध्ये जावे, यात असते ती व्यक्तिरेखेची जादू. अगदी सोनेरी केसांच्या परीच्या परीकथेमधील दुष्ट जादूगारासारखी.
हा जादूगार नसेल तर पांढ-या घोड्यावरून येणारा राजपुत्र, त्याची प्रेयसी परीराणी, तिच्या सोनेरी केसांचा पिवळाधम्मक प्रकाश हे सगळं सगळं फिज्जुल आहे किंवा रूप बदलणा-या राक्षसाचा जीव पिंज-यातील पोपटामध्ये असावा, तसे हे खलनायक विविध रूपांमध्ये आले तरी कथेचा, गोष्टीचा खरा जीव तेच असतात. हिंदी सिनेमाच्या पटकथेचा एक अलिखित नियम आहे. नायकाच्या एन्ट्रीच्या आधी खलनायक किती क्रूरकर्मा आहे, हे दाखवून देणारा सीन हवा; म्हणजे सिनेमामध्ये नायकाच्या समोर काय वाढून ठेवले आहे, हे एकदा प्रेक्षकांच्या डोक्यात घुसले की मग उत्तरोत्तर रंगत वाढत जाणार, याची प्रेक्षकांना खात्री पटते.
या खलप्रवृत्तीच्या व्यक्तिरेखांमध्ये फक्त पुरुष आहेत असे नाही, तर स्त्रियाही तेवढ्याच ताकदीने उभ्या आहेत. यात लिंगभेद नाही; एवढेच काय, तृतीयपंथीय खलनायकही आपला ठसा ठेवून गेले आहेत. स्वत:ची विशिष्ट स्टाइल, केशरचना, हावभाव, एखादा तकिया कलाम (ठरावीक वाक्य किंवा शब्द), कपडे, शारीरिक व्यंग, छुपा व्यवहार किंवा हत्यारे अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टी बाळगत हे खलनायक चित्रपटभर आपलं अस्तित्व दाखवत असतात. प्रत्यक्ष पडद्यावर न येतासुद्धा केवळ आवाजाने, भिंतीवरील सावलीने, डोळ्यांच्या प्रचंड क्लोजअपने मनाचा थरकाप उडवत असतात.
खरे तर ज्याला ‘फिअर ऑफ अननोन’ म्हणतात (म्हणजे अज्ञाताची भीती) त्या मनुष्य स्वभावातील मूळ प्रवृत्ती किंवा विकनेसचा वापर करून या व्यक्तिरेखा उभ्या राहिल्या असतात. भीती ही मूलभूत भावना आहे. अचानक काहीतरी घडणे, धक्का लागणे, पडणे, अंधार होणे किंवा मिट्ट काळोखामध्ये अडकणे, अचानक भरधाव वेगाने जवळून मोठे वाहन जाणे आणि त्या धक्क्यातून सावरण्यासाठी काही क्षण हतबुद्ध होऊन उभे राहणे. आपल्या ज्ञानेंद्रियांच्या सीमा दाखवून देणा-या या घटना असतात. काही काळ काही कळेनासे झाले! मी कुठे आहे, हेही समजेना! भानावर यायला वेळ लागला! भान हरपले! आदी उद्गार याच क्षणांची वर्णने करतात.
असे अकल्पित अचानक अंगावर काटा आणणारे क्षण अनेकांनी अनुभवलेले असतात; पण या जीवघेण्या अनुभवाला कोणी पैसे देऊन सामोरे जाईल, असे वाटत नाही. पण हेच सत्य आहे, असे रहस्यपटांचा बादशहा हिचकॉक आपल्या आत्मचरित्रात ठासून सांगतो. त्याच्या चित्रपटांचे यश याच भीतीमध्ये आहे, हे तो नमूद करतो. त्याच्या सायको चित्रपटाचा खेळ टोकियोमध्ये होता. इंग्रजी भाषा अनोळखी असणारा जपानी ऑडियन्स होता. पण पडद्यावर उमटणारी चित्रे बोलकी होती. गोष्ट भाषेविना समजत होती आणि त्याच त्या जगप्रसिद्ध बाथटबमधील खुनाच्या प्रसंगात बाथटबचा प्लॅस्टिकचा पडदा उघडला आणि प्रेक्षकांतून किंकाळ्या ऐकू आल्या. अगदी अमेरिका, इंग्लंडमध्ये ऐकू येत तशा. कारण भीती ही मनुष्याची मूलभूत भावना आहे. तिला देश, धर्म, भाषा यांची कसली बंधने?
आपली पूर्ण चित्रपट कारकिर्द भीती किंवा रहस्यपटाने गाजवणा-या हिचकॉकने आपल्या आत्मचरित्रात एक प्रसंग वर्णिला आहे. ज्याचा प्रभाव अमीट होता आणि त्याच्या बालमनावर झालेल्या त्या प्रभावाचे, भीतीचे चित्रण तो आयुष्यभर करत राहील. त्याच्या वडलांचे एक मित्र पोलिसात होते. त्यांच्याकडे एकदा त्यांनी छोट्या हिचकॉकला एक चिठ्ठी देऊन पाठवले. ती चिठ्ठी वाचून त्या पोलिसदादाने छोट्या हिचकॉकला लॉकअपचे दार उघडून आत काही काळ कोंडून ठेवले. पाच- दहा मिनिटेच असतील; पण त्या घटनेने भीतीचे अक्राळ-विक्राळ रूप त्यांच्यासमोर उलगडले. अत्यंत शांत, खोड्या न करणा-या छोट्या हिचकॉकला त्याचे वडील कोणताही रंगाचा डाग नसलेले कोकरू म्हणत. हे निष्पाप कोकरू जेसुईट शाळेमध्ये जात असे. त्या शाळेत खास रबराने बनवलेल्या छडीचा वापर शिक्षा देण्यासाठी होत असे. शिक्षा झालेल्या मुलाचे नाव पुकारून त्याला शाळा संपेपर्यंत वर्गाबाहेर उभे केले जात असे आणि शाळा सुटल्यावर हेडमास्तर छडीचा मार देत असत. कल्पना करा, वर्गाबाहेर उभ्या असलेल्या बालमनावर किती दडपण येत असेल. हेच ‘फिअर ऑफ अननोन’चे वाट पाहणे हिचकॉकच्या चित्रपटातून पडद्यावर प्रभावीपणे साकारले. त्याच्या विविध वैचित्र्यपूर्ण खलनायकांच्या रूपाने. ही अफलातून व्यक्तिचित्रे साकारणा-या मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट किंवा इतर माध्यमातील कलावंतांना आपण भेटणार आहोत. प्राण, प्रेमनाथ, जीवन, रणजित, ललिता पवार, अमजदखान, अमरिश पुरी, प्रेम चोप्रा, अजित, नादिरा, के. एन. सिंग, कन्हैयालाल, सदाशिव अमरापूरकर असे अनेक, जे आपल्या अभिनयसंपन्न व्यक्तिरेखांनी ओळखले जातात. नायक, नायिकेच्या सरळसोट प्रेमकहाणीमध्ये रंगतदार मिर्चमसाला पेरणारे हे व्हिलन आणि व्हॅम्प आपल्याला अडीच-तीन तास खिळवून ठेवण्याचे महान कार्य करत असतात. नाहीतर गाणी चालू झाल्यानंतर चहा पिण्यासाठी किंवा सिगरेट पिण्यासाठी थिएटरबाहेर गेलेल्या प्रेक्षकांना पुन्हा आत खेचून आणणार कोण? नायकाला मोठं, महान करण्यासाठी एकाऐवजी दोन-तीन व्हिलन वापरण्याचीही टूम निघाली होती. अमिताभ चित्रपटात फायटिंगमध्ये दहा-बारा गुडांना सहज घायाळ करीत असे. पण खरे सांगू का? ‘खलु धर्म साधनम््’ या चालीवर नायकापेक्षा हेच खरे नायक! खलनायक नव्हे ‘खलु’नायक!
raghuvirkul@gmail.com
(ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, लेखक)