आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमाशंकरचा पाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहानपणापासून पाऊस खूप आवडतो. पण लहानपणी वाटायचे, पाऊस फक्त नदी, शेतात, शेतातील विहिरीत, जायकवाडी धरणात पडावा. रस्त्यावर पडल्यावर खूप चिकचिक होते. पाणी साचते, चालता येत नाही आणि रस्त्यावरून खड्ड्यातून एखादे वाहन गेले की पाणी अंगावर उडते. मग चिडचिड होते. पण समज आल्यावर कळले की, पाऊस असा ठरावीक ठिकाणी पडत नाही, तो त्याच्या मनात येईल तिकडे पडतो...

पावसात भिजायला खूप आवडते. अजूनही मी एकदा तरी काहीतरी निमित्त काढून किंवा दुपारी हे ऑफिसातून घरी आले नाही की, मनसोक्त पावसात भिजते आणि आजूबाजूच्या मैत्रिणींना भिजवते. म्हणजे त्यांना बाहेर बोलवायचे आणि त्यांना आपण मिठी मारायची, म्हणजे आपले ओले अंग असल्यामुळे त्यांचे पण कपडे भिजतात आणि त्यांना ओढत पावसात आणायचे. असे करता करता आम्ही सर्व जण पावसात भिजतो... मग कुणी तरी भज्यांचा बेत करते. गरम गरम भजी खायची, पुन्हा भिजायचे, नंतर गरम चहा, मसाला दूध वगैरे घ्यायचे, गप्पा, मजा करायची आणि घरात यायचे. संध्याकाळी हे पावसात भिजून आल्यावर यांना पण गरमगरम कांदाभजी खिलवायची. भुईमुगाच्या ओल्या शेंगा भाजून त्याबरोबर गूळ घेऊन खायला आवडते. त्या शेंगांचा भाजलेला वास खूप छान येतो. मक्याचं कणीस भाजून तेल, लिंबू, तिखट-मीठ लावून खूप छान लागते. आम्ही भीमाशंकरला जाताना खूप मोठा पाऊस, विजांचा कडकडाट, आमच्या गाडीसमोरून वीज कडकड करत खूप वेगाने गेली. क्षणभर काहीच सुचलं नाही. गाडी थांबली. आम्ही सर्व जण खूप घाबरलो. थोड्या वेळाने पाऊस कमी झाल्यावर भीमाशंकरला गेलो. दर्शन घेतले. पुन्हा पाऊस सुरू झाला. अतिशय भयानक वाटत होते. विजेचे ते रौद्ररूप जवळून पहिल्यांदाच पाहिले. तसेच बीडजवळ ‘कपिलधार’ धबधबा प्रसिद्ध ठिकाण. तेथे 250 ते 300 पायर्‍या आहेत आणि त्याही सरळ. त्यामुळे चढउतार करण्यास अवघड, पण अतिशय सुंदर, प्रेक्षणीय, निसर्गरम्य स्थळ. आम्ही पायर्‍या चढत असताना पाऊस आला. खूप मुसळधार. त्या पायर्‍यांवरून पाणी खाली येत होते आणि आम्ही पायर्‍या चढत वर जात होतो. ते पाणी पूर्ण अंगावर, अगदी तोंडात जात होते. लाट आल्यासारखे वाटत होते. आम्ही हळूहळू वर चढण्याचा प्रयत्न करत होतो. पायर्‍या पूर्ण झाल्यावर पाऊस पण थांबला होता. पण अशा पावसात जाण्याची मजा आली.
-