आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now The Rain Water Harvesting Education Information

रेन वॉटर हार्वेस्टिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतामधील जवळपास साठ टक्क्यांहून अधिक जनता शेतीवर अवलंबून आहे. पण तरीही कृषी क्षेत्रामधील करिअरविषयक विद्यार्थी-पालकांमध्ये काहीशी नाराजी किंवा अनास्था दिसून येते. चाकोरीबद्ध शिक्षण बी.कॉम., बी.एस.सी., आय.टी. मॅनेजमेंटसारखे क्षेत्र कॉर्पोरेट जगतामध्ये चांगल्या पॅकेजेसचे जॉब देतात. मग ‘शेती’ करून काय भविष्य आहे? असा प्रश्न पुढे उभा राहतो. शिवाय इथली शेती ही संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे जर निसर्ग नाराज झाला तर विदर्भातील शेतकर्‍यांसारखं होईल की काय, अशी सुप्त भीती शेतीविषयक कोर्सेसला असते आणि म्हणून पालक आणि विद्यार्थी या क्षेत्राकडे दुर्लक्ष करताना दिसतात. दूध व दुग्धजन्य पदार्थ, डेअरी फार्मिंग, फळफळावळ, भाज्या पिकवणं, तसेच रासायनिक खते, सेंद्रिय खते यांची उपयुक्तता, प्रभावी वापर, रसायनांचे दुष्परिणाम, कीटकनाशकाची फवारणी, त्यांचे शाळा, ऋतुमानानुसार येणारी पिकं, त्यांना लागणारे पोषक वातावरण, जमिनीची सुपीकता, जमिनीची मशागत, त्याचे शास्त्र, माती, लाल माती तसेच गांडूळ खत यावरील अभ्यास व संशोधन अशा अनेक उपयुक्त गोष्टींनी परिपूर्ण असा बी.एस.सी. इन अ‍ॅग्रिकल्चर असा कोर्स उपलब्ध आहे.

ज्या विद्यार्थ्यांना शेतीविषयक अभ्यास करावयाचा आहे, त्यांच्यासाठी तर खास कृषी विद्यापीठांची स्थापना झालेली आहे. पडणार्‍या पावसाचं व्यवस्थित नियोजन अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखं नवे क्षेत्रसुद्धा कृषी क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. पाणी हे एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्याचा वापर अत्यंत योग्य उपयुक्त गोष्टींसाठीच व्हायला हवा. शेतीसाठी तर पाण्याची नितांत गरज असते. अशा वेळी पडणार्‍या पावसाचं व्यवस्थित नियोजन केल्यास, ते साठवून त्याचा उपयोग शेतीसाठी केल्यास बर्‍याच गोष्टी सुलभ होऊ शकतात. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही एक प्रक्रिया आहे, तंत्रज्ञान आहे. जगभरामध्ये विविध ठिकाणी याचा अत्यंत प्रत्ययकारी वापर होताना दिसतो.

युरोप किंवा इस्रायलसारख्या ठिकाणी तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आदर्श पद्धतीने शेती कशी केली जाऊ शकते याचे धडे संपूर्ण कृषी जगतालाच दिले गेले आहेत. भारतामध्येही गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन, संवर्धन व उपयुक्त आणि चातुर्याने वापर करण्याचा प्रयत्न सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे होतच आहे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगचेदेखील आहे. पावसाचे बरेचसे पाणी निव्वळ वाहून जाते. परंतु तेच साठवून तंत्रशुद्ध पद्धतीने वापरल्यास त्याचा फार मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. खास रेन वॉटर हार्वेस्टिंगवर कितीतरी व्याख्याने, चर्चासत्रे, शिबिरे भरवण्यात येत असतात.

‘इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात इग्नू’ मध्ये अल्प कालावधीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहे. शिवाय सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हॉयर्नमेंट ही दिल्लीमधील संस्थादेखील अल्प कालावधीचा अभ्यासक्रम चालवते. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील, दापोली तालुक्यातील कोकण कृषी विद्यापीठ, तसेच परभणीमधील मराठवाडा कृषी विद्यापीठ, अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सेस, बंगळुरू, कर्नाटक आणि कर्नाटकातील धारवाड येथील युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चर सायन्सेस या ठिकाणी कृषीविषयक तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग अभ्यासक्रमाविषयी माहिती मिळू शकते.

विलास गावरसकर
vilasgavraskar@yahoo.co.in