आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी नेहरूंच्या वाटेवर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"मित्रों...मै बचपन से ही ये बनना चाहता था’ हे मोदींच्या विशिष्ट पठडीतील वारंवार कानी पडलेले वाक्य! पण सध्या मात्र मोदी यांनी "मैं बचपन से ही नेहरू बनना चाहता था' हे वाक्य खूप मनावर घेतलेले दिसत आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरूंनी कार्यभार स्वीकारल्यानंतर १९५०मध्ये प्रजासत्ताकाची निर्मिती होऊन पंडित नेहरू पुन्हा पंतप्रधान बनले, त्याच वर्षी नरेंद्र मोदी यांचा जन्म झालेला आहे. हा कालखंड (१९४७ ते १९६४) ‘नेहरू कालखंड' म्हणून ओळखला जातो. प्रशासन, राज्यकारभार, आर्थिक-राजकीय धोरण, शिक्षण, गीत-संगीत, कला-नाट्य, संस्कृती, राहणीमान या सर्वांवर नेहरूंची छाप होती, जी आजही दिसून येते. नेहरू १९६४मध्ये वारले, तेव्हा नरेंद्र मोदी १४ वर्षांचे होते आणि स्वाभाविकपणे ते शालेय शिक्षण घेत असतील. कदाचित शाळेत असताना, सर्वच शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे "मी भारताचा पंतप्रधान झालो तर’ असा निबंधसुद्धा त्यांनी लिहिला असणार! शाळेत शिकणार्‍या त्यांच्या निष्कपट बालमनात मी भारताचा पंतप्रधान झालो तर, याचा अर्थ मी पंडित नेहरू झालो तर, असाच असणे उघड आहे.

नेहरूंच्या विचारसरणीचे पूर्ण आकलन नसतानाही, नेहरूंना समोर ठेवून लिहिलेल्या निबंधामध्ये का असेना, त्यांना नेहरू व्हायचे होते. पण शालेय शिक्षण संपवून पुढे उच्च शिक्षण घेऊन सामाजिक, राजकीय भूमिका कायम होईपर्यंत बालमनातील निष्कपटता न टिकणे ही सहज मानवी प्रवृत्ती आहे. नेहरू गेले तेव्हा १९६४मध्ये १४ वर्षे वय असणारे मोदी त्यानंतर ५० वर्षांनी, वयाच्या ६४व्या वर्षी देशाचे पंतप्रधान झाले; पण नेहरूंच्या विचारधारेवर, व्यक्तिमत्त्वावर, कुटुंबीयांवर सातत्याने टीका करणार्‍या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून! आज पंतप्रधान बनल्यानंतर आपण पुन्हा लहान व्हावे, नेहरू होऊन निखळपणे सर्वांकडे पाहावे, मुलांत खेळावे, बागडावे, असे तर मोदींना वाटत नसावे? मोदी यांच्या बाह्य वर्तनातून तरी निदान आज असेच वाटत आहे.

पंडित नेहरू यांनी जागतिक राजकारणात बजावलेली भूमिका आणि प्रथम पंतप्रधान म्हणून भारतात केलेल्या कार्याची व्यापकता किती प्रचंड आणि देदीप्यमान आहे, याची जाणीव मोदी यांना पंतप्रधान झाल्यानंतरच झाली आहे. पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी स्वतःची ओळख ‘प्रधान सेवक’ अशी करून दिली होती. त्याचे खूप कौतुक झाले. पण वास्तविक स्वतःचा ‘प्रधान सेवक’ असा उल्लेख पंडित नेहरू यांनी स्वतंत्र भारतात पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून भाषण करताना केला होता. पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांना नेहरू व्हायचे होते, त्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. अन्यथा, तिला नेहरूंची मोदी यांनी केलेली पहिलीवहिली नक्कल म्हणावे लागेल!

मोदी आयुष्याच्या तारुण्यातील कालखंडात ज्या विचाराने प्रेरित झाले, तो विचार प्रामुख्याने नेहरूविरोधी आहे. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः नऊ वर्षं, बहिणी विजयालक्ष्मी आणि कृष्णा, मुलगी इंदिरा, जावई फिरोज, बहिणीचे नवरे, पुतण्या ब्रिजमोहन यांनी प्रत्येकी तीन वर्षं आणि पत्नी कमला यांनी एक वर्ष कारावास भोगला. एवढा मोठा त्याग कोणत्याही परिवाराला केव्हाही शक्य होणार नाही, म्हणून आजही नेहरू कुटुंब भारतीयांच्या मनात जागा व्यापून आहे. म्हणूनच निवडणुकीपूर्वी नेहरू यांच्याबद्दल गैरसमज पसरवून निरर्थक टीका करण्याचे काम केले गेले. सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वतः नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू हे सरदार पटेल यांच्या अंत्यविधीला गैरहजर असल्याची धादांत खोटी माहिती देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केला. कारण, हे मोदी संघविचाराने प्रभावित होऊन जडणघडण झालेले आणि मनातील आतल्या आवाजाने अद्याप साद न घातलेले हे मोदी होते. देशात निर्माण झालेल्या धर्माधिष्ठित उग्र राष्ट्रवादी वातावरणातील युवकांचे आशास्थान असणार्‍या मोदी यांनी झंझावाती प्रचार केला, विरोधकांना धूळ चारून मोदी बहुमताने सत्तेत आले आणि ठरल्याप्रमाणे पंतप्रधानदेखील झाले. पण आज मोदी यांना केंद्रात संपूर्ण बहुमत असूनही अद्याप काश्मीर प्रश्न, ३७० कलम, समान नागरी कायदा, काळा पैसा इ. बाबत नवीन काहीही करता आलेले नाही. या समस्या पंडित नेहरू यांच्यामुळेच निर्माण झाल्या असल्याचे भांडवल नरेंद्र मोदी यांच्या पक्षाकडून सतत ६० वर्षे केले होते.

परदेश दौरे करून मागील सरकारच्या कराराच्या अनुषंगाने केलेले पुरवणी करार, बहुचर्चित विदेश दौरे, मुठी आवळत हातवारे करत केलेली परदेशातील आवेशपूर्ण भाषणे, जुन्या योजनांचे नामांतरण, ‘मन की बात'सारखी भाषणे आणि ‘मेक इन इंडिया'सारख्या इंग्रजी घोषणा वगळता मोदींनी गेल्या वर्षभरात नवीन काहीही साधले नाही. अर्थात, पंतप्रधान बनल्यानंतर नेहरूंबाबत मात्र मोदींमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले आहे. सुभाषबाबू यांच्या कथित हेरगिरी प्रकरणात जेव्हा नेहरू यांच्यावर टीका सुरू झाली, तेव्हा मोदी फ्रान्सच्या दौर्‍यावर होते. इकडे सुभाषबाबू यांची हेरगिरी नेहरूंनी केली म्हणून चौकशी समितीची मागणी करणार्‍या स्वपक्षातील लोकांना मोदींनी फ्रान्सच्या राजधानीतूनच उत्तर दिले. त्यांनी पॅरिसमधील भाषणात फ्रान्स आणि भारत यांच्या मैत्रीचा वारसा सांगून पंडित नेहरूंचा अतिशय गौरवाने उल्लेख केला. अगदी परवाच दिल्लीत २८ एप्रिल २०१५ रोजी ‘नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळेच देश प्रगतिपथावर असल्याचे सांगून देशातील युवकांनी नेहरूंचा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगावा’ असे आवाहनही त्यांनी केले. नेहरू यांच्या कार्याची महानता, मोदींमधील संवेदनशील निखळ मनाच्या नेतृत्वास उमगल्याचे हे प्रतीक आहे. त्यामुळे सध्या ते नेहरूंच्या विचारांवर, मार्गावर चालण्याचा प्रयत्न गेल्या एक वर्षापासून अतिशय प्रामाणिकपणे करत आहेत. ही म्हटल्यास कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे.

स्वतःला नेहरूंच्या जागी कल्पून शालेय जीवनात मोदी यांनी निबंधातून शब्दबद्ध केलेला भारत निर्माण करण्याची संधी नियतीने आज त्यांच्यावर सोपवली आहे. पण केवळ नक्कल करून पंडित नेहरूंएवढे मोठे होता येत नसते, तर नेहरू होण्यासाठी धर्मनिरपेक्ष संसदीय लोकशाहीवरील दृढ विश्वास, व्यासंग, जगाचे ज्ञान, आधुनिक वृत्ती, मानवतावादी दृष्टिकोन, विद्वत्तेसोबत विवेकी मन आणि स्वतःवरील टीका सहन करण्याची वृत्ती अंगी असायला हवी, हे जाणूनच मोदी त्या दृष्टीने सतत प्रयत्न करत आहेत. त्यांनी हे जाणले आहे की, या सर्व बाबींसोबत नेहरू होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय असेल तर, ते म्हणजे निष्कपट बालमन! त्यासाठी मोदी नेहरूंप्रमाणेच मुलांत मिसळतात. कधी मुलांचे कान पकडतात, मुलांची पुस्तके न्याहाळतात, तर कधी मुलांना बाकड्यावर तबला वाजविण्याचे कसब शिकवतात! सर्व काही नेहरूंप्रमाणेच करतात. मोदी खरोखरच याच वृत्तीने नेहरूंच्या विचारातील भारत घडविण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे माझे मत आहे. अन्यथा ती नेहरूंची भ्रष्ट नक्कल ठरेल, याची जाणीवदेखील मोदींना नक्कीच आहे. मोदी या कार्यात यशस्वी होतील, अशी आशा त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मी करतो.

राज कुलकर्णी
rajkulkarniji@gmail.com
(लेखक व्यवसायाने वकील असून पं. जवाहरलाल नेहरू या विषयाचे अभ्यासक आहेत.)
बातम्या आणखी आहेत...