आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या माहेरचं रान दिसे गं स्‍वप्‍नी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाऊस पडताच जाग्या झाल्या माहेरच्या आठवणी.
माझ्या माहेरचं रान, दिसे गं स्वप्नी।
गर्भातून बी अंकुरे, धरणी झाली गं हिरवी।
इंद्रधनु दिसे आकाशी, सप्तरंगाची उधळण करी।
खट्याळ वारा झोंबे, लाजर्‍या वृक्षवेली।
प्रत्येकाच्या जीवनात पावसाच्या असंख्य आठवणी असतात. काही चांगल्या, तर काही वाईट. काही विस्मृतीत गेलेल्या, तर काही पाऊस पडताच ताज्या झालेल्या. आज सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. परसदारी ओट्यावर खुर्ची टाकून मी आरामात बसले होते. एका डिशमध्ये गरम गरम कांदाभजी व दुसर्‍या हातात वाफाळलेला चहाचा कप. कांदाभज्यांना आईच्या हातची चव मात्र नव्हती. थुईथुई पावसाच्या सरीची गंमत बघता बघता मी माहेरच्या शेतात फुलपाखरू बनून केव्हा पोहोचले, याचे भान नव्हते.

सर्व रानमाळ, जणू धरतीने हिरवा शालू पांघरला आहे, असा भासतो. त्या डोलणार्‍या पिकांचा मला खूप अभिमान वाटतो. अशा वातावरणात भुरळ पडते ती शेतात भाजी, भाकरी, कांद्याची न्याहारी. तोंडी लावायला रानभाज्या, चवळी, तरोटा, कोथिंबीर वगैरे. पावसात बाबांच्या कडेवर शाळेत जाणे, येताना चिंब भिजत, चिखल तुडवत सरळ घरी न येता तासन्तास नदीचा पूर बघणे, मग आईचे रागावणे, सर्व काही आठवते.
गेल्या वर्षी जून सरत आला तरी पाऊस पडायची चिन्हे दिसेनात. शेतकरी वर्ग चिंतातुर झाला. मुले कमरेला झाडांचा पाला बांधून धोंडी मागू लागली. कुणी देवाला नवस बोलू लागले, तर कोणी बेडकाचे लग्न लावले. मी अन् माझ्या घरच्या लोकांनी महादेवाला अभिषेक घालायचे ठरवले. त्याकरिता शेतातच गोवर्‍यांवर दाल-बाटी करायची. स्वयंपाकाचे सामान घेऊन शेतात गेलो. तिथे सर्वांनी मिळून स्वयंपाक केला अन् ठरवल्याप्रमाणे अभिषेक केला. जेवायला बसणार, एवढ्यात आकाशात काळेकुट्ट मेघ गर्जना करत बरसायला लागले. आमची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. मेणकापडाने स्वयंपाक झाकला अन् आम्ही सर्व आंब्याच्या झाडाखाली थांबलो. वरून पाऊस धो धो कोसळत होता अन् झाडाखाली जमिनीतून विंचू बाहेर निघत होते. नेमका मलाच विंचू चावला. एकीकडे पावसाने चिंब भिजून थंडी वाजत होती, तर दुसरीकडे पायात विंचवाच्या भयंकर वेदना होत होत्या. काही वेळाने पाऊस थांबला. जिकडे तिकडे पाणी अन् चिखल झाला होता. हातात चपला घेऊन चिखल तुडवत आम्ही घर गाठले.
गावाकडच्या अनेक आठवणी पावसाच्या साक्षीने आठवतात. शहरात कुठे आली अशी मज्जा. इथे तर सगळीकडे सिमेंटचे जंगल झाले आहे. पाऊसही आता लहरी झाला आहे. आताचीच घटना. उत्तराखंडात पावसाने थैमान घालून हजारो भाविकांना यमसदनी पाठवले. तरीही पाऊस हवाहवासा वाटतो.
-