आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raghuvir Kul Article About Bollywood Villains, Divya Marathi

खलनायकीचा शैलीदार आविष्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वरी आणि शामप्रसाद सिन्हा या जोडप्याला पाटणा शहरी राहात असताना तीन मुले होती. पहिला राम, दुसरा लक्ष्मण, तिसरा भरत आणि 15 जुलै 1946रोजी चौथा झाला, तो शत्रुघ्न सिन्हा. हे चौथे शेडेंफळ कॉलेज वगैरे करून पुण्याच्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये अ‍ॅक्टिंग करण्यासाठी दाखल झाले. बिहारमधील पाटणा येथून येणारा हा तरुण इन्स्टिट्यूटमध्येसुद्धा दादागिरी, रॅगिंगसाठी फेमस होता. जाता जाता एक आठवण अशी की, मी 1976च्या सुमारास काही कामानिमित्त पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाण्यासाठी पुणे स्टेशनवरून रिक्षा पकडली. रिक्षावाल्याला फिल्म इन्स्टिट्यूटचा पत्ता सांगितला. त्याने समोरच्या आरशातून माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, बर्‍याच वर्षांनी तिथे जातोय. मागे एकदा शत्रुघ्न सिन्हाला मारण्यासाठी आमची गँग गेली होती. बरीच वर्षे झाली त्याला. अर्थात मला हे नवे नव्हते. फिल्म इन्स्टिट्यूटच्या हॉस्टेलवर असे शत्रुघ्न संदर्भातले किस्से बर्‍याच वेळा ऐकले होते.
त्याची ‘खामोश’ ही अदा तेव्हापासून होती. पुढे हे मिस्टर दिल्लीला 2003मध्ये हेल्थ अ‍ॅन्ड फॅमिली मिनिस्टर आणि नंतर 2004मध्ये शिपिंग मिनिस्टर झाले. आपल्या लोकशाहीचा विजय असो!!

सध्या यांची कन्या सोनाक्षी, हिंदी चित्रपटाची नायिका आहे. तिचे जुळे भाऊ लव आणि कुश याच धंद्यामध्ये हात पोळून घेत आहेत. त्याची आई पूनम सिन्हा पूर्वी कोमल नावाने शत्रुबरोबरच ‘सबक’ या 1973च्या चित्रपटामध्ये झळकली होती. ती 1973मधील ‘मिस इंडिया’ होती. हे झाले घरगुती रामायण!

शत्रुघ्नला प्रथम पाकिस्तानी मिलिटरी ऑफिसरचा रोल देव आनंदने आपल्या ‘प्रेम पुजारी’ या चित्रपटामध्ये दिला; पण तो चित्रपट काही कारणांनी रेंगाळला. बाकीचे चित्रपट आधी झळकले. 1971मध्ये आलेला गुलजारचा ‘मेरे अपने’ने शत्रुला ओळख दिली. तरुण गँगवाल्या दादाची भूमिका त्याला फिट बसली होती. ‘मिट्टी का तेल क्या होता है? दुकान को आग लगाकर बताऊ?’सारखे एन्ट्रीला डायलॉग मारत शत्रु कॉलेज तरुणामध्ये फेमस झाला होता. नंतर ‘दोस्त’, ‘समझोता’, ‘जबान’, ‘बुनियाद’, ‘भाई हो तो ऐसा’, ‘कहते है मुझको राजा’, ‘दो राहा’सारखे अनेक चित्रपट येत होते आणि शत्रुची इमेज बनत चालली होती. अगदी प्रेमगीतामध्येसुद्धा ‘बरखा रानी जरा थमके बरसो’ म्हणणारा शत्रु पावसाला दम देतोय, असेच वाटत असे. जोरात पाऊस आला नाही तर ढगात येऊन वरुणाचा नळ पिळीन, अशी धमकी देतोय; असेच त्याचे एक हात कोपरात वाकडा करून आवाज देणे होते.

एक हात कोपरात वाकलेला आणि ‘खामोश’ ओरडणे, प्रत्येक मिमिक्रीवाला तेव्हापासून आवर्जून करीत असे.शत्रु आणि सुभाष घई पुण्याहून मुंबईला दर शनिवार- रविवार प्रोड्युसर लोकांच्या घरी वा पार्ट्यांमध्ये घुसण्यासाठी येत असत, तेव्हा कधी शत्रु घईचा सेक्रेटरी बनून वावरत असे; तर कधी घई शत्रुचा सेक्रेटरी बनून प्रोड्युसरवर छाप पाडत असे. अर्थात, दोघेही विनातिकीट पुण्याहून मुंबईला पोहोचलेले असत. कडकीच्या जमान्यातील या दोस्तीखातर घईने शत्रुसाठी ‘कालीचरण’ बनवला आणि मग दोघांची गड्डी निकल पडी.

अमिताभबरोबरचा ‘काला पत्थर’ शत्रु आणि अमिताभच्या एकाच फ्रेममध्ये येण्याने चार्ज होत असे. दोघांपैकी कोण माजोरडीगिरी करतो, याची स्पर्धा लागत असे.‘रिडिफ’ या सर्व्हरने घेतलेल्या एका लोकप्रियतेच्या चाचणीमध्ये शत्रुला मोस्ट ‘अन्कन्व्हेनशनल’ हिरो ही उपाधी दिली होती. खलनायकीकडून सहानुभूती मिळवणार्‍या भूमिकांकडे प्रवास करणारा शत्रु खलनायक म्हणूनच लक्षात राहील. पटनासाहेब येथून अभिनेता शेखर सुमनला हरवून एम.पी. झालेला शत्रु, बंगाल फिल्म जर्नालिस्ट अ‍ॅवार्ड, बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर, पाच वेळा फिल्मफेअर नॉमिनेशन घेतलेला खलनायक आहे. आणि हे त्याचे एम.पी. (नंतर मिनिस्टर) असण्यापेक्षा मोठे आहे, कारण तो पाच वर्षांच्या एम.पी.गिरीपेक्षा 30 वर्षे प्रेक्षकांच्या मनात राज्य करत आहे. त्याने नायकाच्या भूमिकेत कितीही ‘खामोश’ म्हटले, तरी त्याच्या एन्ट्रीला प्रेक्षकांतून आलेल्या शिट्ट्या आणि आरोळ्या त्याला विसरता येणार नाहीत...

आपल्या तुळतुळीत टक्कलावरून नाराजीने हात फिरवत एक डोळा बारीक करत काहीशा चिरक्या आवाजात ‘शान’मधला ‘शाकाल’ समोरच्या नाकाम होऊन आलेल्या आपल्या माणसाला मगरीच्या, शार्क माशाच्या तोंडी देतो आणि पाण्याचा निळा रंग रक्ताने लाल होताना बघतो. चेहर्‍यावर ‘काय करणार बाबा करावं लागतं हे सारं’, असे भाव आणतो; तेव्हा हा माणूस आहे की हृदयशून्य हैवान, असे प्रेक्षकांना वाटत असे.

मगरीला किंवा शार्क माशांना मेलेल्या प्राण्याचे मांस टाकावे, इतक्या शांतपणे जिवंत माणसे खाऊ घालणारा ‘शाकाल’ करणारा कुलभूषण खरबंदा मूळचा दिल्लीचा. जेम्स बॉन्डच्या चित्रपटामधील खलनायक ‘ब्लोफिल्ड’ या व्यक्तिरेखेवरून बेतलेला ‘शाकाल’ म्हणजे खरबंदा, हे समीकरण त्याच्या अभिनयानेच घट्ट केले होते.

पाकिस्तानातील हसनाबाद येथे 21 ऑक्टोबर 1944रोजी जन्मलेला कुलभूषण फाळणीनंतर भारतात अनेक शहरी वास्तव्य करत दिल्लीमध्ये स्थिरावला.

दिल्लीमधील ‘यात्रिक’, ‘अभियान’ अशा नाट्यसंस्थांमधून थिएटर करता करता तो सई परांजपेच्या 1974च्या ‘जादू का शंख’ या चित्रपटामध्ये प्रथम दिसला.

शाम बेनेगलच्या ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘कलयुग’, ‘जुनून’ अशा आर्ट फिल्ममधून त्याचे काम लक्षात येणारे होते. बी. व्ही. कारंथच्या ‘गोधुली’मध्ये ही कुलभूषण होता. ‘अंधी गल्ली’, ‘उत्सव’, ‘मंडी’, ‘त्रिकाल’, ‘सुसमन’ अशा समांतर चित्रपटांच्या साथीनेच ‘महेश भट्ट’चा ‘अर्थ’, ‘एक चादर मैली सी’, ‘घायल’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘गुप्त’, ‘बॉर्डर’, ‘यस बॉस’, ‘रेफ्युजी’ अशा मेनस्ट्रिम चित्रपटांमधूनही दिसत होता.

दीपा मेहताची ट्रायालॉजी ‘अर्थ’, ‘वॉटर’ आणि ‘फायर’ या चित्रपटत्रयीमधूनही तो वेगवेगळ्या भूमिकांमधून लक्षात राहिला. असेच त्याचे वेगळे काम ‘मान्सून वेडींग’मध्येही होते. चांगल्या नटाला चांगल्या भूमिका नेहमी भुरळ घालत असतात. आणि त्यापेक्षा अधिक ‘रंगभूमी’वरून आलेल्या कलावंताला ‘रंगभूमी’ पुन:पुन्हा आपल्या अंधार्‍या अवकाशात बोलावत असते. मराठी नाटकावरून हिंदी अनुवादित ‘सखाराम बार्इंडर’, ‘एक शून्य बाजीराव’, ‘आत्मकथा’ अशा दर्जेदार नाटकांमधील कुलभूषणच्या भूमिका हेच शाबीत करतात.

खलनायकाचा काळा-पांढरा संघर्ष दाखवणे सोपे आहे; पण कुलभूषणचे खलनायक अत्यंत सूक्ष्म छटा दाखवत जिवंत होत असत.

‘शान’मधील ‘शाकाल’ साकारताना विचित्र वेषभूषा सोडली तर कुलभूषणने बाह्य उपकरणे, विविध लकबी, आदीचा वापर फारसा केला नाही. त्याची देहबोली, एखादा दृष्टिक्षेप, आवाजाचा योग्य वापर हीच त्याची हत्यारे होती. चांगला खलनायक साकार करण्यासाठी चांगल्या अभिनेत्याची गरज असते, हे खरबंदाने बंद्या रुपयासारखे सिद्ध केले.