आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन विलक्षण मोहरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सदाशिव माझ्या ‘मोहरे’ चित्रपटामधील मुख्य खलनायक होता. ‘वासू मुदलियार’ ऊर्फ बद्री नारायण चावला ऊर्फ बद्री. अशी अनेक नावे त्याची त्या चित्रपटामध्ये होती; पण प्रत्यक्षात त्याचे नाव गणेश नरोडे आहे, हे मला कित्येक वर्षे माहीत नव्हते. तसे आपले मराठी कलावंताचे काम रंगभूमीवरूनच सुरू होते. छबिलदासमध्ये त्यांनी केलेला ‘यात्रिक’ हा जी. ए. कुलकर्णींच्या कथेवरचा प्रयोग पाहिला होता. पुढे व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेल्या त्याच्या ‘हँड्स अप’ नाटकाची जाहिरातही आम्ही केली होती.

आणि मग सदाशिव नावाजला गेला तो गोविंद निहलानींच्या ‘अर्धसत्य’मधील रामा शेट्टीच्या भूमिकेमुळे. मोजून संपूर्ण चित्रपटामध्ये त्याला तीन सीन होते, पण त्याचे येणे पडदा व्यापून टाकत असे. अटक करण्यासाठी आलेल्या सत्यवादी पोलिस इन्स्पेक्टरला ज्या पद्धतीने शेट्टी मंत्र्याचा फोन येतो, ते विलक्षण होते. फोनचा हँडसेट नव्हे तर पिस्तूल रोखल्याप्रमाणे पोलिस इन्स्पेक्टरला गोळी लागू पडते व त्यांना निमूटपणे हात हलवत परत जावे लागते.

अहमदनगरचा खास देशस्थी काळा-सावळा रंग. बारीक कापलेले केस. त्या सावळ्या चेहर्‍यामध्ये उठून दिसणारे पांढरे डोळे आणि पॉज घेत घेत बोलण्याची पद्धत, एवढी हत्यारं जवळ असताना पिस्तुले वगैरे दुसरे अवजड सामान बाळगायची काय जरुरी?

आज मराठी-हिंदी रंगभूमीवर नवीन येणारा काळ्या-सावळ्या कांतीचा अभिनेता स्वत:ला अमरापूरकर समजतो, यात सारे आले. अशी दीर्घ टिकणारी छाप त्याने सोडली आहे. यशाबरोबर बोलण्यामधील माजही डायलॉग प्रभावी करण्यासाठी उपयोगी पडत आहे.

11 मे 1950 रोजी जन्मलेला गणेश रंगभूमीवरील काम करता करता सदाशिव हे नवीन नाव धारण करून मुंबईत आला. मात्र त्याआधी 1971मध्ये ‘आमरस’ हा एक चित्रपटही झाला होता. पुढे ‘अर्धसत्य’च्या पुण्याईवर सदाशिव अमरापूरकरने अनेक चित्रपट केले आणि मग त्याची जोडी जमली ती धर्मेंद्रबरोबर. ‘हुकू मत’ चित्रपट बंपर चालला तो 1987चा. त्यामुळे आपल्यासाठी ‘सदाशिव’ लकी मॅस्कॉट आहे, असे वाटून धर्मेंद्र आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी त्याचा आग्रह धरू लागला. मधल्या काळात नासूर, पुराना मंदिर, वीरुदादा, जवानी, फरिश्ते अशा नावावरूनच कल्पना येणारे चित्रपट येत होते. कुली नं. 1, आंटी नं. 1, गुप्त अशा चित्रपटांमध्ये सदाशिव विनोदी भूमिकांमधूनही दिसला आणि मग 1991मध्ये ‘सडक’ नावाचा वेगळा चित्रपट आला. त्यामध्ये सदाशिवने साकारलेला ‘महारानी’ नावाच्या तृतीयपंथी व्हिलनचा रोल त्याला बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टरचे अवॉर्ड देऊन गेला.

सदाशिव आणि परेश रावल यांची जोडी या लेखासाठी एवढ्याचसाठी घेतली, कारण दोघे रंगकर्मी, दोघे व्हिलन म्हणून आले, दोघे विनोदी भूमिकाही साकारणारे आणि दोघांनी वेगवेगळ्या स्वभावाचे दोन तृतीयपंथी ‘हिजडे’ रंगवले, ते वाखाणले गेले. कारण मुळात दोघे चांगले नट आहेत. सदाशिवने बाळ गंगाधर टिळक रंगवले, तर परेशने ‘सरदार’मध्ये सरदार वल्लभभाई पटेल साकारले. परेशचा जन्मदिवस 31 मे 1950. नरसी मोनजी कॉलेजमधून एकांकिका, नाटके करणारा. त्याच्या कॉलेजचे प्रिन्सिपल कोहली सर पोरं स्पर्धा करून आले की स्वत: खाना बनवून त्यांना रात्री जेवण देत असत. मध्यमवर्गीय गुजराती घरातून आलेल्या परेशचे स्वरूप संपत या उच्चवर्णीय श्रीमंत पोरीवर प्रेम बसले. ती 1979ची मिस इंडिया होती. तिच्याकडूनच पॉकेटमनी घेऊन याची कलाकारगिरी चालत होती.

त्या वेळी तो गोविंद निहलानी, श्याम बेनेगल आदी आर्ट फिल्म करणार्‍या दिग्दर्शकांच्या ऑफिसच्या फेर्‍याही मारत होता. पण काही होत नव्हते. 1984मध्ये ‘होली’ चित्रपट आला. 1986मध्ये ‘नाम’ चित्रपटामध्ये व्हिलनचा लक्षात राहणारा रोल मिळाला. ‘किंग अंकल’, ‘कब्जा’, ‘रामलखन’, ‘दौड’, ‘बाजी’ अशा अनेक चित्रपटांनंतर ‘आँखें’ आला. त्यामध्ये आंधळ्या चोराची भूमिका ‘नजरे’त भरणारी होती. याच सुमारास परेश विनोदी भूमिकांमध्ये दिसू लागला. ‘हेराफेरी’मधील सोडा वॉटर बॉटलच्या जाडीएवढा चश्मा घातलेला मराठी घरमालक ‘बाबूराव गणपतराव आपटे’ लोकांनी डोक्यावर घेतला. ‘आवारा पागल दीवाना’, ‘गरम मसाला’, ‘भूलभुलैया’, ‘वेलकम’, ‘दे दना दन’ आदी विनोदी भूमिकांची फटाक्यांची माळ लागली; पण त्याआधी आला होता ‘तमन्ना’. या चित्रपटामध्ये परेश तृतीयपंथी बाप झाला होता. एका लहान मुलीला दत्तक घेऊन तिला बापाची माया देऊन मोठी करणार्‍या ‘हिजड्या’चा रोल तो जगला होता. ही एका सत्यघटनेवरील कथा होती.

अशा विचित्र वल्ली समाजात असतील तर उत्तम नटाला रोल सजवण्यासाठी मग आणखी काय हवं? अवॉर्ड्स परेशला अनेक मिळाली. आपण रोल कसे सिलेक्ट करता, असे त्याला एका मुलाखतीमध्ये विचारले तेव्हा तो म्हणाला होता, ‘गाढव, शेळी आणि पंचलक्षणी घोडा यामधून काही निवडा म्हटल्यावर काही तरी चॉइस आहे; पण सर्वच गाढवे असतील तर काय निवडणार? हिंदी चित्रपटांसाठी येणारे रोल अशा एकमेव गाढवासारखे असतात. ते मी फक्त पैशासाठी करतो.’
अलीकडे त्याचा वेगळा रोल असलेला ‘ओ माय गॉड’ येऊन गेला. आपण झाडाभोवती नाचत प्रेमगीत म्हणू शकत नाही, प्रेमवीर मजनूचा रोल करू शकत नाही, हे पुरेपूर जाणणारा परेश वेगवेगळ्या छटा असणारा व्हिलन मात्र जीव लावून करतो. आपल्या शक्यता जाणणारा परेश आणि सामाजिक भान असणारा अमरापूरकर हे हिंदी चित्रपटसृष्टीमधील वेगळे नट. मागे होळीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय करू नका, म्हणून सांगायला जाणारा आणि मारामारी करणारा अमरापूरकर आणि ‘सरदार’ चित्रपटासाठी व्यवस्थित अभ्यास करून उभा राहणारा परेश आजकाल पडद्यावर दुर्मिळ झाले आहेत.
सेटवरील मोकळ्या वेळात दासबोध वाचणारा सदाशिव आणि जॅक निकल्सनचा ‘वन फ्ल्यू ओव्हर दि ककुज नेस्ट’ बघणारा परेश आम्हाला हवे आहेत.

परेश आता ‘नरेंद्र मोदी’ चित्रपटासाठी तयारी करतोय, असे ऐकले.
मग हा ‘हीरो’ की ‘व्हिलन’?
‘दोनों हाथों से ताली बजाओ।’