आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगेचा गांधर्व विवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांतनुला पित्याच्या वचनाची आठवण होतीच. शांतनुची देहबोली तिच्या सर्व अटी शिरसावंद्य असल्याचेच दाखवीत होती. भरत कुळातल्या विख्यात राजाला आपण अंकित करून घेतल्याने गंगेलाही हसू फुटले. गांधर्वविवाह पार पडला.

मेरू पर्वतावर वरुणपुत्र वसिष्ठ ऋषींचा आश्रम होता. हरिणे व विविध पक्ष्यांनी हा आसमंत गजबजून गेलेला होता. फुलाफळांनी आश्रम परिसर सुशोभित झालेला होता. कंदमुळे व झरे यांनी युक्त अशा परिसरातील पवित्र आश्रमात वसिष्ठ तपाचरणात मग्न असत. दक्षप्रजापतीची कन्या सुरभी. कश्यपमुनींच्या कृपाप्रसादाने सुरभीने धेनूला जन्म दिला. वसिष्ठ ऋषींना ही धेनू होमधेनू म्हणून प्राप्त झाली. अशा या पुण्यतपोवनामध्ये ही धेनू संचार करायची.
 
स्वर्गातल्या देवकन्येप्रमाणे ही नंदिनी या तपोवनात शोभून दिसायची. या तपोवनात अनेक देव, ऋषीमुनी, देवगणही मनसोक्त विहार करायचे व वास्तव्य करायचे. असेच एकदा ‘अष्टवसू’ आपल्या भार्यांसह या मनोहारी तपोवनात संचार करत असताना गेंडेदार आकर्षक शेपटी असलेल्या गाईच्या दर्शनाने वसू ‘द्यू’च्या पत्नीवर मोहिनीच घातली. ही गाय शुभदर्शनी, शांत वृत्तीची, दुधाळ व पुष्ट होती. द्यू पत्नीने त्या कामधेनूचे पतीला दर्शन घडविले. त्या धेनूच्या दर्शनाने द्यू तर बेहद्द खूश होऊन पत्नीला म्हणाला, ‘ही गुणवान कृष्णनयना धेनू वसिष्ठांच्या मालकीची आहे. या गाईचे मधुर दूध जर मानवाला मिळाले, तर मर्त्यमानवही हजारो वर्षे जगेल. तो चिरतरुण राहील.’
 
द्यूच्या पत्नीला पृथ्वीवरील तिच्या एका मैत्रिणीची आठवण झाली. उशीनर राजर्षीची कन्या ‘जितवती’ तिची जीवश्चकंठश्च मैत्रीण होती. पृथ्वीवरील सर्व रूपसंपदा जणू जितवतीलाच बहाल केलेली होती. द्यू पत्नी एकदम उद्गारली, ‘माझ्या जितवती मैत्रिणीसाठी ही सवत्सधेनू मला हवीच.’ तिने पतीला आज्ञाच केली, ‘मनुष्यलोकात माझी मैत्रीण चिरतारुण्याने निरोगी राहण्यासाठी ही गाय मी तिला देणारच. माझा हा प्रेमळ हट्ट समजून तुम्ही तो पुरवाच.’ पत्नीची मर्जी सांभाळण्यासाठी द्यूने पृथु इत्यादी बंधूंशी संगनमत करून वसिष्ठांच्या सवत्सधेनूचे हरण केले.
 
आपण स्वर्गनिवासी देवगण असल्याची प्रौढी मिरवणाऱ्या द्यूला वसिष्ठ ऋषींच्या तप:सामर्थ्याची कल्पना नव्हती. वनविहार पूर्ण करून फळे घेऊन वरुणपुत्र वसिष्ठ ऋषी आश्रमात आल्यानंतर धेनूंचे दर्शन घेत. त्यांना कामधेनू नंदिनी दिसली नाही, म्हणून संपूर्ण तपोवनाचा त्यांनी शोध घेतला. वसिष्ठांनी चित्त स्थिर करण्यासाठी डोळे मिटून घेतले. अंतर्ज्ञानी वसिष्ठांच्या चेहऱ्यावर क्रोधाचा अंगार सतेज झाला. ‘माझी दुभती गाय पळवणाऱ्यांना मृत्यूलोकात जन्म घेणे भागच पडेल! माझे वचन असत्य ठरणारच नाही.’ शापवाणीने तप:सामर्थ्य घटते. वसिष्ठ ऋषी अष्टवसूंना शाप दिल्यानंतर पुन्हा तपाचरणामध्ये मग्न झाले.
 
ऋषीने देवांनाच शाप दिल्याचे कळताच स्वर्गात खळबळ माजली. अष्टवसूही दिव्यज्ञानी असल्याने वसिष्ठ ऋषींना प्रसन्न करून घेण्यासाठी तपोवनात आले. वसिष्ठांनी शाप मागे घेण्यास चक्क नकार दिला. तुम्हा आठही जणांना मी शाप दिला आहे. ‘द्यू’ने घोर अपराध केल्याने त्याला दीर्घकाळ मृत्यूलोकात राहावेच लागेल. अन्य सात जणांना अत्यल्प काळानंतर पुन्हा स्वर्गात येता येईल (उ:शाप). द्यूचा घोर अपराध पाहता मर्त्य लोकात त्याला संतती होणार नाही. परंतु तो सकल शास्त्रात नैपुण्य मिळवील. धर्मशील वृत्तीने जगेल. आपल्या पित्याचे हितरक्षण करील. परंतु स्त्री सुखाला पारखा राहील.’ वसूंबरोबर एक क्षणही अधिक न दवडता महर्षी आश्रमात निघून गेले. अष्टवसूंची गंगेशी गाठ पडली. वसू आणि गंगा सर्वच शापबाधित. समदु:खी एकत्र आल्याने त्यांनी विचारविनिमय केला. वसू म्हणाले, ‘हे गंगे! तुझ्या पोटी आमच्यापैकी प्रत्येक जण जन्माला येताच क्षणी पाण्यात सोडून दे. द्यूला मात्र मर्त्यलोकात दीर्घकाळ राहावेच लागेल.’ अष्टवसू व गंगेच्या करारातील तपशीलही ठरला.

प्रतीपाचा पुत्र शांतनु. तारुण्यात पदार्पण करीत असताना प्रतीपाने त्याच्याजवळ मन मोकळे केले, ‘हे पुत्रा शांतनु! तुझे कल्याण करण्याच्या हेतूने एक सौंदर्यवती, चिरतरुण रूपगर्विता, दिव्य स्त्री माझ्या उजव्या मांडीवर येऊन बसली होती. ती तुझा अभिलाष बाळगून पुत्रप्राप्तीच्या इच्छेने एकांतात तुझी गाठ घेईल. तिची चौकशी न करता, तिच्याशी वाद न घालता तिच्या कृत्याने क्रोधीत न होता, तू निमूटपणे तिचा स्वीकार कर. दिव्य सहवासाचा अनुभव घे. तिला कधी अडवू नकोस.’ प्रतीपाने शांतनुला राज्याभिषेक केला व स्वत: वनात निघून गेला.

मृगयाप्रिय शांतनुला अरण्यातला संचार फारच रुचत असे. असेच एकदा गंगातीरावर एकटाच मृगया करीत असता, अचानक समोर लावण्यवती स्त्री दिसली. अशी उज्ज्वल कांती त्याने त्यापूर्वी कधी पाहिली नव्हती. चांदण्यासम पारदर्शी वस्त्रही त्याने कधी पाहिलेले नव्हते. त्या दिव्यरूपसंपदेने त्याचे चित्तच मोहरून गेले. एकटक नजरेने तो जणू सौंदर्य पीत होता. त्याची नजर एक पळही दुसरीकडे जात नव्हती. (महाभिष-गंगा प्रथम भेट) तशीच अवस्था त्या रूपगर्वितेची झाली. पहिल्याच दृष्टिक्षेपात गंगेचे शांतनुवर प्रेम जडले. ‘देवकन्येची कांती असलेली तू कुणी देवता, गंधर्वी, अप्सरा, यक्षी, भुजंगी आहेस, की चक्क मानुषी? मी तुझी आर्जवपूर्वक प्रार्थना करतो. तू माझी भार्या हो.’ गंगेच्या मनातलेच शांतनु बोलला. ती शांतनुच्या समीप गेली. ‘मी तुझी अंकित होऊन साम्राज्ञी होईन, पण मी जसे वागेन त्याविरुद्ध तू बोलता कामा नयेस. माझे वागणे तुला रुचो वा न रुचो, तुझी नापसंती मला सहन होणार नाही. माझ्या मनाला लागेल असे बोललास, तर मात्र मी तुला सोडून तत्काळ निघून जाईन.’ शांतनुला पित्याच्या वचनाची आठवण होतीच. शांतनुची देहबोली तिच्या सर्व अटी शिरसावंद्य असल्याचेच दाखवीत होती. भरत कुळातल्या विख्यात राजाला आपण अंकित करून घेतल्याने गंगेलाही हसू फुटले. गांधर्वविवाह पार पडला. एकांतातील क्रीडेत देवकन्येचे अप्रतिम कौशल्य पाहून शांतनु संतुष्ट झाला. 

अलौकिक रतिक्रीडेने शांतनुला स्वर्गात गेल्याचाच भास होत असे. दीर्घ काळानंतर गंगेला पहिला पुत्र झाला. जन्मताच तिने पुत्राला गंगेत बुडविला. शांतनु मनात हिरमुसला; पण गंगा सोडून जाईल म्हणून गप्प बसला. असे एकामागून एक सात पुत्र तिने निर्विकारपणे गंगार्पण केले. आठव्या वेळी पुत्राला हातात घेऊन गंगा स्मित करतेय, असे दिसताच दु:खाने संतापलेला शांतनु ‘ए कैदाशिणी, थांब. त्याला मारू नकोस. तू आहेस तरी कोण? पापांच्या राशीवर तू बसलेली आहेस.’ ‘हे पुत्रवतांमध्ये श्रेष्ठ असलेल्या राजा! मी या पुत्राला मारून टाकीत नाही.
 
पूर्वसंकेताप्रमाणे माझे पृथ्वीवरील वास्तव्यही आता संपणार आहे. महर्षींचे गण जिची नित्य सेवा करतात, ती जन्हुसुता गंगा मीच आहे. देवकार्यसिद्धीसाठीच मी तुझ्या सहवासात राहिले. वसिष्ठ ऋषींच्या शापामुळे वसूंनी मर्त्यलोकात जन्म घेतला. तू त्यांचा श्रेष्ठ पिता झालास आणि मी त्यांची अद्वितीय माता झाले. या देवकार्यासाठीच मी मानवी स्त्री रूप घेतले. तुझ्या हातून हे पुण्य घडल्यामुळे तुलाही अक्षय लोकाची प्राप्ती होणार आहे. माझा करार मी पूर्ण केला आहे. राजा! तुला एक तरी पुत्र असावा, म्हणून अष्टवसूंनी प्रत्येकी आपला अाठवा अंश देऊन हा पुत्र माझ्या पोटी जन्माला घातला आहे. गंगेनेच हा पुत्र तुला दिला आहे. द्यू नावाच्या अष्टवसूचाच अवतार म्हणजे हा पुत्र.’ एवढे बोलून गंगा पुत्रासह अंतर्धान पावली. शांतनु हस्तिनापूरला आला.
 
एके दिवशी शांतनुला गंगेचा प्रवाह क्षीण झालेला दिसला. पाहतो ते अद‌्भुतच दिसले. एक कुमार अस्त्रांचा विनियोग करून आपल्या बाणांनी गंगाप्रवाहाला अडवून धरताना त्याला दिसला. त्या कुमाराने राजाकडे पाहिल्यावर राजा मंत्रमुग्ध झाला व कुमार अंतर्धान पावला. शांतनुला हा कुमार आपलाच पुत्र असल्याची खात्री पटली. ‘गंगे! माझ्या पुत्राला स्वाधीन कर!’ लोकोत्तर रूप असलेल्या गंगेने शांतनुला त्याचा पुत्र बहाल केला. ‘राजा! सर्व अस्त्रांचे याला ज्ञान आहे. रणांगणात इंद्राप्रमाणे पराक्रमी आहे. वसिष्ठ, शुक्र आणि बृहस्पती या सर्वांचे ज्ञान या तुझ्या पुत्रात एकवटले आहे. याचा सांभाळ कर!’ शांतनु ‘देवव्रताला’ घेऊनच घरी परतला. हा पुत्र गंगेचा व अष्टवसूंचा प्रसाद की शांतनुचा? हा पुत्र हस्तिनापूरचा युवराज झाला. पुढे तो ‘भीष्म’ म्हणून अजरामर झाला.

» दक्षप्रजापतीची कन्या सुरभी. कश्यपमुनींच्या कृपाप्रसादाने सुरभीने धेनूला जन्म दिला. वसिष्ठ ऋषींना ही धेनू होमधेनू म्हणून प्राप्त झाली. अशा या पुण्यतपोवनामध्ये ही धेनू संचार करायची. स्वर्गातल्या देवकन्येप्रमाणे ही नंदिनी या तपोवनात शोभून दिसायची.
 
लेखकाचा मोबाइल क्र. : ९८२००७१९७५
patwardhanraja@hotmail.com
बातम्या आणखी आहेत...