आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिली डोंट बी सिली!!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हमीद अली खानचा जन्म (जानेवारी २७, १९२२) गोवळकोंड्याचा. वडील निझामाचे पर्सनल खजिनदार होते. कॉलेजमध्ये जाण्याच्या वयात हमीद अली आपली कॉलेजची पुस्तके-वह्या विकून सिनेमामध्ये नशीब काढण्यासाठी घरातून पळून आला.

मुंबईत धक्के खात असतानाच हमीदला हीरो म्हणून १९४६मध्ये ब्रेक मिळाला आणि सिनेमासाठी नामकरण झाले ‘अजित’. त्याआधी युसूफ खानचा ‘दिलीपकुमार’ झाला होताच. अजितचा पहिला सिनेमा होता ‘शाहेमिर्जा’ आणि हिरॉइन होती गीता बोस. त्यानंतर वनमालाबरोबर ‘सिकंदर’, खुर्शिदबरोबर ‘आपबीती’, लीनाकुमारीबरोबर ‘सोने की चिडिया’, मीना शौरीबरोबर ‘ढोलक’, ‘चंदा की चांदनी’मध्ये मोनिका देसाई अशा त्या काळच्या नामांकित हिरॉइनबरोबर सिनेमे एकामागोमाग येऊ लागले. नलिनी जयवंतबरोबर तर मोजून १५ चित्रपट झाले. यापैकी बर्‍याच चित्रपटांनी बॉक्स
ऑफिसवर राम म्हटले. पण अजितच्या घरी चूल पेटत होती. माहिमच्या ‘पॅराडाइज’समोरच्या इमारतीमध्ये तेव्हा आणि त्यानंतर बराच काळ त्याचे वास्तव्य होते.

चक्क चौकडीची लुंगी घालून महाराज फुटपाथवर गप्पा मारीत उभे राहत असत. हीरो म्हणून फारसे हाताला काही लागत नाही, बघून अजितने आपला मोर्चा सेकंड लीड रोलकडे वळवला. ‘मुगले आझम’ आणि ‘नया दौर’ हे त्या काळातील नाव घेण्यासारखे चित्रपट आणि त्यामधील अजितचे रोलही लोकांच्या नजरेत भरले. दोन्ही चित्रपटांचा हीरो ‘दिलीपकुमार’ होता. मधल्या काळात तो पुन्हा हैदराबादला स्थायिक होण्यासाठी परत गेला. तेथे त्याला कोणी मांत्रिक, तांत्रिक, भविष्यवाणी करणारा पंडित भेटला. त्याने सांगितले, एखादा रोल ज्यामध्ये पूर्ण पांढरे कपडे असतील, तो तुला पुन्हा सिनेमामध्ये आणेल. खरं-खोटं तो मांत्रिक आणि त्याचा देव जाणो; पण अजितचा पुन:प्रवेश व्हिलन म्हणून झाला, तो ‘जंजीर’मधून आणि त्यामध्ये पूर्ण पांढर्‍या वेषात, पांढर्‍या केसात, पांढर्‍या बुटामध्ये वारंवार पडणार्‍या स्वप्नांमधील पांढर्‍या धुक्यातील पांढर्‍या घोड्याच्या प्रतीकाने झाला. ज्युवेल, द्रोही, यादों की बारात अशी जवळपास ५७ चित्रपटांची बारात निघाली. अनेक चित्रपटांमध्ये अजित बाप आणि प्रेम चोप्रा मुलगा अशी बाप-लेकाची खलनायकी जोडी ही खूप वापरली गेली.अजितचा खलनायक नेहमी उच्चवर्गीय, अत्यंत मृदू बोलणारा, पण बोलण्यात जरब असणारा होता. त्याचा अनुनासिक आवाज, त्या आवाजाची मृदू पण खतरनाक धमकीची नक्कल अनेक नकलाकार दिवसरात्र करू लागले.

आसपास अर्धनग्न पोरी घेऊन हातामध्ये व्हिस्कीचा ग्लास फिरवत, सिगारेटचा धूर उडवत अजित आपल्या मोठ्या मोठ्या काचेच्या लाल, पिवळ्या रंगाच्या गॉगलमधून खलनायकी कट रचत असे, तेव्हा पिवळ्याधम्मक नागाच्या विषारी डोळ्यांची नजर आठवत असे. त्याच्या डोळ्यांतील पुढे घडणार्‍या घटनांचा विषारी प्लॅन सोबतच्या सुंदरीला न कळल्यामुळे ती वेड्यासारखे काही प्रश्न विचारत असे. आणि त्यावर अत्यंत शांतपणे अजित काय मूर्खांसारखे प्रश्न विचारत आहे, असा भाव धारण करून ‘लिली डोंट बी सिली’सारखे फेमस डायलॉग मारीत असे. ही त्याची सखी बर्‍याच वेळा ‘मोना डार्लिंग’ असे. ‘मोना तुम सिर्फ खाना, पीना और सोना’ अशी तिच्या अकलेची सालं काढत थिएटरमध्ये प्रेक्षकांना रिझवणारा अजित आणि त्याची ‘मोना’ कोण विसरेल! एखाद्या त्याच्या हाताखालच्या माणसाने चांगले काम केले, वा चांगली बातमी आणली की ‘स्मार्ट बॉय’ म्हणून त्यांचे कौतुक केले जाई; आणि दुसर्‍याच क्षणी गोळी घालून ठार केले जाई. अशी ‘स्मार्ट बॉय’ माणसे आपल्याच जिवावर कधी उठतील याचा नेम नाही; म्हणून नेम धरून त्याला मारला, हे आपले लॉजिक शांतपणे सांगणारा अजित महा आतल्या गाठीचा, आपल्या मनातील विचारांचा थांगपत्ता न लागू देणारा, पांढर्‍या कपड्यातील काळा कर्दनकाळ वाटू लागे. २२ डिसेंबर १९९८ रोजी हैदराबादमधील आपल्या राहत्या घरी अटॅकने हमीद अली ऊर्फ ‘अजित’ पैगंबरवासी झाला. त्याच्या पश्चात उरले त्याचे चार मुलगे आणि एक मुलगी. त्याच्या पोराने बापाची नक्कल करीत टेलिव्हिजनवर अँकर होण्याचा प्रयत्न केला, पण तो फारसा चालला नाही. नकला नकलाच राहतात. ‘आखिर असली सोना तो सोना होता है ना, मोना?”
raghuvirkul@gmail.com