आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाची कलाकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैसा ही मोठी मजेशीर गोष्ट आहे. पैसा दोन प्रकारचा असतो. पहिला प्रकार अर्थातच सरकार, रिझर्व्ह बँक, मोठमोठे उद्योग, घोटाळे, भ्रष्टाचार, योजना, महत्त्वाकांक्षी प्रकल्प या क्षेत्रांत वापरला जाणारा पैसा. या पैशाविषयी मोठमोठे लोक मोठमोठ्या गोष्टी सांगत असतात. काही लाख कोटींच्या योजना, काही अब्ज रुपयांचे अर्थसंकल्प, काही सहस्र कोटींचे पुतळे आणि कधीकधी काही लाख कोटी रुपयांचे भ्रष्टाचारी घोटाळे. आता मुळात सामान्य माणसाने कोटी रुपये कधी एकदम पाहिलेलेच नसतात, त्यामुळे त्यासंबंधी आलेल्या बातम्यांचा त्याच्या मेंदूवर काही परिणाम होत नाही. त्याचा पैसा हा शक्यतो काही हजार आणि क्वचित काही लाख रुपयांचा बँक अकाउंटमध्ये असणारा किंवा मग नोटांच्या स्वरूपात खिशात आणि कपाटात ठेवलेला असतो. या पैशाविषयी येणारी बातमी मात्र त्याला बरोबर समजते. उद्यापासून पेट्रोल तीन रुपये महाग होणार, या बातमीनंतर लगेचच पेट्रोलपंपावर भली मोठी रांग लागते. तीन रुपये वाचविल्याचे समाधान देशाच्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचारावर चिडून जाण्यापेक्षा मोठे असते.

आमची नोटा आणि नाण्यांच्या स्वरूपातल्या पैशांची समज किती प्रगल्भ आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास अनेक मनोरंजनात्मक गोष्टी हाती लागतात. आजकाल लहान मूल बोलायला लागल्यानंतर मम्मी, पप्पा या शब्दानंतर ‘पैसा’ हा शब्द शिकते. जन्मदात्यांशी असलेल्या मूलभूत नात्यानंतर तिसरे महत्त्वाचे नाते असे पैशांशी बनते आणि आयुष्यभर हे नाते मग तुटता तुटत नाही. एक वेळ आईबाप सुटतील, पण पैशाशी संबंध तोडणे केवळ अशक्य. हे मान्य नसल्यास दहा रुपयांची एक नोट घेऊन तिला पूर्ण जाळून टाकण्याची हिंमत करा, जाळणे तर दूर; असे काही करण्याची कल्पनाही सहन होत नाही. पैशाशी आपले नाते, हे असे घट्ट जोडलेले आहे. पैसा हा नव्या जगाचा धर्म असून दहा, पन्नास, शंभर, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा या त्या नव्या धर्माच्या पवित्र पोथ्या आहेत.

सामान्यांचा हा पैसा सरकारी मालकीच्या निरनिराळ्या छापखान्यांमध्ये छापला जातो, रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत येणार्‍या सरकारी बँकांमध्ये साठवला जातो. त्याचे निरनिराळ्या लोकांना वितरण करून, तो पैसा चलनात आणला जातो आणि मग या खिशातून त्या खिशात आणि या बँकेतून त्या बँकेत फिरत राहतो. फिरता फिरता अर्थातच त्याचे अंग घुसळले जाते. नवा कोरा पोत जाऊन ढिलेपणा येतो. हळूहळू तो आजारी पडायला लागतो. आजारी पैशाला रिझर्व्ह बँक वेगळे काढायला सुरुवात करते. या आजारी पैशाचे ढीग जमा होत होत, मग मोठे होत जातात आणि मग एक दिवस त्यांची रवानगी पेपर कापून टाकणार्‍या एका मोठ्या यंत्रात केली जाते. पैशाचे मग बारीक बारीक कपट्यांत रूपांतर होते. कधी काळी जीवनाची आयुष्यरेखा बनलेला पैशाचा मग कचरा बनतो. या कचर्‍याचे मूल्य इतर कागदांच्या कचर्‍याच्या मूल्याइतकेच असते.
काहीच मूल्य नसलेला हा पैशाचा कचरा मग इंधन म्हणून वापरला जाऊ शकतो किंवा मग त्याच्या विटा बनवून रस्त्याच्या बांधकामात वापरल्या जातात. क्वचित प्रसंगी या कचर्‍याचे पल्पमध्ये रूपांतर करून त्यापासून दुय्यम दर्जाचे पुठ्ठेही निर्माण केले जातात. रद्दी कागदाची किंमत असली, तरी त्यावरचे रंग आणि चित्रांचे तुकडे मग काही नव्या प्रश्नांची निर्मिती करतात.

जगभरात वापरात असणार्‍या कोट्यवधी नोटांची निर्मिती करण्यासाठी बेसुमार वृक्षतोड होते, नोटांवर निरनिराळे रासायनिक रंग लावल्याने त्याचे कचर्‍यात रूपांतर झाल्याने, तो कचरा जाळणे वा जमिनीत गाडून टाकण्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. नोटा चलनात असल्यानंतर आपल्याला जितक्या आकर्षक वाटतात, त्याच आकर्षणातून नोटांच्या कचर्‍याविषयीदेखील आपल्याला एक वेगळेच भावनात्मक आकर्षण निर्माण होते आणि या आकर्षणातूनच मग नानाविध आविष्कारांची निर्मिती होते.

मार्क वॅगनर नावाचा अमेरिकन चित्रकार फक्त एक डॉलरच्या नोटांचे निरनिराळे तुकडे वापरून त्या तुकड्यांतून कोलाज तंत्राने नवे चित्र तयार करतो. त्याच्या चित्रांचे विषय पैशांशीच निगडित असलेल्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांसंबधी असतात.

रॉबर्ट वेश्लर नावाचा शिल्पकार सुट्ट्या नाण्यांना घेऊन त्याचे मोठमोठे स्तंभ आणि चौकोन बनवितो, तर एरिक पेन्सर नावाचा स्वीडिश कलाकार देशोदेशीची नाणी गोळा करून एखाद्या देशाचा नकाशा त्या देशाच्या नाण्यांमधूनच तयार करतो आणि लॅटिवियामधली इरिना ट्रहानोवा त्या देशांच्या चलनातले फक्त रंग वापरून ऐतिहासिक पोर्ट्रेट‌्स बनविते. सुजान स्टॉकवेलसारखी फॅशन डिझायनर जगभरातल्या चलनी नोटा एकत्र शिवून त्याच्यापासून सुंदरसा ड्रेस बनविते, तर फ्लोरिडामधले पाईन बेटावरचे एक रेस्टॉरंट, आतल्या सर्व भागांवर नोटाच नोटा चिकटविते.

चलनी नोटांचा हा कलात्मक वापर गमतीशीर आणि कल्पक आहे, हे निश्चित; पण या पलीकडे जाऊन नोटांचा राजकीय चळवळीत भूमिका मांडण्यासाठीदेखील वापर होतो आहे. यात झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष मुगाबे यांच्या ढिसाळ अर्थनीतीने बेसुमार चलनवाढ होऊन, वापरात आणण्यात आलेल्या १०० ट्रिलियनच्या नोटेचे उदाहरण, बरेचसे बोलके आहे. झिम्बाब्वेच्या कोसळलेल्या अर्थव्यवस्थेचे निदर्शक म्हणून या अवास्तव चलनी मूल्याच्या नोटांचे वॉलपेपर आणि पोस्टर बनवून ‘द झिम्बाब्वियन’ या दैनिकाने २००९मध्ये पूर्ण जगाचे लक्ष या समस्येकडे वेधून घेतले होते. अमेरिकेच्या मार्क वॅग्नरच्याच ‘ईफ ओनली’ या चित्रात पैशाच्या अगणित वाढत जाणार्‍या वटवृक्षावर अमेरिकेचे पितामह जॉर्ज वॉशिंग्टन कुऱ्हाड चालविताना दाखविले आहे, तर दुसर्‍या एका कलाकृतीत नोटांचा कल्पकतेने वापर करून त्यापासून कचर्‍याचा झाडू बनविला आहे. हा झाडू जगातला सर्वात महागडा झाडू आहे, हे सांगायला नकोच.

तर असा हा पैशापासून तयार होणार बिनपैशाचा खेळ. चलनातल्या पैशांमागे धावताना सामान्य माणूस जेवढा व्यग्र, तेवढाच तो चलनातून काढून टाकलेल्या पैशातून कलात्मक बनावा, म्हणून अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेने काही वर्षांपूर्वी एक युक्ती शोधून काढली. चलनातून बाद झालेल्या नोटांचे बारीक बारीक तुकडे करून यातून पुन्हा नोटा तयार करता येणार नाहीत, याची दक्षता घेऊन हे तुकडे लोकांना विकायला सुरुवात केली. आज कुठलाही सामान्य अमेरिकन माणूस फेडरल रिझर्व्हचे प्रदर्शन पाहायला गेल्यास, त्याला हे पिशवी भरून कपटे फेडरल बँक भेटवस्तू म्हणून देते किंवा मग इंटरनेटवर दहा डॉलर देऊन तुम्ही काही, हजार डॉलर किंमत असलेल्या डॉलरचे तुकडे सहज विकत घेऊ शकता. त्यातून मग हे कपटे बरणीत साठवून ठेवणे, निरनिराळ्या शोभेच्या वस्तूंमध्ये वापरणे किंवा काचेच्या गोलांत ठेवून त्यातून कल्पक चीजवस्तू तयार केल्या जाऊ शकतात. अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह हे करीत असताना भारताच्या रिझर्व्ह बँकनेही या शक्यतेवर २००९ मध्ये विचार केला होता. गेल्याच महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा अब्जावधी किमतीच्या कोट्यवधी नोटा चलनातून बाद केल्या असून या नोटांच्या कपट्यांची कंत्राटे निघणार आहेत. अवघ्या सहा रुपये किलो भावाने सामान्य लोकांसाठी हा कचरा उपलब्ध झाला असता, तर यातून भारतातल्या कलाकारांनीही कल्पक प्रयोग केले असते, हे निश्चित.
rahulbaba@gmail.com