आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस 'मनासारखा'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुले शाळेत गेलेली आणि संपूर्ण दुपार ही माझी हक्काची व स्वत:ची. त्यातच बाहेर पडणारा पाऊस. मग काय विचारता? बाहेर पाऊस पडत असताना खुर्ची टाकून आवडतं पुस्तक वाचण्यातली मजा काही औरच असते. अशीच एकेदिवशी पाऊस पडत असताना मी पुस्तक वाचत बसले होते. थोडा वेळ पुस्तक वाचण्यात मग्न तर थोडा वेळ पाऊस न्याहाळण्यात असा आलटून पालटून कार्यक्रम चालू असतानाच दारावरची बेल वाजली. हातातले पुस्तक बाजूला ठेवून दरवाजाकडे गेले. दरवाजा उघडताच पाहते तर समोरच्या बिल्डिंगमधल्या संध्यावहिनी होत्या. त्यांच्या मुलीने एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता त्यासाठी त्यांना माझे मार्गदर्शन हवे होते.
त्यांना मी चारपाच मुद्दे सांगितले. आमची चर्चा संपताच त्या घरी जायला निघाल्या. तर मी म्हणाले, ‘वहिनी, बाहेर पाऊस पडतोय आणि अशा वेळेस गरमागरम भजी नाही खाल्ली तर आपल्याइतकं अरसिक कुणीच नसेल. मला भजी खाण्याची खूप इच्छा होती; परंतु एकटीसाठी भजी करणे फारच कंटाळवाणे. आता तुमची कंपनी मिळाल्यामुळे भजी करण्यात आणि खाण्यातही मजा येईल.’
माझा भजी खाण्याचा विचार ऐकताच संध्यावहिनी दु:खी स्वरात म्हणाल्या, ‘अहो ताई, पाऊस आणि कांदा भजी याचं समीकरण लग्नानंतर कधी जुळलंच नाही.’ वहिनींचे उद्गार माझ्या काळजात चर्र करून गेले. मी गरमागरम कांदा भजी केली. आम्ही दोघींनी ती खाल्ली. घरी जायला निघताना संध्यावहिनी म्हणाल्या, ‘माझ्या लग्नाला नऊ वर्षं होऊन गेलीत; परंतु या नऊ वर्षांत पाऊस पडत असताना कांदा भजी खाण्याचा आस्वाद आज प्रथमच घेतला आणि ख-या पावसाची मजाही अनुभवली. त्याबद्दल धन्यवाद.’


संध्यावहिनी घरी गेल्या, परंतु मी मात्र विचारांच्या चक्रात गुरफटून गेले. माझ्या लेखी कांदा भजी म्हणजे मनात यायला अवकाश, की डिश तयार. याउलट संध्यावहिनींना बाहेर पाऊस पडत असतानादेखील भजी खावीशी वाटली तरी ते शक्य नव्हते. नुकतेच लग्न होऊन संध्यावहिनी सासरी आल्या असता पावसाळ्यातील एकेदिवशी चांगलाच पाऊस बरसत असताना संध्यावहिनींना माहेरच्या आईच्या हातच्या कांदाभज्यांची आठवण झाली आणि त्या पतिमहाशयांजवळ बोलून गेल्या, ‘गरमगरम कांदा भजी करू का?’
वहिनीच्या इच्छेचा विचार न करता पतिदेव म्हणाले, ‘आत्ता काय कांदा भजी खायची वेळ आहे का?’ या प्रश्नार्थक उत्तराने वहिनी चांगल्याच निरुत्तर झाल्या आणि मनातली इच्छा मनातच दडपून पावसाच्या सरींबरोबर कांदाभज्यांचा आस्वाद घेण्याचेच विसरून गेल्या.
आज माझ्याकडे माहेरच्या आठवणी काढत पावसाच्या सरींबरोबर कांदा भजी खाण्याचा आस्वाद घेत मनापासून आनंदल्या, पण मला मात्र भजी खाण्यातली मजा अनुभवता आली नाही. मनात येत राहिले, स्त्रीला अशा किती छोट्याछोट्या गोष्टींचा त्याग करावा लागत असतो. नव-याला आवडते तेच करावे, स्वत:च्या इच्छांना कायमची तिलांजली द्यावी, असे का?
कांदा भजी, मूग भजी, पनीर भजी, बटाटा भजी, पालक भजी, मिक्स व्हेज भजी, मका भजी, मिक्स डाळ भजी, हादग्याच्या पानांची भजी, ओव्याच्या पानांची भजी, सुरती कंदाची भजी, भेंडीची भजी, मसूरच्या डाळीची भजी अशी अनेक प्रकारची भजी वेळोवेळी अनेकांना खाऊ घालताना आनंद
वाटत असतो. परंतु बाहेर पाऊस पडत असताना गरमागरम कांदा भजी खाण्याचा मोह मात्र पूर्वीसारखा होत नाही. संध्यावहिनी काही डोळ्यांसमोरून हटत नाहीत.
(पाऊस आणि भजी, पाऊस आणि सहल, पाऊस आणि गिर्यारोहण, पाऊस आणि पावसाळी भाज्या, पाऊस आणि वाहतुकीचा खोळंबा, पाऊस आणि चिकचिक असे कितीतरी आपल्याला आठवून जाते. तुम्हाला काय आठवते पाऊस आला की, ते आम्हाला लिहून कळवा, 10 जुलैपर्यंत. आमच्या पाऊस विशेषांकासाठी
- संपादक, मधुरिमा)