आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगेची स्वर्गातून हकालपट्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इक्ष्वाकु वंशामध्ये ‘महाभिष’ नावाचा अत्यंत पराक्रमी, सत्यवचनी राजा होऊन गेला. त्याला हजार अश्वमेध व शंभर राजसूय यज्ञांचे पुण्य प्राप्त झाल्याने, तो कीर्तीच्या शिखरावर विराजमान झाला होता. देवांचा राजा इंद्र तर त्याच्यावर प्रसन्न होताच, पण ब्रह्मदेवानेही त्याला मृत्यूनंतर ब्राह्मी सभेचा परवाना दिलेला होता. स्वर्गातील देव व मोजक्या राजर्षींनाच हा बहुमान प्राप्त होता. थोडक्यात, महाभिष राजाकडे (व्हीआयपी)खास परवाना होता.

एकदा मर्त्यलोकात (पृथ्वी) काय परिस्थिती आहे, याची आढावा बैठक देवांच्या पुढाकाराने भरली असता ब्राह्मीसभेत ३३ कोटी देव उपस्थित होते. 

(८ वसू-देवगण + ११ रुद्र + १२ आदित्य + दोघे अश्विनी कुमार ८+११+१२+२=३३. कोटी म्हणजे प्रकार.) पुण्यवान राजर्षींमध्ये महाभिषही होता. महाभिष राजाही ब्राह्मीसभेत उपस्थित असल्याची खात्री झाल्यावर जन्हुसुता, देवकन्या, श्रेष्ठ सरिता गंगाही तिकडेच जायला निघाली. तिच्याजवळ चंद्रकिरणांनी विणलेले अत्यंत तलम मौल्यवान वस्त्र होते. तेच तिने परिधान केले. लगबगीने सभेत प्रवेश करणार, इतक्यात गंगेचे ते उंची वस्त्र वाऱ्याने कधी उडवून टाकले तेही गंगेला समजले नाही. गंगेने ‘तशा’ अवस्थेत प्रवेश करताच सर्व देवांनी माना खाली घातल्या. 

पण राजर्षी महाभिष त्या स्वर्गीय सौंदर्याकडे इतका आकृष्ट झाला की, तो टक लावून पाहातच राहिला. ब्राह्मीसभेचा उपमर्द झाल्याने ब्रह्मदेवही रागावला. ‘हे दुष्टबुद्धे महाभिषा! तुला पुन्हा मर्त्यलोकामध्ये (पृथ्वीवर) जन्म घेणे भाग पडेल. त्यानंतरच तुला पुन्हा स्वर्ग प्राप्त होईल. ज्या गंगेने तुझ्या मनाला इतकी भुरळ घातली, ती तुझी पत्नी होईल, पण तुझ्या मनाविरुद्ध वागेल. तिच्या त्या वर्तनाचा तुला क्रोध आला म्हणजे, शापापासून गंगेची मुक्तता होईल.’ (आदिपर्व अध्याय ९६) महाभिष आणि गंगा दोघांनाही ब्रह्मदेवाने फारच कठोर शाप दिला, असे देवांना वाटले.

महाभिषाने पृथ्वीवरील सर्व राजांचे चारित्र्य तपासले व प्रतीप राजाच आपला पिता व्हावा, याबद्दल त्याचा ठाम निर्णय झाला. मर्त्यलोकात महाभिषाची पत्नी म्हणूनच आपल्याला जीवन व्यतीत करायचे आहे, या विचारात गंगा एकसारखी मग्न होत राहिली. महाभिष व गंगेने आता पृथ्वीवर जन्म घ्यायचा, हे नक्की झाले.

शापित गंगा ब्राह्मीसभेतून बाहेर पडली. तेव्हापासून मुळातच चंचल असलेले तिचे मन एकाग्र होतच नव्हते. महाभिष राजाचे रूपही तिच्या नजरेसमोरून हटत नव्हते. एके दिवशी अशीच मुक्त स्वच्छंद संचार करणारी गंगा अष्टवसूंची अवस्था पाहून हबकून गेली. या वसूंचे चेहरे निस्तेज, उद्विग्न, खिन्न, मलूल का झाले असावेत? देवांचेच कुशल नसावे, अशी तिची भावना झाली. ‘तुमच्या या दुर्दशेचे कारण काय?’ गंगेच्या प्रश्नाने भानावर आलेले देव अष्टवसू म्हणाले, ‘आमच्या हातून एक लहानसा अपराध घडला, त्यामुळे आमची ही अवस्था झाली आहे.’ ‘तुम्हालाही ब्रह्मदेवानेच शाप दिला का?’ गंगेने विचारले. ‘नाही! वसिष्ठ ऋषी एकांतात संध्योपासना करीत असताना, आमच्या हातून त्यांचा उपमर्द झाला. आम्ही चक्क मूर्खासारखे वागलो.’ ‘मर्त्यलोकांमध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागेल’, अशी वसिष्ठांची शापवाणी आहे. स्वर्गातून मर्त्यलोकांत जाणाऱ्यात आता महाभिष व गंगा या जोडीत अष्टवसूंसह एकूण शापित दहा झाले.

अष्टवसूंना महाभिष व गंगेला मिळालेल्या शापाची माहिती होती. पण गंगेला अष्टवसूंच्या शापाची इत्थंभूत माहिती नव्हती. श्रेष्ठसरिता गंगेला अष्टवसूंनी गळच घातली, ‘हे गंगे! तू स्त्री रूप धारण कर आणि आम्हा अष्टवसूंना तुझ्या उदरी जन्म घेऊ दे. आम्हाला मानवी स्त्रीच्या पोटी जन्म घेण्याची अजिबात इच्छा नाही.’ ‘तुम्ही माता म्हणून माझी निवड करूनच टाकलेली आहे. तर तुमचा पिता कोण व्हावा, हाही निर्णय तुम्हीच सांगा.’ ‘भरतकुळात प्रतीपाचा मुलगा पुरुषश्रेष्ठ राजा शांतनु या नावाने विख्यात होईल. हा राजा शांतनुच आमचा पिता होईल.’ 

थोडक्यात, ब्रह्मदेवाने बांधलेली लग्नगाठ गंगेला समजली. गंगेच्या मनातील खदखद शांत झाली. प्रतीपपुत्र शांतनु तिच्या मनाभोवती रुंजी घालू लागला. ‘देवहो! तुमच्या मताप्रमाणेच मी वागेन. मी त्या शांतनु राजाचे भले करीन आणि तुमची इच्छापूर्तीही होईल.’ ‘हे गंगे! ही योजना नीट एेक! तुझ्या पोटी आम्ही एकेक करून जन्म घेऊ खरे, पण जन्मताच तुझ्या पुत्रांना तू पाण्यात टाकून दे. म्हणजे, आमचा मर्त्यलोकातला प्रायश्चित्ताचा कालावधी काही क्षणांपुरताच मर्यादित राहील.’ गंगेने या योजनेला होकार दिला. परंतु शांतनुला एक तरी पुत्र द्यायलाच हवा, अशी गंगेने अटही घातली. नाहीतर पुत्रप्राप्तीच्या इच्छेने तो माझ्याशी समागम करील तो सर्वथा व्यर्थ जाईल.’ अष्टवसूंना आता त्या वचनाचे गांभीर्य समजले. म्हणजे आठच्या आठ वसू जन्मताच पाण्यात टाकता येणार नाहीत. सात पुत्रांना जन्मताच स्वर्गात प्रवेश मिळेल. आठवा? दीर्घकाळ पृथ्वीवर प्रायश्चित्त भोगत राहणार. दीर्घकाळपर्यंत पृथ्वीवर राहणारा देवकन्या, जन्हुसुता, गंगेचा पुत्र आपल्याच अंशाचा हवा. ते कसे शक्य करायचे? अष्टवसू म्हणाले, ‘आमच्या प्रत्येकाच्या वीर्याचा आठवा भाग तुझ्या उदरी जन्म घेईल. तुझ्या पतीला हवा असणारा हाच पुत्र तू त्याला देऊ शकशील. परंतु अशा प्रकारे उत्पन्न झालेल्या या पुत्राला मर्त्यलोकामध्ये संतती होणार नाही. तुझा हा पुत्र निपुत्रिकच नव्हे अपत्यहीन राहील. पण तो महान पराक्रमी होईल.’ (अष्टवसू व गंगा यांच्या भविष्यातील अॅग्रीमेंट रजिस्टरही झाले.) पृथ्वीवरील प्रतीप, शांतनु व गंगेच्या अष्टवसूंसह नात्याचे देवांनी योग्य नियोजन केले.

भरतकुळातील प्रतिश्रव्य राजाला प्रतीप नावाचा पुत्र झाला. चिरतरुण गंगेची ब्राह्मदेवाने अगोदरच पृथ्वीवर रवानगी केली होती. भरसभेत चंद्रकिरणेही न पांघरता ती उपस्थित राहिली म्हणजे पहिला अपराध तिचाच होता. त्यानंतर महाभिष राजा देवांप्रमाणे मान खाली न घालता तिच्या सौंदर्याने गारद होऊन एकटक पाहात बसला, म्हणून गुन्हेगार नंबर दोन. पहिल्या अपराध्याला मोठी दीर्घकाळ शिक्षा. 

म्हणून गंगा पृथ्वीवर मोहक स्त्रीरूप घेऊन अवतीर्ण झाली. हरिद्वारमध्ये प्रतीप राजा जप करीत ध्यानस्थ बसला असता, कमनीय गंगा त्याच्या उजव्या मांडीवर विराजमान झाली. राजा प्रतीपाची जपसाधना भंगली. ‘तू माझ्या मांडीवर बसून काय योजले आहेस?’ ‘मी कामिनी तुझ्या सहवासासाठी आतुर आहे. अशा स्त्रीचा अव्हेर करणे सज्जन निंद्य समजतात.’ गंगेची देहबोली प्रतीपाने ओळखली. ‘हे सौंदर्यवती, मी कामवासनेने परस्त्रीशी सहवास करणार नाही. क्षत्रिय नसलेल्या स्त्रीशी तर अजिबातच नाही.’ गंगेला हा अपमानच वाटला. ‘मी सर्व दृष्टीने तुझ्या योग्यतेची आहे. मी स्वर्गात वास्तव्य करणारी देवकन्या आहे. आजपर्यंत मला कुणीही अव्हेरलेले नाही!’

‘तरीही तू माझ्या उजव्या मांडीवर बसून धर्मपरंपरेनुसार माझी कन्या किंवा सून होण्याचीच इच्छा व्यक्त केली आहेस. माझ्या मनात तुझ्याबद्दल पत्नीप्रेम नाही. तू माझी सून हो. माझ्या पुत्रासाठी मी तुला मागणी घालतो. सुनेसाठी राखून ठेवलेल्या मांडीवरच तू बसलेली आहेस.’ गंगेचा डाव यशस्वी झाला! 

हे जगविख्यात भरतवंशीय धर्मज्ञा, तुझ्या पुत्राशी मी विवाह करीन. पण माझी अट आहे. माझे वागणे व माझे कृत्य त्याने सहन केले पाहिजे. त्याने त्याबद्दल माझ्याशी वितंडवाद घालायचा नाही. कोणतीही चर्चा करायची नाही. या अटीवर मी येथे राहीन व तुझ्या पुत्रावर अखंड प्रेमाचा वर्षाव करीन. तुझ्या पुत्राला जे पुत्र होतील, त्या योगे तो हमखास स्वर्गात जाईल. हे देवकन्येचे वचन आहे.’ इतके बोलून गंगा अचानक अंतर्धानही पावली. प्रतीप राजाने पुत्रप्राप्तीसाठी प्रौढ वयात भार्येसह खास तपाचरण सुरू केले. तपाचे फळ म्हणून पुत्रप्राप्तीही झाली. प्रतीप पत्नी सुनंदाला देवापि, शांतनु व बाल्हिक असे तीन पुत्र झाले.

- राजा पटवर्धन
 संपर्क  : ९८२००७१९७५
बातम्या आणखी आहेत...