आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raghuvir Kul Article About Duryodhana, Divya Marathi

दुर्योधन : पुराणपुरुष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दुर्योधन’ या शब्दाचा अर्थ ‘लढण्यास कठीण’, ‘हरवण्यास कठीण’. धृतराष्ट्र आणि गांधारीचा मोठा मुलगा दुर्योधन महाभारतामधील एक अत्यंत महत्त्वाचे पात्र आहे. त्याचे दुसरे नाव सूयोधन होते. महाभारतामध्ये कृष्णाने त्याला नेहमीच सूयोधन नावाने संबोधले आहे.

गांधारीला ऋषी व्यासाचा वर होता की, तुला 101 मुले होतील. पण गर्भकाळ जास्त झाल्यामुळे गांधारी आपल्या पोटावर वैतागाने मारू लागली आणि एक गोळा निर्माण झाला. त्याचे 101 पिंड करून ते कलशामध्ये ठेवून ते कलश तुपामध्ये एक वर्षभर जमिनीमध्ये पुरून ठेवले गेले. त्यामधील पहिला कलश फुटला आणि त्यामधून दुर्योधनाचा जन्म झाला...

बलरामाकडून गदायुद्ध शिकलेल्या सूयोधनाचा गदायुद्धामधील प्रमुख प्रतिस्पर्धी होता, ‘भीम’ आणि शकुनीमामा त्याचा प्रमुख कुटनीतितज्ज्ञ होता. धृतराष्ट्राचा मोठा मुलगा असल्यामुळे दुर्योधनाचाच हस्तिनापुराच्या राज्यावर हक्क होता. पांडुच्या मुलांना राज्य देण्यास त्याचा विरोध होता. दुसरे कारण, कुंतीची मुले वेगवेगळ्या देवांकडून झाली होती. ती पांडुची नव्हती. म्हणून नेहमी तो पांडवांना ‘कौन्तेय’- कुंतीची मुले- म्हणत असे.

उत्तम योद्धा, उत्तम राजा, उत्तम दोस्त असलेल्या ‘खलनायक’ दुर्योधनाच्या अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला फारशा ज्ञात नाहीत. कर्ण सूतपुत्र म्हणून धर्नुविद्येच्या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही, म्हटल्यावर कृष्णाच्या या सूयोधनाने त्याला राजा बनवले आणि आपला जानी दोस्तसुद्धा!

कर्णाची एक गोष्ट फार मनोज्ञ आहे. कर्ण दुर्योधनाच्या पत्नीबरोबर खेळत, तिच्या राजवाड्यात बसला होता. त्याची पाठ दरवाजाकडे होती. खेळामध्ये दुर्योधनाची पत्नी हरू लागली होती. तेवढ्यात तिने दुर्योधनाला दरवाजातून आत येताना पाहिले, आणि ती उभी राहू लागली. कर्णाला वाटले, ही खेळात हरू लागली आहे म्हणून उठून जात आहे. म्हणून त्याने तिचा पदर धरून बसण्यास सांगितले. पण, त्या जोरदार खेचण्याने पदराला असलेली मोत्याची माळ तुटली आणि सर्व मोती जमिनीवर विखुरले. दुर्योधनाच्या पत्नीच्या चेहर्‍यावरील भयभीत भाव बघून, कर्णाने मागे वळून पाहिले आणि दुर्योधनाला बघून तोही नको तो गैरसमज झाला, म्हणून ओशाळून खाली मान घालून उभा राहिला. त्या दोघांची ती अवस्था बघून दुर्योधन म्हणाला, ‘आता हे मोती मी उचलायचे, की त्याची माळ ही करून द्यायची!’
आपल्या मित्राच्या चारित्र्यावर दृढ विश्वास असल्यामुळेच दुर्योधनाच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण झाला नाही. एकदा मित्र म्हटल्यावर तो आयुष्यभर त्याची पाठराखण करत राहणारा होता. भीमाबद्दल त्याच्या मनात द्वेष होता. शकुनीमामाच्या सांगण्यावरून त्याने भीमावर विषप्रयोगही केला. पण नागराजाच्या वरदानामुळे आणि अचाट ताकदीमुळे भीम त्यामधून वाचला. मयसभेमध्ये फजिती झाल्यावर द्रौपदीच्या ‘आंधळ्याचा आंधळा मुलगा’, ही टिप्पणी त्याला फार लागली होती. पांडवांना युद्धात हरवणे कठीण आहे, म्हटल्यावर शकुनीमामाच्या कपटाने त्यांना द्युतामध्ये हरवून द्रौपदीला दु:शासनाकरवी राजसभेत खेचत आणून वस्त्रहरण करवणे, याचे मूळ त्या टोमण्यात होते. आपल्या मांडीवर बस, म्हणून स्वत:ची मांडी थोपटणे दुर्योधन रागाने आणि पुरुषी अहंकारातूनच करून गेला.

पांडवांचा द्वेष हा त्याचा प्रमुख दुर्गुण होता, आणि कपटनीतीचा पुरस्कार त्यातूनच आला होता. अर्थात, कपट दोन्ही बाजूकडे होते. युद्धातील मनुष्यबळावर त्याची मदार होती, आणि पांडवांकडे कृष्ण होता. लाक्षागृहामध्ये लाख, चरबी, गवत, कापूर आदी ज्वलनशील पदार्थाने घर बनवून, पेटवून देऊन पांडवांना मारण्याचा कट रचणे, अज्ञातवासानंतर राज्य देण्यास नकार देणे, केवळ पाच गावे पांडव मागत असताना सुईच्या अग्रावर मावणारी जमीनसुद्धा देणार नाही, म्हणणे हे गर्वाचे लक्षण होते. माज होता. तरीही गदायुद्धासाठी कोणताही पांडव निवडण्याची संधी असताना, त्याने तुल्यबळ भीमाला निवडले, हे त्याचे उमदेपणच दाखवते. गांधारीच्या दिव्यदृष्टीसमोर जाताना मांडी झाकून घेणे त्याला कृष्णाने भाग पाडले आणि ज्या मांडीवर द्रौपदीला तो पुरुषी अहंकाराने बस म्हणत होता, ती फोडण्याची संधी भीमाला आयती मिळाली.

बाप आंधळा म्हणून दुर्योधनाला काय खरे आणि काय खोटे समजत नव्हते, असे म्हणतात; पण महाभारतात एके ठिकाणी तो कृष्णाला म्हणतो, ‘मला धर्म समजतो, पण मी तो पाळू शकत नाही. आणि अधर्मापासून माझी सुटकाही होत नाही.’ आपल्या व्यक्तिमत्त्वाची इतकी सुंदर मीमांसा करणारा दुर्योधन परिस्थिताची शिकार होता.

बाप आंधळा असणे माझी चूक नाही आणि राजाचा मोठा मुलगा म्हणून राज्यावर माझाच हक्क आहे, ही त्याची सरळ साधी भूमिका होती आणि तिच्यासाठीच तो आयुष्यभर लढत राहिला. केवळ पांढरा आणि मिट्ट काळा असा हा संघर्ष नाही. दुर्योधनाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये करड्या रंगछटा अनेक असल्यामुळे तो जगप्रसिद्ध खलनायक असला तरी अत्यंत वेधक आहे. या ग्रे शेड्समुळे तो व्यक्ती म्हणून अधिक भावतो. त्याचा द्वेष, तिरस्कार, राग, अपमान, सूडबुद्धी हे सर्व मानवी वाटतात. बर्‍याचदा आपल्या विविध माध्यमातून दुर्योधनाची छबी पार वाईट रंगवली जाते. बी. आर. चोप्रांच्या ‘बॅण्डवाल्याचे कपडे’ घातलेल्या ‘महाभारत’ सिरीयलमधून त्याचे फारच विकृतीकरण झाले. पण अशा सुलभीकरणामुळे व्यक्तीमधल्या छटा मरून जातात. खरे तर याच छटा त्या व्यक्तिमत्त्वाला माणूसपण देत असतात.

अर्थात, माणसांचा देव बनवण्याचीही आपली परंपराच आहे. उत्तरांचलमध्ये कुमॉव भागात दुर्योधनाची पूजा होते, कारण महाभारतामध्ये कुमॉव सैन्याने दुर्योधनाच्या बाजूने युद्ध केले होते. आजच्या भाषेत म्हणायचे तर तळागाळातील माणसापर्यंत जाती-पाती पलीकडे भावणारा तो योद्धा होता. केरळमध्ये कौलम जिल्ह्यामध्ये पोरूझाई पेऊवेरूथी मलानंदा मंदिरामध्ये आजही त्याची पूजा होते. दक्षिण भारतामधील दुर्योधनाचे हे प्रसिद्ध मंदिर आहे.

दुर्योधन हा श्रेष्ठ खलनायक असला, तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा, कुटनीतीचा, खर्‍या-खोट्या आग्रहाचा व्यवस्थित, सखोल अभ्यास व्हायला हवा, हे नक्की. मनुष्य स्वभावाचे वेगवेगळे विभ्रम आपणास पाहायला मिळाले, तर माणूसप्राणी जाणून घेण्यात ते फार उपयोगी पडतील.

गांधारीच्या दिव्यदृष्टीने हिर्‍यासारख्या टणक नि मजबूत झालेल्या दुर्योधनाच्या प्रतिमेमागे काही सच्च्या दोस्तीचा, विश्वासाचा हळुवार झरा आपणास मिळाला, तर नारळातील मधुर पाण्याचा आनंद द्विगुणीतच होईल...