आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहिंग्याचा आक्रोश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वत:चे घर नसणे, स्वत:चा देश नसणे, कुठे राहावे, काय काम करावे, किती पैसे कमवावे, लग्न करावे की न करावे, अपत्य जन्माला घालावे की न घालावे, अशी विलक्षण कोंडी रोहिंग्या स्थलांतरित सध्या अनुभवताहेत, परंतु त्यांचा आक्रोश हवेतच विरून जातोय...

गेले महिनाभर इन्स्टंट नूडल्सच्या बंदीवरच्या कथा बऱ्याच गाजल्या. यात नूडल्समध्ये असणाऱ्या घातक घटकांपासून तर होस्टेल, कॉलेज आणि बॅचलरलाइफमध्ये इस्त्री गरम करून त्यावर भांडे ठेवून मॅगी बनविणे किंवा फक्त चार मेणबत्त्यांंच्या साहाय्याने मॅगी बनविणे इत्यादी रंजक किस्से तयार होत होते. इन्स्टंट नूडल्सवर अशी उलटसुलट चर्चा सुरू असताना जगाच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यात इन्स्टंट नूडल्सचीच पाकिटे एका समूहाला अन्न म्हणून वाटली जात होती. या नूडल्स शिजवण्यासाठी त्या समूहातल्या लोकांजवळ कुठलेही भांडे अथवा विस्तवाचा कुठलाही स्रोत उपलब्ध नव्हता. कारण, जगातल्या सर्व देशांनी नागरिकत्व नाकारल्याने, माणसांचा हा समूह अन्न म्हणून फेकलेली बिस्किटे आणि न शिजवलेल्या कच्च्या नूडल्स खात एखादा देश आश्रय देईल, या आशेने भणंगासारखा समुद्रावर भरकटतो आहे. हा लेख लिहिला जाईपर्यंत बांगलादेश आणि म्यानमारमधून बोटीत बसून आश्रयाच्या शोधात बाहेर पडणाऱ्या ३००० शरणार्थींची रवानगी निर्वासितांच्या छावण्यांत करण्यात आलेली आहे. हजारो शरणार्थी अजूनही बोटींमध्ये बसून आहेत. या बोटींवर ना अन्न आहे, ना पाणी. प्रत्येक बोटीवरचे मृत्यूचे प्रमाण पाहता, या बोटींना तरंगत्या शवपेट्या म्हटल्यास वावगे ठरू नये.

गेली काही वर्षे आंतराष्ट्रीय स्तरावर रोहिंग्या मूळचे कुठले? हा वाद वेळोवेळी काढला जातो. म्यानमारमधील रखाईन भागात वास्तव्य असलेल्या या मुस्लिम अल्पसंख्याक जमातीला म्यानमार-बांग्लादेशातून रोजगारासाठी आलेले स्थलांतरित समजतो. रोहिंग्यांच्या कित्येक पिढ्या इथेच वास्तव्य करून असल्या तरी या लोकांना म्यानमारचे नागरिक मानले जात नाही, नागरिकांना मिळणाऱ्या कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत. अलीकडे झालेल्या जणगणनेत, या लोकांना समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे रोहिंग्या हे राष्ट्रविहीन लोक समजले जातात. रोहिंग्यांना लग्न करणे, अथवा अपत्य जन्माला घालण्यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. त्यांनी कुठे राहावे, काय काम करावे आणि किती पैसे कमवावेत, यावर अनेक बंधने आहेत. याशिवाय बहुसंख्याकांविरुद्ध होणाऱ्या चकमकीनंतर आपल्यावरचा उरलासुरला विश्वासही रोहिंग्या गमावून बसले आहेत. यातले एकूणएक लोक दारिद्र्याने पिडलेले असल्याने राष्ट्रसंकल्पना अथवा नागरिकता, या विषयांवर विचार करण्याचे आकलन वा वेळ त्यांच्याकडे नाही. या पराकोटीच्या अन्यायग्रस्त परिस्थितीत जिथे आहोत, तिथेच अन्याय सहन करीत मृत्यूला सामोरे जाणे किंवा मग पळून जाताना मृत्यूची जोखीम घेऊन दुसऱ्या देशाकडे धाव घेणे, हे दोनच पर्याय रोहिंग्यांजवळ राहतात. आपल्याकडे असेल नसेल ते विकून हे लोक मानवी तस्करांच्या मदतीने निरनिराळ्या देशांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. एका बोटीत शेकडो लोक ठासून भरलेल्या, पुरेशा अन्न आणि पाण्याच्या बेगमीशिवाय मग या बोटी मध्य आशियातल्या निरनिरळ्या देशांच्या दुर्लक्षित समुद्राकडे पाठवल्या जातात. या बोटीतला प्रवास अर्थातच घुसमटलेला आणि प्रचंड हलाखीचा असतो. तरीही जिवंत रहाण्याची आदिम ओढ रोहिंग्यांना जिवंत ठेवत असते.

जिवावरची जोखीम घेऊन केलेला बोटींवरचा हा प्रवास कित्येकदा भर समुद्रातच संपतो. कधी बोट कुठल्या देशाच्या किनाऱ्याला लागते तेव्हा त्या देशात बेकायदा घुसखोरी करताना अग्निदिव्याला सामोरे जावे लागते. आणि यात अनेकांचा मृत्यू ओढवतो. इथपर्यंतचे हे चक्र जगण्यासाठी केलेला संघर्ष म्हणून पाहता येईल. पण कित्येकदा हा संघर्ष फसतो आणि ज्या देशात या बोटी पोहोचल्या आहेत त्या देशातले सैन्य या बोटींना परत समुद्रात हुसकावून लावते. समुद्रात परत ढकलले जाण्यानंतर मात्र रोहिंग्यांच्या जगण्याचा संघर्ष संपतो, आणि मृत्यूचे महाभयानक तांडव सुरू होते. पुरेशा अन्नाअभावी बोटीवरची लहान मुले अगोदर दगावतात. समुद्रातले खारे पाणी अथवा स्वतःचेच मूत्र पिल्याने हायपरनेट्रीमिनीया होऊन हळूहळू इतर लोक मरायला सुरुवात होते. आश्रय नाकारणाऱ्या देशाकडून पाणी अथवा अन्नाची मदत मिळालेली असल्यास हा संघर्ष मग आणखी काही दिवस तग धरून दुसऱ्या एखाद्या देशात पोहोचण्याचा प्रयत्न करतो, कदाचित पुन्हा एकदा हाकलून लावला जाण्यासाठी. भणंग भिकाऱ्यांच्या या अवस्थेततला दुसरा टप्पा अर्थातच कुठल्या ना कुठल्या देशात, शरण मिळविण्याचा आहे आणि नेमके इथेच आंतरराष्ट्रीय समुदायाला परिस्थिती आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे. मलेशिया आणि इंडोनेशियात या बोटी पोहोचल्यानंतर या निर्वासितांना पुरेशी वैद्यकीय मदत देऊ केल्यानंतर पुन्हा बोटीत बसवून देत आपल्या देशातील जमिनीवर तात्पुरता निवारा देण्यासही नकार देण्याचे अमानवी कृत्य या देशांनी केले. यापुढचा सर्वात संतापजनक प्रकार ऑस्ट्रेलियाच्या सरकारने केला असल्याचे सांगितले जात आहे. या बोटी परत इंडोनेशियाकडे पाठविण्यासाठी त्यांनी तस्करांना प्रत्येकी पाच हजार डॉलर देऊ केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

सारीपाटावरल्या या अमानवी राजकीय खेळीत आतापर्यंत थायलंडने घेतलेली भूमिका बरीचशी समाधानकारक म्हणता येईल. थायलंडमध्ये आजपावेतो दीड लाखांहून अधिक शरणार्थींनी आश्रय घेतला असून त्यात पंचेचाळीस हजाराहून अधिक रोहिंग्या आहेत. हा चांगुलपणा आम्हाला भलताच महागात पडतो आहे, असे थायलंडचे म्हणणे आहे. समस्यांचे मूळ म्यानमारमध्ये असून आपल्या देशातल्या अल्पसंख्याकांना मूलभूत नागरिकत्वही न देण्याच्या त्यांच्या निगरगट्ट भावनेतून ही समस्या उत्पन्न झाली आहे, असे थायलंडचे म्हणणे आहे; ज्यात बरेचसे तथ्यही आहे. या लोकांकडे म्यानमारमधल्या बहुसंख्याकांनी सहानुभूतीने पाहावे, असे आवाहन "अ‍ॅम्नेस्टी' आणि "वर्ल्ड ह्यूमन राइट्स' या संस्थांनी आणि दलाई लामांनी केले आहे. हे असे असले, तर म्यानमारतर्फे अजून कुठल्याही आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत "डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स'सारखी आंतरराष्ट्रीय संघटना रखाईन भागात शक्य होईल तेवढी मदत करण्याचे प्रयत्न करीत होती. परंतु या निमित्ताने या भागातली भयानक परिस्थिती जगासमोर आणली जाईल, या भीतीने म्यानमारने या संघटनेवर बंदी आणली आहे. मानवतावादी नजरेतून पाहताना रोहिंग्यांबद्दल भारतीयांना सहानुभूती वाटणे साहजिक असायला हवे; पण भारतात सध्या मानवतावादापेक्षा सोयीने चालणारे राजकीय वारे पाहता भारतीयांना रोहिंग्याबद्दल सहानुभूती असण्याची शक्यता तशी फार कमी आहे.

बहुसंख्य हिंदूंचा देश म्हणून बहुसंख्य बौद्धांच्या म्यानमारकडे पाहिल्यास तिथल्या बहुसंख्याकांबद्दल सहानुभूती वाटण्याची काही शक्यता भारतात आहे. २०१३ मध्ये बोधगयावर केला गेलेला बॉम्बहल्ला हा रोहिंग्यांवर होणाऱ्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी केला गेला होता अशी माहिती समोर आल्यानंतर आता कुठलाही शहाणा पत्रकार अथवा राजकीय पक्ष या विषयावर बोलणे पूर्णतः टाळतो. इतकेच काय, पण भारतातल्या माध्यमांतही या समस्येबद्दल फार काही छापून आलेले नाही. रोहिंग्या ही जमात मुस्लिम असल्याने पाकिस्तानच्या जमात-ए-इस्लामी संघटनेने रोहिंग्यांच्या परिस्थितीबद्दल तीव्र निषेध नोंदवलाय. इतकेच नाही, तर इतर मुस्लिम राष्ट्रांनी म्यानमारसोबत संबंध तोडून टाकावेत, असेही आवाहन केले आहे.
चिघळलेल्या या परिस्थितीच्या एक पाऊल आणखी पुढे जात तालिबानसारख्या दहशतवादी संघटनाही रोहिंग्यांना धर्मयुद्धात सामील होण्याचा पुकारा करीत आहेत. चीन आणि भारताची सरकारे सध्या या विषयावर पूर्णपणे मौन बाळगून असून म्यानमारबरोबर राजकीय आणि आर्थिक संबध वाढवित असताना या विषयाबद्दल कुठलीही टीका करणे आर्थिक संबंधांच्या दृष्टीने त्यांना परवडणारे नाही. अन्नपाण्यावाचून संकटात सापडलेल्या ज्या रोहिंग्यांभोवती हे राजकारण चाललंय, त्यांना मात्र या प्रकाराची तितकीशी जाणीव नाही. महासागरात भरकटलेल्या त्यांच्या बोटींना आपण नेमके कुठल्या अक्षांश-रेखांशावर आहोत, हेही माहीत नाही. गुंतागुंतीची धार्मिक चढाओढ आणि पैशांच्या कूटनीतीला टाळून रोहिंग्यांवर होणाऱ्या या अत्याचाराबद्दल भारताने म्यानमारला स्पष्ट शब्दांत समजावले पाहिजे. जात, धर्म आणि सीमारेषा या पलीकडे जगात अजूनही मानवता शिल्लक असू शकते, याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचे काम भारत करू शकतो. तसेच आपल्या भोवतालचे सर्व जग एका प्रचंड मानसिक अस्थैर्यातून जात असताना ज्या देशाने गौतम बुद्धांना जन्म दिला आणि जगाला शांतीचा संदेश दिला, त्या देशाने मानवतेची वैश्विक भावना अजूनही कुठेतरी जिवंत असल्याचे उर्वरित जगाला पटवून दिले पाहिजे. शेवटी जात, धर्म, भाषा आणि सीमारेषांच्या पलीकडे बघताना आज जगभरातील पाच कोटी विस्थापित लोकांना मरणयातनांचा सामना करावा लागतोय; हीदेखील माणसेच आहेत आणि याच धरतीची लेकरे आहेत, हे आपण विसरता कामा नये.
(rahulbaba@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...