आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गज्ञानाचा दुर्मिळ खजिना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसाचे निसर्गापासून तुटणे हे सर्वार्थाने ज्ञानापासून दुरावणे असते. माणूस जसा शहरांकडे धाव घेतो, तंत्रज्ञानाच्या आहारी जातो, तशी ही तुटण्याची प्रक्रिया वेगाने घडू लागते. या अवस्थेला आव्हान देणारी घटना ‘प्लॅनेट अर्थ-II’ मालिकेच्या रूपाने छोट्या पडद्यावर घडणार आहे. त्याविषयी...

जगाची अर्धी लोकसंख्या आता शहरात राहते. शहरात राहणे आले म्हणजे, निसर्गातल्या असंख्य गोष्टींच्या मानवाशी असलेल्या नात्यात अंतर येणे स्वाभाविक आहे. एखाद्या माणसाच्या तीन पिढ्या शहरात राहिलेल्या असल्यास, निसर्गाबद्दलचे त्याचे ज्ञान वा नाते, हे अधिकाधिक तुटक होते. हा तुटलेपणा नेमका किती जास्त आहे, हे तपासायचे असल्यास आपल्याला किती झाडांची नावे माहिती आहेत, आणि किमान शहरात दिसणारी किती झाडे आपण नावानिशी ओळखू शकतो, असा प्रश्न स्वतःला करून पाहावा. अलीकडच्या अभ्यासात लोकांना फार फार तर वीस ते पंचवीस झाडे ओळखता येतात. प्राण्यांची नावे पुस्तकांमधून वा टीव्हीवरून लोकांना ज्ञात असतीलही, पण यातले कित्येक प्राणी एका सबंध पिढीने उभ्या आयुष्यात प्रत्यक्ष डोळ्याने कधीही पाहिलेले नसतात. ते तसे पाहिलेले नाहीत म्हणून, त्यांचे विशेष असे काही बिघडतही नाही. पण  अवघ्या तीन वर्षांच्या मुलाला अक्षरओळख नसतानाही पिझ्झाच्या दुकानाचा ब्रँड, बर्गरच्या दुकानाबाहेर बसलेल्या पुतळ्याचे नाव आणि उंदराचे एक कार्टून लगेच ओळखता येते, याचे पालकांनाही विशेष कौतुक वाटते, तेव्हा खूप काही बिघडत चालल्याची भावना रोखता येत नाही.

एकंदरीत लाखो वर्षांपासून निसर्गाच्या सहज आकलनातून शिकलेल्या गोष्टी अवघ्या पाच पिढ्यांनी आपल्या डोक्यातून पुसून टाकल्या अाहेत. त्या रिकाम्या झालेल्या जागेत विकत घेतलेली सुखं माणसाने भरायला सुरुवात केली आहे. गेल्या दशकभरापूर्वीपर्यंत तरी यात काही गैर आहे, असे कुणाला वाटत नव्हते, पण मोबाइल फोनच्या स्मार्ट शोधानंतर माणसाचे निसर्गाशी असलेले उरलेसुरले नातेही तुटत चालले आहे. या तुटत्या नात्यांसोबत माणसाला ज्ञात असलेले प्राणी, पक्षी, त्यांच्या परस्पर व्यवहारातून शिकलेले शब्द, म्हणी, वाक्प्रचार हेही नष्ट होत आहेत. शहरीकरण आणि मोबाइल फोनने मुळात समृद्ध असणाऱ्या, अनेक भाषांच्या अस्तित्वावर घाव पडायला सुरुवात झाली आहे. 

माणसाने भाषेचा शोध लावला, तेव्हा त्याने निसर्गातले प्राणी, पक्षी आणि इतर जीव यांच्याही भाषेचा उपयोग करून घेतला. सध्या वापरात असलेल्या भाषेतून निसर्ग वजा केल्यास मागे उरलेल्या भाषेत व्यवहारवादाचा गाळ अधिक साचताना दिसतो, त्यामुळे पुरेशा शब्दांअभावी माणसांना आपले दु:ख शब्दांत व्यक्त करता येत नाही. ते तसे व्यक्त करता आलेच, तरी ऐकणाऱ्याची भाषा तितकी प्रगल्भ नसेल, तर त्याला त्या माणसाचे दु:ख समजावून घेता येत नाही. एखाद्या समाजाची भाषा त्रोटक आणि मोडकळीस आलेली असेल, तर त्या समाजात सर्वप्रथम नैराश्याचे प्रमाण वाढते. ते अगदी चाळीस ते पन्नास टक्के इतक्या गंभीर प्रमाणातही वाढू शकते. एखाद्या समाजाची मोठी लोकसंख्या नैराश्य आणि वैफल्यग्रस्त असेल तर आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असूनदेखील असा समाज आनंद आणि समाधान बाबतीत इतर समाजांच्या तुलनेत मागे असू शकतो. संसर्गजन्य रोग निदान अँटिबायोटिक्स आणि इतर औषधांच्या मदतीने आटोक्यात आणले जाऊ शकतात. मानसिक रोग इतक्या सहजतेने आटोक्यात आणले जाऊ शकत नाही, त्यासाठी सर्वप्रथम माणसाला त्याच्या भावना व्यवस्थित शब्दांत व्यक्त करणे आवश्यक असते. आणि त्यासाठी लागणारा भावनात्मक शब्दसंग्रह, हा त्याच्या मातृभाषेतून येतो. कुठल्याही माणसाच्या मातृभाषेचे मूळ हे त्याच्या सभोवातलाच्या निसर्गात असते, त्यामुळे कुठल्याही भाषेच्या मूळ उगमाचा स्रोत, हा सभोवतालचा निसर्ग आणि त्यात असलेली निसर्गभाषा असते.

मातृभाषेच्याही अगोदरच्या टप्प्यात येणारी ही निसर्गभाषा म्हणजे नेमके काय, हे लोकांना समजावून सांगणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. शहरी वातावरणात जगण्यासाठी निसर्गावर थेट अवलंबून राहावे लागत नसेल, किंवा त्याच्याशी संपर्काची गरज नसेल तेव्हा निसर्गाशी माणसाचे असलेले मूलभूत नाते, पुन्हा प्रस्थापित करणे, तसे अवघड असते. आपल्यातले काही लोक ‘वीकएंड’ला शहराबाहेरच्या पिकनिक स्पॉट्सवर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा प्रयत्न करीतही असतात, पण यात निसर्गाशी नाते जोडणे कमी आणि निसर्गाला ओरबाडणेच जास्त असते. काही श्रीमंत लोक वर्षाकाठी एकदोन वेळा क्वचित तीनदा आंतरराष्ट्रीय ठिकाणांनाही भेटी देतात, पण या भेटी देत असताना तिथला निसर्ग समजावून घेणे कमी आणि सेल्फी काढण्यावर त्यांचा जास्त भर असतो. कित्येकदा, आपण ज्या कुठल्या स्थळाला भेट दिली होती, तिथल्या पाच प्रमुख वनस्पती वा प्राण्यांची नावे जाणून घ्यायच्या फंदातही काही लोक पडत नाहीत. अशा स्वकेंद्री व्यवहारातून कित्येकदा निसर्गाच्या जवळ जाऊनही तो जाणून घेण्याची संधी आपण गमावतो. अशा वागण्यातून आपल्या फेसबुकच्या फोटोला शेकड्याने लाइक्स येतीलही कदाचित, पण निसर्गाच्या सान्निध्याच्या निखळ आनंदापासून आणि अनुभूतीपासून आपण दुरावतो. जगभरातल्या टुरिस्ट स्पॉटची मुख्य आकर्षणे, तिथे जाण्याच्या आणि राहाण्याच्या पद्धती, अपेक्षित खर्च आणि व्यवस्थापन हे आगोदरच व्यवस्थित ठरलेले असल्याने त्यात तिथल्या स्थानिक निसर्गाबद्दल आयुष्याला उपयोगी ठरेल, असे काही शिकणे वा अनुभवणे तसेही शक्य होत नाही. त्यामुळे जगभर फिरून आणि लाखो रुपये खर्च करूनही निसर्गाशी पुन्हा कनेक्ट न होता आल्याने असंख्य लोक नैराश्याच्या गर्तेत ढकलले जातात.

या पार्श्वभूमीवर, प्रवासावर वारेमाप खर्च न करता आणि आपल्या घराच्या दिवाणखान्यात बसूनच निसर्गाशी पुन्हा कनेक्ट होण्याची आणि निसर्गभाषा शिकण्याची एक सुलभ आणि अद््भुत संधी भारतीयांसाठी चालून आली आहे. जागतिक दर्जाच्या डॉक्युमेंट्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘बीबीसी’ या वृत्तसंस्थेच्या ‘नॅचरल हिस्ट्री युनिट’ने तयार केलेल्या ‘प्लॅनेट अर्थ II’ या डॉक्युमेंट्रीचे प्रसारण सोमवार १८ सप्टेंबरपासून रोज रात्री नऊ वाजता सोनी ‘बीबीसी अर्थ’ या वाहिनीवर होणार आहे. जाणकारांच्या जगात रोज एक तास याप्रमाणे सलग पाच दिवस चालणाऱ्या या माहितीपटाचे वर्णन या शतकातला सर्वात मोठा इव्हेंट म्हणून केले जात आहे. २००७ मध्ये आलेल्या ‘प्लॅनेट अर्थ’ या पहिल्या डॉक्युमेंट्रीने आपल्या ग्रहाबद्दल आणि निसर्गाबद्दल असलेल्या ज्ञानात मोलाची भर टाकलीच, पण कित्येकांची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीही बदलून टाकली. गेल्या दहा वर्षांत डिस्प्ले आणि कॅमेऱ्याच्या तंत्रज्ञानात घडून आलेल्या अद््भुत क्रांतीच्या टोकावर प्लॅनेट अर्थ II चे निर्माण केले गेले आहे. म्हणूनच ही डॉक्युमेंट्री पाहणे, हा अनेकांच्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट अनुभवही ठरू शकतो.

९१ वर्षांतच्या दीर्घ आयुष्यात साठहून अधिक वर्षे वन्यजीवनाच्या अभ्यासात व्यतीत केलेल्या सर डेव्हिड अॅटनबरो यांनी या डॉक्युमेंट्रीसाठी निवेदन केले आहे. समुद्री बेट, पर्वत, जंगले, वाळवंट, गवताळ प्रदेश आणि शहरे अशा सहा भागांत असलेल्या या डॉक्युमेंट्रीत वन्यजीव आणि निसर्गाचे चित्रण, हे माणसाच्या दोन लाख वर्षांच्या इतिहासातले सर्वात भव्य दिव्य आणि सुंदर चित्रण आहे. उघड्या डोळ्यांना लवकर दिसून न येणाऱ्या अनेक गोष्टी या कॅमेऱ्याच्या मदतीने टिपण्यात आल्या अाहेत. त्यातली नाट्यमयता अनुभवल्यानंतर हा कॅमेरा वर्तमान काळातल्या माणसाचा तिसरा दैवी डोळा आहे की काय, इतपत निष्कर्षापर्यंत तुम्ही जाऊ शकाल.

नुकत्याच जन्माला आलेल्या इगुवानाच्या पिल्लाचा शेकडो सापांनी केलेला पाठलाग आणि त्यातल्या दोन सापांच्या तावडीत सापडल्यानंतरही त्यातून सहीसलामत सुटण्याची एक क्लीप तीन महिन्यांपूर्वी जगभर व्हायरल झाली होती. ही व्हिडिओ क्लिप आपल्यातल्या बहुतांशानी पाहिलेलीच असेल. या क्लिपमधला प्रसंग हा याच माहितीपटाच्या पहिल्या भागात घेतलेला आहे. श्वास रोखून ठेवणाऱ्या अशा अनेक प्रसंगाचा समावेश या माहितीपटात आहे. यापलीकडे जाऊन या डॉक्युमेंट्रीमुळे अनेकांना निसर्ग आणि निसर्गाची भाषा समजावून घेण्यास मदत होऊ शकते. डॉक्युमेंट्री पाहिल्यानंतर निसर्गाशी असलेले आपले नाते पुन्हा जोडणे, निसर्गभाषा शिकणे आणि त्यानंतर आपल्या मातृभाषेचा निसर्गाशी असलेला संबध आणि त्यायोगे आयुष्याला अर्थ आणण्याची अशक्य प्रक्रिया या डॉक्युमेंट्रीच्या मदतीने होऊ शकते. जगभर निसर्गाचा ऱ्हास चालू असताना आपण नेमक्या कुठल्या गोष्टींना विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवतो आहे, याचेही भान आपल्याला या प्रसंगी झाल्याशिवाय राहणार नाही. एकूणच, ‘प्लॅनेट अर्थ II’च्या निमित्ताने ज्ञानाच्या जगाला लागलेल्या लॉटरीरूपी बक्षिसावर आपला हक्क नक्की सांगावा, अशी ही वेळ आहे.
 
- राहुल बनसोडे
rahulbaba@gmail.com
बातम्या आणखी आहेत...