आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raghuvir Kul Article About Bollywood Villains, Divya Marathi

दोन वस्ताद!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दीवार’ चित्रपटामध्ये ‘दावर’ आणि ‘सामंत’ या दोन स्मगलरांची मुंबई बंदरावर वर्चस्व राखण्याची स्पर्धा असते. अमिताभ या दोघांना या खेळामध्ये एक्का म्हणून हवा असतो. इधर का माल उधर करण्याच्या या खेळामध्ये अमिताभ ‘डबल क्रॉस’ करण्यासाठी मदन पुरीला इमारतीच्या लिफ्टमध्ये भेटतो; लिफ्ट दोन मजल्यांच्या मध्ये थांबवून बोलणी करतो; तेव्हा ‘ये लिफ्ट बीच में क्यों रोकी?’ या मदन पुरीच्या प्रश्नाला, ‘मैंने सुना है, लिफ्ट के दीवारों के कान नहीं होते’ असे उत्तर मिळते. अर्थात, पुढे इधर का माल उधर झाल्यावर मदन पुरी अमिताभला गोळी घालण्यासाठी पिस्तुलास हात घालतो, तेव्हा त्याला ‘सोन्याचे अंडे’ देणार्‍या कोंबडीची गोष्ट अमिताभ ऐकवतो.

आपली चाल आपल्यावरच उलटली आहे, हे लक्षात आल्यावर ‘मैं तो मजाक कर रहा था’ हे वाक्य ज्या पद्धतीने आणि चेहर्‍यावरील हावभावाने मदन पुरीने म्हटले आहे, ते मनावर कायमचे कोरले गेले आहे. टिपिकल पंजाबी-सिंधी चेहरा, लबाड डोळे, ओशाळे भाव, मतलबी हास्य, कधीही-केव्हाही आपल्या स्वार्थासाठी शब्द फिरवण्याचा निर्लज्जपणा... या मदन पुरीच्या व्यक्तिमत्त्वाबरोबर त्वचेप्रमाणे एकजीव झालेल्या गोष्टी असल्यामुळे याचे पडद्यावर येणे पुढील कारस्थानाची नांदीच देणारे ठरायचे. त्याउप्पर कितीही श्रीमंतीचा आव आणणारे कपडे, सूट, पाइप, चिरुट, उंची गाड्या दाखवल्या तरी हा माणूस निच्चड आहे, हे लपवता येणार नाही, अशी देहबोली.
एवढ्या भांडवलावर लाहोरला 1915 मध्ये जन्मलेल्या मदनलाल पुरी या कलावंताने 1940 ते 1980 पर्यंतच्या 40 वर्षांत 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये कामे केली. अनेक प्रकारचे खलनायक रंगवले. वर्षाला जवळपास आठ चित्रपट यांच्या अदाकारीने पडद्यावर आले. ही मोठीच आणि कामाचे सातत्य दाखवणारी गोष्ट आहे. मोठा भाऊ चमनलाल आणि धाकटा अमरीश पुरीही आपल्या भूमिकांनी चित्रपट क्षेत्रात स्थिर झाले होते.

मदन पुरीचा पहिला चित्रपट ‘अहिंसा’. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही, हे वर्षाला आठ या समीकरणाने लक्षात येतेच; पण या यादीमध्ये स्मगलर, छोटा-मोठा दादा, काका, कपटी मामा, चर्चमधील फादर, कोणाचा तरी भाऊ, करप्ट पोलिस ऑफिसर, अशा विविध भूमिका असल्या तरी हे पात्र आतल्या गाठीचे किंवा संधीसाधू नक्कीच असणार, अशी प्रेक्षकांची खात्री असे.

मधल्या काळात काही वेगळ्या भूमिकाही त्याने केल्या. पण 300हून जास्त चित्रपटांमधील ‘दीवार’, ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’, ‘उपकार’, ‘चोर मचाये शोर’, ‘पूरब पश्चिम’, ‘राधा और सीता’, ‘झूठा’, ‘स्वयंवर’, ‘बेनाम’, ‘अमर प्रेम’, ‘आराधना’, ‘कटी पतंग’ या त्याच्या काही लक्षणीय म्हणता येतील अशा भूमिका. हिंदी चित्रपटामधील खलनायक या छापामुळे फारशा वेगळ्या भूमिका त्याच्या वाट्याला आल्या नाहीत, तरी आलेल्या कामाला न्याय देण्याचे काम मात्र त्याने प्रामाणिकपणे केले. अप्रामाणिक माणसाचा रोलही प्रामाणिकपणे करावा लागतो आणि त्याचेच चाळीस वर्षांचे करिअर मिळणे, हे बक्षीस असते.

बक्षिसांचीच बात करायची तर अनुपम खेरची आठवण होते. पाच वेळा फिल्मफेअर, भारत सरकारची मानाची ‘पद्मश्री’, सेन्सॉर बोर्डाचे चेअरमन पद, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालकपद आदी गोष्टी सन्मानपूर्वक अनुपमकडे चालून आल्या. सिमल्याला एका काश्मिरी पंडिताच्या घरी 7 मार्च 1955 रोजी अनुपमचा ट्यांहा झाला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतल्यावर तो हिमाचल प्रदेश युनिव्हर्सिटीमध्ये नाट्यशास्त्र शिकवू लागला. 1982 मध्ये ‘आगमन’ नावाच्या चित्रपटाने याचे चित्रपटसृष्टीमध्ये आगमन झाले. 1984 मध्ये आलेल्या ‘सारांश’ चित्रपटाने याला अभिनेता म्हणून प्रसिद्धी दिली, पण तरी स्ट्रगल चालूच होता.

1985 मध्ये माझ्या ‘मोहरे’ चित्रपटाच्या कास्टिंगच्या वेळी अमरीश पुरींनी अनुपम खेर यांचे नाव सजेस्ट केले होते. आम्ही वांद्रे येथील एका इराणी हॉटेलमध्ये भेटलो होतो. भूमिका एका गुन्हेगाराची होती; पण माणुसकी आणि थोड्या हळव्या मनाच्या माणसाची होती. केवळ मिट्ट काळी भूमिका नसून त्यात ‘ग्रे’ शेड्स आहेत आणि त्यामुळेच भूमिका आव्हानात्मक आहे, हे पटल्यावर आम्ही एकत्र काम केले. त्यादरम्यान माझ्या सेटवर त्याला किमान दोन-चार प्रोड्युसर रोज साइन करण्यासाठी येत असत. चित्रपट संपता संपता त्याने जवळपास 80 चित्रपट साइन केले होते. ते पाहून मी त्याला म्हटले, ‘ये क्या कर रहे हो? तीन-तीन शिफ्ट में काम करना पडेगा।’ तेव्हा खांद्यावर हात टाकून तो म्हणाला होता, ‘मैं भगवान को हाथ जोडके एक ही प्रार्थना करता हूँ, मुझे बिझी रख। मैंने इतने दिन बेकार, काम बिना निकाले हैं, कि खुद पर का विश्वास उड जाता है। किसी काबील अभिनेता के लिए ये नरक से ज्यादा कठिन होता है।
आणि आज त्याच्या कामाकडे पाहिले तर हा माणूस किती काम करतो, हे लक्षात येईल. 400हून अधिक चित्रपट आणि 100हून अधिक हिंदी नाटकांचे प्रयोग. ‘से ना समथिंग टू अनुपम अंकल’ ही लहान मुलांची सीरियल, ‘सवाल दस करोड’ हा गेम शो, ‘आय लव्ह इंडिया’चे एपिसोड, ‘ईआर’ ही हॉलीवूडची मालिका, ‘बेंड इट लाइक बेकहॅम’ आणि ‘ब्राइड अँड प्रिज्युडिस’ हे चित्रपट, ‘मैंने गांधी को नहीं मारा’ हा वेगळा चित्रपट निर्माण केला आणि त्यात भूमिकाही केली. ‘डॅडी’ या 89 सालच्या चित्रपटातील भूमिकेसाठी बेस्ट अ‍ॅक्टरचे बक्षीस’.

‘ए वेन्सडे’ हा वेगळा चित्रपट. शाहरुखबरोबर डर, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, चाहत, कुछ कुछ होता है, मोहब्बतें, वीर झारा, ओम शान्ति ओम असे अनेक... परवा परवा ऑस्करला नामांकन झालेला ‘सिल्व्हर लायनिंग प्लेबुक’. सकाळी 8 वाजता गिरणीत कामाला निघावे तसा हा रोज आपल्या घरातून बाहेर पडतो. देवाने त्याची प्रार्थना ऐकलेली दिसते...

पण मुळात त्याच्या अभिनयामुळे, त्याने केलेल्या अनेक भूमिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकृतीचे, व्यक्तीचे चेहरे आपणास सापडतात. खुनशी, चावट, वात्रट, विनोदी, अत्याचार सहन करणारा सामान्य माणूस, अगदी बफुनरी करणारा विदूषक, तुम्ही म्हणाल ते.
पण त्याचा प्रसिद्ध खलनायक म्हणजे 1986मधील ‘कर्मा’ चित्रपटातील ‘डॉ. डँग’. दिलीपकुमारसारख्या दिग्गज कलावंतासमोर हा कालचा अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेला पोरगा ताकदीने उभा राहिला. ‘इस थप्पड की गूंज मेरे कानों मे गूंजती रहेगी’ हे वाक्य पुन:पुन्हा आठवण्यासारखी त्याची अदाकारी त्याला काम कमी पडू देणारी नव्हती.

आपल्या कामावर विश्वास असेल आणि न थकता काम करण्याची तयारी असेल तर अभिनेता काय आणि किती काम करू शकतो, याचे अनुपम उदाहरण आहे. मराठी चित्रपटामध्येही ‘थोडं तुझं थोडं माझं’, आणि ‘कशाला उद्याची बात’मध्ये तो दिसला होता. ‘खलनायक’ या सदरामध्ये आपल्या ‘डॉ. डँग’सारख्या व्यक्तिरेखेने दखल घेण्यास लावणार्‍या अनुपमकडून अधिकाधिक चांगल्या आणि गूढ खलनायकी भूमिकांची आशा व्यक्त केली तर ते अयोग्य होणार नाही. ‘डू समथिंग गुड, बॅड अँड अग्ली अनुपम अंकल!’