आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फापटपसारा: आवाज नास्तिकांचा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एथिस्ट फाउंडेशन ऑफ ऑस्ट्रेलिया - Divya Marathi
एथिस्ट फाउंडेशन ऑफ ऑस्ट्रेलिया
जगात एकच धर्म असल्यास शांती येईल, असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे आणि ही शांती केवळ आमच्याच धर्मामुळे येऊ शकेल, असे प्रत्येक धर्माच्या अनुयायाला वाटते. या जागतिक शांतीसाठी हिंसेचा मार्ग पत्करून एकाच धर्माची व्यवस्था आणण्याच्या प्रक्रियेत सर्वात अगोदर बळी जातोय, तो नास्तिकांचा.

परमेश्वराचा शोध घेण्यात माणसाच्या कैक पिढ्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. जगाचा कर्ता करविता देव कसा असतो, कुठे राहतो, त्याला नेमके काय हवे असते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात माणसाने लाखो सूक्त रचली, धर्मग्रंथ लिहिले, काही जण अन्नपाण्याचा त्याग करून, त्याचे नामस्मरण करीत मृत्युमुखी पडले (किंवा ईश्वरचरणी विलीन झाले, असे म्हणू या). देवाची व्याख्या करून त्याला अपेक्षित असलेल्या आचरणाचे नीतिनियम, अनेक परिशिष्टांसहित, निरनिराळ्या धर्मग्रंथात लिहून ठेवण्यात आले. त्या धर्मग्रंथांना अनुसरून वागणाऱ्या व्यक्तिसमूहांना ‘धर्म' या संकल्पनेखाली एकत्र येता आले. या निरनिराळ्या धर्मांनी लोकांना नैतिकतेच्या व्याख्या आणि पापपुण्याचे हिशेब मांडून जगायला शिकविले. जगात एकच धर्म असता तर कदाचित जगाचे चित्र वेगळे राहिले असते, पण विविध धर्मग्रंथांच्या आचारविचारांत असणारी तफावत, मग त्यांना अनुसरणाऱ्या धर्मसमूहांमध्ये परस्परविरोधी वातावरण तयार करू लागली. आमचाच धर्म श्रेष्ठ आणि त्याला अपेक्षित असलेला परमेश्वर हाच खरा परमेश्वर, या मूलभूत मुद्द्यावरून लोक कधी सभ्यपणे चर्चा करू लागले, कधी आततायी शाब्दिक हिंसा, तर कधी थेट एकमेकांचे गळे कापत धर्माच्या संकल्पनांचे अर्थ शोधत राहिले. आजही शोधत आहेत. धर्माची संकल्पना कधी कालातीत होईल, ही शक्यता तशी फार कमी वाटते. धर्म विलुप्त होणार नसतील, तर त्या धर्माची परमेश्वराबद्दलची व्याख्याही नाहीशी होणारी नाही.

अनादी अनंत परमेश्वराचा शोध अनेक धर्मसंस्थापकांनी आपापल्या परीने घेतला, त्या संबंधीचे विस्तृत विवेचन आपल्या धर्मग्रंथांमध्ये लिहून ठेवले. ज्या वेळी हे धर्मग्रंथ लिहिले गेले, त्या काळाचे वर्तमान, सामाजिक परिस्थिती, लोकांच्या आकांक्षा, दु:खाचे स्वरूप आणि समूहांचे राजकारण हे आजच्या तुलनेत बरेच वेगळे होते. विज्ञानाच्या वापराने आज माणसाने केलेली प्रगती, त्यातून आज-काहींच्या-वाट्याला आलेले सुखासीन जीवन, लोकांच्या आकांक्षांचे आणि दु:खाचे बदललेले स्वरूप आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असणारी आजची परिस्थिती, या धर्मग्रंथांच्या काळातील परिस्थितीपेक्षा खूपच वेगळी आहे. अशा स्थितीत वर्तमानाशी सुसंगत असा नवा धर्म स्थापला जायला हवा, किंवा मग ज्ञात धर्मांची चिकित्सा आणि अनुरूप बदल व्हायला हवेत. जगाची लोकसंख्या पुरातन धर्मांत अगोदरच वाटली गेलेली असल्याने, आणि बहुसंख्येचा त्या त्या धर्मांवर ठाम विश्वास असल्याने नवा धर्म स्थापला जावा, असे सध्याच्या धार्मिक लोकांना पटणारे नाही. मग उपाय उरतो तो उपलब्ध धर्मांची चिकित्सा करून, त्यात बदल करून त्याची वर्तमानाशी सांगड घालण्याचा.

अर्थात, धार्मिक व्याख्यांची वर्तमानाशी सांगड घालताना सर्वप्रथम राजकीय परिस्थितीचा विचार करावा लागतो. काही देशांमध्ये अनेक धर्मांचे लोक एकत्र असतात आणि त्यात कोणत्याही एका धर्माचे लोक ७५% हून जास्त नसतात. तेव्हा एकमेकांच्या धर्माशी सलोख्याने वागून कट्टर धार्मिकतेपेक्षा, धर्मनिरपेक्षतेचा मार्ग स्वीकारून सर्वसमावेशक सामाजिक प्रगती साधणे शक्य असते. या परिस्थितीत नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य असले, तरी धर्मांचे अवाजवी स्तोम माजवता येत नाही. धार्मिक विचार ही खाजगी बाब बनून माणसाचे खाजगी वर्तन धार्मिक, तर सामाजिक वर्तन धर्मनिरपेक्ष राहून सामाजिक शांतता राखणे शक्य होते. देशातली सामाजिक शांतता जितकी जास्त तितका तो देश सुखी, असे एका अर्थाने म्हणता येते. हे सुख म्हणजे, आर्थिक प्रगती किंवा सिमेंटच्या मोठमोठ्या इमारती नव्हे; तर एक असे सुख ज्यात माणसे पैशांसाठी हपापलेली नाहीत, त्यांच्या गरजा मर्यादित अाहेत. कष्टांचा फारसा गाजावाजा न करता लोक आपल्या वाट्याला येणारे काम भांडणे न करता वा एकमेकांचे गळे न कापता करत आपले आयुष्य व्यवस्थित जगत आहेत.
माहिती-तंत्रज्ञानाची क्रांती जगभर पसरल्यानंतर आणि जगात असलेले एकूण एक साहित्य, तत्त्वज्ञान आणि माहिती सामान्यांच्या अवाक्यात आल्यानंतर, देव या संकल्पनेला पराकोटीचा आदर देत विचारलेल्या प्रश्नांना तिलांजली देऊन माणसांचे काही समूह आता जरा वेगळे प्रश्न विचारू लागले आहेत. ‘कशावरून देव हा पुरुषच असेल, स्त्री का नाही?' किंवा ‘परमेश्वर जर जगाचा कर्ता-करविता आहे, तर मग जगात चाललेल्या वाईट गोष्टींचीही जबाबदारी तो घेतो का?', ‘स्वर्ग आहेच कशावरुन?', ‘देव नेमका कसा दिसतो?', हे आणि असे अनेक प्रश्न बालसुलभ प्रश्न म्हणून पाहता येतील किंवा पराकोटीचे मूलभूत प्रश्न म्हणूनही. ज्याचे उत्तर धर्मगुरू म्हणवणाऱ्यांकडे तयार असले तरी ते प्रश्न विचारणाऱ्यांना पटत नाही. देव असल्याचा पुरावा उपलब्ध नसल्याने देवाला नाकारणाऱ्या लोकांना मग ‘नास्तिक' म्हटले जाते. अलीकडे अशी विचारधारणा ठेवणाऱ्या लोकांची संख्या वाढत असून एरवी एकमेकांशी भांडणाऱ्या सर्व धर्मियांमध्ये या ‘नास्तिक' वर्गातल्या लोकांबद्दल राग असतो. जगात या घडीला सर्वात जास्त हेटाळणी कुणाची होत असेल तर ती नास्तिकांची. अशा लोकांना पढतमूर्ख म्हणणे, वेड्यात काढणे, गर्विष्ठ म्हणणे, धर्मद्रोही म्हणणे आणि धार्मिक बहुसंख्येत सरळसरळ ‘देशद्रोही' असल्याचा किताब देणे, ही नवी वास्तवता बनली आहे. व्यापक अर्थाने पाहिल्यास ‘नास्तिक' हे खरे तर सर्वात असुरक्षित अल्पसंख्याक आहेत. एखाद्या देशात धार्मिक कट्टरता जेवढी जास्त तेवढेच नास्तिक असणे धोक्याचे असते. देवाच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणाऱ्यांना भर चौकात फाशी दिले जाते, सुरे व चाकू घेऊन हाल हाल करून मारले जाते, हे शक्य नसेल तिथे त्यांची बंदुकीच्या गोळीने गुपचुप शिकार केली जाते. जगात एकच धर्म असल्यास शांती येईल, असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे आणि ही शांती केवळ आमच्याच धर्मामुळे येऊ शकेल, असे प्रत्येक धर्माच्या अनुयायाला वाटते. या जागतिक शांतीसाठी हिंसेचा मार्ग पत्करून एकाच धर्माची व्यवस्था आणण्याच्या प्रक्रियेत सर्वात अगोदर बळी जातोय, तो नास्तिकांचा. असे का होत असावे? या प्रश्नाचे निश्चित उत्तर खुद्द नास्तिकांकडेही नाही. मारले जाण्याची भीती पत्करूनही ते प्रश्न मात्र विचारणे थांबवत नाहीत, उलट त्यांचे प्रश्न विचारण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

rahulbaba@gmail.com