आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेट देम अलोन! (राहुल बनसोडे)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागरी जगातल्या पुरुषासोबतच्या शरीरसंबंधातून जन्मास आलेल्या बाळाची अंदमानातल्या जारवा जमातीतल्या लोकांनी हत्या केली… बातमी कुतूहल चाळवणारी आहे, तशीच असंख्य पेच आणि प्रश्न निर्माण करणारीही. त्याचेच प्रतिबिंब मानववंशतज्ज्ञ, इतिहासकार, समाजशास्त्र अभ्यासक आदींच्या चर्चांमधून जगभर उमटत आहे. याच चर्चांमधून प्रतिध्वनित होणारा मुख्य प्रश्न आहे – नागरी सभ्यतेच्या विरोधात असलेल्या या हत्येच्या कृतीबद्दल जारवांना कठोर शासन करायचे, की त्यांच्या आदिम अस्तित्वावर घावा घालणाऱ्या प्रगत समाजाला वेळीच न रोखता त्यांच्या रूपाने जिवंत असलेल्या मानवाच्या इतिहासाचाच खून पाडायचा?

चाकाचा आणि बंदुकीचा शोध लागण्याच्याही हजारो वर्षे अगोदर स्वअस्तित्वाची सहजप्रेरणा घेऊन आफ्रिकेतला माणूस जेव्हा जगभरातली भूमी पादाक्रांत करीत होता, त्या वेळी काही आदिमानव समूह भारताच्या अंदमान बेटापर्यंत येऊन पोहोचले आणि सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी प्राचीन भारतातल्या पहिल्या मानवी वस्त्यांपैकी एक वस्ती अंदमानात आकारास आली. यानंतरही माणसांचे जगभरातून भारतीय उपखंडात स्थलांतर होतच होते. अन्नपदार्थ आणि नैसर्गिक साधनांच्या विपुलतेने नटलेला हा भूप्रदेश जुन्या जगातल्या लोकासांठी स्वर्गच होता. या स्थलांतरातून अगोदर स्थायिक झालेल्या माणसांशी जुळवून घेताना संस्कृतीचा विस्तार गुंतागुंतीच्या मार्गांतून गेला. नंतरच्या काळातली काही स्थलांतरे वेगवान असल्याने त्यांना आक्रमणाचे स्वरूप प्राप्त झाले. त्यातून भारतातली बहुसांस्कृतिक व्यवस्था आकारास आली. निरनिराळ्या धर्मांच्या अधिपत्याखाली माणसामाणसांत वर्गीकरण करण्यासाठी जाती आणि उपजाती हे व्यवसायाधारित निकष भारतीय समाजव्यवस्थेला लावले तर भूत, वर्तमान सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर बरेच विस्तृत भाष्य करता येते. जातीचा आभासी निकष नाकारून भारतीय लोकसंख्येचे जनुकीय वर्गीकरण केल्यास सद्य:स्थितीत उपलब्ध असणाऱ्या डीएनए चाचण्यांमध्ये दोन पराकोटीच्या भिन्न समजल्या जातींमध्ये जनुकीय साम्य आढळून येते, याशिवाय काही जनुके ही जगभरातल्या इतर देशांच्या मूलभूत जनुकांशी मिळतीजुळती असल्याचेही दिसते. त्यामुळे जाती वा धर्माच्या शोधाच्याही अगोदरपासून भारतीय उपखंडात प्रगत मानवी संस्कृती अस्तित्वात होती, असा निष्कर्ष ढोबळपणे काढता येतो.
अंदमानच्या बेटावर असणारे आदिवासी मानवाच्या या जनुकीय विविधतेच्या मुळाशी असलेल्या काही मूलभूत जमातीपैंकी आहेत. मुळात, हा प्रदेश नैसर्गिक संपत्तीने नटलेला असल्याने या समूहाची प्रगती अश्मयुगीन प्रगतीच्या पलीकडे झालेली नाही. त्यानंतर या गटातल्या लोकसंख्येमध्ये काही हजार वर्षांनंतर उपप्रकार पडून त्यांचे पाच वेगवेगळ्या समूहात रुपांतरही झाले. या पाच समूहांपैकी एक समूह पूर्णतः नाश पावला. उरलेल्या चार समूहांची एकूण लोकसंख्या सहाशेपेक्षा कमी राहिली. ‘जारवा’ ही या चार उरलेल्या जमातींपैकी एक जमात. अंदमान बेटावर त्यांची संख्या चारशेच्या आसपास आहे. भारताच्या मुख्य जमिनीपासून दूर बेटावर संसार मांडून हजारो वर्षे सुखात जगणाऱ्या या प्रजातीवर पहिले संकट आले, ते सतराव्या शतकात, डॅनिश लोकांनी अंदमानात पाऊल ठेवल्यानंतर. पुढे अंदमान येथे कारागृह बांधताना ब्रिटिश सरकारने आणि नाविकतळ उभारताना भारतीय नौदलाने त्यांना जंगली श्वापदांसारखी वागणूक दिली. जंगलाच्या अत्यंत दुर्गम प्रदेशात राहात असल्याने स्वातंत्र्यानंतरही अंदमानच्या या मूलनिवासी लोकांचा मुख्य भूभागातल्या लोकांशी फारसा संबंध आला नाही.

अंदमानच्या या आदिवासींच्या आयुष्यात मुख्य भूभागावरच्या लोकांची ढवळाढवळ १९७०मध्ये त्यांच्या वस्तीमधून मधोमध जाणारा महामार्ग बांधल्यानंतर वाढली. अगोदर कधी बाहेरच्या माणसाशी संपर्क न आल्याने, जारवा लोकांना पाहण्यासाठी मग पर्यटकांच्या रांगा लागू लागल्या. जारवांच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्याकडे प्राणीसंग्रहालयातल्या प्राण्यांकडे पाहावे, त्या कुतूहलाने लोक पाहू लागले. त्यांच्याकडे अन्नाची पाकिटे फेकली जाऊ लागली, त्यांच्या नग्न देहांचे फोटो काढले जाऊ लागले. हे इथेच थांबते तर ठीक; पण जारवांना बाहेरच्या लोकांनी दारू व गांजाचे व्यसन लावले. अलीकडे तर लज्जेचे भान नसणाऱ्या निरागस नग्न जारवा स्त्रियांचे नाचताना व्हिडिओ बनविले गेले. त्यांच्या स्त्रियांशी बाहेरच्या जगातल्या पुरुषांचे शारीरिक संबंध होऊ लागले. अशा शारीरिक संबंधातूनच जारवा स्त्रियांना अपत्ये होऊ लागली. जारवांच्या मूळ रूपांपेक्षा वेगळी दिसणारी ही मुले अर्थातच जारवांच्या पारंपरिक नियमात बसत नसल्याने त्यांची हा समूह परंपरेनुसार हत्या करतो. प्रथमदर्शनी ही कृती अमानुष अशीच वाटते, पण नीट खोलात जाऊन विचार केल्यानंतर हा गुंता निर्माण करण्यासाठी पूर्णतः बाह्य हस्तक्षेप कारणीभूत आहे, हे वास्तवही नाकारता येणार नाही.

स्वयंपूर्ण जीवनपद्धती आणि आपल्या जंगलापलीकडे असणाऱ्या अवाढव्य जगाबद्दल काहीही माहिती नसणाऱ्या जारवांना पैसा वा देश आणि त्याचा कायदा याचे काहीही आकलन नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनपद्धतीवर भारतीय कायदा लादणे नैसर्गिकरीत्या अशक्य आहे. मार्च महिन्याच्या १३ तारखेला ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या एका बातमीनुसार, नागरी वस्तीतल्या पुरुषाशी झालेल्या शरीरसंबंधातून जन्माला आलेल्या चार महिन्याच्या एका बाळाच्या हत्येनंतर जारवांच्या नागरिकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. इतक्या लहानग्या बाळाच्या हत्येचे कुठल्याही प्रकारे समर्थन केले जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा हत्येकरिता जारवांना कडक शासन केले गेले पाहिजे, असा नेहमीचा ‘सोशल मीडिया’ तर्क येथे कुणीही सहज लावील. पण या गुन्याकरिता जारवांच्या पूर्ण समूहालाच अटक करावी लागेल आणि त्यांना नेमके का अटक केले गेलेय, याचे स्पष्टीकरणही द्यावे लागेल. जारवांची भूमी ही कुठल्याशा देशाचा अविभाज्य घटक असून त्या देशाला स्वतःचा असा एक विस्तृत कायदा आहे. या देशाच्या कायद्यानुसार जारवांनी केलेली हत्या हा गुन्हा ठरतो, हे जारवांना प्रचलित व्याख्या आणि देश संकल्पनेतून समजावून सांगावे लागेल. गुंतागुंतीच्या या प्रक्रियेत मग सुरू होते ती जगभरातले आदिवासी आणि त्यांच्यावर अतिक्रमण करणाऱ्या प्रगत समाजाच्या परस्परसंबधातली अतिप्राचीन समस्या.
जगाच्या इतिहासात जिथे कुठे म्हणून आप्रवासी लोक क्षेत्रविस्ताराच्या कारणाने नव्या भूप्रदेशातील आदिवासींच्या संपर्कात आले, तिथे तिथे त्यांनी आदिवासींच्या जगण्याच्या मूलभूत हक्कावरच गदा आली. यात एरवी स्वातंत्र्याचे गोडवे गाणारी अमेरिका, समतेच्या पुरस्काराची वल्गना करणारे जमिनीवरचे धर्म आणि पैशांच्या नशेला हपापलेले भांडवलवदार सर्वात पुढे येतात. अमानुष वा जंगली म्हणून आदिवासींच्या हत्या करणे, त्यांच्या जमिनी बळकावून त्यांना गुलाम करणे, त्यांच्या मूळ संस्कृतीचे विसर्जन करून त्यांच्यावर आपला धर्म लादणे, त्यांच्या प्राकृतिक आवासांना नष्ट करून तिथे कंपन्या, पाम तेलाची झाडी, खाणी आणि टुरिस्ट स्पॉट्स विकसित करणे आणि संकल्पना राबवून जगातल्या आधुनिक मानवाचे हात अशा शेकडो संस्कृतींच्या हत्येमुळे रक्ताने माखलेले आहेत. जगातले जवळजवळ सगळे भूभाग आधुनिक अर्थव्यवस्थेचे पाईक बनल्यानंतर, या मुख्य धारेपासून अजूनही दूर स्वयंपूर्ण जीवन जगणाऱ्या आदिवासींची संख्या आता काही लाखांवर आलेली आहे. जारवा त्या अत्यल्प लोकसंख्येचाही अत्यल्प भाग आहेत, त्यांना समाजाच्या "मुख्य धारेत' आणण्याचा जुनाच मतप्रवाह येथेही लागू पडू शकतो. मात्र जगाचा आजपर्यंतचा इतिहास पाहता ही प्रक्रिया कितपत न्यायाने होईल, यावर शंका घेण्यास बराचसा वाव आहे. मुळात, हजारो वर्षे मुख्य समाजापासून दूर राहिल्याने आदिवासींची रोगप्रतिकारक शक्ती ही मुख्य जमिनीवरच्या लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीपेक्षा कितीतरी क्षीण असते. यामुळे जेव्हा म्हणून आदिवासींचे पुनर्वसन केले जाते, त्या वेळी त्यांना विविध रोगांची लागण होऊन कित्येकदा त्यांचा पूर्ण समूह नष्ट झाल्याची उदाहरणे आहेत. बाह्यजगातल्या लोकांशी संपर्कात येऊन जारवा लोकही गोवर आणि कांजण्यांसारख्या रोगांना बळी पडत आहेत.

अशा वेळी शिकारी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर हजारो वर्षे टिकून राहिलेल्या या स्वयंपूर्ण लोकांना आधुनिक अर्थव्यवस्थेत आणून त्यांचे जीवन सुखमय करण्याचे स्वप्न कुठल्याही सरकारला पडू शकते. सुखाची आणि विकासाची सर्वमान्य व्याख्या सरकारला जारवांच्या संदर्भातही लागू करावीशी वाटू शकते. मुळात सुखाची मुख्य धारेतली व्याख्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेने गरीब माणसाला कितपत सुखी केले आहे, याचा शोध घेतला, तर हाती येणारी उत्तरे मन विदिर्ण करणारी आहेत. वेगाने नष्ट होत चाललेली जंगले आणि शेतीच्या वाढत्या औद्योगिकरणाने आता कुठेही स्वयंपूर्णता उरलेली नाही. कित्येक जातींचे पारंपरिक व्यवसाय पूर्णतः बंद झालेले आहेत. या जातींमध्ये जन्माला येणाऱ्या लोकांना शहरीकरणाने तयार केलेल्या कनिष्ठ आणि कष्टाच्या रोजगार संधीशिवाय दुसरे कुठले मार्ग नाहीत. जागतिकीकरणात संस्कृतीची पाळेमुळेच उखडली गेल्यामुळे या संस्कृतीवर अवलंबून असणाऱ्या लोककलेतल्या जातींवर भीक मागण्याची पाळी आली आहे. राखीव जागांमुळे उपलब्ध असणाऱ्या संधी आणि एकूण बेरोजगारांची संख्या यांचा अनुपात पाहता प्रत्येक जातीला १००% आरक्षण देऊनही बेरोजगारीची समस्या सोडविता येणार नाही, अशी परिस्थिती आज देशात आहे.

या भयानक परिस्थितीशी पूर्णतः अनभिज्ञ राहून स्वत:च्या जंगलात सुखनैव जगणाऱ्या जारवांना देण्यासाठी मुख्य भूमीवरच्या भारताकडे काहीही नाही. शहरीकरण आणि चंगळवादात कुठलीही मूलभूत संधी न देता आणखी चारशे जिवांना आपण सहभागी करून घ्यावे का? हा गंभीर प्रश्न येथे उपस्थित होतो आहे. एकीकडे हजारो वर्षांनंतर अजूनही अश्मयुगीन अंधारातूनही बाहेर न पडू शकलेल्या या आदिवासींना नव्या युगातील मानवाने केलेल्या प्रगतीचा उपभोग घेण्याची संधी उपलब्ध आहे, तर त्यांच्या जैविक मर्यादा आणि अत्यल्प लोकसंख्या पाहता त्यांचे मुख्य धारेत येऊन टिकून राहणे कितपत शक्य होईल, यावर साशंकताही आहे. याशिवाय मुख्य धारेत येण्यासंबंधी जारवांचे स्वतःचे मत काय आहे, यासंबंधी आपल्याला काहीही माहिती नाही.
अंदमान हा भारताचा राजकीय भूभाग आहे. त्यावर नाविक तळ बनविणे आणि त्यातून अंदमान व देशाच्या समुद्री भूभागाचे रक्षण करणे, ही भारताचे जबाबदारी आणि कर्तव्यही आहे. पण या कर्तव्यापलीकडे अंदमानची जंगले आणि त्याचे अंतर्गत भूभागही जारवांच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. न्यायालयाने आदेश देऊनही अंदमानमधून जाणारा अंदमान ट्रंक रोड (ATR) अजूनही बंद झालेला नाही. जारवांच्या नैसर्गिक वसतिस्थानात हस्तक्षेप करण्याचे प्रकार आटोक्यात असले, तरी त्यातून होणारे शोषण हे नवनव्या समस्यांना जन्म देणारे ठरत आहे. पृथ्वीचे गोल असणे, देश, सीमा, अण्वस्त्रे यांपैकी आपल्याला माहीत आणि स्वीकृत संकल्पनांबद्दल जारवांना काहीही माहिती नाही. मुख्य भूभागावरच्या आपणा सर्वांस कनेक्टेट जगाचे आकलन जारवांंपेक्षा कैकपटीने जास्त आहे. आपल्याला जशी आपल्याबद्दल विस्तृत माहिती आहे, तशीच ती जारवांबद्दलही आहे. या वाढीव माहितीचा निकष लावल्यास आपण जारवांशी कुठलाही संपर्क न करणे, हेच त्यांच्या हिताचे आहे. हे मान्य करण्यास कुणाचेही दुमत होणार नाही.

यानंतरही जारवांना आपल्याशी संपर्क करायचाच असेल, तर त्याबद्दल आपण त्यांना आडकाठीही करू नये, इतपत जाणीव आपण ठेवायला हवी. जारवांच्या आयुष्यात बाह्यजगातल्या लोकांचा हस्तक्षेप रोखणे आणि अंदमानचे बाह्यभागातून संरक्षण करणे, ही कामे भारत सरकार बरीच वर्षे व्यवस्थित करीत असले, तरी जारवांची लोकसंख्या आणि परंपरा लक्षात घेता कुठल्याही नाजूक क्षणी ही जमात संकटात येऊ शकते. त्यामुळे शक्य त्या उपाययोजना करून या जमातींचे पूर्ण संरक्षण करणे, हे भारत सरकारचे कर्तव्य आहे. निरनिराळ्या मुखांमधून ऐकू आलेल्या निरनिराळ्या इतिहासाच्या पलीकडे, जारवा हे आपल्या सर्वांत प्राचीन पूर्वजांपैकी एक आहेत, हे सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल. या पूर्वजांचे आणि त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करणे ही आपली मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी आहे. सद्य:स्थितीत ही जबाबदारी पार पाडण्यासाठी जारवांच्या आयुष्यात कसलाही संपर्क वा हस्तक्षेप न करणे, हा एकच मार्ग आपल्याजवळ उपलब्ध आहे.

rahulbaba@gmail.com
छायाचित्र सौजन्य :- सर्वायवल इंटरनॅशनल
पूरक माहितीसाठी सहकार्य : हरी कुमार, एलिन बॅरी (द न्यूयॉर्क टाइम्स)