आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रकल्पाचा महानायक!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. गणेश देवी प्रबंध संपादक असलेल्या ‘भारतीय भाषा लोकसर्वेक्षण’ या संस्थेमार्फत गेल्या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय भाषांच्या संशोधनाचे अकरा नवीन खंड प्रकाशित करण्यात आले. त्यात भारतातल्या अनेक महत्त्वांच्या भाषांचे सखोल दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. भारतात बोलल्या जाणाऱ्या एकूण ७८० भाषांचे दस्तऐवजीकरण करण्याचे काम भारतीय भाषा लोकसर्वेक्षणतर्फे सुरूच असून भारतीय भाषांबद्दल आतापर्यंत ३७ खंड प्रकाशित केल्यानंतर २०२० पर्यंत एकूण ९२ पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. या निमित्त डॉ. देवी यांचे संशोधन आणि भाषा संशोधनाचा अन्वयार्थ लावणारा हा खास लेख...
 
जगात जवळजवळ सात हजार भाषा आहेत आणि फक्त दोनशेच्या आसपास देश आहेत. राष्ट्र संकल्पनेत देश आणि भाषा याची सांगड घालताना आपल्याला असे दिसून येते की, जगातले बहुतांश देश हे त्यांच्या एका मुख्य भाषेसाठी ओळखले जातात, ज्याला काही लोक ‘राष्ट्रभाषा’ असेही म्हणतात. यानंतर अलीकडच्या काळात त्या देशातली दुसरी महत्त्वाची भाषा असते ती म्हणजे इंग्रजी, तिसरी त्या त्या राज्याची भाषा, जी कित्येक जण आपली मातृभाषाही मानतात. ‘मातृभाषा’ या शब्दाची एक धोपट व्याख्या म्हणजे, माणसाला जन्म देणाऱ्या आईची भाषा किंवा मग ज्या भागात त्याचा जन्म झाला, तिथल्या प्रदेशाची भाषा. भाषा ही अक्षरे, शब्द आणि वाक्यं यांची बनलेली असते. दैनंदिन व्यवहार, भावना आणि अभिव्यक्तीसाठी तिचा वापर केला जातो. बहुतांश लोकांना भाषेची इतपत सोपी आणि सरळ व्याख्या जगण्यासाठी पुरेशी असली तरी या व्याख्येच्या पलीकडे पाहू न शकण्याची क्षमता माणूस आणि समाजाला निराशाजनक पातळीवर आणून सोडू शकते. कुठल्याही भाषेच्या नानाविध मिती आणि रचना समजावून घेताना ती भाषा वापरणाऱ्या माणसांच्या व्यक्तिमत्त्वांचा, सामाजिक जीवनपद्धतींचा आणि संस्कृतीचा जो कोलाज उभा करते, तो कोलाज अनुभवण्यासाठी माणसाची सगळी ज्ञानेंद्रिये, आत्मभान आणि बुद्धीचा कस लागतो. मानववंश शास्त्रात संशोधन करणाऱ्या संशोधकांमध्ये भाषाशास्त्रज्ञांचा अनेकांना हेवा वाटतो, तो याच कारणासाठी. म्हणूनही भाषेचा शोध घेणे, तिच्यावर संशोधन करणे आणि ती आत्मसात करणे, हे जगातील सर्वात जास्त अनुभुतीजन्य काम ठरते.

स्वयंप्रेरणेने कुठलीही नवीन भाषा शिकणे हे कुठल्याही साइड इफेक्टशिवाय २४ तास करता येईल, इतके चांगले व्यसन असू शकते.  नवीन भाषा शिकल्याने खूप सारे मानसिक आजार कुठल्याही औषधाविना आटोक्यात येऊ शकतात, एकाच जन्मात माणसाला जगण्याची पूर्णतः नवी संधी देऊ शकतात. हीच भाषा माणसावर जबरदस्तीने लादली गेल्यास, ती नव्या मानसिक आजारांना जन्म देऊ शकते, व्यक्तीचे जगणे व्यवस्थेच्या दावणीला बांधू शकते आणि माणसांना बौद्धिक व शारीरिक गुलामगिरीत ढकलू शकते. संख्येने अल्प असलेल्या आदिवासी आणि मूलनिवासींवर जेव्हा बहुसंख्यकांची भाषा आक्रमण करते, तेव्हा ती त्या भाषेच्या संस्कृतीवरच आक्रमण करीत असते. पराभूतांची भाषा जेव्हा हळूहळू अस्तंगत होत जाते, तेव्हा त्यासोबत त्या भाषेचीही संस्कृती लोप पावत जाते. गेल्या पन्नास वर्षांत औद्योगिकीकरणामुळे निसर्गाचा ऱ्हास होतो आहे. हा ऱ्हास होत असताना त्या निसर्गावर अवलंबून असणाऱ्या लोकांना विस्थापित व्हावे लागत आहे. मूळ निसर्गाशी नाते तुटल्याने आणि जगण्यासाठी बहुसंख्यकांची भाषा शिकावी लागल्याने, जगभरातल्या आदिवासी आणि अल्पसंख्य समूहातल्या भाषा मरू लागल्या आहेत. जगात आजघडीला दर दोन आठवड्याला एक भाषा मरत असून सात हजार भाषांपैकी साडेतीन हजार भाषा या कायमच्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ज्याप्रमाणे संकटकालीन प्रजातींना वाचविण्याचे एक मोठे आव्हान आज जगासमोर आहे, त्याचप्रमाणे संकटकालीन भाषा वाचवण्याचेही मोठे आव्हान जगासमोर आहे. या आव्हानाला सामोरे जाताना भाषांचे मूळ शोधणे, तिचा निसर्गाशी परस्परसंबंध लावणे, ती भाषा बोलल्या जाणाऱ्या प्रदेशाचा भौगोलिक अभ्यास करणे आणि त्या भाषेच्या संस्कृतीचा शक्य तितका सखोल शोध घेणे हे महत्त्वाचे काम जगभरातले काही महत्त्वाचे भाषाशास्त्रज्ञ करत आहेत. या भाषाशास्त्रज्ञांतले महत्त्वाचे भारतीय नाव म्हणजे, डॉ. गणेश देवी. 

देवींचे संशोधन हे इतर संशधोनाच्या क्षेत्रातल्या लोकांमध्ये वाचले जात असल्याने आणि ते लेखकांचे लेखक किंवा समीक्षकांचे समीक्षक असल्याने सर्वसाधारण पुस्तके वाचणाऱ्या वाचकांनाही गणेश देवींची विशेष माहिती असतेच, असे नाही. त्यांची दुसरी एक ओळख म्हणजे, दोन वर्षांपूर्वी देशात वाढत्या असहिष्णुततेनंतर मानाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांनी परत केला आणि ‘दक्षिणायन’ या सामाजिक चळवळीचे नेतृत्व करायला घेतले. पुरस्कार वापसीनंतर अलीकडच्या काळात त्यांनी व्यवस्थेवर घेतलेली भूमिका आणि निरनिराळ्या ठिकाणी केलेली विवेचने काही अंशी राजकीय स्वरूपाचीही आहेत. या ओळखीच्या पलीकडे आपल्या अभ्यासू वृत्तीने आणि विनयशील स्वभावाने समोरच्याचे मन आणि मेंदू एकाच वेळी जिंकून घेणारा माणूस अशीही ओळख त्यांच्या अंतर्गत वर्तुळातले लोक सांगू शकतील. या ओळखीपलीकडे जाऊन देवींच्या कामाची आणि त्यांच्या भूमिकेची पूर्णतः नव्याने ओळख करून घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे. डॉ. गणेश देवी प्रबंध संपादक असणाऱ्या ‘भारतीय भाषा लोकसर्वेक्षण’ या संस्थेमार्फत गेल्या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय भाषांच्या संशोधनाचे अकरा नवीन खंड प्रकाशित करण्यात आले. त्यात भारतातल्या अनेक महत्त्वाच्या भाषांचे सखोल दस्तऐवजीकरण केले आहे. भारतात बोलल्या जाणाऱ्या एकूण ७८० भाषांचे दस्तऐवजीकरण करण्याचे काम भारतीय भाषा लोकसर्वेक्षणतर्फे सुरूच असून भारतीय भाषांबद्दल आतापर्यंत ३७ खंड प्रकाशित केल्यानंतर २०२० पर्यंत एकूण ९२ पुस्तके प्रकाशित करण्याचे ध्येय त्यांच्यासमोर आहे. यात फक्त लिखित भाषेचाच नाही, तर मौखिक भाषेचाही अंतर्भाव असून भारतातल्या अत्यंत दुर्मिळ आणि कमीत कमी लोकसंख्या असलेल्या लोकसमूहांच्या भाषांचा समावेश आहे.

भारतीय भाषा लोकसर्वेक्षणात गणेश देवींनी केलेल्या या कामाकडे ‘स्टँड अलोन’ काम म्हणून बघताना त्यात भारतीय भाषांची श्रीमंती आणि विशाल भारतीय संस्कृतीचे चित्र दिसून येते याबाबत शंकाच नाही. हे संशोधन पंचवीस वर्षांपूर्वी बाहेर आले असते तरीही, हे मत फारसे वेगळे आले नसते, पण बदलत्या जगाच्या ज्या काळात हे संशोधन बाहेर आले आहे, त्याच्याकडे नजर टाकल्यास मानवी सभ्यतेच्या एका नव्याच वळणावर आपण उभे आहोत, याची प्रचंड विस्मयात टाकणारी जाणीव झाल्यावाचून राहत नाही. हा लेख लिहिला जात असताना शास्त्रज्ञांनी डायबिटिसवर लस शोधून काढली आहे, कृत्रिम गर्भाशयाचा शोध लावला अाहे. त्यातून यशस्वीरीत्या मेंढीच्या अर्भकाला मोठे करून दाखवले आहे, चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला आहे. तिथे कायमची मानववस्ती उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. असे अचाट शोध लावीत असतानाच डीएनएच्या मदतीने आफ्रिकेत जन्माला येऊन जगभर पसरलेल्या माणसांच्या निरनिराळ्या काळातला स्थलांतराचा इतिहास शोधून काढला आहे, तेरा हजार वर्षांपूर्वी माणसाने सर्वप्रथम जिथे शेती केली, त्या जागा शोधून काढल्या आहेत, माणसाचा गेल्या दोन लाख वर्षांचा अतिशय सविस्तर इतिहास लिहिला गेला आहे. भविष्य आणि भूतकाळासंदर्भात इतके सविस्तर ज्ञान माणसाला होत असतानाच वर्तमानकाळात राष्ट्राराष्ट्रांमध्ये कमालीचे वितुष्ट वाढत अाहे. निरनिराळ्या राष्ट्रप्रमुखांकडुन प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या अण्वस्त्र वापरांच्या धमक्या दिल्या आहेत. मानवप्राण्याचे आता नेमके काय होणार आणि पुढे येणारी परिस्थिती चांगली असणार आहे की वाईट याबद्दल कुणाचेही एकमत नसले, तरी मानव प्राणी स्थित्यंतरात जात असून तो आता थेट परमेश्वर बनेल किंवा पुन्हा आदिम होऊन जंगलात भटकत फिरेल किवा मग पूर्णतः नष्ट होऊन जाईल याबद्दल अनेकांना कुतूहल आणि भीती आहे. 

बदलत्या जगाच्या या परिस्थितीत माणूस असणे म्हणजे नेमके काय, याचा शोध घेताना ज्या निसर्गातून माणूस जन्माला आलेला आहे, त्याचाही प्रचंड अभ्यास जगभर चालू आहे. प्रगत तंत्रज्ञान, उच्चशक्तीचे कॅमेरे आणि दळणवळणाच्या अत्याधुनिक सोयींचा वापर करून अभ्यासकांनी पृथ्वीच्या एकूण एक जागेवर जाऊन आपल्या ग्रहाबद्दल आणि जीवसृष्टीबद्दल सखोल माहिती मिळविली आहे. ही माहिती मिळवण्यासाठी निसर्गाचे निरीक्षण करत असताना वनस्पती आणि प्राण्यांचे अंतर्गत व्यवहार, जीवनपद्धती आणि त्यांचे निसर्गाशी असणारे नाते आपल्याला समजते आहे. समाजव्यवस्था फक्त माणसांचीच नसून ती मुंग्या, मासे आणि पक्ष्यांचीही असू शकते, भावना या फक्त माणसालाच नसून त्या वनस्पतींनाही असू शकतात, बलात्कार फक्त माणूसच नाही, तर डॉल्फिन्सही करतात, ही आणि अशीच असंख्य तथ्ये माणसाचा माणसाकडे पहाण्याचा दृष्टिकोन वेगाने बदलीत आहेत. बुद्धिवंतांना मुळापासून हादरवून टाकणाऱ्या या परिस्थितीत माणसाचा निसर्गाशी असणारा व्यवहार तपासायचा असल्यास, सर्वप्रथम त्याच्या भाषेचा अभ्यास करणे गरजेचे ठरते, आणि या परिघावर मग गणेश देवी यांनी भाषेवर केलेले काम हे कुठल्याश्या वैश्विक समीकरणाचा मोठा भाग ठरते.

भांडवलशाहीच्या व्यवस्थेत बहुसंख्य लोक सुखी होत असताना काही लोकांना या भौतिक सुखातला फोलपणा आणि त्याचे साइड इफेक्ट्स कळाल्याने त्यांनी सार्वकालिक सुखाचा आणि बुद्धाला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा पुनर्शोध सुरू केला आहे. हा मार्ग डोळे दिपवून टाकणाऱ्या ज्ञानातून आणि स्वतःला पूर्णपणे विसरून निसर्गाच्या सहवासातून जातो. भांडवलशाही जगाच्या कमालीच्या नियंत्रीत वातावरणापासून हजारो मैल दूर रानावनात भौतिकसुखांच्या चक्रात अद्याप न अटकलेले लोक हे काहींच्या मते, जगातले सर्वात श्रीमंत लोक समजले जातात. या लोकांच्या घराचा आकार फार फार तर दहा बाय दहा फूट आणि उंची आठ फूट असते, पण या घरांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, ते बांधण्यासाठी वीस वर्षांचे कर्ज घ्यावे लागत नाही. चिरंतन सुखाचा शोध लावताना माणूस अधिकाधिक बलशाली होत गेला, तरी त्याला अजूनही चिरंतन सुखाचा शोध लागलेला नाही, तो तसा कधी लागेल हे सांगणे आजही अवघड आहे. भविष्यातही हा शोध लागणार नसेल, तर मग इतिहासातल्या कुठल्या काळात माणूस सुखी होता, हे शोधण्याचा प्रयत्न काही पुनरुज्जीवनवादी लोक आणि सरकारे करू लागली आहेत, पण माणसाचा इतिहास व्यवस्थित माहिती असणाऱ्यांना भूतकाळातही माणूस कधी खूप सुखी होता, असे दिसून आलेले नाही.

भारतीय भाषांचे कूळ आणि मूळ दोन्ही शोधून काढल्यानंतर गणेश देवी यांची भूमिका ही देशीवादी झाली आहे. हा देशीवाद हा इतर लेखकांपेक्षा गणेश देवींना मोठ्या परिघावर दिसत आहे. कदाचित तो सर्वात बाहेरचा परिघही असू शकतो. आपल्या देशांत केवळ सरकारला विरोध करणारा एक गैरसोयीचा माणूस म्हणून काही लोक देवींकडे बघतात, देशीवादासारख्या भंपक तत्त्वज्ञानाची पाठराखण करणारा माणूस म्हणून त्यांच्यावर काहीजण टीका करतात, तर केवळ अतिभव्य काम करणारा माणूस म्हणून त्यांच्या विस्तृत अभ्यासाकडे काहीजण दबकून बघतात. या नेहमीच्या समुहांपलीकडे बदलत्या जगाची माहिती अद्ययावत असणारे लोक, बीबीसी आणि नॅशनल जिओग्राफिकसारख्या ख्यातनाम संस्था, संयुक्त राष्ट्रसंघासाठी काम करणारे भाषाशास्त्रज्ञ आणि विज्ञानाला आधुनिक जगाचा परमेश्वर मानणाऱ्या लोकांच्या नजरेतून गणेश देवींकडे पाहिल्यास, ते माणसाच्या संस्कृतीचे महानायक आहेत, असे स्पष्टपणे म्हणता येते. त्यांना स्वतःला असे काही म्हणून घेणे कदाचित आवडणार नाही, पण त्यांच्या संशोधनाने विस्मयचकीत झालेला कुणीही हे पूर्णतः मान्य करेल. ज्या कामासाठी देवींना संस्कृतीचा महानायक म्हटले जाते, त्या कामाचे स्वरूप बघता अंगात अत्यंत साधेपणा आणि सामान्यपणा असल्याखेरीज, हे काम करणे शक्य नव्हते, त्यामुळे हा विरोधाभास हे आपल्या काळाचे एक मजेशीर सत्यही आहे.

भाषांचा वैश्विक प्रकल्प
डॉ. देवी यांच्या नेतृत्वाखाली ग्लोबल लँग्वेज स्टेट्स रिपोर्ट (जीएलएसआर) हा प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पांगर्तत जगभरातल्या जवळपास सहा हजार जिवंत भाषांवर संशोधन केले जाणार आहे. यात भाषांच्या अभ्यासाबरोबरच भाषेच्या अस्तित्वाचाही धांडोळा घेतला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॉपुआ न्यू गिनी आणि भारत या देशातील भाषांवर संशोधन होणार असून २०२० पर्यंत निष्कर्ष निरीक्षणे नोंदली जाणार आहेत.
 
- राहुल बनसोडे
rahulbaba@gmail.com
 
(मिंट लाऊंज-१९ ऑगस्ट २०१७ या साप्ताहिक पुरवणीत एलिझाबेथ कुरुविला यांनी घेतलेल्या मुलाखतीवरून साभार)
 
पुढील स्लाइडवर वाचा... भाषा हा लोकशाहीचा घातक घटक: गणेश देवी
बातम्या आणखी आहेत...