आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खलनायकीचा ‘प्राण’...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘पिक्चर मे ‘प्राण’ नही है तो प्राण नही है।’ असं म्हणणारा माझा एक प्राणप्रेमी मित्र होता.
सोलापूरसारखे सिनेमाप्रेमी गाव अख्ख्या महाराष्ट्रात नाही. दक्षिणेकडील कट आऊट्स लावण्याची प्रथा महाराष्ट्रात सोलापुरातील थिएटरपाशी संपत असे. हिरो-हिरॉइनचे मोठमोठाले कटआऊट्स अगदी मिरवणुकीने वाजतगाजत थिएटरवर आणून लावले जात असत. एवढेच नव्हे तर त्या चित्रपटामधील हिरोच्या वेषभूषेप्रमाणे वेषभूषा करून फॅन मंडळी टोळक्याटोळक्याने फर्स्ट डे फर्स्ट शोला येत असत आणि आपापल्या हिरोच्या आद्याक्षराच्या नावाने वावरणा-या या टोळ्या अभिमानाने देव आनंदचे फॅन म्हणजे डीए, शम्मी कपूरचे म्हणजे एसके, राजेंद्रकुमार म्हणजे आरके, दिलीपकुमार म्हणजे डीके नावाने मिरवत असत. त्यांच्यामध्ये गॅगवॉर होईल इतकी वैराची भावनाही असे.
आशियामधील आद्य मल्टिप्लेक्स म्हणता येईल, असे ‘भागवत चित्र मंदिर’ (चित्रमंदिर! वाह काय नाव आहे) नावाचे थिएटर संकुल सोलापुरात आहे. एकाच आवारात चार थिएटर असलेल्या या संकुलाचे माझे आजोबा मॅनेजर होते, तेव्हा फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकिटे मिळत होती. या लेखाच्या प्रारंभी उल्लेख केलेला माझा दोस्त प्राणचा वेडा. त्याला ‘दिल दिया दर्द दिया’ सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचाच होता. दिलीपकुमारसाठी नाही तर व्हिलन प्राणसाठी. त्याच्या बरोबर शोला बसलेलो असताना एकूण एक प्रेक्षक दिलीपकुमार प्रेमी होता...फक्त आम्ही सोडून. चित्रपटामध्ये एक प्रसंग आहे. प्राण व्हिलन, जमीनदार असतो आणि दिलीपकुमार नोकर.
मालकाला घोड्यावर चढून बसण्यासाठी दिलीपकुमार दोन्ही हात रिकिबीसारखे धरून बसतो. त्यावर पाय ठेवून प्राण घोड्यावर स्वार होतो. खाली जमिनीवर असलेला दिलीपकुमार घोड्यावरील प्राणकडे खुन्नसने बघत असतो तेव्हा.
‘मालिक के तरफ आँख उठकर देखते हो कमिने।’ असे म्हणून प्राण त्याला मारतो. आपल्या हिरोच्या कानाखाली व्हिलन आवाज काढतो, ते बघून सारे थिएटर चिडीचूप झाले होते. आणि त्याच क्षणी माझ्या मित्राला अत्यानंदाच्या उकळ्या फुटत होत्या. हा प्राणप्रेमी ‘और एक’ म्हणून जोरात ओरडला. थिएटरमधील समस्त दिलीपकुमारप्रेमी हा कोण काफिर म्हणून आमच्याकडे बघू लागले आणि आयुष्यात प्रथम भीतीने माझ्या अंगावर काटा आला. आता आपण मार खाऊन मरणार म्हणून.
प्राणपणाने प्रेम करणारे फॅन प्राण नावाच्या व्हिलनला मिळाले, कारण होताच तसा तो. अत्यंत सुखवस्तू घरातील हा देखणा तरुण उत्तम कपडे, उत्तम गाड्या, उत्तम उंची सेंट वापरणारा होता. लाहोरला एका पानवाल्याकडे पान खाऊन स्टाइलमध्ये सिगरेट पिणा-या प्राणला पाहून ‘पांचोली फिल्म’मध्ये त्याला स्वत: पांचोलीने रोल ऑफर केला. पण ही गंमत असावी, म्हणून तो स्टुडिओमध्ये गेलाच नाही. पण नशीब त्याला फिल्ममध्येच घेऊन येणार होते. त्याचा पहिला चित्रपट ‘यमला जट’ (1940). त्यामध्ये त्याने व्हिलनचीच भूमिका केली होती. पण नंतर ‘हलाकु’, ‘पिपली साहेब’, ‘खानदान’ असे अनेक चित्रपट हिरो म्हणून केले. नंतर 1947च्या धामधुमीत मुंबईच्या मायानगरीमध्ये नशीब काढण्यासाठी तो आला, तेव्हा दुस-याच दिवशी स्वातंत्र्याची घोषणा झाली आणि फाळणीची आग पेटली. प्राण तेव्हा ताजमहाल हॉटेलमध्ये मुक्कामाला होता. ताज हे त्या काळचे उत्तम आणि महागडे हॉटेल. बायकोला महत्प्रयासाने त्याने इंदोरला तिच्या बहिणीकडे आणले आणि जवळपास तीन महिन्यांचे हॉटेलचे भाडे तिचे दागिने विकून दिले. कामाची वानवा होतीच. तेव्हा अ‍ॅक्टर शाम आणि मित्र सदात हसन मंटोने त्याला शाहिद लतिफच्या ‘जिद्दी’मध्ये काम दिले, हा त्याचा मुंबईमधील पहिला ब्रेक.
त्यानंतर आपल्या शैलीदार अभिनयाने त्याने पडदा व्यापून टाकण्यास सुरुवात केली. मद्रासमधील जवळपास सर्व चित्रपटांमध्ये प्राण असे. ‘राम और शाम’ चित्रपटाच्या वेळी दिलीपकुमार आणि प्राण इडली, डोसा, सांबार खाऊन खाऊन पकले होते. तेव्हा त्यांनी मुंबईहून पंजाबी आचारी बोलावून हॉटेलच्या रुममध्येच पंजाबी खाना बनविण्यास सुरुवात केली होती.
प्रत्येक भूमिकेसाठी वेगळी केशभूषा, वेषभूषा, एखादा ‘तकीया कलाम’ आदी गोष्टी प्राण आवर्जून करीत असे. ‘ठिक है ना, ठिक’ किंवा ‘हम बोलेगा तो, बोलोगे की, बोलता है’सारखे तोंडात सहज बसणारे त्याचे तकीया कलाम फेमस झाले नाहीत तरच नवल.
त्याचा स्वत:चा विगमेकर होता. ‘जंजीर’मधील पठाणाचा मेहंदीवाल्या केसांचा विग आणि त्याचे डोळ्यांवर येणारे केस दोन्ही हाताने मागे सारण्याची लकब कोण विसरेल? ‘मधुमती’मधला उग्रसेन आणि ‘जिस देश में गंगा बहती है’मधला डाकू, त्याची सतत मानेवरील कॉलरमधून फिरणारी बोटे ही लकब घेताना त्याने दिलेले स्पष्टीकरण फार छान आहे. प्राण म्हणाला होता, ‘हीच लकब घेतली; कारण या डाकूच्या मनात सतत आपली मान फाशीच्या दोरात अडकेल ही भीती होती.’ आपल्या रोलकरिता अशी अभ्यासपूर्ण विचार करण्याची प्राणची ताकद मोठी होती.
एक दोन नाही तर शंभरहून जास्त चित्रपटांमध्ये व्हिलन रंगवणे सोपे नाही. आपला अमीट ठसा विविध भूमिकांद्वारे उठवून प्राण साहाय्यक आणि कॅरेक्टर अ‍ॅक्टर म्हणून पुन्हा उभा राहिला. ‘जंजीर’मधील व्हिलन कम दोस्त असलेला पठाण येण्याआधी ‘उपकार’मधील मलंग चाचा म्हणून प्राण लोकांच्या नजरेत भरला. पुढे आपल्या रोलसाठी मिळालेले फिल्मफेअर अवॉर्ड त्याने नाकारले, कारण त्या वर्षी ‘पाकिझा’च्या संगीतासाठी गुलाम महंमदला डावलण्यात आले होते.
आपल्या खासगी आयुष्यात अत्यंत सज्जन असणा-या प्राणचे दुसरे प्रेम क्रिकेट होते. सर फ्रँक वॉरेल त्याचे जिवलग मित्र होते. अनेक हिरोपेक्षा जास्त मानधन प्राणला मिळत असे. पण, ‘बॉबी’च्या वेळी राज कपूरकडे पैसे नव्हते म्हणून केवळ एक रुपयात चित्रपट साइन केला होता. त्याचे मानधन परवडत नाही, म्हणून बी. आर. चोप्रांच्या सिनेमात प्राण दिसला नाही. अर्थात, गुड पेमास्टर म्हणून बी. आर.चा लौकिक कधीच नव्हता.
मनमोहन देसाईंच्या प्रत्येक चित्रपटामध्ये प्राणची भूमिका महत्त्वाची असे, अगदी त्यांच्या पहिल्या ‘कन्हय्या’पासून ‘अमर अकबर अ‍ॅन्थनी’पर्यंत. अशा शेकडो फिल्म्सनंतर प्राणला भारतीय सिनेमासृष्टीमधील ‘दादासाहेब फाळके’ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. एकेकाळी आपल्या भेदक नजरेने आणि आवाजाने पडदा थरथरवणारा प्राण व्हीलचेअरवर डोळ्यात हरवलेले भाव घेऊन थरथरणा-या हाताने पुरस्कार घेताना बघवत नव्हता.
93 वर्षांचे समृद्ध आयुष्य जगून प्राण 12 जुलै 2013 रोजी मुंबईत स्वर्गवासी झाला खरा; पण तो आजही ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट ते इस्टमन कलर चित्रपटांमधून आपल्या विविध खलनायकी भूमिकांद्वारे माणसांच्या अथांग मनातील काळे पांढरे विचार विश्व प्रेक्षकांसमोर सादर करून त्यांचे जग रंगीत- संगीत करीत आहे.
बेजान कार्डबोर्डच्या व्यक्तिरेखांमध्ये प्राण ओतणारा प्राण! खरंच, ‘पिक्चर में ‘प्राण’ नही है तो ‘प्राण’ नही है।