आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळीव इतिहास: ‘रुस्तम’चा तिढा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवाह संबंधात अडकलेल्या पत्नीची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने कावस माणेकशा नानावटी या देशभक्त, त्यागी आणि नैतिकतेचा आदर्श असलेल्या नौदल अधिकाऱ्याने तिच्या मित्राला भावनावेगात गोळ्या घातल्या. ही घटना कायद्याच्या जगात अभ्यासाचा विषय ठरलीच, पण सिनेमा (रुस्तम)-नाटकालाही या घटनेने खाद्य पुरवले...
मुंबई. १ नोव्हेंबर १९५८. कावस माणेकशा नानावटी हा पारसी समाजातील भारतीय नौदल अधिकारी. नोकरीच्या निमित्ताने अनेक वेळा घरापासून दूर राहणारा. अनेक दिवसांनी घरी परतला. तेव्हा पत्नी सिल्व्हिया त्याच्यापासून दुरावा राखत असल्याचे त्यास जाणवले. त्याने विचारपूस केली असता, सिल्व्हियाने नानावटीचाच सिंधी समाजातील मित्र प्रेम आहुजा यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे कबूल केले. नानावटीसाठी हा एक धक्का होता, मात्र तो सावरला. त्यानंतर त्याने पत्नी सिल्व्हिया आणि मुलांना मेट्रो सिनेमामध्ये सोडले. तो थेट प्रेम आहुजाकडे गेला. आहुजाला त्याने विचारले की, तू सिल्व्हियासोबत लग्न करून तिच्या मुलांचा सांभाळ करण्यासही तयार आहेस का? यावर आहुजाने नकार देताच, त्याने स्वत:जवळच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून आहुजावर तीन गोळ्या झाडल्या. आहुजा मृत्युमुखी पडला. यानंतर नानावटीने स्वतःहून या कृत्याची कबुली दिली. तो पोलिसांच्या स्वाधीन झाला. नानावटी खटल्यातील प्रथम माहिती अहवालात नमूद असलेले हे कथानक!

नानावटीच्या विरोधात भारतीय दंड विधानातील कलम ३००, ३०२, भारतीय पुराव्याचा कायदा कलम ८ व १०५ या प्रमुख व दंडप्रक्रिया संहितेतील इतर कलमांतर्गत मनुष्यवधाचा खटला चालविला गेला. न्यायालयासमोर प्रमुख दोन विषय होते. ही हत्या पूर्वनियोजित होती की, तत्कालीन परिस्थितीत भावनावेगात घडलेली होती? नानावटीचा बचाव हा हेतूशिवाय घडलेला मृत्यू, असा होता; तर आरोपीने पूर्वनियोजित हत्या केली, असा अभियोग पक्षाचा आरोप होता.

भारतीय दंड विधानातील कलम ३००मधील व्याखेनुसार, मनुष्यहत्या जर तत्कालीन परिस्थितीत भावनावेगात घडली असेल, किंवा एखाद्या व्यक्तीकडून भावनावेगात अचानक उद‌्भवलेल्या परिस्थितीतून किंवा भांडणातून कोणत्याही पूर्वनियोजनाशिवाय उद्युक्त होऊन, स्वतःवरील नियंत्रण जाऊन, कोणाच्या चुकीमुळे किंवा अपघाताने घडली असेल तर अशी हत्या कलम ३०२ अंतर्गत येत नाही. हा निकष पाहताना भांडणास कोणी सुरुवात केली? या मुद्द्याचा विचार केला जाऊ नये, असे या कलमातील परिच्छेदात नमूद केले अाहे. अशा गुन्ह्याची शिक्षा १० वर्षे कारावास एवढी आहे. हत्या पूर्वनियोजित असल्याचे सिद्ध झाले, तर कलम ३०२ अन्वये आजन्म कारावास किंवा मृत्युदंड या शिक्षा दिल्या जातात.

ब्रिटिशांच्या काळातील कलकत्ता, मुंबई व मद्रास या प्रेसिडन्सी टाऊनमध्ये पूर्वी ज्युरीची पद्धत होती. यांची संख्या तीन ते नऊ असायची. मुंबई सत्र न्यायालयाच्या अंतर्गत नानावटी प्रकरणाची सुनावनी नऊ ज्युरींसमोर करण्यात आली. ज्युरी पद्धत प्रामुख्याने वसाहतीच्या देशातील स्थानिक समाजभावनांचा विचार न्यायनिवाड्यामध्ये व्हावा, या हेतूने ब्रिटिशांकडून अमलात आणली गेली होती. भारतीय राज्यघटनेत ज्युरींचे अस्तित्व नाही. मात्र न्यायालयीन प्रक्रियेचा भाग म्हणून, १९६० पर्यंत ज्युरींची तरतूद रद्द केली गेलेली नव्हती. नानावटी हा देशभक्त नौदल अधिकारी होता. त्यात तो नैतिक वर्तणुकीचा, शिस्तीचा व उमद्या मनाचा होता. शिवाय त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नव्हती. तो स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला होता. या सर्वांचा परिणाम म्हणून झालेली हत्या ही पूर्वनियोजित नसून, ती भावनेच्या भरात घडली गेली असल्याचे ज्युरींनी मान्य केले. ८ विरूद्ध १ याप्रमाणे ज्युरींनी नानावटीच्या बाजूने निर्णय दिला.

खटल्याचे सत्र न्यायाधीश रतीलाल मेहता यांनी ज्युरींचा निर्णय अयोग्य असल्याचे घोषित करून हा खटला उच्च न्यायालयाकडे वर्ग केला. ज्युरींच्या निर्णयावर अनेक कायदेतज्ज्ञांनी टीका केली, तरी सामान्य जनता मात्र या निर्णयावर समाधानी होती. भारतीय समाजातील देशभक्तीच्या मध्ययुगीन संकल्पनेला अनुसरून, देशासाठी लढणारा सैनिक हाच सर्वोच्च देशभक्त आणि सर्वोच्च त्यागी समजला जातो. त्याचप्रमाणे समाजात असणाऱ्या पुरुषवर्चस्ववादी विचारातून सर्वात मोठा गुन्हा म्हणजे पत्नीने केलेला विश्वासघात! सर्वोच्च पाप म्हणजे पत्नीचा व्यभिचार आणि त्याची सर्वयोग्य शिक्षा म्हणजे मृत्युदंड! या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून नानावटीने केलेली कृती योग्य असल्याचे मत जनसामान्यांत आणि खास करून पारसी समाजात निर्माण झाले होते. त्यातून नानावटीबद्दल समाजामधून प्रचंड सहानुभूती निर्माण झाली. नानावटी हा पारसी समाजाचा असल्यामुळे आणि प्रेम आहुजा हा सिंधी समुदायातील असल्यामुळे पारसी समाजाने नानावटीला ‘नायक’ या स्वरूपात पाहिले. कारण नानावटी हा मध्यमवर्गीय मानसिकतेचा प्रतिनिधी तर आहुजा हा रंगेल वृत्तीचा खलनायक अशा स्वरूपात या खटल्याचे वृत्तांकन सुरू झाले. ‘ब्लिट्झ’ या साप्ताहिकात आर. के. करंजिया यांनी नानावटीच्या समर्थनार्थ वृत्तांकन केले. मुंबईमध्ये पारसी समाजाने साडेतीन हजार लोकांची रॅली नानावटीच्या समर्थनार्थ काढली. या साऱ्या बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून की काय, नानावटीस ज्युरींनी निर्दोष मानले!

मुंबई उच्च न्यायालयासमोर अभियोग पक्षाने आहुजाची हत्या पूर्वनियोजित कशी होती, आणि नानावटीने हत्या करण्यास काय कारण घडले हे सिद्ध केले नाही, या प्रमुख दोन मुद्द्यांवर आपली बाजू मांडली. फेरसुनावणीदरम्यान अनेक मुद्दे समोर आले. प्रमुख मुद्दा असा की, घटनेच्या प्रसंगी कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता, त्यामुळे केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे वस्तुस्थिती जाणणे गरजेचे होते. यात सिल्व्हियाचा कबुलीजबाब महत्त्वाचा ठरला. तिच्या जबाबानुसार, आहुजा आणि तिच्यातील संबंधाबाबत माहिती झाल्यावर नानावटी आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. त्या वेळी सिल्व्हियाने त्यास रोखले. मात्र, त्या वेळी प्रेम आहुजा तिच्यासोबत लग्न करण्यास तयार होता की नाही, हे तिने नानावटीस सांगितले नव्हते. याचा जाब विचारण्यासाठी तो आहुजाकडे गेला. जेव्हा तो आहुजाच्या फ्लॅटमधील बेडरूममध्ये गेला, तेव्हा आहुजा टॉवेल गुंडाळून नानावटीसमोर आला. नानावटीने त्यास विचारले, ‘सिल्व्हियासोबत लग्न करून तिच्या मुलाबाळांचा सांभाळ करशील का?’ या वेळी आहुजा त्याला म्हणाला, ‘मी जिच्यासोबत झोपतो, त्या प्रत्येक स्त्रीबरोबर लग्न करू काय?’ या वाक्यामुळे नानावटीला प्रचंड राग येऊन दोघांत झटापट झाली आणि त्या दरम्यान नानावटीने आहुजावर तीन गोळ्या झाडल्या. यातील ‘झटापट’ झाल्याची घटना घडलीच नाही, असे अभियोग पक्षाचे म्हणणे होते, कारण आहुजाच्या कंबरेभोवती गुंडाळलेला टॉवेल जसाच्या तसाच होता. झटापटीत गुंडाळलेला टॉवेल तसाच टिकून राहणे अशक्य आहे!

मुंबई उच्च न्यायालयाने ही हत्या हेतुत: व नियोजनपूर्वक असल्याचा अभियोग पक्षाचा युक्तिवाद मान्य करून नानावटीला दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा दिली. जी शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने २४ नोव्हेंबर १९६१ रोजी कायम केली.

न्यायालयाचे काम केवळ शिक्षा सुनावणे एवढेच असते. अंमलबजावणीचा अधिकार हा सरकारचा असतो. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आजीवन कारावासाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यावर या शिक्षेची अंमलबजावणी ही संपूर्णतः सरकारच्या अखत्यारित होती. नानावटी ही उच्च वर्तुळातील व्यक्ती होती. शिवाय सेवेदरम्यान त्याने अनेक वेळा शौर्य गाजवून विविध सन्मान व पदे मिळविलेली होती. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विश्वासातील व्ही. के. कृष्ण मेनन यांच्यासोबत नानावटीने सुरक्षा सचिव म्हणून काम केले होते. नानावटीचा पूर्वइतिहास, त्याची नौदलातील सेवा याचा एकत्रित विचार करून, त्यास तीन वर्षांच्या कारावासानंतर मुक्त करण्यात आले. त्यानंतर नानावटी आपल्या कुटुंबासोबत कॅनडा येथे स्थायिक झाले आणि २००३मध्ये त्यांचा तिथेच मृत्यू झाला.

नानावटीस शिक्षेतून दिली गेलेली माफी, तत्कालीन राजकीय वर्तुळात मात्र चर्चेचा विषय बनली. नानावटीचा नेहरू कुटुंबाशी चांगला परिचय होता. नानावटीचा माफीचा अर्ज प्रलंबित असताना नेहरूंच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या गव्हर्नर होत्या. नानावटीला शिक्षेतून माफी दिली तर सिंधी समुदाय नाराज होईल, अशी शंका असल्यामुळे यावर निर्णय घेतला जात नव्हता. कारण नानावटी खटल्यामुळे भारतातील अल्पसंख्याक पारसी आणि सिंधी हे दोन्ही व्यापारी तथा उच्च वर्तुळातील नेहमी शांत असणारे समुदाय परस्परांच्या विरोधात उभे राहिले होते. खटल्यादरम्यान पारसी समुदायाने नानावटीस तर सिंधी समुदायाने प्रेम आहुजाची बहीण मामी आहुजा हीस पाठिंबा दिला होता. मात्र त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान भाग घेतलेल्या सिंधी समाजातील भाई प्रताप यांचीही माफीची याचिका प्रलंबित होती, जे आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात सजा भोगत होते. दरम्यानच्या काळात मामी आहुजानेदेखील नानावटीस माफी मिळावी, असे निवेदन दिले. सरकारच्या शिफारशीवरून गव्हर्नर विजयालक्ष्मी पंडित यांनी दोन्हीही याचिका मंजूर केल्या.

नानावटी खटला हा आजही समाजभावना, न्यायव्यवस्था, शासन आणि शिक्षेची अंमलबजावणी या सर्व बाबींच्या अध्ययनाचे साधन म्हणून पहिला जातो. या खटल्याचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, न्यायालयातील ज्युरींची पद्धत बंद करावी, अशी शिफारस १९५८च्या न्यायालयीन सुधारणा आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आली होती. मात्र नानावटी खटल्यानंतर ही पद्धत बंद केल्यामुळे ज्युरींची न्यायनिर्णयात भूमिका असणारा ‘नानावटी खटला’ हा भारतातील शेवटचा खटला ठरला! मात्र, साहित्य आणि कलाक्षेत्रावर या खटल्याचा प्रभाव पडत राहिला. हिंदी चित्रपटसृष्टीत अशोककुमार अभिनीत ‘ये रास्ते है प्यार के’ हा नानावटी खटल्यावर आधारित पहिला चित्रपट आला. त्यानंतर विनोद खन्नाच्या ‘अचानक’ या चित्रपटाची कथादेखील याच खटल्यावर आधारित आहे. मराठी रंगभूमीवरील ‘अपराध मीच केला’ हे मधुसूदन कालेलकरांचे नाटक याच खटल्यावर आधारित होते, ज्यात नानावटीची भूमिका अरुण सरनाईक यांनी केली होती. नुकताच प्रदर्शित झालेला अक्षयकुमार ‘रुस्तुम’ हा चित्रपट याच नानावटी खटल्यावर आधारित आहे. आज पन्नास वर्षे उलटूनही ही वास्तव घटना अनेकांना भुरळ घालते आहे, हेच यातून स्पष्ट होते.
rajkulkarniji@gmail.com
पुढे पाहा, फोटोज..
बातम्या आणखी आहेत...