आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनर्शोध महाभारताचाः कर्ण सूतनिंदा सहन करतो?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुर्योधनाने ब्रह्मदेवाच्या सारथ्य कर्माची कथा सांगताना, कर्णाचा जन्म सूत कुळातला नाही, असे म्हटले. त्याला त्याने क्षत्रिय कुळात जन्मलेला देवपुत्र म्हटले...
भीष्म व द्रोण हे दोन महावीर कौरवसेनेचे सेनापती होते. पहिले दहा दिवस भीष्म सेनापती व नंतरचे पाच दिवस द्रोण सेनापती. या दोन्ही सेनापतींचा मृत्यू होण्यास द्रुपद-यज्ञसेनाचे पुत्र शिखंडी व धृष्टद्युम्न कारणीभूत झाले. शंकराच्या वरदानाने पहिला औरस (पत्नीला झालेला) व दुसरा अयोनिज (यज्ञातून उत्पन्न झालेला). स्वत: द्रुपद, त्याचे दोन्ही पुत्र, शिखंडी व धृष्टद्युम्नाचे पुत्र अशा तीन पिढ्या युद्धात पांडवांच्या बाजूने लढल्या. असो... द्रोण सेनापती असताना अभिमन्यूने सर्व कौरववीरांचा (एकास एक लढतीत) पराभव केला. त्यात शल्य मामाही होता. शेवटी एकट्या अभिमन्यूला सहा वीरांनी घेरून नि:शस्त्र करून ठार केला. त्यानंतरच्या दिवशी वरील सहा वीरांनी (द्रोण, कृप, कर्ण, अश्वत्थामा, कृतवर्मा, शल्य) प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही कृष्णार्जुनाकडून जयद्रथाचा वध झालाच. कौरववीरांच्या विजयाच्या आशा तेव्हाच संपल्या. द्रोणांचा शिरच्छेद त्यांच्याच शिष्याने (धृष्टद्युम्न) केल्यावर ‘सूतपुत्र’ कर्ण युद्धाच्या सोळाव्या दिवशी सेनापती झाला. भीष्म द्रोणांचा ‘कपटी अडथळा’ आता दूर झाला. कर्णाच्या सेनापतीपदाच्या पहिल्या दिवशीच त्याची बेअब्रू झाली. भीष्म, द्रोण, कृष्णार्जुनापेक्षाही श्रेष्ठ पराक्रमी म्हणून स्वत:ची शेखी मिरवणाऱ्या कर्णाला धृतराष्ट्र पुत्रांचा भीमाच्या हस्ते झालेला प्रचंड नाश पाहावा लागला. कर्णाने दुर्योधनाजवळ कबूल केले की, पहिल्या दिवशी अर्जुनाच्या शस्त्रज्ञानामुळे त्याने आम्हाला चकवून टाकले. पण उद्या तो माझ्या हातून सुटणार नाही. पहिल्या दिवशी आपला पराक्रम सिद्ध करू न शकल्यामुळे कर्णाच्या पराक्रमाबद्दल साशंकता निर्माण झाली. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ अशा परिस्थितीत दुर्योधनाजवळ त्याने स्वत: व अर्जुन यांची तुलना केली. दिव्यास्त्रांच्या बळात समतुल्य, गांडीवाच्या तोडीचे काकणभर अधिकच श्रेष्ठ असे विजय (शंकर-इंद्र-पर्शुराम-कर्ण) धनुष्य माझ्याजवळ आहे. युद्धकौशल्य, बाहुबळ, पराक्रमात मी अर्जुनापेक्षा श्रेष्ठ असल्याचे कर्णाने सांगितले. ‘तर मग हे घोडे पेंड खाते कुठे?’ हा दुर्योधनाच्या मनातला प्रश्न योग्य समजून कर्ण म्हणाला, ‘अर्जुनाच्या धनुष्याची प्रत्यंचा, रथ, भाते, ध्वजावरील वानर, मनोवेगाने धावणारे घोडे या सर्व बाबीत अर्जुन वरचढ असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जगाचा नायक श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथ्य करतो. दुर्योधना! तू बाणांनी भरलेले रथ माझ्या मागे उभे कर.’ ‘बस्स?’ हा दुर्योधनाच्या चेहऱ्यावरचा भाव ओळखून कर्णाने गौप्यस्फोट केलाच. ‘दुर्योधना! कसेही कर, माझ्या रथावर शल्याची सारथी म्हणून नियुक्ती कर.’ त्यानंतर मी सर्व गुणांनी अर्जुनापेक्षा वरचढ होईन. दुर्योधनाने त्वरितच ‘शल्यमहात्म्य’ स्तोत्र गायला सुरुवात केली. शल्य स्थितप्रज्ञासारखा निर्विकार!

दुर्योधनाला पुन्हा शल्यगुणगान करणे भाग पडले. ‘शल्या तू श्रीकृष्णासमान, देवासूर युद्धात महादेव योद्धा धर्नुधर झाला, तेव्हा ब्रह्मदेव सारथी झाला. आज कर्ण अर्जुनाशी युद्ध करणारच, तेव्हा तू कृष्णापेक्षाही श्रेष्ठ असल्यामुळे माझ्या यशासाठी कर्णाचे सारथ्य कर.’ शल्य खूश व्हायच्या ऐवजी भुवया वक्र करून, डोळे फिरवून संतापाने लालबुंद झाला. ‘माझ्या शौर्य, शस्त्रज्ञान, बाहुबल, महान योद्धा म्हणून असलेल्या स्थानाला तुच्छ लेखून तू सूतपुत्र कर्णाची माझ्यापेक्षा श्रेष्ठ म्हणून प्रशंसा करतोस? आता आपल्या सैन्याचे संख्याप्राबल्य अधिक राहिलेले नाही. उरलेले तुझे सैन्य माझ्या ताब्यात दे, मी एकटाच युद्धाचा शेवट करून परत जाईन. माझ्या गदेने पर्वतांचा चुरा होतो. क्रोधाने समुद्र शुष्क होतो. तू माझ्यासारख्या मुर्धाभिषिक्त (राजसिंहासन, राज्याभिषेक, मुकुट, रथ, छत्र चामरयुक्त) राजर्षिकुलोत्पन्न क्षत्रियाला नीच कुळात जन्मलेल्या सूतपुत्राचे सारथ्य करायला सांगतोस?’ ‘सूतपुत्र कर्णासारखे सूत माझ्या सेवेत राबतात. बंदीजनांकडून स्तुती ऐकूनच मला जाग येते. युद्धभूमीत सूतपुत्र कर्णाच्या घोड्यांचे लगाम कधीही मी सांभाळणार नाही.’ तू माझ्याकडून चातुर्वर्ण्य माहात्म्य ऐक. ‘ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हा श्रेष्ठत्वानुसार क्रम आहे. निषिद्ध वर्णसंकराने इतर जाती निर्माण झाल्या. सूत जातीचे लोक ब्राह्मण, क्षत्रिय या उच्चवर्णीयांचे सेवक म्हणून नेमलेले आहेत. क्षत्रियराजा कधी सूतांचा सेवक झाल्याचे ऐकले आहेस का? दुर्योधन व कर्ण यावर सुन्न झाले. युद्ध इथेच संपणार की काय, असा भाव दोघांच्याही चेहऱ्यावर उमटला.

महाभारतात (अनुशासन पर्व) क्षत्रिय पुरुष व ब्राह्मण स्त्री यांच्या संततीला ‘सूत’ असे संबोधले आहे. या संततीला चातुर्वर्ण्याच्या बाहेरच्या अशा स्तोत्रगायन व सारथ्य कर्मावर नियुक्त केले आहे. या जातीतील पुढची पिढीही तेच कर्म करणार. म्हणजे सूताचा पुत्र सूतच राहणार. अशा चर्चा फक्त पुत्रांपुरत्याच मर्यादित असतात. स्त्रीचे मुख्य कर्म अपत्यनिर्मिती. धृतराष्ट्राच्या सेवेतला ‘संजय’ गाल्वगण सूताचाच पुत्र होता. म्हणून संजयही सूत्रपुत्र म्हणून ओळखला जायचा. राधेय, राधासूत, (वैकर्तन) वसुषेण हा अधिरथ-राधा या सूतकुळात वाढवलेला मुलगा ‘सूतपुत्र कर्ण’ म्हणूनच ओळखला जात होता. अधिरथ धृतराष्ट्राचा सारथीच होता. कर्णाला दुर्योधनाने अंगदेशचा राजा म्हणून कितीही गौरवला, तरी त्याच्या सर्व स्त्रिया सूत कुटुंबातल्याच होत्या. कर्णाची एकही स्त्री उच्चवर्णीय नव्हती. ब्राह्मण स्त्री व क्षत्रिय पुरुष यांचा विवाह धर्मसंमत नव्हताच. परंतु धर्मब्राह्म म्हणून त्यापासूनची अपत्ये बहिष्कृतही नव्हती. राजेलोकांच्या मर्जीत, त्यांचे प्रतिष्ठित सेवक, जवळपास वावर असणारी अशी सूत मंडळी. दैत्य वा असुर यांचा ब्राह्मण गुरू शुक्राचार्य. त्यांची कन्या देवयानी. तिने क्षत्रिय राजा ययातीशी विवाह केला (पाणिग्रहण). यांचा पुत्र यदु हा वरील नियमाप्रमाणे सूत ठरायला हवा होता. त्याच यादव वंशातला श्रीकृष्ण. पण श्रीकृष्ण क्षत्रियच समजला गेला, सूत नाही. याचा अर्थ, ब्राह्मण स्त्री व क्षत्रिय पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातल्या पुत्राला सूत म्हटले जायचे. किंवा शुक्राचार्यांच्या काळात सूत ही संज्ञाच नव्हती? यदुचा वंश क्षत्रियच ठरला. श्रीकृष्णाने स्वखुशीने अर्जुनाचे सारथ्य केले, म्हणजे सूताचेच कर्म केले. असो.

दुर्योधनाने शल्यमहात्म्य स्तोत्रानंतर त्याच्यापुढे नतमस्तक होऊन हातच जोडले. ‘शल्या! तुझे सत्यवचनी आर्तायनी कूळ विश्वविख्यात आहे. कर्ण व मी तुझ्यापेक्षा स्वत:ला बलवान समजतच नाही. मी कर्णाला अर्जुनापेक्षा सरस व तुला कृष्णापेक्षाही श्रेष्ठ मानतो. कर्ण अर्जुनापेक्षा फक्त अस्त्रज्ञानात श्रेष्ठ आहे. पण तू कृष्णापेक्षा अश्वज्ञान व सामर्थ्याने श्रेष्ठ आहेस.’ दुर्योधनाने पुन्हा एकदा ब्रह्मदेवाच्या सारथ्यकर्माची कथा रंगवून सांगितली. ‘शल्या तू अर्जुन, कर्ण, श्रीकृष्ण या तिघांहून श्रेष्ठ आहेस. भृगुनंदन पर्शुरामाने कर्णाच्या गुणांमुळेच त्याला धनुर्वेदाचे दान दिले व देवांची दिव्यास्त्रेही दिली. कर्णाचा जन्म सूत कुळातला आहे, हे मी मान्य करीत नाही. मी याला क्षत्रिय कुळात जन्मलेला देवपुत्र समजतो. (पण क्षत्रिय कन्या कधीच दिली नाही!) त्याच्या आईने स्वत:चे रहस्य लपवून (सूर्य वा कुंतीचा उल्लेख टाळतो.) सूत कुळात सोडून दिले. महारथी, महाबाहू, ‘सूर्यासारखा’ तेजस्वी, कवचकुंडलांनी विभूषित कर्णासारख्या पुत्राला सूत जातीची स्त्री कधीतरी जन्माला घालू शकेल का? कर्ण नीचकुळात जन्मलेलाच नाही. बिचारी हरिणी आपल्या उदरातून वाघाला कधी तरी जन्माला घालील का?’ ही सर्व कर्णस्तुती कर्णादेखत सुरू होती. त्याला सूत निंदेचा अजिबात राग आलेला नाही. उलट तो सुखावला होता, हे आज कर्णाच्या व्यक्तित्वाचे जातीय विश्लेषण करणाऱ्यांनी लक्षात ठेवायला हवे. शल्याने मध्येच विचारले, ‘कर्णाने अर्जुनाचा वध केल्यावर त्या रथात कृष्णाची शंख, चक्र, गदा, शार्ङग धनुष्य इ. सर्व आयुधे राहतीलच. या आयुधांनी लढला तर तुझा कोणता वीर टिकेल? तुझ्या संपूर्ण सेनेचे एकटा श्रीकृष्ण भस्म करील.’ दुर्योधन पुन्हा हात जोडून म्हणाला, ‘तू कर्णाचा अवमान करू नकोस. तुला माझ्या सेनेचे कृष्णाप्रमाणेच संरक्षण करायचे आहे.’ शल्य प्रसन्न झाला. सारथ्य मान्य करून त्याने एक अट घातली. ‘युद्धकाळात माझ्या मनात येईल, ते ते मी बोलेन.’ दुर्योधनाने कर्णाला सर्व कुंतीपुत्रांना मारून टाक, अशी आज्ञा दिली. सूत प्रकरणातून स्वत:ची सुटका करून कर्णाला युद्धार्थ प्रवृत्त केले. आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या.
लेखकाचा मोबाइल क्र. - ९८२००७१९७५
लेखक महाभारताच्या व्यासंगामुळे पुण्यातील ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर’च्या नियामक मंडळावर (२०११-१४) सदस्य
म्हणून निवडून आले. या लेखमालेसाठी भांडारकरी संशोधित प्रतीसह अन्य ग्रंथांचा
आधार घेतलेला आहे.

दिव्यास्त्रांच्या बळात समतुल्य, गांडीवाच्या तोडीचे काकणभर अधिकच श्रेष्ठ असे विजय धनुष्य माझ्याजवळ आहे. युद्धकौशल्य, बाहुबळ, पराक्रमात मी अर्जुनापेक्षा श्रेष्ठ असल्याचे कर्णाने सांगितले. तर मग हे घोडे पेंड खाते कुठे?
patwardhanraja@hotmail.com
बातम्या आणखी आहेत...