आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्तिकाचे वचन (राजा पटवर्धन)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जनमेजयाने महासर्पयज्ञाची चोख सुरक्षा व्यवस्था केली. होमातून धुरांच्या लोळाने नागांचा थरकाप सुरू झाला. लहानमोठ्या सर्व प्रकारचे सर्प जणू अग्नीत उड्या मारून स्वत:च दग्ध होत होते. सर्पांच्या कोलाहलास व्यास नारदादी साक्ष होते.
ना गराज तक्षकाच्या विषदंशामुळेच परिक्षित राजाचा मृत्यू झाला. त्याचा बदला घेण्यासाठी तक्षकासह सर्व नागांचे भस्म करण्याचा जनमेजयाने सर्पसत्रात निश्चय केला. यज्ञमंडप वेदपारंगत ऋत्वीजांच्या मंत्रांनी घुमू लागला. जनमेजय यज्ञदीक्षा घेणार, इतक्यात, लोहिताक्ष स्थपतीने (कारागीर) यज्ञभूमी, तिचा आकार व वेळही सदोष असल्याचे निदर्शनास आणले. वास्तुविद्येत पारंगताने बजावले, ‘एक ब्राह्मणकुमार यज्ञसिद्धीत विघ्न आणील.’ सर्पयज्ञास आतुर झालेल्या जनमेजयाने स्थपतीच्या वाणीकडे दुर्लक्ष करून यज्ञदीक्षेचे आचमन प्राशन केले. मंत्रघोष निनादू लागले.
प्रजापतीला (सत्ययुगात) कद्रू व विनता अशा दोन कन्या होत्या. कश्यप मुनींनी या दोन्ही कन्या भार्या म्हणून स्वीकारल्या. बहिणी सवती झाल्या. दोन्ही पत्नींच्या सेवेने प्रसन्न झालेल्या कश्यपाने ‘वर मागा’ अशी आज्ञा केली. कद्रूने एक हजार तेजस्वी नागपुत्र; तर विनतेने तेज, सामर्थ्य व पराक्रमात हजाराहून सरस अशा दोनच पुत्रांची मागणी केली. ‘तथास्तु!’ ‘या गर्भांची नीट जोपासना करा.’ असे म्हणून कश्यप मुनी वनात तपश्चर्येला गेले. अद्भुत असे घडले की, दीर्घकाळाने कद्रूने एक हजार अंडी घातली व विनतेने फक्त दोन. दोघींनीही अंडी उबेत ठेवली. कद्रूच्या अंड्यातून एक हजार नागपुत्र जन्मले. सवत अगोदर आई झाल्याने विनता कासावीस झाली. तिने अधीरतेने एक अंडे फलित होण्याआधीच फोडले. पुत्र बाहेर आला खरा, पण कंबरेच्या खाली लुळा. अपुरी वाढ झाल्याने मातेवर संतापलेला होता. ‘गेली पाचशे वर्षे ज्या कद्रूसोबत तू स्पर्धा करत आलीस तिची तू दासी होशील.’ ‘आता दुसरे अंडे तरी योग्य वेळी फलित होण्याची वाट पाहा. लोकोत्तर पुत्र जन्माला येईपर्यंत धीर धर. तुझ्या दास्यातून तोच तुला मुक्त करील.’ मातेला प्रथम शाप व लगेच उ:शाप देऊन, तो अपंग पुत्र अंतराळात उडून गेला.
रात्र संपून प्रभातकाळी सूर्याच्या सारथ्यासाठी जो प्रथम दर्शन देतो, तोच हा विनतेचा पुत्र अरुण (अरुणोदय). विनतेचा दुसरा पुत्र गरुड (वैनतेय). जन्मताच नाग हेच ज्याचे भक्ष्य ठरलेले ते खाण्यासाठी त्याने आकाशात भरारी मारली. कद्रूचे पुत्र शेष, तक्षक, वासुकी, नहुष, एलापत्र इ. नागांच्या हजार प्रजाती जन्मल्या. नाग व पक्षी प्रजाती निर्माण करणाऱ्या या दोघा सवतींनी अमृताच्या प्राप्तीसाठी समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या उच्चै:श्रवा घोड्याचे दर्शन झाले. त्यांनी पैज लावली. विनता म्हणाली, ‘हा अश्वराज पांढऱ्या रंगाचा आहे.’ कद्रू म्हणाली, ‘परंतु याची शेपटी काळीकुट्ट आहे.’ जर उच्चै:श्रव्याची शेपटी काळी असेल, तर विनता कद्रूची जन्मभर दासी होईल. शेपटी पांढरी असेल तर कद्रू दासी होईल. कद्रूने कपट केले. हजार पुत्रांना म्हणाली, ‘तुम्ही काळ्या केसांचे रूप धारण करून उच्चै:श्रव्याची शेपटी काजळासारखी काळीकुट्ट दिसेल, अशा पद्धतीने अश्वाच्या शेपटाला चिकटा. ही माझी आज्ञा आहे!’ कद्रूच्या मुलांनी हे कपट झिडकारून लावले. आपण दासी होणार, या भयाने कद्रू संतापली. तिने पुत्रांना शाप दिला, ‘जनमेजय राजा सर्पसत्र करेल, तेव्हा अग्नी तुम्हाला जाळून टाकील.’ कद्रूच्या शापाला ब्रह्मदेव साक्षी होता.
कद्रूचा पुत्र ‘वासुकी’ हा अमृतमंथनाच्या वेळी मंदार पर्वताला वेढा घालून रज्जू बनला होता. ब्रह्मदेवाकडे वासुकीने मदतीची याचना केली. वासुकीने या शापातून मुक्त होण्याचा एक उपाय म्हणून जरत्कारु ऋषीला जरत्कारुच नाव असलेली आपली बहीण अर्पण केली. पती व पत्नी दोघांचेही नाव जरत्कारु. त्यांचा पुत्र आस्तिक.
जनमेजयाच्या सर्पसत्रामध्ये अग्नी तुम्हाला जाळून टाकील, असा सर्पमाता कद्रूने शाप दिला होता. त्याचे परिमार्जन व्हावे, म्हणून वासुकीने अापली बहीण जरत्कारु, व्रतस्थ जरत्कारु ऋषीला दिली. सर्पांची संख्या पृथ्वीवर अमर्याद वाढलेली आहे. लोकहितासाठी ब्रह्मदेवासकट देवगणांनी कद्रूच्या शापाचे स्वागत केले. हे अचाट सामर्थ्य असलेल्या भुजंगांचे जहर अत्यंत दाहक आहे. दुसऱ्यांना विनाकारण नित्य पीडा देणे हा त्यांचा उपजत स्वभाव बनला आहे. ब्रह्मदेवाने कद्रू पती कश्यपाला बोलावून सांगितले, ‘कद्रूच्या शापाने तू क्रोधी होऊ नकोस. यज्ञामध्ये सर्पांचा समूळ नाश ही प्राचीन परंपराच आहे.’ ‘कश्यपा! मी तुला सर्पदंश विष उतरविणारी विद्या देत आहे.’ कश्यप मुनींकडून सर्व काश्यपांना ही विद्या उपलब्ध झाली. असो. आईचा शाप खराच ठरणार, म्हणून घाबरलेले नागपुत्र कसलाही किंतु मनात न बाळगता उच्चै:श्रवा अश्वाच्या पुच्छाला काळ्या केसांचे रूप धारण करून चिकटून बसले. उच्चै:श्रवाचे पुच्छ काळ्या रंगाचे आहे, हे विनताने मान्य केले. विनता कद्रूची दासी झाली.
इकडे, जनमेजयाने महासर्पयज्ञाची चोख सुरक्षा व्यवस्था केली. होमातून धुरांच्या लोळाने नागांचा थरकाप सुरू झाला. लहानमोठ्या सर्व प्रकारचे सर्प जणू अग्नीत उड्या मारून स्वत:च दग्ध होत होते. सर्पांच्या कोलाहलास व्यास नारदादी साक्ष होते. सर्पसत्राला सुरुवात होताच नागेंद्र तक्षकाने इंद्रभवन गाठले. आपण परिक्षिताला कसा दंश केला, त्याची कबुली दिली. वासुकीही कष्टी झाला. माझीही आहुती पडणार, असे भगिनी जरत्कारुला सांगून वासुकीने तिची करुणा भाकली. हे भुजंगाेत्तमे! ज्या कारणासाठी मी तुला जरत्कारु ऋषीला अर्पण केली, तो उद्देश सफल होऊ दे. तुझा पुत्र आस्तिक, हा यज्ञ सफल होऊ देणार नाही, असे वचन देवाने दिलेले आहे. ऋषीकुमार आस्तिकाने हे सारे समजून घेऊन वासुकी मामाला वचन दिले. ‘नागराजा, तू शांत हो. मी आताच जनमेजयाकडे जातो. तुझे भय मी समूळ नष्ट करीन.’
कुमार आस्तिक ब्राह्मणाची वाणी जनमेजयाच्या कानावर येऊ लागली. ‘जनमेजया, इंद्रादी सर्व देव, व्यासादी ऋषी व युधिष्ठिराच्या यज्ञाप्रमाणे तुझा यज्ञही महान कल्याणकारी आहे.’ या स्तुतीने जनमेजय राजा सुखावला. त्याचा अाविर्भाव या लहान ब्राह्मणपुत्राला ‘वर’ देण्याचा होता, हे ऋत्विजांना दिसले. ‘राजा! अजून तक्षकाची आहुती पडायची आहे.’ ही मात्रा लागू पडली. ‘तक्षक माझा हाडवैरी आहे. तक्षक सत्वर येऊन पडेल, असेच मंत्र उच्चारा!’ ‘इंद्रभवनात तक्षक लपून बसलाय’ असे याज्ञिकांनी जनमेजयाला सांगितले. ‘तर मग इंद्रासह तक्षकाला अग्नीमध्ये लोटून द्या.’ यज्ञाच्या होत्याने इंद्राला आव्हान देणारे मंत्र उच्चारताच इंद्राचे आसन गदगदा हलू लागले. होत्याने तक्षकाच्या नावाने आव्हान करताच इंद्र तक्षकासह आकाशात तरंगू लागला. यज्ञकर्त्यांचे भयंकर सामर्थ्य प्रत्यक्ष पाहून इंद्राने तक्षकाला सोडून दिले व आपण इंद्रभवनात पळून गेला. तक्षकाला यज्ञीय ज्वाळांचा स्पर्श जाणवू लागला. आपले मंत्रसामर्थ्य अचाट असून आता तक्षकही भक्ष्यस्थानी पडणार, म्हणून खूश झालेले ऋत्विज म्हणाले, ‘राजा तू आता बालक ब्राह्मणाला वर दे!’
‘तू बाल असूनही सर्वज्ञा(वृद्ध)सारखा सामर्थ्यवान आहेस. तुझी मनोकामना मी पूर्ण करीन. वर माग.’ तक्षक भोवळ येऊन गरगरत यज्ञकुंडाकडेच येत होता. तेवढ्यात तो बालऋषी म्हणाला, ‘जनमेजया! तुझ्या यज्ञाची समाप्ती होऊन नाग यज्ञअग्नीत न पडोत.’ ‘हे विप्रश्रेष्ठा, तू सुवर्ण, धन, धेनू वा अन्य काहीही माग पण यज्ञ खंडित होता कामा नये.’ राजाची विनंती आस्तिकाने मान्य केली नाही. ‘यज्ञ संपून माझ्या मातेच्या कुळाचे रक्षण व्हावे, हाच मला वर हवा आहे.’ आस्तिक आक्रंदून म्हणाला. त्याच्या तेजाने सर्वत्र वीजच चमकली.
यज्ञमंडपातील सर्व वेदवेत्ते एका सुरात म्हणाले, ‘ब्राह्मण बालकाचा वर त्याला प्राप्त होऊ दे.’ आस्तिकाने तक्षकाला वाचवले. जनमेजयाला निर्णय मान्य करावाच लागला. जनमेजयाने आस्तिकाचा सत्कारही केला.
गरुडाने आपल्या भावांसाठी ‘अमृत’ आणून नागांना देण्याचे वचनही पूर्ण केले होते व विनतेची (आईची) दास्यातून मुक्ती झाली होती.
लेखकाचा मोबाइल क्र. - ९८२००७१९७५
बातम्या आणखी आहेत...