आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवासा आणि नकोसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाऊस कधी रिमझिम, कधी मुसळधार, वेडा आणि धसमुसळा पाऊस, कधी अचानक धुंद करणारा, कवेत घेणारा ओला हळवा पाऊस. पावसाच्या या गोड आठवणी अगदी वयाच्या आठव्या वर्षापासून आतापर्यंतच्या.
1970 च्या सुमारासचं छोटंसं आणि छानसं नाशिक. श्रावणात कपालेश्वर मंदिरापासून निघणारी शंकराची पालखी पूर्ण भद्रकालीला वळसा घालून भर पावसात ढोल, टाळ, मृदंग वाजवत जायची तो आवाज अजूनही कानात निनादतो आणि ‘जय भोलानाथ, जय जय शंकर’ हे शब्द व झांजेचा आवाज आला की पालखीचे दर्शन घेऊन उपवास सोडायचा आणि भरपावसात त्या पालखीचे दर्शन म्हणजे अपूर्व सोहळाच!

नंतर पावसात चिंब भिजत पत्री फुले गोळा करायची आणि घरी आल्यावर शेगडीवरचा ऊन ऊन भात, मेतकूट, तूप व जोडीला पापड- लोणचे खाऊन मन तृप्त व्हायचे. घराच्या खिडकीतून पावसाची गंमत तासन्तास बघत बसायची आणि मोठमोठ्याने पावसाच्या कविता म्हणायच्या. आम्ही बहिणी म्हणत असू ती कविता-

पावसाच्या धारा, येती झरा झरा
झाकोळले नभ, सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहळ जाती सरसर...

नंतर कॉलेज जीवनातला पाऊस तर मनाला वेड लावणाराच होता. 1980 च्या वेळचे एचपीटी कॉलेज. आमच्या कॉलेज कॅम्पसमध्ये मोठे चिंचेचे झाड होते. त्या झाडाखाली बसून आम्ही मैत्रिणी 50 पैसे गोळा करून 2 रुपयांत 8 पाववडे आणि अदरक की मिठी चाय यांचा आस्वाद घेत पावसाच्या झिम्मड गाण्यात पावसासारख्या ओल्या हळव्या गप्पाष्टकांमध्ये रंगून जायचो. अशा पावसाच्या अनेक आठवणी आहेत. पावसाचे रूप साठवत वर्षा सहल, निसर्गाच्या सहवासात कवितांचे वाचन, कॉफी पीत पीत काव्यवाचन, मैत्रिणीशी मनाचे गुपित कॉफीच्या मगातून पावसाला साक्षी ठेवूनच केलेले आठवते. वणीच्या सप्तशृंगी देवीला पावसाळ्यात जायचे आणि दर्शन घेऊन गडाच्या पायथ्याशी आल्यावर गरम गरम भुईमुगाच्या शेंगा, मक्याचे गरम गरम कणीस खात खात गप्पांना पावसासारखे उधाण येई. जरी मला भिजवलं, जरी पावसात भाज्या महाग घ्याव्या लागल्या, तरी पाऊस मला खूप आवडतो.