आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Kulakarni Article On Netaji Shubhashchandra Bos

नेताजींच्या नावाने राजकीय चाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुभाषबाबूंच्या जन्मदिनी, २३ जानेवारीला पंतप्रधानांच्या खास उपस्थितीत गुप्त फाइली उघड केल्या गेल्या. २४ जानेवारीला अमित शहा भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले. २५ जानेवारी रोजी सुभाषबाबूंचे नातू चंद्र बोस यांनी भाजपात वाजत-गाजत प्रवेश केला. सुभाषबाबूंच्या मृत्यूचे गूढ उकलावे, याहीपेक्षा सत्ताधाऱ्यांचे राजकीय हेतू या निमित्ताने उघड झाले...
सुभाषबाबूंची इच्छा होती की, काँग्रेसचे नेतृत्व गांधींऐवजी नेहरूंनी करावे. हिंदू-मुस्लिम प्रश्न हा मुळात ब्रिटिशांनी निर्माण केलेला असून याबाबत निर्णय ब्रिटिश भारत सोडून गेल्यावर घेणे गरजेचे आहे, असेही त्यांचे मत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीचा उद्देश नजरेपुढे ठेवून प. बंगालच्या तृणमूल सरकारने त्यांच्या अखत्यारितील ६४ संचिका (फायली) सार्वजनिक केल्यानंतर केंद्र सरकारनेही २३ जानेवारीला नेताजी बोस यांच्या जन्मतिथीचे औचित्य साधून विविध मंत्रालयातील १०० संचिका सार्वजनिक केल्या. मोठा गवगवा करून सरकारच्या हाती नवीन काहीही लागलेले नाही. उलट सुभाषबाबू व जवाहरसाल नेहरू तथा काँग्रेस यांच्यातील संबंधाबाबत अनेक नवीन बाबी या संचिकेच्या माध्यमातून समोर आल्या आहेत.

संचिकेतील कागदपत्रानुसार स्पष्ट दिसते की, १२ जून १९५२ रोजी नेहरूंकडून सुभाषबाबू यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून दरवर्षी १०० पौंड एवढी रक्कम १९६५ पर्यंत देण्यात येत होती. १९६५मध्ये अनिता बोस यांच्या लग्नानंतर त्यांच्याच विनंतीनुसार ती बंद करण्यात आली. सुभाषबाबूंच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या जपानमधील रेंकोजी मंदिरासाठी आजपर्यंत भारत सरकारने सुमारे ५२ लाख ६६ हजार २७८ रु. खर्च केल्याचेदेखील समोर आले आहे. नेहरूंनी ५ मार्च १९५२ रोजी सुभाषबाबूंचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचे मान्य केले, मात्र कुटुंबीय ही बाब मान्य करत नाहीत, हे पाहून त्याबाबत निर्णय घेतला गेला नाही. याच कारणास्तव नेहरूंनी त्यांच्या अस्थीदेखील भारतात आणण्याचे प्रयत्न केले नाहीत. याच संचिकेतून हेदेखील स्पष्ट झाले की, १९९२, १९९५मध्ये रशियन सरकारने सुभाषबाबू रशियात असल्याबद्दल कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे कळवले आहे. या संचिकेतून एक जुनीच बाब नव्याने समोर आल्याचे सरकारतर्फे जाहीर केले आहे. ती म्हणजे, नेहरूंनी सुभाषबाबू यांना ‘युद्ध गुन्हेगार’ संबोधून ते रशियात असल्याची माहिती २७ डिसेंबर १९४५ रोजी ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट अॅटली यांना कळवली होती. हे कथित पत्र हे शामलाल जैन यांच्या शपथपत्राचा भाग असल्याचे म्हटले आहे. ते मान्य केले तरी खोसला आयोगाने अंतिमतः काढलेला निष्कर्ष हा फिगेस आयोग, शाहनवाज आयोग यांच्या निष्कर्षाला दुजोरा देणारा होता. ज्यानुसार नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचे मान्य केले होते.

नेताजींचे पूर्वायुष्य, त्यांची राजकीय विचारधारा यांच्याकडे दुर्लक्ष करून कित्येकांनी अगदी कुटुंबीयांनीदेखील त्यांच्या भूमिका राजकीय सोय म्हणून घेतल्या आहेत. रशियात १९१७मध्ये झालेल्या कामगारांच्या क्रांतीपासून प्रेरणा घेऊन कार्य करणाऱ्या चित्तरंजन दास यांचे शिष्य असणारे सुभाषबाबू कडव्या डाव्या विचारांचे होते. त्यांंची इच्छा होती की, काँग्रेसचे नेतृत्व गांधींऐवजी नेहरूंनी करावे. हिंदू-मुस्लिम प्रश्न ब्रिटिशांनी निर्माण केलेला असून याबाबत निर्णय ब्रिटिश भारत सोडून गेल्यावर घेणे गरजेचे आहे. यासाठीच ते १९४०मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिशविरोधी भूमिका घेत ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी अफगाणिस्तानमार्गे जर्मनीला पोहोचले. या वेळी त्यांनी धारण केलेले नाव होते, महम्मद झियाउद्दीन! गौतम चट्टोपाध्याय यांच्या मते, सुभाषबाबू यांना रशियात जायचे होते; मात्र तेथे जाऊ न शकल्याने ते जर्मनीत गेले. हिटलरची भेट होण्यापूर्वी व्हिएन्नामध्ये राहात असताना नेताजी यांचे नवे नाव होते, अर्नाल्डो मेंझोटा!

रेडिओच्या माध्यमातून जोरदार प्रचार करून भारतावर स्वारी करण्याची योजना हिटलर आणि रिब्बेनट्रेप यांनी आखली होती. यासाठी बोस यांचा वापर करण्याचे धोरण त्यांनी आखले होते. पोटिब्राड व हुईझेन या रेडिओ केंद्रावरून ब्रिटिशांच्या विरोधात आझाद हिंद सेनेची स्थापना केल्याची घोषणा त्यांनी केली. परंतु हिटलर केवळ आपला वापर करून घेत असल्याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी जर्मनी सोडण्याचा पर्याय निवडला. ८ फेब्रुवारी १९४३ रोजी जर्मन पाणबुडीने ते जपानला पोहोचले आणि त्यानंतर प्रत्यक्ष सैन्य चढाई करण्यास ऑक्टोबर १९४३ उजाडला होता. कोहिमा, मणिपूर, अंदमान येथील यशस्वी चढाईनंतर अवघ्या १२ महिन्यांत जर्मनी व इटलीने शरणागती पत्करली. मात्र जपान लढत होता, कारण दुसऱ्या महायुद्धात लढणाऱ्या प्रत्येक राष्ट्राची उद्दिष्टे वेगवेगळी होती. हिरोशिमा-नागासाकीवर अमेरिकेने अणूबॉम्ब हल्ला केल्यावर जपानने १० ऑगस्ट १९४५ रोजी शरणागती पत्करली. ही बातमी तैवान बेटावर असणाऱ्या बोस यांना १३ ऑगस्ट रोजी समजली. अाशिस राय यांनी बोस यांच्या तैवानमधील या कालखंडावर ब्रिटिश गुप्तहेर खात्याचे दस्तऐवज अभ्यासून ‘बोस फाइल्स’ नावाने हे संशोधन वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार सुभाषबाबू १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैपेईहून मित्सुबिशी-के-२१ या लष्करी विमानाने दुपारी २ ते ३च्या दरम्यान रंगूनला निघाले असता, हवाई धावपट्टीवरच स्फोट होऊन विमानाने पेट घेतला आणि पायलटच्या मागे पेट्रोल टाकीजवळ बसलेल्या बोस यांना आगीने घेरले. त्यात ते गंभीर जखमी झाले. निप्पॉन इस्पितळात अवघ्या अर्ध्या तासात त्यांच्यावर डॉ. योशिमी यांनी उपचार केले. त्यांची मुलाखत अाशिस रॉय यांनी घेतली असता, त्यातील कथन त्या वेळी बोससोबत असणाऱ्या हबीब उर रहेमान यांच्या शहनवाज आयोगासमोर दिलेल्या कथनाशी मिळतेजुळते आहे. डॉ. योशिमी म्हणतात, ‘ते खूप गंभीर भाजलेले होते आणि हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्यांनी पाणी मागितले. त्यानंतर रात्री ९ वाजता उपचार चालू असताना ते वारले. मृत्यू प्रमाणपत्रात मृत्यूचे कारण ‘भाजून झालेल्या गंभीर जखमांमुळे व मानसिक धक्क्यामुळे हृदय बंद पडून मृत्यू’ असे आहे. युद्धकाळातील गुप्ततेमुळे हे प्रमाणपत्र ‘इचिरो ओकुरा’ या नावाने तयार केले गेले. मुखर्जी आयोगाने याच नावाचा उल्लेख करून सुभाषबाबू अपघातात मरण पावले नाहीत, असा निष्कर्ष काढला होता. तैवानमधील प्रादेशिक सरकारचा प्रमुख सी. के. येन याने ब्रिटिश परराष्ट्र खात्याला पाठवलेल्या ‘एफसी१८५२/६/१९५६’ या पत्रामध्ये नमूद केले आहे की, बोस यांचे दहन २२ ऑगस्ट १९४५ रोजी झाले. ते ब्रिटिश अधिकारी टँन टी टी याने पहिले. टी टीच्या नोंदीनुसार, ‘त्या दिवशी काही भारतीयांसोबत मृतदेह घेऊन एक बँडेज गुंडाळलेली व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीचा चेहरा खूप रडवेला होता.’ हे वर्णन हबीब उर रहेमान यांचे आहे. टी टी लिहितो की, तैवानमधील दहन नोंदी पुस्तकात ‘इचिरो ओकुरा’ या लष्करी अधिकाऱ्यांचे दहन झाल्याची नोंद असून १९४६मध्ये हरिन शहा नावाचा भारतीय पत्रकार या ठिकाणी भेट देण्यास आला होता. येन यांच्या संपूर्ण कागदपत्रात सुभाषबाबूंचा उल्लेख ‘टी’ असा येतो. कारण, ब्रिटिश गुप्त संदेशात सुभाषबाबू यांचे नाव ‘टी’ असे असून दुपारी दोन वाजता ‘टी’चा अपघात झाल्याची नोंद आहे. ‘टी’ हे नाव देण्याचे कारण काय असावे, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. ब्रिटनमधील ‘इम्पेरियल वॉर म्युझियम’मधील कागदपत्रानुसार, ब्रिटिश सुभाषबाबू यांना ‘वॉर क्रिमिनल’ मानत नव्हते. निगेल जार्विस या संशोधकाच्या मते, इंग्लंड-भारतामधील कायदेशीर स्थिती पाहता, सर इ. जेनकिन्स, सर एफ. मुडी यांनी त्यांचा उल्लेख ‘ट्रेटर’ असा केला आहे. टी फॉर ट्रेटर हा ब्रिटिश कोडवर्ड असू शकतो.

उपलब्ध पुराव्यांनुसार सुभाषबाबूंचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवान बेटावरील विमान अपघातात गंभीर जखमांमुळे झाला आहे. त्यांच्या अस्थी जपानमध्ये ठेवण्यात आल्या आहेत, ज्यास रेंकोजी मंदिर म्हणून ओळखले जाते, असे ठामपणे म्हणता येऊ शकते. याचाच अर्थ, नेहरूंचे कथित पत्र पूर्णपणे खोटे व चुकीचे आहे. कारण बोस ‘वॉर क्रिमिनल’ही नव्हते आणि ते डिसेंबर १९४५मध्ये हयात असण्याची शक्यता जवळपास नाही.

महम्मद झियाउद्दीन उर्फ अर्नाल्डो मेंझोटा उर्फ ‘इचीरो ओकुरा’ उर्फ ‘टी’ उर्फ रेनकोजी उर्फ सुभाषचंद्र उर्फ नेताजी हे महान देशभक्त, पुरोगामी, कडव्या डाव्या विचारसरणीचे धाडसी स्वातंत्र्यसेनानी होते. स्वातंत्र्य संग्रामात म. गांधी जर भारतीय राष्ट्रवादाचे सूर्य असतील आणि नेहरू, पटेल, शास्त्री, राजाजी त्यांच्याभोवती परिभ्रमण करणारे ग्रह असतील, तर सुभाषबाबू हे स्वतंत्र कक्षा, स्वतंत्र ग्रहमाला असलेला तारा आहेत.
rajkulkarniji@gmail.com