आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमनाथ मेरा नाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावरच्या करीमपुरा भागामध्ये 21 नोव्हेंबर 1926 रोजी प्रेमनाथचा जन्म झाला. फाळणीनंतर हे कुटुंब जबलपूरमध्ये स्थायिक झाले. पेशावरी देखणेपणा यांच्या अंगात होता. पूर्वीच्या काही चित्रपटांमध्ये प्रेमनाथ रोमन हीरोप्रमाणे आपल्या पिळदार शरीरयष्टीमुळे उठून दिसत असे. धाकटे दोन भाऊ नरेंद्रनाथ आणि राजेंद्रनाथ हेसुद्धा चित्रपटसृष्टीमध्ये होते, पण विनोदी वात्रट रोल करण्यात यांची आयुष्ये गेली. प्रेमनाथ मात्र हीरो म्हणूनच आला पण फारसा चालला नाही. दरम्यान ‘औरत’ चित्रपटाच्या वेळी त्याचे बिना रॉयबरोबर प्रेम जमले आणि त्यांनी लग्न केले. त्यांची दोन मुले आणि नातवंडे ही याच चित्रपट व्यवसायात आहेत.

प्रेमनाथची बहीण कृष्णा ही राज कपूरची पत्नी! तर दुसरी बहीण प्रेम चोप्राची पत्नी असा सगळा फिल्मी मामला. बिना रॉयबरोबर लग्न केल्यावर त्यांनी पी. एन. फिल्म्स नावाची कंपनी काढली आणि ‘शगुफा’, ‘प्रिझनर ऑफ गोवळकोंडा’, ‘समुंदर’, ‘वतन’ आदी चित्रपट काढले. पण त्यांना आणि पर्यायाने प्रेमनाथलाही यश मिळाले नाही. खरं तर 1948 सालीच प्रेमनाथ ‘अजित’ नावाच्या चित्रपटामध्ये हीरो म्हणून आला होता. मोनिका देसाई ही त्या वेळची नटी त्याची हिरॉइन होती. राज कपूरने त्याला आपल्या चित्रपटामध्ये विविध भूमिका दिल्या. 1952 सालचा ‘आन’, त्याआधी 1949 साली आग आणि बरसात अशा चित्रपटांमध्ये प्रेमनाथने भूमिका केल्या होत्या.
प्रेमनाथ महाराज आपल्या विचित्रपणासाठी प्रसिद्ध होते. पृथ्वी थिएटरमध्ये पृथ्वीराज कपूर हार्मोनियम घेऊन आवाजाची पट्टी लावत असत. त्या धर्तीवर प्रेमनाथ आपल्या गाडीत नेहमी हार्मोनियम बाळगत असे आणि जसजसा दिवस कलंडत असे तसतसे याचा तोल जाऊ लागला की आपल्या भसाड्या आवाजात खुल्या चौपाटीवर किंवा बँडस्टँडवर गायन सुरू करीत असे.

मधल्या पडत्या काळामध्ये महाराज जबलपुरात जाऊन राहिले होते आणि वेळी-अवेळी भेंडाघाटामधील नदीच्या पात्रामध्ये शिवलिंग किंवा शाळीग्राम शोधत फिरत असतं. सोबत बाजाची पेटी असेच. अर्थात अशा निर्जन स्थळी त्यांच्या गाण्यावर कोणी आक्षेपही घेत नसे की कोणी दादही देत नसे. तिसरी मंजिल तेव्हा येऊन गेला होता आणि मग विजय आनंदने 70 साली त्यांना ‘जॉनी मेरा नाम’साठी बोलावून घेतले. चित्रपट कारकीर्दीतील प्रेमनाथची ही दुुसरी खेळी होती. एव्हाना विचित्र, विक्षिप्त अशी पडद्याबाहेरही त्यांची प्रतिमा तयार झाली होती. खुनशी, दारुडा, स्त्रीलंपट, कपटी, घातकी अशी प्रतिमा रंगवण्यासाठी प्रेमनाथसारखा दुसरा चांगला नट नव्हता. डोक्यावरचे टक्कल, बसलेले नाक, रंगीबेरंगी शर्ट, छाती उघडी टाकलेली! त्यातून गळ्यात घातलेले गंडेदोरे आणि चित्रविचित्र माळा बाहेर आलेल्या, फुलाफुलांच्या भडक लुंग्या किंवा पायाला घट्ट बसणारा चुणीदार पायजमा. एका हातामध्ये दारूची बाटली आणि दुसर्‍या हातात बंदूक. ‘रूप पाहता लोचनी, हा रेप करणार साजणी’ असली नजर आणि त्यांचे ते तोंडातल्या तोंडात बरळल्याप्रमाणे बोलणे. पडद्यावर अशी छबी आली की लेखक-दिग्दर्शकाचे अर्धे काम झालेच म्हणून समजा.

‘जॉनी मेरा नाम’मधील रायसाहेब भूपेंद्रसिंग अथवा रणजित ही भूमिका प्रेमनाथसाठीच लिहिली आहे, असे बघताक्षणी जाणवते. हे दिग्दर्शक विजय आनंदचे कास्टिंगचे यश. मागे विजय आनंदला त्याचा कोणता सिनेमा अधिक आवडतो हे विचारल्यावर त्याने ‘जॉनी मेरा नाम’चे नाव घेतले होते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे या कथेमध्ये व्यावसायिक ठोकताळेच अधिक होते. अत्यंत सामान्य, ठोकळेबाज कथा पण तिला रंगतदार बनवण्यासाठी महान प्रयत्न करावे लागले होते, त्या प्रयत्नामधीलच हा एक भाग प्रेमनाथचे कास्टिंग. पद्मा खन्नाचे मादक नृत्य ‘हुस्न के लाखों रंग... कौन-सा रंग दूँ?’ हे तिला अजरामर करून गेलेच, पण त्या गाण्यामध्ये कडव्या-कडव्याला घायाळ होत जाणारा स्त्रीलंपट रायसाहेब भूपेंद्रसिंग प्रेमनाथला कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत ठेवणार यात शंका नाही. त्यानंतर ‘तेरे मेरे सपने’मधील सेठ माधोचंद, ‘रोटी कपडा मकान’मधील हरनामसिंग, गॉडफादर चित्रपटावरून उचललेल्या फिरोज खानच्या ‘धर्मात्मा’मधील ‘धरमदास’धर्मात्मा! अर्थात या हिंदी आवृत्तीमध्ये मार्लन ब्रांडोच्या जागी प्रेमनाथला पाहणे शिक्षाच होती. कालीचरणमधील आय.जी.पी. खन्ना, ‘देशप्रेमी’मधील पूथ्थू अण्णा हा दक्षिणी अवतार पाहणे म्हणजे पंजाबीने केला कानडी भ्रतार असा प्रकार होता, पण भारतीय प्रेक्षक किती सहनशील आहे याचे हे उदाहरण म्हणून माफ करायलाच हवे.

अशा काळातही पुन्हा राज कपूर कामाला आला. त्याने बॉबीमधील ‘जॅक ब्रिगान्झा’ ही बेवड्या कोळ्याची भूमिका प्रेमनाथला दिली आणि महाराज ‘डिंपल कापडिया’चे बाप म्हणून उभे राहिले. ‘घे घे घे घे रे प्यार मे सौंदा नहीं’ म्हणत ‘झूठ बोले कौवा काटे’च्या तालावर चेहरीपट्टी लुंगी घालून नाचले. ‘माया’ नावाच्या अमेरिकन टेलिव्हिजन सीरियलमधल्या एका एपिसोडमध्येसुद्धा त्यांनी काम केले.
कुठली एक स्टाइल, लकब, तकिया कलाम अशा ठरावीक साच्यातील गोष्टी न करता केवळ आपल्या दिसण्यावर, अस्तित्वावर प्रेमनाथ सिनेमे करीत राहिला. काही वेळा या त्याच्या असण्यासाठी रोल लिहिले गेले आहेत की काय, असे वाटण्याइतपत तो सहजतेने पडद्यावर वावरत असे. मुळातील बेफिकिरी भडंग वृत्ती, आला दिवस साजरा करण्याची प्रवृत्ती ही कदाचित अनेक वर्षांच्या अस्थिर करिअरमुळे आली असावी. स्वत:च्या बायकोबरोबर केलेले पिक्चर आपटले होते. अपयश माणसाला अधिक बेफिकीर बनवत असावे. राज कपूरचा मेव्हणा, बिना रॉयचा नवरा, प्रेमकिशनचा बाप आणि साइड हीरोसारखी ओळख असली तरी प्रेमनाथचे अस्तित्व आपली छाप पडद्यावर आणि बाहेर सोडल्याशिवाय जात नसे. वयाच्या 65 वर्षी 3 नोव्हेंबर 1992 रोजी प्रेमनाथ मुंबईमध्ये निधन पावला. 65 हे काही डबलहड्डी पंजाबी माणसांचे मरण्याचे वय नव्हे. अजून पाच-दहा वर्षे त्याने आरामात काम केले असते. पण ‘बेफिकरी तेरा नाम प्रेमनाथ!’ हेच खरे.