आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढबाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढाचा पाऊस धो धो कोसळत होता. किटी पार्टी संपतच आली होती. सर्वजणी गरम चहाचा आस्वाद घेत होत्या. तेव्हा सुमती म्हणाली, ‘मी तुम्हाला आषाढबागेची कल्पना सांगते. आषाढात पाऊस असल्याने बाहेर शेतीची कामे जोरात चालू असतात. म्हणून आपल्या घरातील लक्ष्मी शेतात वास्तव्याला जाते. तिला परत आपल्या घरी घेऊन येण्यासाठी, तिची मनधरणी करण्यासाठी शेतावर जेवणाचा डबा घेऊन जावे. तिला नैवेद्य दाखवावा. आपण ग्रहण करावा व तिला पुन्हा आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रित करावे.’ ही संकल्पना सर्वांनाच खूप आवडली. आपल्या हरवलेल्या संस्कृतीची नव्याने ओळख झाली. मनात आले, या संकल्पनेतूनच वर्षा सहलींची सुरुवात झाली असेल. त्यामुळे आम्ही पण आषाढ संपण्यापूर्वी शेतावर डबा घेऊन जायचे निश्चित केले. तारीख ठरवूनच पार्टीची सांगता केली. त्यानुसार आम्ही 15 जणी फार्महाऊसवर पोचलो. आम्ही तिथेच स्वयंपाक केला आणि फार्महाऊसच्या शेजारी असलेल्या देवळात जाऊन देवीला नैवेद्य दाखवला. परतताना सर्वजणी चिंब भिजलो. कारण मुसळधार पाऊस सुरू झाला होता. सर्वांनाच सपाटून भूक लागली होती. खिडकीतून येणार्‍या पावसाच्या तुषारांच्या संगतीने हसतखेळत जेवलो. जेवल्यावर गप्पा मारल्या, पत्ते खेळलो. पण पाऊस कमी होण्याचे चिन्ह दिसेना. बाहेर जाणे मुश्किल झाले होते. मग वीणा म्हणाली, ‘हेमा, तू खूप वाचत असतेस, काहीतरी वेगळं सांग ना.’ मग मी सर्व मैत्रिणींना पूर्वी वापरल्या जाणार्‍या काही म्हणी सांगू लागले.
का गं बाई लाल, चौघांचा माल
घरच्या गृहिणीची लाली नजरेत भरायची. तेव्हा तिला म्हणायचे, का गं बाई लाल. तर ती म्हणायची, चौघांचा माल. म्हणजे घरात नवर्‍याबरोबर चार भाऊ कमावतात. त्यामुळे घरात आबादीआबाद आहे, म्हणून माझ्या गालावर लाली आहे.
का गं बाई उभी, घरात दोघी-चौघी
तीच गृहिणी दारात आरामशीर उभी असते, तेव्हा असे विचारल्यावर म्हणते, घरात मी एकटीच काम करणारी नाही तर दोघी-चौघी आहेत, म्हणून मी दारात उभी राहून गप्पा मारू शकते.
का गं बाई पळती, घरी भाकर जळती
काळाची पावले धावू लागली अन् त्या गृहिणीने वेगळी चूल मांडली. मग ती एकटीच, माझा स्वयंपाक मलाच करावा लागणार अन् मी वेळेवर पोचले नाही तर भाकरी जळणार, स्वयंपाक बिघडणार.
का गं बाई दुबळी, निघाले वेगळी
हल्ली निस्तेज का दिसतेस बाई, तर वेगळं झाल्याने दुबळी झाले.
मग मला पावसाशी संबंधित म्हणी आठवल्या.
तापीले उना पूर, गिरनाले वसू दाटे
नावाड्या रे भाऊ, नाव टाक लेकीसाठे
पुराच्या वर्णनाला मातेच्या प्रेमाची झालर आहे. पुरामुळे आधीच दुथडी वाहणार्‍या तापीने गिरणेचे पाणी घेतल्याने प्रदेश जलमय झाला आहे. लेकीच्या काळजीने व्याकूळ झालेली आई नावाड्याला नाव टाकायला सांगत आहे.
बरसरातमा ना पाणी बरसे,
ते डोयामा वरीसभर पाणी बरसे
पावसाळ्यात पाणी बरसले नाही तर शेतकर्‍याच्या डोळ्यांतून वर्षभर ते अश्रूंच्या रूपातून बरसत राहते.
म्हणी ऐकून शारदा कौतुकाने म्हणाली, ‘छोटासा दागिना घातलेली स्त्री जशी नजरेत भरते अन् घरंदाज वाटू लागते तशी मराठी भाषाही म्हणींची जोड मिळाली की समृद्ध बनते अन् खूप काही शिकवून जाते.’
या गप्पांतच संध्याकाळ झाली, पाऊसही कमी झाला होता. आनंदातच आम्ही घराकडे प्रयाण केले.

hemazawar@gmail.com