आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाश्वत संघर्षनाट्य!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ते २००७ चा हा काळ. देश वेगाने प्रगती करतोय. देशाचा जीडीपी आणि उपभोगांचे आलेख एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. हे सगळे होत असताना या घडामोडींवर अवलंबून असणारी एक नवी बाजारपेठ उभी राहते-कचर्‍याची बाजारपेठ. एरवी टाकाऊ म्हणून टाकून दिलेल्या कितीतरी गोष्टींमध्ये एक नवी सूक्ष्म अर्थव्यवस्था आकार घ्यायला लागते. २००८मध्ये येऊ घातलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी चीनमध्ये नवनव्या इमारती वेगाने उभ्या राहायला लागतात. या इमारतींच्या पायासाठी वापरले जाणारे मूलभूत डबर आणि स्क्रॅपची एक मोठी गरज निर्माण होते. या डबरमध्ये कच्चा माल म्हणून वापरल्या जाणार्‍या मिनरल वॉटरच्या बाटल्या मग एक घाऊक कमोडिटी बनून जातात. रोजच्या शेअर निर्देशांकासारखी त्यांची किंमत वरखाली होते, बदलते. २५ रुपये किलो या भावात विकल्या जाणार्‍या त्या भंगारच्या बाटल्या शहरी झोपडपट्ट्यांत एक तात्पुरती नवी श्रीमंती घेऊन येतात. भंगार गोळा करण्याच्या व्यवसायात एका अकरा वर्षांच्या मुलाला रोज वडापाव खाण्याऐवजी अधूनमधून चिकन चिल्ली राइस खायची चंगळ शक्य व्हायला लागते.

२००८. चीनमधल्या बांधकामांचा वेग मंदावला असून जग आर्थिक महामंदीत सापडले आहे. निर्देशांक नीचांकी पातळीवर आलेले असून या निर्देशांकाशी थेट निगडित असणार्‍या भंगारच्या व्यवसायातही मंदी आलेली आहे. मिनरल वॉटरच्या बाटल्यांचा दर १५ रुपये प्रतिकिलो घसरला आहे. तूट भरून निघावी म्हणून लोक जास्त कष्ट करून जास्त बाटल्या गोळा करतात, आणि आवक वाढल्याने बाटल्यांचा भाव आणखी कमी होऊन दहा रुपये प्रतिकिलोवर येतो. पोटाची भूक शमवण्याच्या मूलभूत प्रेरणेतून शहरी जीवनातले भंगारविश्व बदललेल्या समीकरणांशी जुळवून घ्यायला शिकते आणि जगण्याच्या या संघर्षातून मग ‘बिहाइंड द ब्यूटिफुल फॉरएव्हर’ नावाचा कथापट उभा राहतो.

पुलित्झर पुरस्कार प्राप्त लेखिका कॅथरीन बू यांच्या ‘बिहाइंड द ब्यूटिफुल फॉरएव्हर’ नावाच्या पुस्तकाने गरिबी आणि जगण्याचा संघर्ष एका निरपेक्ष नजरेतून उभा केला. यात कुठेही त्यांनी गरिबी बटबटीत केली नाही अथवा दारिद्र्याचा अनुकंप केला नाही. आपल्या निर्मितीक्षमतेचा वापर करत लोक आपले पोट कसे भरतात, याचा थेट मागोवा बू यांनी घ्यायचे ठरविले. यासाठी तीन वर्षांहूनही अधिक काळ मुंबईतल्या अण्णावाडी झोपडपट्टीशी त्या एकरूप झाल्या. प्रथम या बाईंविषयी तिथल्या लोकांना आदर आणि कुतूहल वाटले; नंतर आश्चर्य आणि सरत्या टप्प्यात कीव. हे लोक ‘गरीब’ आहेत, हे सुखवस्तू आणि रोज पोट भरणार्‍यांना माहीत असते. त्यामुळे सर्वसाधारण लोकांना गरिबांची एकतर दया येते किंवा राग. पण या वस्तीतल्या लोकांना मात्र श्रीमंती काय असते वा पैसे बचत करणे म्हणजे नेमके काय, याबद्दल काहीही माहिती नाही. किंबहुना ते आर्थिक उतरंडीत सगळ्यात तळाशी आहेत. मुंबई विमानतळाजवळ ‘ब्यूटिफुल फॉरएव्हर’ ही बांधकामाच्या टाइल्सची आश्वासनात्मक जाहिरात लावलेली आहे आणि त्या जाहिरात लावलेल्या भिंतीच्या पलीकडे आहे, अण्णावाडी नावाचे साधारण तीन हजार लोकसंख्येचे एक विश्व. येथे जगणार्‍या प्रत्येकाला आपण मुख्य समाजाचा भाग नसून एक अडचण आहोत, हे माहीत आहे.
आपल्या जगण्याने वा मरण्याने कुणालाही फरक पडत नाही, या एका भयंकर जाणिवेतून इथले दैनंदिन जीवन रोज पुढे सरकते. ते पुढे सरकते, असे म्हणणेही कदाचित सयुक्तिक ठरणार नाही; पण यातले काही आपले पोट जवळजवळ रोज व्यवस्थित भरू शकतात, यालाच कदाचित प्रगती म्हटले जाऊ शकेल. कारण यातल्या काही लोकांवर भुकेपोटी कित्येक वेळा गटारातले उंदीर पकडून भाजून खाण्याची वेळ येते, उंदीर न मिळाल्यास ते मोठ्या गटारीच्या कडेला वाढणारे शेवाळ खाऊन गुजराण करतात. वस्तीतल्या वस्तीतही हे लोक सर्वात कमनशिबी आहेत. यातला ‘मध्यमवर्ग’ मग अर्थातच स्वतःला रोज जेवण देऊ शकणारा आहे. रोज जेवण मिळेलच, याची त्यांना खात्री नाही; पण निरनिराळ्या क्लृप्त्या लढवीत हे लोक कधी बांधकामाच्या ठिकाणांहून लोखंड चोरतात, तर कधी कचर्‍याचे ढिगारे उपसतात. ‘जर्मन सिल्व्हर’ ही इथली खरी चांदी. कारण याचे थोडे तुकडे वा गुच्छा भंगारात मिळाल्यास त्यांची दिवसाची मिळकत ६० ते ७० रुपयांच्या घरात जाऊ शकते. यापुढे मग येतो तो या वस्तीतला श्रीमंत वर्ग; ज्याला अन्नाची चैन परवडू शकते. अर्थात, ही चैन खालच्या शोषितांमुळेच शक्य होते.

इथं विस्तवाने भाजलेल्या बाईला इस्पितळात नेताना रिक्षावाला रिक्षा स्वच्छ करावी लागेल म्हणून जास्त पैसे मागतो, दोन वर्षांची लहान मुलं खुशाल मरायला सोडून दिली जातात आणि वयात येण्याअगोदर किती तरी कोवळ्या मुलींवर बलात्कार होतात. असे बलात्कार पोलिसांत कळवल्यास पोलिस बलात्कारित मुलीच्या पालकांकडून खोटे साक्षीदार उभे करण्याची धमकी देत, पैसे उकळण्याचे काम करतात. ‘स्लमडॉग मिलेनियर’सारखी स्वप्ने पाहणारे इथेही आहेत, पण आपल्या स्वप्नांना दिशा देताना त्यांना पराकोटीच्या विरोधाभासी जगाचा सामना करावा लागतो. दशकानुदशके चाललेल्या विकासाच्या नावाखाली घडवून आणल्या गेलेल्या निवडणुका लोकशाहीतला फोलपणा नागडा करतात. आणि या कथनात्मक अहवालात मग कॅथरीन बू एक मूलभूत प्रश्न उभा करतात. परिस्थिती जर एवढी भयानक आहे, तर मग हे लोक एकत्र येऊन बंड का करीत नाहीत? या प्रश्नाचा मागोवा घेताना त्यांना कळते की, हे सर्व शोषित आपापसांतच एकमेकांना नष्ट करण्याच्या प्रक्रियेत सहभागी आहेत. किंबहुना स्वतःचे शोषण टाळायचे असल्यास, त्यांना दुसर्‍याचे शोषण करावेच लागते. या प्रक्रियेत कधीतरी त्यांचाही जीव जाऊ शकतो किंवा मग त्यांना स्वतःचाही जीव द्यावा लागू शकतो.
जगण्याचा संघर्ष हा एकाच वर्गातल्या लोकांमध्ये वेगवेगळे स्तर निर्माण करत थिटा पडत जातो; पण इथली सगळी संभाषणं जिवंत राहण्याच्या एका असीम ऊर्जेतून येत असतात. नेमकी हीच ऊर्जा पकडण्याचा प्रयत्न नाटककार डेविड हरे यांनी ‘बिहाइंड द ब्यूटिफुल फॉरएव्हर’चे नाट्यरूपांतर करताना केले. नॅशनल थिएटर्सच्या मीरा स्याल यांनी ते गेल्या महिन्यात रंगभूमीवर आणले. हे नाटक तसे रंगभूमीवर आणण्याचे काम अत्यंत जोखमीचे होते. पण सशक्त अभिनय आणि नाट्यतंत्राच्या जोरावर हा प्रयोग पूर्णतः यशस्वी झाला. सध्या लंडन शहरात प्रयोग गर्दी खेचत आहेत. यथावकाश हे नाटक न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवर येईल, काही प्रयोग भारतातही होतील.

गेल्या पन्नास वर्षांत गरिबी कमी झाली असली, तरी दारिद्र्यरेषेखाली जगणार्‍या एकूण लोकांची संख्या कमी झालेली नाही, उलट ती वाढते आहे. शहरांचा विकास होताना विस्थापितांचे हजारो लोंढे आपापली गावे सोडून अण्णावाडीसारख्या झोपडपट्टीत अन्नाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत. पुलित्झरसारखा मानाचा गौरव मिळवणार्‍या कॅथरीन बू यांनी भारताच्या दारिद्र्याचे सार्थ विश्लेषण आपल्या पुस्तकात मांडले आहे. दुर्दैवाने, ज्या भारताची ही कथा आहे, तिथल्या सुखवस्तू लोकांना याबद्दल जराही माहिती नाही. इथल्या माध्यमांनीही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय. नामदेव ढसाळांशी नाळ असलेली व्यक्ती दूर कुठे तरी वॉशिंग्टनमध्ये जन्म घेते, हे जितके आश्चर्यजनक आहे, तितकेच भयावह सत्यही!
rahulbaba@gmail.com