आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कॉमनवेल्थ’ एकसामायिक समृद्धीचे मैत्रीपर्व! (रसिक, राज कुलकर्णी)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोऱ्यांनी भारतावर २०० वर्षे राज्य केले, सबब स्वातंत्र्यानंतर ब्रिटनच्या राजघराण्याशी संबंधित संस्थात्मक परंपरेशी काडीचेही देणे-घेणे नको, अशी ताठर भूमिका घेतली गेली असती तर ‘कॉमनवेल्थ’च्या व्यासपीठामुळे एकसामायिक समृद्धीची दारेही कदाचित वेगाने उघडली नसती...

‘कॉमनवेल्थ’ म्हणजे इतिहासात ब्रिटिशांची वसाहत असणारे देश. पण वसाहती स्वतंत्र झाल्या, प्रजासत्ताक झाल्या तरीदेखील इंग्लंडबरोबरचे संबंध कायम राहिले. ही सर्व राष्ट्रे ‘कॉमनवेल्थ’ या अराजकीय संघटनेच्या रूपाने मैत्रीच्या धाग्यात एकत्र राहिली. सध्या इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) ही कॉमनवेल्थ राष्ट्राची प्रमुख असून कॉमनवेल्थचे मुख्य कार्यालय लंडनमधील मार्लबरो हाउस येथे आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरदेखील भारताने कॉमनवेल्थचे सदस्यत्व स्वीकारले, याबाबत अनेक वेळा टीकाटिप्पणी केली जाते, कारण कॉमनवेल्थचा सदस्य असणे म्हणजे इंग्लंडच्या राणीचे अधिपत्य मान्य करणे, असा काहींचा विचार असतो. एकेकाळी हे सत्य असले तरी आज ही वस्तुस्थिती नाही!

लॉर्ड रॉसबेरी यांनी ‘ब्रिटिशांच्या वसाहती आता हळूहळू स्वतंत्र होण्याच्या मार्गावर अाहेत. बदललेल्या परिस्थितीत वसाहती स्वतंत्र झाल्या तरी त्यांना एकत्रित आणणारी एखादी संघटना असावी, असा विचार १८८४मध्ये सर्वप्रथम मांडण्यात आला. तेव्हापासून वसाहतीच्या पंतप्रधानांची (डोमीनिएन्स प्रिमिअर्स कॉन्फरन्स) परिषद भरवली जाऊ लागली. त्यानंतर १९११मध्ये तिलाच पुढे ‘इम्पेरिअल कॉन्फरन्स’ म्हणून ओळखले जाऊ लागले. पहिल्या महायुद्धानंतर १९१७मध्ये झालेल्या बोल्फोर डिक्लेरेशनच्या माध्यमातून जगभरातील ब्रिटिश वसाहतींना स्वातंत्र्य देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. नेमके याच वेळेस ब्रिटिश मुत्सद्दी जॉन ख्रिश्‍चन स्मट्स याने सर्वप्रथम ‘ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स’ हा शब्दप्रयोग केला. त्यामध्ये इंग्लंड आणि त्याच्या वसाहती यांचे अधिकार समान पातळीवर असतील, असे ठरविण्यात आले. राणीच्या अधिसत्तेस मान्यता देणारा कोणताही देश या ‘कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स’चा सदस्य होण्यास पात्र असेल, अशी घोषणा केली गेली. पण राणीच्या अधिसत्तेस मान्यता, या अटीमुळे स्वतंत्र झालेले अनेक देश सहभागी होण्यास तयार नव्हते. मात्र, कॉमनवेल्थमधील प्रत्येक देशाचे सार्वभौमत्व मान्य करणाऱ्या १९४९च्या ‘लंडन घोषणे’नंतर ‘कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स’चा आधुनिक कालखंड सुरू झाला.

भारत हा कॉमनवेल्थ राष्ट्रांतील सर्वात मोठ्या वसाहतींपैकी एक असल्यामुळे स्वातंत्र्यानंतर देखील भारत ‘कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स’चा सदस्य असावा, अशी विनंती पंतप्रधान क्लेमेंट अँटली आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांनी केली होती. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५०पर्यंत भारत, ब्रिटिश ‘१९३५च्या भारत’ कायद्यानुसार कॉमनवेल्थचा भाग होता. नेहरूंनी १८ एप्रिल १९४८ला पत्र लिहून घटनानिर्मिती होऊन देश प्रजासत्ताक होत नाही तोपर्यंत भारत अद्याप याबाबत निर्णय घेऊ शकत नसल्याचे कळवले होते. मात्र १९४९मध्ये सर्वच सदस्य देशांचे सार्वभौमत्व कॉमनवेल्थने मान्य केल्यामुळे भारत कॉमनवेल्थचा सदस्य राहील, अशी घोषणा पुढे नेहरू यांनी केली. या घोषणेस भारतातून विरोधही झाला. पण ब्रिटिशांच्या काही वसाहती स्वतंत्र झाल्या होत्या, तर काही स्वातंत्र्याच्या मार्गावर होत्या. या सर्व देशातील प्रश्न आणि भारतासमोरचे प्रश्न जवळपास एकसारखेच होते. भारताप्रमाणेच या सर्व देशातील प्रशासनावर आणि न्यायव्यवस्थेवर इंग्लंडचा प्रभाव होता. त्यामुळे ब्रिटिशांपासून नव्याने स्वतंत्र होणाऱ्या देशांबरोबर मित्रत्वाचे संबंध निर्माण करण्यासाठीच एक चांगले व्यासपीठ म्हणून भारताने कॉमनवेल्थमध्ये राहण्याचे मान्य केले. नेहरूंनी त्यांच्या गट निरपेक्ष आंदोलनाची उभारणी याच कॉमनवेल्थ राष्ट्राच्या परिषदांमधून केली होती.कॉमनवेल्थ ही काही राजकीय संघटना नाही, किंवा या संघटनेच्या सदस्यांना संघटनेची नियमावली बंधनकारकही नाही. मात्र कॉमनवेल्थ राष्ट्रांना मार्गदर्शक ठरणाऱ्या तत्त्वांचा अंगीकार या राष्ट्रांनी करावा, या अनुषंगाने घोषणापत्रे जाहीर केली जातात. त्यामधून कॉमनवेल्थ राष्ट्रांत लोकशाहीचा पुरस्कार, सुप्रशासन, कायद्याचे राज्य या तत्त्वांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले जाते. ‘सिंगापूर घोषणापत्र’ (१९७१) हे लोकशाहीचा पुरस्कार, मानवी हक्क, व्यक्ती स्वातंत्र्य आणि जागतिक शांतता याचा पुरस्कार करणारे होते. लासाका घोषणापत्रात (१९७९) लिंगभेदाबाबत जनजागृती करून उपाययोजना करण्याचे आवाहन केले गेले. लॉगकिवी घोषणापत्र (१९८९) हे प्रामुख्याने पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत होते. हरारे घोषणापत्रात (१९९१) याच मुद्द्याबाबत कॉमनवेल्थ राष्ट्रांनी आवश्यक ते कायदे पारित करावे, असे आवाहन करण्यात आले होते. यासाठी स्वतंत्र निधीदेखील कॉमनवेल्थ राष्ट्रांनी उभा केलेला आहे. भारताच्या दृष्टिने विचार केला तर भारताचा वाढणारा व्यापार आणि शेजारील राष्ट्रांबरोबर सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारतास सार्क परिषदेच्या बरोबरीने कॉमनवेल्थसुद्धा तेवढेच महत्त्वपूर्ण आहे.
कॉमनवेल्थमध्ये आज एकूण ५४ देश आहेत. त्यात भारत हा कॉमनवेल्थ राष्ट्रांमधील सर्वात प्रभावी देश आहे. काही देशांनी ब्रिटिश वसाहतीचा भाग नसतानादेखील स्वेच्छेने कॉमनवेल्थचे सदस्यत्व स्वीकारले आहे. इतिहासात पोर्तुगीजांची वसाहत असलेल्या मोझंबिक या देशाने १९९४मध्ये कॉमनवेल्थचे सदस्यत्व स्वीकारले. त्यामुळे सदस्यत्वाच्या नियमावलीत १९९४च्या एडिनबरो घोषणापत्रानुसार बदल करण्यात आले. त्यानुसार १९९५ला कॉमेरून आणि २००९ला रवांडा या देशांनी सदस्यत्व स्वीकारले. कॉमनवेल्थचे सदस्य होण्यासाठी महत्त्वपूर्ण अट म्हणजे, देशात लोकशाही प्रशासन असले पाहिजे. कारण लोकशाहीचा पुरस्कार आणि अंगीकार हे ‘कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स’च्या निर्मितीमागील मूलभूत तत्त्व आहे. झिम्बॉम्वे हा देश लोकशाही प्रशासनात अपयशी ठरल्यामुळे २००२मध्ये त्या देशाचे सदस्यत्व निलंबित केले गेले. तर निवडणुका न घेतल्यामुळे सप्टेंबर २००९मध्ये फिजी या देशाचे सदस्यत्व निलंबित केले गेले. भारत कॉमनवेल्थमधील प्रभावी देश असल्यामुळे पाकिस्तान कॉमनवेल्थच्या बाबतीत कायमस्वरूपी उदासीन राहिला. पाकिस्तानमध्ये १९५८ पर्यंत लोकशाहीच नव्हती. त्यामुळे तो कॉमनवेल्थचा भाग असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यानंतरदेखील पाकिस्तान सातत्याने कॉमनवेल्थचा भाग राहू शकला नाही. परवेज मुशर्रफ यांनी १९९९मध्ये लष्करशाही राज्य प्रस्थापित केल्यानंतर पाकिस्तानचे सदस्यत्व २००४पर्यंत निलंबित केले गेले. त्यानंतरदेखील २००७मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आले. १९७२मध्ये बांगलादेशाला मान्यता दिल्यानंतर पाकिस्तानने स्वतःहून निषेध म्हणून सदस्यत्व काढून घेतले होते. या कारणामुळेदेखील पाकिस्तान कॉमनवेल्थच्या फायद्यापासून दूर राहिला तो कायमचाच!


कॉमनवेल्थ राष्ट्रे ही प्रामुख्याने इंग्रजी भाषा बोलणारी राष्ट्रे आहेत. त्यामुळे कॉमनवेल्थ राष्ट्रांमधील विद्यार्थ्यांना इंग्लंड, अमेरिकेत उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण झाल्या. इंग्रजी भाषेमुळे भारताने जगाला अनेक क्षेत्रातील विद्वान दिले आणि भारतीयांनी इंग्रजी साहित्यातही भर घातली. कॉमनवेल्थ राष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पात्र विद्यार्थ्यांना कॉमनवेल्थ स्कॉलरशीपसुद्धा दिली जाते. सर्वच कॉमनवेल्थ राष्ट्रांमधील कायद्याची निर्मिती ही ब्रिटिशांनी केली असून या राष्ट्रातील आजच्या न्यायव्यवस्थेवर ब्रिटिश न्यायव्यवस्थेचा मोठा प्रभाव आहे.

न्यायव्यवस्थेच्या सुधारणांबाबत ‘कॉमनवेल्थ लॉयर्स असोसिएशन’ ही सर्वात मोठी वकिलांची संघटना आहे. त्याचा फायदा कॉमनवेल्थ राष्ट्रांना होतो. त्याचबरोबर संवैधानिक सुधारणांसाठी कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन’, महायुद्धात ब्रिटिशांच्या वतीने सैनिक म्हणून लढलेल्या कॉमनवेल्थ राष्ट्रांतील माजी सैनिकांसाठी कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह कमिशन’ यांची निर्मिती केली गेलेली आहे.

कॉमनवेल्थच्या इतर उपक्रमांपैकी ठळकपणे जागतिक पटलावर दिसून येणारा उपक्रम म्हणजे, कॉमनवेल्थ गेम्स! कॉमनवेल्थ गेम्स या ऑलिम्पिकनंतर जगात होणाऱ्या सगळ्यात मोठ्या क्रीडा स्पर्धा आहेत. कॉमनवेल्थ गेम्सची सुरुवात १९३०मध्ये कॅनडातल्या हॅमिल्टन येथे झाली. त्या वेळी या स्पर्धा ‘ब्रिटिश एम्पायर गेम्स’ म्हणून ओळखल्या जात होत्या. १९५४मध्ये या स्पर्धांना ‘ब्रिटिश एम्पायर अॅन्ड कॉमनवेल्थ गेम्स’ असे नाव दिले गेले. १९७०मध्ये ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स आणि १९७८ सालापासून आजतागायत कॉमनवेल्थ गेम्स असे नामकरण केले गेले आहे. क्वीन्स बॅटनची सुरुवात मात्र १९५८पासून झाली. ही क्वीन्स बॅटन लंडनमधल्या बंकिमहॅम पॅलेसपासून निघून, ज्या देशात स्पर्धा आहेत त्या देशात स्पर्धांच्या उद‌्घाटन सोहळ्याच्या दिवशी पोहोचते.

ब्रिटिश लेखक अँड्यू रॉबर्ट याच्या सुप्रसिद्ध अशा ‘हिस्ट्री ऑफ इंग्लिश स्पीकिंग पीपल्स’ या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे कॉमनवेल्थमधील राष्ट्रे हेच खऱ्या अर्थाने इंग्रजी भाषेला जागतिक भाषा बनविणारे देश आहेत. एवढेच नव्हे तर आजही या देशांतील प्रशासनावर, न्यायव्यवस्थेवर इंग्रजी भाषेचा प्रभाव आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आदी देशांनी स्वातंत्र्यानंतर जी प्रगती केली, याचे मुख्य कारण इंग्रजी भाषा आणि तो कॉमनवेल्थचा भाग असणे हेसुद्धा आहे, अशी मांडणी रॉबर्ट यांनी या पुस्तकात केली आहे. जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणाऱ्या भारतासाठी ‘कॉमनवेल्थ नेशन्स’ हे ‘नाम' आणि ‘सार्क' एवढेच महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

(rajkulkarniji@gmail.com)

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...