आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्ध्वस्त दफनभूमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐंशीच्या दशकात हे भोग अफगाणिस्तानच्या वाट्याला आले. अफगाणिस्तान पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतर महासत्तांनी आपला मोर्चा इराककडे वळवला आणि अफगाणिस्तानप्रमाणेच इराकही पूर्ण उद्ध्वस्त केला. आता अमेरिका-रशिया आपलं वर्चस्वाचं युद्ध सिरियाच्या भूमीत लढतंय. महासत्तांच्या या लढाईला इस्लामिक स्टेट, बशर असाद, पुतीन, शिया-सुन्नी या टोळ्या असे अनेक कंगोरे आहेत. मात्र जगापुढचे सध्याचे प्रश्न हे युद्धखोर नेत्यांच्या कलकलाटापलीकडचे आहेत आणि आत्मकेंद्री नेत्यांच्या विरोधात असलेल्या माध्यमांचे आणि प्रत्येक मानवतावादी व्यक्तीचे प्राथमिक कर्तव्य हे आपल्या देशात शांतीसाठी प्रयत्न करणे, हेच असायला हवे.

रासायनिक अस्त्रांचा हल्ला युद्धग्रस्त सिरियासाठी नवा नाही. या अगोदर अशाच स्वरूपाचे दोन मोठे हल्ले २०१३मध्ये तिथे झाले होते. याशिवाय वरचेवर रासायनिक अस्त्रांच्या लहानसहान घटना तिथे घडतच असतात. गेल्या आठवड्यात मात्र त्याचे स्वरूप भयावह होते. सिरियातल्या इदलिब प्रांतातल्या खान शायखुन येथे झालेल्या या हल्ल्यात ७४ लोकांचा मृत्यू आणि ५५०हून अधिक लोक जायबंदी झाले. या हल्ल्यानंतर जगभरातल्या माध्यमांमध्ये दुसऱ्या दिवशी छापून आलेल्या लहानग्या मुलांच्या मृतदेहांची छायाचित्रे पाहून जगातल्या सर्व संवेदनशील लोकांचे मन हेलावले असणार, यात शंका नाही. 

या संवेदनशील लोकांमध्ये अमेरिकेेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश व्हायला हवा, असे त्यांच्या लोकसंपर्क अधिकाऱ्यांना आणि खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनाही वाटले. उद्ध्वस्त सिरियातल्या गृहयुद्धाने पोळून निघालेले हताश नागरिक देशोदेशींच्या सीमाभागात जाऊन आश्रयासाठी याचना करीत असताना डोनाल्ड ट्रम्प मात्र त्यांना आश्रय न देण्याबद्दल नेहमीच ठाम राहिले आहेत; किंबहुना निर्वासितांना अमेरिकेचे दरवाजे बंद करणे आणि सिरियातल्या तुरळक भागात असलेल्या आयसीस या अतिरेकी संघटनांच्या भीतीचा बागुलबुवा देशात उभा करणे यामुळेच ट्रम्प हे सत्तेत आले आहेत. यानंतर एकदमच खान शायखुन येथील हल्ल्यानंतर त्यांना आपत्तीग्रस्तांविषयी सहानुभूती का वाटत असावी, या प्रश्नाचे उत्तर तसे सोपे आहे. निवडून आल्यानंतर अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षाला आपली हुकमत जगाला दाखवून देण्यासाठी कुठल्या तरी अशांत क्षेत्रातल्या युद्धाची नेहमीच गरज भासत असते. 

निवडून येण्यापूर्वी एखादे युद्ध सुरू असल्यास त्यात हस्तक्षेप करून मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तेथील युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि कुठे युद्ध सुरू नसल्यास अशा युद्धाला जन्म देऊन तिथून आपल्या सामर्थ्याची ग्वाही पूर्ण जगाला देत असतात. गेल्या काही दशकांची अमेरिकेची याबाबतची धोरणे पाहिल्यास खनिज तेल आणि नैसर्गिक संसाधने असलेल्या प्रदेशांत दुही माजविणे, तिथे युद्धजन्य परिस्थिती तयार करणे आणि युद्धात विजय मिळवून मग त्या देशात अमेरिकाधार्जिण्या लोकशाहीची स्थापना करणे अशी सरळसोपी आहे. या सरळसोप्या जागतिक पोलिसगिरीला जगाने आता पुरते ओळखले असल्याने तेलाबाबत स्वयंपूर्ण होऊन बराक ओबामा यांनी मध्यपूर्वेत अमेरिकेची शत्रू म्हणून तयार झालेली ओळख पुसण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्यांना फारसे यश आले नाही. 

अमेरिकेला अतिरेक्यांची भीती दाखवून सत्तेत आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यपूर्वेत शांतता नांदावी वा तिथे युद्धबंदी व्हावी, असे काही वाटणे केवळ अशक्य आहे. रासायनिक हल्ल्यानंतर ज्या संवेदनशीलतेचा आव आणून ट्रम्प पत्रकारांशी बोलत होते, ती संवेदनाच मुदलात ट्रम्प यांच्याकडे नाही, हे माध्यमातल्या ज्येष्ठ पत्रकारांना व्यवस्थित माहीत आहे. गेल्या दहा वर्षांत मानसशास्त्राच्या अभ्यासात जगाने इतकी प्रगती केली आहे की, ट्रम्प यांच्यासारखे लोक आत्मकेंद्री (नार्सिसिस्ट) या प्रकारात मोडतात आणि आत्मकेंद्री लोकांना दुसऱ्या कुठल्याही माणसाबद्दल आत्मीयता नसते वा सत्याची चाडही नसते. तर असे आत्मप्रेमाने ग्रासलेले ट्रम्प जेव्हा माध्यमांसमोर सिरियन नागरिकांवरच्या या हल्ल्यावर अश्रू ढाळतात आणि आपण सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांविषयी प्रचंड नाराज आहोत, असे म्हणतात, तेव्हा त्यांच्यातली करुणा कमी आणि युद्धखोरपणाचा कांगावा जास्त दिसतो. 

भीतीचा बागुलबुवा उभे करणारे लोक हे अतिरेक्यांइतकेच वाईट असतात. याबद्दल बोलताना प्रसिद्ध विचारवंत युवाल हरारी हे भुंग्याचे उदाहरण देतात. त्यांच्या मते, अतिरेकी हे भुंग्यासारखे असतात. भुंगा हा आकाराने लहान असतो आणि त्याला टपरीवरच्या कपात मिळणाऱ्या ज्युसचा एखादा थेंब हवा असतो. पण भुंगा लहान असल्याने त्याची ज्युसच्या ग्लासवर कसलीही सत्ता चालत नाही. मग हा भुंगा काय करतो? तर तो एखाद्या बैलाच्या कानात भुनभुनायला लागतो. त्याची ही भुनभुन ऐकून बैल पहिल्यांदा तर अस्वस्थ होतो आणि नंतर पिसाट होऊन टपरीत शिरतो. त्याच्या या पिसाट होऊन टपरीत शिरण्याने ती टपरी कोसळते आणि मग या अंदाधुंदीत सांडलेल्या ज्युसपैकी थेंबभर ज्युस त्या भुंग्याला प्यायला मिळते. असा कानात भुंगा शिरलेला बैल हा कुठल्याही व्यवस्थेसाठी घातक असतो. 

२०११ मध्ये भयंकर दुष्काळाने होरपळून निघालेल्या सिरियन शेतकऱ्यांच्या उठावातून सुरू झालेला गृहकलह तिथले स्वयंघोषित राष्ट्राध्यक्ष असाद यांच्या बेमुर्वतखोरीमुळे गृहयुद्धात परावर्तीत झाला आणि त्यात आजमितीला तुर्कस्तान, इराक, रशिया, इस्रायल आणि अलीकडे अमेरिकेचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग सुरू झाला. आपण युद्धाला भीत नसून आपल्या सैन्यसामर्थ्याची उर्वरित जगाला चुणूक दाखविण्यासाठी रशिया आणि त्या देशाचे प्रमुख व्लादीमीर पुतीन हे सिरियाला जागतिक युद्धाची प्रयोगशाळा म्हणून वापरत आहेत. नव्याने शोधलेली शस्त्रे आणि क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यासाठीदेखील सिरियन गृहयुद्धाचा वापर करणे या देशांना चुकीचे वाटत नसेल तर रशिया व इराकने माणुसकीची कुठली रेषा ओलांडण्याची अद्याप बाकी ठेवली आहे, हे एकदा तपासून पाहायला हवे. सिरियन गृहयुद्ध धुमसत राहिल्याने गेल्या चार वर्षांत प्रतिगामी समजल्या जाणाऱ्या अनेक पक्षांनी आपापल्या देशात सत्ता हातात तरी घेतली आहे किंवा त्यांचा प्रभाव तरी वाढला आहे. या युद्धात झालेल्या विध्वंसाची दृश्ये जगभरातल्या मीडियाने कुठलीही भीडभाड न ठेवता प्रसिद्ध केली, सोबतच सिरियातल्या निवडक परिसरात सत्ता काबीज केलेल्या आयसीस या अतिरेकी संघटनेने केलेल्या अमानुष हत्याकांडाचे व्हिडिओही प्रसिद्ध केले. 

या व्हिडिओमध्ये दिसणारी दृश्ये भयंकर आणि दहशत निर्माण करणारीच होती; पण त्या दृश्यातल्या त्या माणसांची मजल कुठपर्यंत आहे किंवा त्यांची शक्ती कितपत आहे, याची कुठलीही माहिती माध्यमांना द्यावीशी वाटली नाही किंवा लोकांनाही घ्यावीशी वाटली नाही. एअर इंडियाच्या सँडल प्रकरणाची बातमी जर आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजत असेल, तर आयसीसने व्हिडिओ आणि छायाचित्रांद्वारे निर्माण केलेला धुमाकूळ जगभरातल्या लोकांच्या मनात किती जास्त प्रमाणात दहशत निर्माण करत असेल, याची कल्पना यावी. आज मॅकडॉनल्डसारख्या रेस्टॉरंटमध्ये अतिजास्त अन्न खाल्ल्याने लाखो लोक लठ्ठपणाच्या आजाराने मरतात, पण त्याविषयी कुणाला बोलावेसे वाटत नाही. अमेरिकेतल्या कामगारांचे काम बाहेरून आलेले मेक्सिकन स्वस्त मजूर पळवत नसून यांत्रिकीकरण आणि रोबोट्समुळे या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, याबद्दल आपल्या प्रचारात डोनाल्ड ट्रम्प एकही शब्द बोलले नाहीत. त्यांनी सिरियन अशांततेच्या भीतीचा बागुलबुवा उभा केला आणि आपला स्वार्थ साधला. 

हा स्वार्थ जसा त्यांनी साधला तसाच जगातल्या इतर काही प्रतिगामी पक्षांच्या नेत्यांनीही साधला आणि आपापल्या देशात संकुचिततावादाचा प्रसार करून सत्ता काबीज केली. ही सत्ता काबीज केल्यानंतर वाढती बेरोजगारी, आर्थिक विषमता, शेतीसमस्या या वास्तवातल्या समस्या सोडविणे त्यांना तसेही कधी शक्य नव्हते. त्यामुळे मग मुख्य प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी लोकांच्या मनात असलेल्या दहशतीचा फायदा घेत त्यांची रीतसर दिशाभूल सुरू केली. या रीतसर दिशाभुलीचा विरोध म्हणून स्वतःला डावे मानणारेे डेमोक्रॅटीक किंवा लेबर पार्टीसारखे पक्ष मग आपल्या देशात ‘हुकूमशाही आली हो’ अशा आरोळ्या देऊ लागले. 

हिटलरने आत्महत्या करून आज पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे आणि तरीही डेमोक्रॅटीक पार्टीसारख्या स्वयंघोषित डाव्यांना ट्रम्प यांच्यामध्ये हिटलर दिसतो आहे. याचा मुख्य तोटा असा की, ट्रम्प आणि त्यांच्या पावलावर पावले टाकून चालणाऱ्या इतर स्वयंघोषित हुकूमशहांनाही आपणच आधुनिक हिटलरचे अवतार आहोत, असे वाटायला लागले आहे. हिटलरचे आधुनिक अवतार बनण्यासाठी देश हा महासत्ताच असावा लागतो असे नाही, किंवा तो अतिशय समृद्ध असावा लागतो असेही नाही; तर हिटलर बनून जागतिक इतिहासात नाव कोरण्याचे स्वप्न उत्तर कोरियासारख्या बुद्रुक देशाच्या हुकूमशहा किम जॉन उन यांनाही पडू शकते आणि आपणच हिटलरचे आधुनिक अवतार आहोत, अशा अाविर्भावात ते तिसऱ्या महायुद्धाची भाषाही बोलत असतात. आपल्या नादी लागून वेड्या झालेल्या भक्तांचे समर्थन मिळवून आधुनिक जगाचे हिटलर बनण्याचे स्वप्न इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामीन नेत्यानहु, रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पडत आहे. याच वेळी त्यांनी खरोखरच हिटलर बनावे म्हणजे जगासमोर त्यांचे वाईट चित्र उभे राहील, असे दु:स्वप्न त्यांच्या विरोधकांना पडत आहे, पण प्राप्त परिस्थितीत कुणीही एक व्यक्ती आधुनिक जगाचा हिटलर बनणे कदापि शक्य नाही. 

आत्मकेंद्री असलेले हे पुरुष चौथी-पाचवीच्या भोवरा खेळणाऱ्या मुलांसारखे आहेत. त्यांची बौद्धिक क्षमता आणि भाषिक लहेजाही अशा चिडखोर लहान मुलांसारखाच आहे. ही परिस्थिती दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीसारखी नसून पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळासारखी आहे, ज्यात अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांना जगावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली होती. याच चिडचिड्या मुलांत सिरियाचे राष्ट्राध्यक्ष असाद यांचीही गणना होईल. आपल्या देशातल्या दुष्काळी परिस्थिती आणि बेरोजगारीवर नियंत्रण आणण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याऐवजी सैन्यबळाचा वापर करून असाद यांनी स्वतःचाच देश बेचिराख करून टाकला. पाच लाखांहून अधिक लोकांचा बळी घेऊन आणि कोट्यवधी लोकांना बेघर करून आजही असाद सिरियाची सत्ता राखून आहेत.

दरम्यान युद्धाने बेजार झालेल्या सिरियन जनतेचा आता माणुसकी आणि नशिबावरचा विश्वासही उडून चालला आहे. मातीच्या ढिगाऱ्याआड दिवस काढणाऱ्या या लोकांच्या नजरा शून्यपणे आकाशाकडे तासन‌्तास लागलेल्या असतात. यातल्या अनेकांनी आपल्या कुटुंबातले बहुसंख्य सदस्य युद्धात गमावले आहेत. युद्धात बेचिराख झालेल्या सिरियन नागरिकांबद्दल उर्वरित जगाला जरी दु:ख वाटत असले तरी सिरियन लोकांना आता मृत्यूचेही भय राहिलेले नाही. युद्धाच्या नरकयातनांमध्ये जीव मुठीत घेऊन जगण्यापेक्षा मरून परमेश्वराच्या सान्निध्यात जाण्याचा रस्ता त्यांना जास्त चांगला वाटतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेने असाद यांची राजवट उलथवून तिथे उद्या स्वातंत्र्य जरी आणले तरी राहण्यायोग्य घरे वा रस्ते त्या देशात शिल्लक नाहीत. दुष्काळी परिस्थिती आजही कायम असून शांतता आल्यानंतरही धान्य पिकविता येईल का, याची शाश्वती नाही. 

सिरियाचा प्रश्न हा आता कधीच न सुटणारा प्रश्न बनला आहे. हा प्रश्न सुटणार तर नाही, पण त्याचा राजकीय संसर्ग उथळपणा आणि युद्धखोरीच्या वाटेवर चाललेल्या कुठल्याही देशाला होऊ शकतो. जगभर मानवी मूल्यांचा होत चाललेला ऱ्हास हा आत्मकेंद्री मूर्खांना सत्तेत आणत असला तरी त्यांचा विजय व त्यांची विचारधारणा ही त्यांच्या देशातल्या सकल जनतेचा विजय वा विचारधारणा नाही. याच हिशेबाने सकल जगाला आधुनिक हिटलर वा तिसऱ्या महायुद्धात कुठलाही रस नाही. जगापुढचे सध्याचे प्रश्न हे युद्धखोर नेत्यांच्या कलकलाटापलीकडचे आहेत आणि आत्मकेंद्री नेत्यांच्या विरोधात असलेल्या माध्यमांचे आणि प्रत्येक मानवतावादी व्यक्तीचे प्राथमिक कर्तव्य हे आपल्या देशात शांतीसाठी प्रयत्न करणे, हेच असायला हवे.

केबल टीव्ही व इंटरनेट नसताना ‘युद्धस्य कथा रम्या’ असे आकर्षक वाक्य म्हणायला आपल्यातल्या काहींना खूप आवडायचे. आज अवतीभवती करमणुकीच्या माध्यमांचा विस्फोट झालेला असताना तिसऱ्या महायुद्धाच्या मनोरंजक कल्पनांमधून जगाने लवकरात लवकर बाहेर यावे, हीच सदिच्छा.
 
- rahulbaba@gmail.com
बातम्या आणखी आहेत...