आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raghuweer Kul Article About Joker, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जोकर: अस्‍सल खलनायकी रसायन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅटमन कॉमिक बुकमधील सुपर व्हिलन ‘जोकर’ हा जगप्रसिद्ध आहे. डी. सी. कॉमिकसाठी जेरी रॉबिन्सन, बिल फिंगर आणि बाल्ड केन या तिघांनी 1941च्या मध्यास ‘जोकर’ प्रथम निर्माण केला. मानसिक संतुलन बिघडलेला हा क्रूरकर्मा. ज्याला इंग्रजीमध्ये ‘सायकोपाथ’ म्हणतात, त्या जातीचा आहे आणि म्हणूनच अविश्वसनीय, अन्प्रेडिक्टेबलही. त्यात भर म्हणून यांची विनोदबुद्धी विकृत आहे. लहान मुलांना, निष्पाप बायकांना, सर्वसामान्य जनतेला ह्युमनशिल्ड ‘ढाल’ म्हणून वापरणा-या, प्रसंगी ठार करणा-या जोकरच्या पोतडीमध्ये अनाकलनीय हत्यारे आहेत आणि त्याचबरोबर एक हारपूनची गन आहे. तिच्या बँगऽऽ आवाजाबरोबर एक छोटासा झेंडाही गनमधून बाहेर येतो; ज्यावर ‘बँग’ असे लिहिलेले असते. समोरच्या माणसांच्या भीतीने घामेजलेल्या चेह-यावरील भेदरलेले भाव बघत हसणे, हा या क्रूरकर्म्याचा विरंगुळा आहे.
1950मध्ये ‘कॉमिक कोड अ‍ॅथॉरिटी’ने कॉमिक बुक्समधील हिंसा आणि विकृतीवर बंधने आणली, तेव्हा ‘जोकर’च्या क्रूरपणाला काहीसा आळा बसला. कारण ‘कॉमिक कोड अ‍ॅथॉरिटी’चे म्हणणे होते की, हिंसा बालमनावर आयुष्यभरासाठी प्रभाव पाडते आणि त्यात तथ्यही आहे. त्या काळात ‘जोकर’ बराचसा माणसाळला होता.
सात दशकांपेक्षा अधिक काळ प्रमुख खलनायक म्हणून जोकर वारंवार वेगवेगळ्या रूपांत प्रकट झाला. त्याच्या जन्मकथा अनेक आहेत; पण सर्वात महत्त्वाची अशी, की जोकर आपल्या गर्भवती बायकोला वाचविण्यासाठी पहिला गुन्हा करतो, पण ती आणि तिच्या पोटातील बाळही वाचत नाही. त्या मानसिक धक्क्यामुळे तो वेडा होतो आणि त्यावर कळस म्हणजे, एका रासायनिक पिंपामध्ये पडल्यामुळे त्याच्या कातडीचा रंग पांढरा होतो, केस हिरवे होतात, ओठ लाल भडक आणि चेह-यावर न संपणारे हसू. या हसण्याची एक गोष्ट आहे. 1928मधील कॉनरॉड वेड नावाच्या नटाचा एक चित्रपट होता, ‘द मॅन हू लाफ’. त्यामधील फोटोवरून हे क्रूर हास्य जोकरच्या चेह-यावर रेखाटण्यात आले.
1970च्या सुमारास पुन्हा जोकर अधिकाधिक खतरनाक होत गेला. विरोधाभासावर आधारित हालचाली, विचार आणि करतुदी या वाढत गेल्या. ‘हंच बॅक ऑफ नोटरडॅम’मधील व्हिलन जसा कुबडा आहे, तसे शारीरिक व्यंग ‘जोकर’च्या पथ्यावर पडले. निष्पाप नागरिकांना घेऊन जाणा-या ‘ट्रेन’चा अपघात घडवून आणणे, रासायनिक हत्यारे वापरणे, हातात खेळवत असलेल्या छोट्या छोट्या काचेच्या गोट्यांचे बॉम्ब फोडणे, अपहरण करणे, खंडण्या मागणे, ऐतिहासिक महत्त्वाच्या म्युझियममधल्या मूर्ती आणि पेंटिंगची विल्हेवाट लावणे, असले वेडाचार वाढत चालले.
आपले पूर्वाश्रमीचे अपयशी आयुष्य आणि त्यात पुन्हा बायको-मुलाला वाचवण्यात आलेले अपयश, याचा प्रभाव ‘जोकर’च्या प्रत्येक कारवाईमध्ये दिसू लागला. अशा आव्हानात्मक भूमिकेने टीव्ही सिनेमाच्या पडद्यावर आक्रमण केले नाही, तरच नवल. तोपर्यंत ‘जोकर आणि बॅटमन’चा संचार मुक्त आणि सर्वत्र झाला होता. अनेक टीव्ही सिरियल, अ‍ॅनिमेशनपट निर्माण होऊ लागले. घराघरात चहाचे मग, टी शर्ट्स, पोस्टर्स, की-चेन...म्हणाल त्या वस्तूंवर जोकर दिसू लागला. 1960मध्ये आलेल्या अ‍ॅनिमेशनपटामध्ये ‘जोकर’ला सिझर रोमियो नावाच्या अष्टपैलू नटाने आवाज दिला होता.
1989मध्ये हॉलीवूडचा प्रख्यात नट जॅक निकलसनने पडद्यावर जोकर साकारला. हा जोकर विनोदाला हत्यार म्हणून वापरत होता. मानसिक संतुलन बिघडलेल्या माणसांचे बोलणे खरे काय? आणि खोटे काय? अशा भ्रमात हिरो आणि प्रेक्षकांना ठेवून अगदी अनपेक्षित खेळी करत राहणे, हा याचा विरंगुळा होता. विशाल पडद्यावरील अत्याधुनिक तंत्राने साकार झालेला हा बॅटमॅन बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. 400 मिलियन डॉलर्सची कमाई त्याने केली. अमेरिकन आणि जगभरातील प्रेक्षकांवर यांची काय जादू आहे, त्याचे हे आकडे पुरावे आहेत. पण हाही विक्रम 2008मध्ये आलेल्या ‘डार्क नाईट’ या चित्रपटाने मोडीत काढला. एक बिलियन डॉलर्स कमाई केलेल्या या चित्रपटामध्ये ‘जोकर’ हिथ लेझर या अत्यंत प्रतिभावान नटाने साकारला होता. मला व्यक्तिश: हा जोकर अधिक आवडतो; त्यांच्या मेकअपच्या संकल्पनेसकट! जोकरचे पांढरेपण आणि चेह-यावरील लाल भडक हसू, डोळ्यांतील काळे काजळ सारेच काही विस्कटलेले, पुसून टाकलेले होते. डोक्यावरील केसांना कधी कंगवा लागला नसावा. भूमिकेची मानसिक अवस्था, भरकटलेपण इतक्या प्रभावीपणे मेकअपमधून क्वचित अधोरेखित होते. आणि त्या विस्कटलेल्या काळजामधून विलक्षण आत्मविश्वासाने, सहजतेने विक्षिप्तपणाची लहर दाखविणारे पाणीदार डोळे. एकूण शारीरिक हालचाली आणि बोलण्याची ढब, धमकीसुद्धा समजावणीच्या सुरात देण्याची, अंगावर काटा आणणारी पद्धत अविस्मरणीय आहे. ‘कोल्ड माऊन्टन’सारख्या समलिंगी नात्यावरील चित्रपटामध्ये अभिनय केल्यानंतर हिथ लेझरने हा ‘जोकर’ अजरामर केला आणि त्यासाठी मिळणारे ऑस्कर अवॉर्ड घेण्याआधीच या जगाचाही निरोप घेतला. हाही क्रूर विनोदच म्हणायचा.
सविस्‍तर वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...