आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्‍तथरारक \'ऑपरेशन पोलो\' ( राज कुलकर्णी)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली याच्याकडे अरब, रोहिले, उत्तर भारतीय मुसलमान, पठाण यांचा प्रमुख समावेश असणारी एकूण २४ हजार सैनिकांची फौज होती, त्यापैकी केवळ ६००० सैनिक प्रशिक्षित होते. याशिवाय त्यांच्या मदतीला दीड लाख रझाकार होते. ‘मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन’ (एमआयएम) या संघटनेचे एक स्वतंत्र सशस्त्रदल होते. बहाद्दूर यार जंग या संघटनेचे १९४४ पर्यंत अध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू झाल्यावर संघटनेची सर्व सूत्रे कासिम रझवीकडे आले. रझाकार हे या रझवीच्या सशस्त्रदलातील स्वंयसेवक होते.

हैदराबाद संस्थानच्या एकूण १७६५ लष्करी अधिकाऱ्यांपैकी १२६८ अधिकारी मुस्लिम होते, ४२१ अधिकारी हिंदू, तर १२१ अधिकारी ख्रिस्ती, पारसी तथा शीख होते. महिन्याला ६०० ते १२०० रुपये पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांत ५९ मुस्लिम, ५ हिंदू आणि ३८ इतर धर्मीय लोक अधिकारी होते.

निजामाच्या सैन्यात एक घोडदलाची तुकडी, ११ बटालियन, दारूगोळ्याची एक तुकडी अशा एकूण सोळा सैन्य तुकड्या होत्या. एकूण २४ हजार सैन्यांच्या तुकडीशिवाय २२ हजार तैनाती फौजदेखील निजामाकडे होती. पाकिस्तानकडून पोर्तुगीजांच्या मार्फत गोव्यातून हैदराबादला शस्त्रास्त्र पुरवठा केला जायचा. काही ठिकाणी हवाईमार्गाने हैदराबादला शस्त्रास्त्र पुरवठा केला जात असे. सिडनी कॉटन या ऑस्ट्रेलियन शस्त्रास्त्र पुरवठादाराने हवाई मार्गे हैदराबादला शस्त्र पुरवठा करण्याचे, अयशस्वी प्रयत्न केले होते.
राजगोपालचारींनी २० जून १९४८ला भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर हैदराबादबाबतच्या हालचालींना प्रचंड वेग आला. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर हैदराबादची आर्थिक नाकेबंदी सुरू झाली. हैदराबादवरील कारवाईपूर्वी संसदेला विश्वासात घेण्यासाठी सरकारतर्फे ७ सप्टेंबर १९४८ रोजी घटना समितीसमोर हैदराबादवरील(भारत) लष्करी कारवाईची माहिती दिली, मात्र या मोहिमेस ‘पोलिस अॅक्शन’ असे नाव मुद्दाम दिले गेले! कारण हैदराबादची समस्या ही देशांतर्गत समस्या असल्याचा संदेश देशाबाहेर जाणे आवश्यक होते.
हैदराबाद संस्थान देशातील सर्वात श्रीमंत संस्थान होते आणि हैदराबादमध्ये त्या काळी तब्बल १७ पोलो ग्राऊंड होते. म्हणूनच हैदराबादवरील लष्करी कारवाईला ‘ऑपरेशन पोलो’ असे नाव देण्यात आले. भारतीय सैन्य दलाच्या चीफ ऑफ स्टाफ ले. जनरल बुचर यांनी या मोहिमेचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंह यांच्याकडे सोपविले. मात्र ‘ऑपरेशन पोलो’ची आखणी भारताचे दक्षिण कमांडचे लेफ्टनंट जनरल इ. एन. गोडार्ड यांनी केली. म्हणून या योजनेला ‘गोडार्ड प्लॅन’ असे म्हणतात. त्यानुसार पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून दोन्ही बाजूने हैदराबादवर हल्ला करण्याचे ठरविले.
पूर्वेकडून होणारा हल्ला हा विजयवाडा येथून मेजर जनरल ए. ए. रुद्रा यांच्या नेतृत्वाखाली गोरखा रायफल्स, पुना हॉर्स, एकोणिसावी फिल्ड बॅटरी, इंजिनिअरिंग युनिट, चार इन्फन्ट्री बटालिअन्स आणि दोन एअरक्राफ्ट यांच्या साहाय्याने करण्याचे ठरले. तर पश्चिमेच्या दिशेने होणारा हल्ला हा सोलापूर येथून मेजर जनरल जे. एन. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्याचे ठरविण्यात आले. या पश्चिम दस्त्यात चार टास्क फोर्स युनिट, घोडदळ, लाईट आर्टिलरी, रणगाडाविरोधी पथक यांचा समावेश होता. पूर्व आणि पश्चिम दस्त्यात एकूण ३५ हजार भारतीय सैन्य या मोहिमेवर तैनात करण्यात आले. हैदराबादतर्फे फौजेचे नेतृत्व जनरल एस. ए. इल इद्रूस आणि कासीम रझवी यांच्याकडे होते. प्रत्यक्ष युद्धात सहभागी असणारी हैदराबादची सैन्य संख्या हैदराबाद स्टेट फोर्सेस २४ हजार आणि रझवीने नवीन भरती केल्यामुळे वाढलेले रझाकार दोन लाख, असे एकूण दोन लाख २४ हजार सैनिक एवढी होती.
पूर्व आणि पश्चिम फ्रंटवर भारतीय फौजा तैनात झाल्यानंतर ‘गोडार्ड प्लॅन’प्रमाणे १३ सप्टेंबर हा हल्ल्याचा पहिला दिवस ठरविण्यात आला. कारवाईच्या पहिल्या दिवशी मध्यरात्री सोलापूरमधून जे. एन. चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सैन्य तुकडी हैदराबादच्या दिशेने निघाली. पहाटेच्या वेळी नळदुर्गच्या किल्ल्याजवळ सैन्य तुकडी पोहोचली असता, हैदराबादी फौजांशी त्यांचा पहिला सामना झाला. ज्यामध्ये बोरी नदीच्या तीरावर असणाऱ्या हैदराबादी फौजांवर शीख इन्फन्ट्रीने आक्रमकपणे हल्ला चढविला. या वेळी बोरी नदीवर असणारा अलियाबादजवळील पूल उडविण्याचा प्रयत्न हैदराबाद फौजांनी केला. कारण हा पूल नष्ट झाला तर कारवाईस आणखी उशीर झाला असता. मात्र लेफ्टनंट कर्नल रामसिंग यांच्या नेतृत्वाखालील नवव्या डोग्रा बटालियनने हा पूल वाचविला. त्याच पुलावरून भारतीय फौजा सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान रणगाड्यासह जळकोट या गावी पोहोचल्या. या ठिकाणी हैदराबादच्या फौजांनी मोठा प्रतिकार केला. मात्र जळकोट येथे यशस्वी चढाई करून लेफ्टनंट कर्नल रामसिंग दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान उमरगा येथे पोहोचले. त्याच वेळी भारतीय फौजांतील आणखी एक दस्ता ज्यामध्ये प्रमुख किंग एडवर्ड घोडदळ, नववी पॅराफिल्ड रेजिमेंट, दहावी इंजिनिअर्स कंपनी, पंजाब रेजिमेंट, गोरखा रायफल्स आणि मेवाड इन्फन्ट्री या सर्वांनी मिळून तुळजापूरवर हल्ला केला. बार्शी शहराकडून तुळजापूरकडे निघालेल्या फौजांनी घाटशिळ परिसरातून तुळजापूर शहरात प्रवेश केला. त्या वेळी तुळजापुरात दोनशे रझाकारांसोबत हैदराबादी इन्फन्ट्रीचै सैनिक होते. मात्र अवघ्या दोन तासांत तुळजापूर शहर आणि परिसर रझाकारमुक्त झाला. तेथून भारतीय फौजा लोहाऱ्याला पोहोचल्या. परंतु पावसामुळे अनेक ओढ्यांना आलेल्या पाण्यामुळे त्यांना पुढे जाता आले नाही. पहिल्या दिवशी भारताने यशस्वी चढाई करून उमरग्यापर्यंत मजल मारली होती.

विजयवाडा येथून निघालेल्या पूर्व फ्रंटवरील ए. ए. रुद्रा यांच्या नेतृत्वाखालील फौजेने कोडार येथून हल्ला सुरू करून होस्पेटपर्यंत विजयी घोडदौड सुरू केली. होस्पेटजवळ तुंगभद्रा नदीवर असणारा अलियाबाद पुलाप्रमाणेच असणारा पूल ५/५ गोरखा रायफल्सने वाचविला.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ सप्टेंबर १९४८ला भारतीय फौजा उमरग्याहून रायचूरकडे निघाल्या असता, हैदराबाद एअरफोर्समार्फत विमानहल्ला सुरू झाला. त्याच दिवशी ३/११ गोरखा रायफल्स आणि आठवी कॅवलरी (घोडदळ) यांनी उस्मानाबाद शहरावर हल्ला केला. या वेळी उस्मानाबाद शहरात रझाकारांनी प्रचंड प्रतिकार केला, कारण त्यांची संख्या मोठी होती. मात्र भारतीय फौजांनी एकाच दिवसात रझाकारांना पूर्णतः पराभूत करून उस्मानाबाद शहर ताब्यात घेतले. त्याच वेळी मेजर जनरल डी. एस. ब्रार यांनी सहाव्या इन्फन्ट्रीसह घोडदळ घेऊन औरंगाबाद शहरावर ताबा मिळविला. शीख इन्फन्ट्री, जोधपूर इन्फन्ट्री, घोडदळ आणि रणगाडे यांच्या साहाय्याने भारतीय फौजांनी त्याच दिवशी जालना शहर ताब्यात घेतले. कारवाईच्या तिसऱ्या दिवशी १५ सप्टेंबरला जालना येथे आलेली सैन्य तुकडी लातूरला पोहोचली आणि तेथून मोमीनाबाद म्हणजे, आजच्या अंबाजोगाईवर हल्ला चढविला... तिथे हैदराबाद सैन्यातील गोळकोंडा लान्सर्स या सैन्य तुकडीने प्रचंड प्रतिकार केला. त्याच दिवशी अंबाजोगाई ताब्यात घेऊन भारतीय फौजा लातूर, नांदेड व बिदरच्या दिशेने निघाल्या.

भारतीय फौजा १६ सप्टेंबर रोजी बिदर ओलांडून आगेकूच करत होत्या. आता हैदराबाद केवळ ७० किमी अंतरावर राहिले होते! प्रतिकार क्षीण झाला होता. त्याच वेळी निजामाला त्याच्या पराभवाची जाणीव झाली. त्यांनी पंतप्रधान लायक अली यांना बोलावून घेऊन राजीनामा देण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात भारतीय फौजा सिकंदराबादजवळ पोहोचल्या होत्या. १७ सप्टेंबरला सायंकाळी भारतीय प्रतिनिधी के. एन. मुन्शी यांना निजामाचा निरोप मिळाला. मुन्शी यांनी निजामाची भेट घेऊन मेजर जनरल इल इद्रूस यांना आदेश देऊन शरणागती स्वीकारण्याचा सल्ला दिला. त्यानुसार निजामाने भारतीय फौजांचे स्वागत करून शरणागती स्वीकारली. सुरक्षा परिषदेत दाखल केलेली तक्रार मागे घेण्याचेही मान्य केले.

सायंकाळी ४.३० वाजता लेफ्टनंट जनरल जे. एन. चौधरी यांच्यासमोर हैदराबाद फौजेचा प्रमुख ले. ज. इल. इद्रूस चौधरी यांना स्वतःहून भेटायला आला. त्याने आधिकारिकरीत्या विनाअट शरणागती स्वीकारल्याचे जाहीर केले. शरणागतीच्या कागदपत्रावर सही करून ले. ज. चौधरींसोबत हस्तांदोलन केले. ले. ज. इल इद्रूस शांतपणे उभा होता. तेवढ्यात जे. एन. चौधरी यांनी आपल्या सिगरेट केसमधून सिगरेट काढली आणि ती इद्रूस यांना ऑफर केली. इद्रूस यांनी सिगरेट स्वीकारून लायटरची मागणी केली आणि सिगरेट ओढतच इद्रूस यांनी जे. एन. चौधरी यांचा निरोप घेतला.

‘ऑपरेशन पोलो’ यशस्वी झाल्याची अधिकृत माहिती अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली. पूर्व फ्रंटवरील विजयवाडा येथून निघालेले सैन्य आणि पश्चिम फ्रंटवरील सोलापूरहून निघालेले सैन्य, हैदराबादमध्ये परस्परांना भेटले! मेजर जनरल ए. ए. रुद्रा यांनी जे. एन. चौधरींचे अभिनंदन केले. विजयी भारतीय फौजेने याच भेटीच्या स्थळी जंगी पार्टी केली. पुढे याच परिसरापासून काही अंतरावर, पोलिसांना लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या सरदार पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीची स्थापना करण्यात आली.
rajkulkarniji@gmail.com
बातम्या आणखी आहेत...