आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raja Kandalkar Article About Babasaheb Ambedkar, Divya Marathi

पाह्यला ‘भीम’ आमी विलेक्शनच्या आखाड्यामंदी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं सारं जीवन एका लढाऊ माणसाची विलोभनीय संघर्ष यात्रा आहे. जगण्याच्या वेगवगेळ्या टप्प्यांवर आंबेडकरांनी विविध भूमिका बजावल्या. त्यातली एक भूमिका राजकीय नेता म्हणून ठसठशीतपणे उठून दिसते. 1937 मध्ये मुंबई विधिमंडळाच्या निवडणुका ब्रिटिश सरकारने जाहीर केल्या. बाबासाहेबांनी नुकताच स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला होता. काँग्रेस, हिंदू महासभा, मुस्लिम लीग या पक्षांच्या तोडीस तोड देशातल्या कष्टकरी, दलितांचा एक राजकीय पर्याय उभा करायचा, हा त्यांचा ध्यास होता. इंग्लंडच्या लेबर पार्टीच्या धर्तीवर हा मजूर पक्ष त्यांनी बेतला होता.

मुंबई विधिमंडळाच्या निवडणुका जाहीर व्हायच्या महिनाभर आधी बाबासाहेब सहकार्‍यांसह राजकीय डावपेच ठरवून तयारीला लागले. मुंबई प्रांतात 175 पैकी 15 जागा राखीव होत्या. राखीव जागांसह काही खुल्या जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले. काही ठिकाणी स्वतंत्र उमेदवारांना समर्थन दिले. बाबासाहेबांच्या आयुष्यातली ही पहिली निवडणूक होती. ते स्वत: मुंबईतून आमदारकीला उभे राहिले. मुंबई प्रांतात झंझावाती दौरा त्यांनी केला. नाशिक, अहमदनगर, खान्देश, सोलापूर, सातारा भागात त्यांनी प्रचारसभा घेतल्या. सातार्‍याला गेल्यावर बाबासाहेबांनी त्यांच्या आईच्या समाधीला पुष्पहार घातला, तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबलेले कार्यकर्त्यांनी पाहिले होते. अहमदनगरच्या अस्पृश्य सभेत त्यांनी मजूर पक्षाचे उमेदवार प्रभाकर जनार्दन रोहम यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. पनवेल, महाड इथंही त्यांच्या मोठमोठ्या सभा झाल्या.

त्या वेळी पुण्यात बाबासाहेबांनी स्वराज्य पक्षाचे नेते लक्ष्मण बळवंत भोपटकर यांना पाठिंबा दिला. भोपटकर सनातनी, प्रतिगामी विचारांच्या लोकांच्या पाठिंब्यावर उभे होते. तरी त्यांचा प्रामाणिकपणा बघून बाबासाहेबांनी त्यांना न डगमगता जाहीर पाठिंबा दिला होता. पुणेकर ब्राह्मणांना पाठिंबा दिला म्हणून त्या वेळी बाबासाहेबांना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं. कामगार नेते ना. म. जोशी यांनी कडाडून टीका केली. ते बाबासाहेबांना म्हणाले, ‘तुमचे गाढवही गेले, ब्रह्मचर्यही गेले.’ बाबासाहेब म्हणाले, ‘गेले तर गेले, पण काम तर झाले!’ या निवडणुकीत बाबासाहेबांविरोधात काँग्रेसने त्या वेळचे प्रसिद्ध क्रिकेटपटू बाळू बाबाजी पालवणकर यांना उभे केले होते. शिवाय पां. न. राजभोज, देवरुखकर यांनाही काँग्रेसनेच मतं खाण्यासाठी उभं केलंय, असा प्रचार झाला होता. त्या वेळी मतदान चुरशीने झाले.
17 फेब्रुवारी 1937ला निकाल लागले. बाबासाहेब प्रचंड मतांनी विजयी झाले. बाबासाहेबांच्या मजूर पक्षाचे 17 पैकी 13 उमेदवार विजयी झाले. बाबासाहेब आमदार म्हणून मुंबई विधिमंडळात गेले.

सन 1945 मध्ये देशात सार्वत्रिक निवडणूक झाली. स्वातंत्र्य दृष्टिपथात असताना ही निवडणूक झाली. ब्रिटिशांविरुद्ध देशभर वातावरण तापत होतं. या वातावरणात सर्व राजकीय पक्ष कामाला लागले. काँग्रेसने ‘छोडो भारत’ ही घोषणा दिली. महंमद अली जिना यांनी पाकिस्तानची आरोळी ठोकली. हिंदू महासभेने नारा दिला- स्वातंत्र्य आणि अखंड हिंदुस्थान. या निवडणुका बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या बॅनरखाली लढवल्या. काँग्रेसकडे देशभक्तीचं वलय होतं. कार्यकर्त्यांचं देशभर जाळं होतं. पैसाही मुबलक होता. बाबासाहेबांकडे पैसा नव्हता. पक्षसंघटनही नव्हतं. अशा परिस्थितीत पुण्यात त्यांनी प्रचाराचा प्रारंभ केला.

या निवडणुकीत प्रचारात बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाला नवी ऊर्जा देणारी घोषणा केली. ते म्हणाले, ‘राज्यकर्ती जमात बना. काँग्रेस हे जळतं घर आहे. त्यावर भरोसा ठेवू नका.’ तीन मागण्या त्यांनी या वेळी सरकारकडे केल्या. एक- दलितांना विधिमंडळात राखीव जागा द्या. दोन- शासन व्यवस्थेत प्रमुख जागा द्या. तीन- शिक्षणासाठी भरघोस अनुदान द्या. खेड्यांतून जमिनीची मालकी द्या.
प्रचाराच्या तयारीसाठी व इतर खर्चासाठी समर्थकांनी मुंबईत बाबासाहेबांना थैली दिली. या वेळी झालेल्या सभेत कार्यकर्त्यांना तिकिटे लावून प्रवेश दिला होता. या वेळी मतदानाच्या दिवशी बाबासाहेबांच्या आवाहनामुळे अस्पृश्यांनी मतदान केंद्रावर पायी येऊन भल्या पहाटे गर्दी केली. रांगा लावल्या. ताटकळत उभं राहून मतदान केलं.

मतदानाचे निकाल लागले. बाबासाहेबांचा या निवडणुकीत सपाटून पराभव झाला. स्पृश्य हिंदूंचे सहकार्य नाही, पक्ष संघटना दुबळी, त्याचा तडाखा बसला. या निवडणुकीत निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून घटना समितीवर जाणार्‍या प्रतिनिधींची निवड होणार होती. मुंबई प्रांतात पराभव झाला; पण बंगाल विधिमंडळातील दलित वर्गाच्या प्रतिनिधींनी घटना समितीत बाबासाहेबांचं नाव सुचवलं. तिथं मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर बाबासाहेब घटना समितीत निवडून गेले. मोठे कार्य घडवून आणण्यासाठी मतभेद असणार्‍यांशीही संधी करावी, या मताचे बाबासाहेब होते. या निवडणुकीनंतर बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहिण्याचं महान कार्य केलं.
जानेवारी 1952 मध्ये देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालील शेड्यूल कास्ट फेडरेशनने जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया,

एस. एम. जोशी यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाशी आघाडी केली होती.
बाबासाहेबांनी मुंबईत चौपाटीवर जाहीर सभा घेऊन या निवडणुकीचा प्रचार सुरू केला. त्यानंतर 25 नोव्हेंबर 1951ला मुंबईतच नरे पार्क मैदानात दोन लाखांची सभा झाली. सभेत बाबासाहेबांनी काँग्रेसला आवाहन केलं ते असं - पं. नेहरूंनी समाजवादी पक्षाला बरोबर घेऊन देशाची धुरा वाहावी. देशात लोकशाही बाल्यावस्थेत आहे. ती बळकट करायचीय. राज्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवायचं तर विरोधी पक्षांची आवश्यकता आहे.

या निवडणुकीच्या प्रचारात बाबासाहेबांची प्रतिमा मोठी होती. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांनी नुकताच राजीनामा दिला होता. हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर नेहरूंशी त्यांचे मतभेद गाजले होते. देशाची राज्यघटना लिहिणारा विद्वान नेता म्हणून जनमानसात त्यांचा दबदबा होता.

बाबासाहेब स्वत: मुंबईतून लोकसभेसाठी उभे होते. त्यांच्या विरोधात प्रचाराला पंतप्रधान पं. नेहरूंनी झंझावाती सभा घेतली. मुंबईत येऊन नेहरू म्हणाले, ‘शेड्यूल कास्ट फेडरेशन व समाजवादी पक्ष यांची एकजूट ही अपवित्र आहे. त्यांना लोळवा.’

त्या वेळच्या निवडणुकीत देशभर नेहरू लाट होती. या लाटेत बाबासाहेबांसारखे तगडे उमेदवार पराभूत झाले. राज्यघटनेचा जन्मदाता लोकांनी मतदानाने अपयशी ठरवला. बाबासाहेबांना 1,23,576 मते पडली. त्यांचे विरोधी काँग्रेस उमेदवार नारायण काजरोळकर यांना 1,37,250 मते पडली; ते विजयी झाले. कम्युनिस्ट नेते एस. ए. डांगे यांनाही या वेळी पराभूत व्हावं लागलं होतं. आकाशातून रॉकेट जमिनीवर आदळावं, तसा हा बाबासाहेबांचा पराभव झाला. काही दिवसांपूर्वी बाबासाहेबांना देशातल्या जनतेनं डोक्यावर घेतलं होतं; तीच जनता नाकारते, हे शल्य त्यांच्या मनानं लावून घेतलं. ते काही काळ निराश झाले; पण नंतर सावरलेही!

या पराभवानंतर बाबासाहेब कार्यकर्त्यांना उभारी देताना म्हणाले, निवडणुका म्हणजे जुगार आहे. तरी आपण यशाच्या जवळ गेलो, हेही नसे थोडके. धीर सोडू नका. उमेद खचू देऊ नका. आपल्या आघाडीतल्या समाजवादींना नावं ठेवू नका.
लोकसभेत जाण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न भंगलं. पण नंतर मार्च 1952मध्ये मुंबई राज्यातून 17 जागांवर राज्यसभेसाठी निवडणूक झाली. त्यातल्या एका जागेवर बाबासाहेब खासदार म्हणून राज्यसभेत गेले. लोकसभा नाही, तर राज्यसभा त्यांनी गाठली.

या पराभवात बाबासाहेबांनी विरोधी उमेदवारांना आदराची वागणूक दिली. नेहरू वा इतर नेत्यांवर टीका करताना, मतभेद व्यक्त करताना त्यांनी नेहमी संसदीय भाषा वापरली. पुढे मे 1954 मध्ये बाबासाहेबांनी विदर्भातील भंडारा लोकसभेची पोटनिवडणूकही लढवली. त्यातही त्यांना काँग्रेसच्या भाऊराव बोरकर यांच्याकडून आठ हजार मतांनी पराभूत व्हावं लागलं. या काळात तर बाबासाहेब आजारी होते. त्या वेळीही त्यांनी पराभव हसतखेळत स्वीकारला. स्वत: निर्माण केलेली राज्यघटना काटेकोरपणे राबवली गेली पाहिजे, लोकशाही बळकट झाली पाहिजे, यासाठी या सर्व निवडणुकांत बाबासाहेबांनी लोकशिक्षणाची, राजकीय शिक्षणाची भूमिका घेऊन प्रचार केला. जय, पराजय मोठ्या मनाने स्वीकारले. म्हणूनच निवडणुकांच्या आखाड्यात पाहिलेला ‘भीम’ लोकांना आजही प्रेरणा देत आहे.