आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाला बांध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार. दुपारनंतर सुटी घेऊन वीकेंड साजरा करायचा, असं ठरवून मी सकाळी जरा उशिरा उठलो. आकाश निरभ्र होतं. लवकर कामं उरकून घरी परतण्याच्या इराद्यानं मी हॉस्पिटलात आलो. चांगलं ऊन पडलं होतं. थोडासा उकाडा जाणवत होता. सारे जण जणू चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. सकाळचं निळंशार आभाळ दुपारनंतर काळ्या मेघांनी कधी आक्रमिलं, हे कळलं नाही. अचानक पावसाचं आगमन झालं. पावसाच्या कोसळणार्‍या जलधारांनी धरतीला चिंब ओलं करायला सुरुवात केली. खिडकीतून बाहेर कोसळणार्‍या पावसाला डोळे भरून न्याहाळायला मी उत्सुक झालो. जसजसा पाऊस पडत होता तसतशा पावसाच्या काही स्मृती, गतजीवनात व्यतीत केलेले क्षण मनात दाटून येत होते.

लहान असताना मुसळधार पावसात घरात बसून राहण्याची जणू शिक्षा वाटे. पाऊस थांबला की सर्व मित्र एकत्र येत असू. घरासमोरून वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहाला रोखण्यासाठी दगड-चिखलाचा बांध करण्यात आम्ही गर्क व्हायचो. अडवलेल्या पाण्यात मनसोक्त खेळायचो. आजोबा बाहेर यायचे. रागवायचे, आम्ही बांधलेला तो बांध पायांनी उद््ध्वस्त करायचे अन् पाण्याला वाट करून द्यायचे. आम्ही हिरमुसले व्हायचो. आजोबांची नजर चुकवून पुन्हा नखशिखांत चिंब भिजायचो. पावसासंगे व्यतीत केलेले ते क्षण आजही मनात ताजे आहेत. त्या टवटवीत क्षणांची मजा लुटणे अन् लहानपणीचे ते मोकळेपण अनुभवणे आज माझ्यासाठी विलक्षण आनंदसोहळाच. पाऊस थांबला तरी झाडांच्या पानापानातून पडणारे पाण्याचे थेंब, पावसात भिजलेल्या पक्ष्यांनी त्यांच्या पंखांची केलेली उघडझाप अन् त्यातून ठिबकणारे पाण्याचे थेंब आजही मन ताजंतवानं करतात. रात्रभर पडलेला पाऊस सकाळी उघडायचा. सकाळी सकाळी मग ओलेत्या आसमंताचं ते भारावलंपण, जाईच्या वेलीतून फुलांसोबत पडणारा पाण्याच्या थेंबाचा वर्षाव, अगर पारिजातकाच्या फुलांसोबत पडणार्‍या पावसाचे थेंब अंगावर घेणं विलक्षण आनंददायी असायचं.
एकदा अलिबागला कॉन्फरन्ससाठी गेलो होतो. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आमची गाडी सुसाट वेगाने अंतर काटत होती. अचानक पावसाच्या धारा कोसळायला लागल्या. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी. दोन्ही बाजूंना असलेले उंच डोंगर. सारंच मनोहारी. गाडीच्या काचा पुसून बाहेर पडणारा पाऊस डोळ्यात साठवत होतो. गाडीतलं उबदार वातावरण. मोठ्या आवाजातलं संगीत. आनंददायी सोहळाच. थोडा वेळ थांबून रस्त्यालगतच्या हॉटेलात घेतलेली कॉफी अन् पुन्हा सुसाट वेगाने पावसात केलेला प्रवास अविस्मरणीय ठरावा असाच होता. अलिबागकडे जाताना वळणावळणाच्या रस्त्यांवर पडणारा पाऊस. पावसात उठून दिसणारी गर्द झाडी. दोन डोंगरांच्या दरीत पिकणारी भातशेती. सारं अनोखं. मनाला हर्षोल्हास देणारं. ते सारे क्षण आज मला जसेच्या तसे स्मरू लागले.

पुणे येथे मुक्काम करून एकदा लोणावळ्याला जात असताना रस्त्यात लागलेला पाऊस आठवतो. घनघोर पावसाचं ते कोसळणं. लोणावळ्याला मग भुशी डॅम परिसरात अनुभवलेला पाऊस. सार्‍या आठवणी आज आपसूकच स्मृतिपटलावर उमटत होत्या. चारी बाजूंना आकाशाला गवसणी घालणारे ते उंचच उंच पर्वत. घनदाट हिरवी वनराई. भारावलेला आसमंत. त्या डोंगररांगांतून खाली आलेले ढग, झाकोळलेले आकाश अन् मनही. त्यात अधूनमधून प्रकाशणारे डेन् अन् ऊन-पावसाचा सुरू झालेला मोहक खेळ अनुभवला. पावसाळा कवेत घेत आनंद लुटणारे पर्यटक. सारं अनोखं! मग रिमझिम पडणार्‍या पावसात भुशी डॅमच्या सांडव्यावरून पडणार्‍या खळाळत वाहणार्‍या फेसाळ पाण्यात ओलेतं होण्यासाठी तरुणाईची उठलेली झुंबड पाहत आम्हीही चिंब ओले झालो. मीठ-मसाला लावलेल्या गरम मक्याच्या कणसांची चव चाखत केलेला उनाडपणा आजही आठवतो. ओथंबणार्‍या त्या पावसाच्या सरीत केवळ शरीरच नव्हे तर मनही चिंब झालं होतं. त्या ओलेतेपणाची मजा काही औरच. कधी कधी पाऊस नकोसाही व्हायचा. पदव्युत्तर अभ्यासाठी पुण्यातल्या बी. जे. महाविद्यालयाचा काळ स्मरतो. सकाळी कितीही पाऊस असला तरी रेनकोट व प्लास्टिकच्या चपला घालून पावसाने भिजलेली वाट तुडवत हॉस्पिटलात जायचो, तेव्हा हाच पाऊस नकोसा व्हायचा. कॉलेजात असताना होस्टेलहून मेसमध्ये रात्री पडणार्‍या पावसात जाणं नकोसं व्हायचं. मग उपाशीच झोपायचो. तेव्हाही हा पाऊस नकोसा व्हायचा. बराच काळ नांदूरघाटसारख्या खेड्यात व्यतीत केला, तेव्हा गावातून घराकडे जाताना पावसात मोटरसायकलमध्ये चिखल अडकायचा, गाडी स्लिप होण्याची भीतीही होती. मग गाडी तिथेच लावायची अन् क्वार्टरकडे चिखल तुडवत पावसात जाण्याचं दिव्य करावं लागायचं. तेव्हाही हा पाऊस नकोसा वाटायचा.

1989 मध्ये बीड जिल्ह्यावर अतिवृष्टी झाली, बिंदुसरेच्या पात्रात असलेले बुद्धबेट पार पाण्यात बुडाले, कित्येकाचे संसार पाण्यात बुडाले, कितीतरी जण त्या महापुरात वाहून गेले... त्या आठवणी नकोशा वाटतात.
असा हा पाऊस. जेव्हा पडतो तेव्हा कधी-कधी नकोसा होतो. पण जेव्हा नसतो तेव्हा मात्र तो पडण्यासाठी मन आसुसलं होतं. कसाही असो, पण पाऊस हवा असतो. पावसात भिजल्यामुळे ओरडणारी आजी असो किंवा पाऊस पडत असताना गॅलरीत बसून आमच्या सौ.ने केलेली गरम गरम कांदाभजी खात अन् सोबत गरम चहाचा आस्वाद घेत गप्पा मारण्याची संधी मी चुकवत नाही.
-
dr.sanjayjanwale@rediffmail.com