आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निव्‍वळ चमत्‍कार!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदीर्घ काळ श्रवणीयता टिकवून गाता गळा राखणे ही किमया शास्त्रीय संगीतात मोजक्या 
कलावंतांनी साधली. ती साधताना शास्त्रीय संगीतातला अंगभूत ठहराव आणि अवकाश उपयोगात आणला, पण पार्श्वगायनात तशी कोणतीही मोकळीक नसताना लतादीदींनी आपला स्वर उन्नत केला... पार्श्वगायन कलेस आभाळाएवढी उंची मिळवून दिली...  

 

लतादीदींच्या आवाजाचे ‘गिफ्टेड व्हॉइस’ यापेक्षा अधिक चांगले वर्णन असू शकत नाही. परमेश्वराने आवाजाची दुर्मिळ अशी देणगी त्यांना प्रदान केली आहे. मात्र, या गिफ्टेड देणगीवर त्यांनी स्वत: केलेले संस्कार आणि त्या आवाजाची अभिव्यक्ती, हे फक्त आणि फक्त लतादीदींचे स्वत:चे योगदान आहे. अप्रतिम, निर्दोष, विलक्षण श्रवणीयता असणारा आवाज त्यांना जन्मजात लाभला, पण अखंडित रियाजाने त्यांनी त्या आवाजावर संस्कार केले आहेत, तो आवाज आवश्यकतेनुरूप ‘घडवला’ आहे. त्यांचे कुठलेही गाणे ऐकले, की या ‘घडवण्याचा’ प्रत्यय येतो.  गंमत म्हणजे, काळाच्या ओघात जसे संगीत सार्वत्रिकरीत्या बदलत गेलेले दिसते, तसाच त्यांचा आवाजही बदलत गेलेला जाणवतो, पण त्याचा प्रभाव मात्र कमी होत नाही, ही माझी पक्की धारणा आहे. 


माझ्या बाबतीत, तर लतादीदींचा आवाज कानावर आला की, अपूर्व समाधान वाटून डोळे आपोआप मिटले जातात आणि एक सात्त्विक, शांत भाव आतल्याआत जाणवू लागतो. हे सारे आपसूक होते. प्रयत्नपूर्वक करावे लागत नाही. अशीच भावना पं. कुमार गंधर्व यांच्याबाबतीतही होते. लतादीदींच्या संदर्भात त्यांना वडील मास्टर दीनानाथांकडून मिळालेला संगीताचा वारसा, त्यांच्याकडून मिळालेली तालीम आणि स्वत:चा रियाज, हे जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच सुरुवातीच्या काळात त्यांना लाभलेले संगीतकारही मला महत्त्वाचे वाटतात. लतादीदी जेव्हा पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आल्या, तेव्हा नूरजहाँ, शमशाद बेगम, गीता दत्त, अमीरबाई कर्नाटकी, सुरैय्या... अशा दिग्गज गायिकांचा जमाना होता. पण हळूहळू दीदींच्या आवाजाचे माधुर्य, कल्पनातीत रेंज - स्केल, ग्रहणक्षमता आणि अभिव्यक्तीचे सामर्थ्य संगीतकारांना उमगत गेले आणि चित्रपटसृष्टीवर लतादीदींच्या स्वराचे साम्राज्य विस्तारत गेले. मला इथे महत्त्वाचे वाटते, हे की कोणत्याही तांत्रिक सुविधा नसताना त्यांनी साठ वर्षांपूर्वी गायिलेली गाणी  आता  ऐकली, तरी त्यातील सुरेलता, भावाभिव्यक्ती, सुरांची फेक यांची जादू आपल्याला मोहवून टाकते. कुठल्याही प्रकारच्या ‘ऑटो ट्यून’ सुविधा नसताना, जी परिणामकारकता त्या साधतात, त्याला तोड नाही. मला तर हा निव्वळ चमत्कार वाटतो. 

 
दुसरी एक गोष्ट यानिमित्ताने मला आवर्जून नोंदवावी असे, वाटते. ती म्हणजे - प्रदीर्घ काळ श्रवणीयता टिकवून लतादीदींचे गाता गळा टिकवणे. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात पं. भीमसेन जोशी, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, गंगूबाई हनगल... अशा मोजक्या कलाकारांनी ही किमया साध्य केलेली दिसते. पण शास्त्रीय संगीतात पार्श्वगायनाच्या तुलनेने हे सोपे असते, कारण तुमच्यापाशी वेळ असतो. मैफलीत तेवढा अवधी मिळतो. स्वरांची बढत क्रमाक्रमाने करता येते. पुनरावृत्तीत आधीपेक्षा अधिक सुरेल, जोरकस, नेमक्या स्वरावली घेता येतात. ही  सोय पार्श्वगायनाच्या क्षेत्रात अजिबात नसते. रेकॉर्डिंगला उभे राहिले की स्वर नेमकाच लागला पाहिजे, अपेक्षित पट्टीतच स्वर लागले पाहिजेत, ते भावनानुकूल असलेच पाहिजेत, ज्या कलाकारावर ते चित्रित होणार आहेत, त्याची शैली अवगत असली पाहिजे, कित्येक व्यवधाने एकाच वेळी सांभाळून तीन-साडेतीन मिनिटांत आपले (इथे -गीतकार, संगीतकार, वादक, कलाकार इत्यादी सर्व घटक) ‘म्हणणे’ प्रभावीपणे मांडावे लागते - जे लतादीदी पिढ्यान््पिढ्या करत आहेत. शिवाय शास्त्रीय गायकांना आपली पट्टी न सोडता हयातभर गाता येते. लतादीदी कोणत्याही पट्टीत सहज गातात. गातानाचा त्यांचा आवाका आश्चर्यकारक आहे. संगीतात हयात घालवलेल्या कुणालाही हे प्रत्यक्षात किती कठीण असते,  याची कल्पना येईल. 


सध्याचा काळ कलेच्या आराधनेपेक्षा फक्त ‘सादरीकरणा’चा आहे. तुम्ही कलाकार आहात की नाही, यापेक्षा तुम्ही ‘परफॉर्मर’ कसे आहात, हेच  महत्त्वाचे ठरते आहे. तुमच्या गळ्यात गाणे कसे आणि किती ताकदीचे आहे, यापेक्षा ते सादर करताना तुम्ही कसे दिसता, हातवारे कसे करता, तुमचा अॅपिअरन्स कसा आहे,  कार्यक्रमाचा सेट कसा आहे, तुमचे कपडे तुम्ही कसे कॅरी करत आहात, यालाच महत्त्व दिले जाते. या झगमगाटात स्वर इकडेतिकडे झालेलेही चालतात, गाण्याचा दृश्य अनुभव उणावता कामा नये, याकडेही अनावश्यक लक्ष दिले जाते. लतादीदी इथे सर्वश्रेष्ठ ठरतात - त्या गात असतानाचे कुठलेही व्हिडिओ पाहिले, तर त्या गाताना जी सात्विकता जागृत होते, तो अनुभव अलौकिक असतो. त्यांचे गाणे त्या ‘व्हिज्युअलाइज’ करतात, हे आपल्याला त्यावरून स्पष्ट कळते. त्यांचे असे गाणे ‘पाहणे’ अतिशय मोलाचे असते.  


ज्या चित्रपट उद्योगात त्यांचा वावर होता, ती इंडस्ट्री अतिशय क्रूर आहे. जे ‘चालत’ नाही, ते क्षणात फेकून देण्याची इथे पद्धत आहे. अशा परिस्थितीत सलग ७० हून अधिक वर्षे स्वत:च्या आवाजाचे माधुर्य निर्माण करून, ते जपण्याची किमया लतादीदींनी साध्य केली आहे. त्यांच्या वडिलांच्या स्मृत्यर्थ जे पुरस्कार दिले जातात, त्याचा एक मानकरी होण्याचा योग माझ्या आयुष्यात आला आहे. काही काळाने, या समारंभात त्यांनी मला गाण्यासाठीही बोलावले आहे. त्या निमित्ताने त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची, भेटण्याची संधी मला मिळाली आहे. ज्यांच्या चरणांशी नतमस्तक व्हावे, असे मनापासून वाटते, अशा त्या दैवता समान आहेत. त्यांचे शुभाशीर्वाद मलाही मिळाले आहेत, हे मी माझे भाग्य समजतो. यापुढेही ते लाभत राहोत, अशी या प्रसंगी प्रार्थनाही करतो... 

 

- राहुल देशपांडे

बातम्या आणखी आहेत...