आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनर्शोध महाभारताचा: परिक्षिताला शाप शृंगीचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शमिक मुनी. त्याचा पुत्र श्रृंगी. त्याने परिक्षिताला उद्देशून शापवाणी उच्चारली - जलाल विष असलेला ‘नागराज-तक्षक’ तुला दंश करून यमाच्या घरी नेईल...

धाैम्य ऋषी युधिष्ठिराचे पुरोहित. त्यांचा शिष्य वेद. या वेदाने गुरुगृही बैलाप्रमाणे राबराब राबून धौम्य ऋषींची मर्जी संपादन केली. धौम्य ऋषींच्या कृपेने वेद सर्वज्ञ झाल्यानंतर जनमेजय राजाचा पुरोहित झाला. उत्तंक नावाच्या वेदशिष्याने वेदगुरुंची मर्जी संपादन केली. उत्तंकाला वेद ऋषींना गुरुदक्षिणा द्यायची होती. गुरुपत्नी उत्तंकाला म्हणाली, "आजपासून चौथ्या दिवशी माझ्या पुण्यक व्रताचे उद्यापन आहे. पौष्य राजपत्नीच्या कानातली कुंडले घालून मला ब्राह्मणभोजन घालायचे आहे. मला ती कुंडले गुरुदक्षिणा म्हणून आणून दे. तुझे कल्याण होईल.' पौष्य राजा हा जनमेजयाचा सहाध्यायी, म्हणजे वेद ऋषींचाही, शिष्यच. उत्तंकाने पौष्य राजाकडे प्रयाण केले. "पौष्य राजाचे कल्याण असो! राजा, मी आपल्यासमोर याचक म्हणून उपस्थित आहे. मला, तुझ्या पट्टराणीच्या कानातील कुंडले गुरु वेदऋषींच्या पत्नीसाठी गुरुदक्षिणा म्हणून हवी आहेत.' "हे वेदशिष्य उत्तंका! शूचिर्भूत होऊन तू अंत:पुरात राणीचे दर्शन घे.' "भगवन‌्! तुमचे स्वागत आहे. आपली आज्ञा शिरसावंद्य आहे.' सत्पात्री दान म्हणून राणीने कानातली कुंडले उत्तंकाच्या स्वाधीन केली. "हे उत्तंक ब्राह्मणा, पूर्वीच्या खांडववनाचा, राजा तक्षक याच कुंडलांसाठी तळमळत असतो. तू सावधान राहा.'

"देवी, त्या तक्षकाची मला भीती वाटत नाही.' उत्तंक त्वरेने निघाला. वाटेत एक नग्नक्षपणक (जैनमुनी?) आपल्याच रोखाने येताना त्याला दिसायचा व तो अदृश्यही व्हायचा. उत्तंकाने पाणी शोधण्यासाठी कुंडले जमिनीवर ठेवली, तेवढ्यात नग्नक्षपणकाने ती पळवली. जलाने देहशुद्ध करून उत्तंकाने क्षपणकाचा पाठलाग केला. उत्तंकाने क्षपणकाला पकडल्याबरोबर त्याने तक्षकाचे रूप धारण करून बिळात प्रवेश केला. उत्तंकाने बिळात घुसण्याचा निरर्थक प्रयत्न केला, तेव्हा इंद्राने उत्तंकाच्या कार्यार्थ थेट वज्र धाडले. ‘वज्रा! जा ब्राह्मणाच्या मदतीला उपस्थित राहा.’ वज्रधारी उत्तंक विवरात शिरला. नागलोकात पोहोचल्यावर उत्तंकाने ऐरावत नागाची स्तुती करून सर्व नागांना वंदन केले. कुरुक्षेत्रात खांडववनात ज्याचा एकेकाळी निवास होता, त्या नागराज तक्षकाने माझी कुंडले द्यावीत, अशी प्रार्थना केली. ज्येष्ठ नागांची स्तुती केल्यानंतरही कुंडले मिळाली नाहीत. उत्तंकाने जगदीश्वराचा जयजयकार सुरू केला. ‘उत्तंका! तुझी कोणती इच्छा पूर्ण करू?’ असा अशरिरी आवाज घुमला (आकाशवाणी). ‘नाग माझे अंकित व्हावेत.’ अग्नीज्वालेने परिसर होरपळू लागल्यावर तक्षक गडबडला. भयभीत होऊन त्याने चोरलेली कुंडले उत्तंकाला दिली. उत्तंक अजून आला नाही म्हणून गुरुपत्नी शाप देण्याच्या विचारात असतानाच उत्तंकाने अभिवादन करून पौष्य राणीची कुंडले गुरुपत्नीला अर्पण केली. ‘तू यशस्वी हो’ गुरुपत्नीने आशीर्वाद दिला. उपाध्याय वेदाने "इंद्र माझा मित्र असल्यानेच त्याने तुझ्यावर अनुग्रह केला. उत्तंका, आता तू आपला घरी जा. तुझे कल्याण असो.’ असा आशीर्वाद दिला.

तक्षकाबद्दलचा राग उत्तंकाला बेचैन करीत होता. त्याने थेट हस्तिनापूरला जनमेजयाची भेट घेतली. ‘राजा जनमेजया! जे कार्य त्वरेने हाती घ्यायचे ते सोडून तू भलत्याच अकार्यास उद्युक्त झाला आहेस.’ जनमेजयाने उत्तंकाची यथायोग्य पूजा करून "मी प्रजापालनाच्याच कार्यात मग्न आहे, आपले कोणते कार्य मी करावे?’ असे विचारले. पुण्यशील ब्राह्मणांमध्ये अग्रगण्य उत्तंक म्हणाला, ‘ज्या तक्षक नागाने तुझ्या पित्याचा बळी घेतला, त्या दुष्ट नागाचा तू सूड घेऊन उचित कर्तव्य पार पाड. आपल्या थोर पित्याच्या वधाचा बदला घेणे, हाच क्षत्रिय धर्म आहे. त्या पापी तक्षकाने तुझ्या पित्याला दंश करून मारून टाकले. इतकेच नव्हे तर विषदंशावरचे उत्तम औषध घेऊन येणाऱ्या काश्यपमुनींना भरपूर धन देऊन माघारी फिरवले. हे लक्षात घेता ‘सर्पसत्र’ सुरू करून अग्निज्वालेत तक्षकाची प्राणाहुती पडू दे. तू सर्पसत्राला प्रारंभ कर. हा सूड घेऊनच तू पितृऋणातून मुक्त हो.’ जनमेजय राजा तक्षकावर संतापला. जणू यज्ञज्वालाच त्याच्या मुखावर दिसू लागल्या. ‘माझ्या पित्याचा मृत्यू कसा झाला? अमात्यांनो, मला सांगा.’ तक्षकाच्या विषाने आपल्या पित्याचा मृत्यू झाला, हे उत्तंकाकडून प्रथमच समजल्याने जनमेजय दु:खी व दीनवाणाही झाला.

श्रीकृष्णकृपेने जिवंत झालेला अभिमन्यू पुत्र परिक्षित राजा, हा पांडवांचा एकमेव जिवंत वंशज होता. त्याला पितामह पांडुराजाप्रमाणे मृगयेची विलक्षण आवड होती. मृगयेचा आनंद लुटणाऱ्या या परिक्षिताने एका हरिणाला बाणाने विद्ध करूनही हरीण निसटला. राजाने कोसोदूर पाठलाग करूनही, हरीण अदृश्यच झाला. राजा धावून धावून दमला. तहानेने व्याकूळ झाला. एका गोठ्यात गायीचे वासरू दुग्धपान करीत असताना, त्याच्या तोंडातून येणारा फेस एक ऋषी यथेच्छ पिताना त्याला दिसला. हाच ऋषीचा आहार. श्रमलेला परिक्षित राजा उग्रव्रताचरणी मुनीला म्हणाला, ‘मुने, मी अभिमन्यूपुत्र हस्तिनापूरचा राजा परिक्षित आहे. जखमी झालेला मृग माझ्या तावडीतून निसटला आहे. आपल्या दृष्टीस पडला का? मौनव्रती मुनीने काहीही उत्तर दिले नाही. राजाच्या प्रश्नालाही उत्तर नाही? परिक्षिताचा क्रोध उफाळला. धनुष्याच्या टोकाने मेलेला सर्प ऋषीच्या गळा खांद्यावर टाकूनही मुनी गप्पच राहिला? परिक्षित क्षुब्ध मनाने घरी परतला. या ऋषीचे नाव शमिक. त्याचा तेजस्वी पुत्र शृंगी. शृंगी हा धेनूपुत्र होता. शमिकाच्या गळ्यात माळेसारखा मेलेला सर्प आहे, हे शृंगीच्या सहाध्यायी कृशाने शृंगीला दाखवून त्यांची थट्टा केली. ‘शृंगी तुझ्या पित्याच्या गळ्यात मेलेला सर्प दिसतोय. तुझा तो गर्व व अहंकार कुठे केला?' संतापलेल्या शृंगीला कृशाने सर्व हकिगत सांगितली. तुझा पिता निश्चल ध्यानस्थ बसलेला आहे. पाहा!
शमिकपुत्र शृंगी ब्रह्मदेवाची नित्य आराधना करीत असे. तो मनोनिग्रही, तेजस्वी, महाकोपिष्ट होता. ‘परिक्षिता! माझ्या पित्याची विटंबना करून तू कुरुवंशाला लांच्छन लागणारे कृत्य केले आहेस. ब्राह्मणांची अवहेलना करणाऱ्या तुझ्यासारख्या पातक्याला जलाल विष असलेला ‘नागराज-तक्षक’ माझ्या शापप्रभावामुळे, आजपासून सात दिवसांनी दंश करून यमाच्या घरी नेईल.’
शमिकाचे मौन सुटल्यावर शृंगीच्या शापवाणीची त्याला कल्पना आली. ‘तपस्वी पुरुषांनी अशी शापवाणी उच्चारून आपले तप:सामर्थ्य नष्ट करू नये, अशी पुत्राला समज दिली. राजा कसाही वागला, तरी ऋषीने त्याला क्षमा करायला हवी. तो प्रजापालन करतो. राजाच्या रक्षणामुळेच तपस्वी जगतात. परिक्षित पांडुप्रमाणेच न्यायाने राज्य करतोय. तो दमलेला, भागलेला होता व माझ्या मौनाची त्याला कल्पना नसावी. वत्सा! तुझा अपार प्रभाव मी जाणतो. तुझा शाप मिथ्या ठरणार नाही. परंतु मी शिष्य गौरमुखी करवी परिक्षिताला तुझ्या शापाची कल्पना देण्यासाठी पाठवतोय.
या दारुण शापाची वार्ता सर्वत्र पसरली. परिक्षिताने एकखांबी प्रासाद बनवून घेतला. कुशल वैद्यांची योजना केली. मंत्र विद्या जाणणारे, विविध औषधींचे साठे, सर्व आपत्तीत उपयुक्त अशी यंत्रणा सज्ज झाली. राजासाठी संरक्षक दलच स्थापन झाले. सातव्या दिवशी सर्पदंशावर जालीम औषधोपचार करणारा एक प्रज्ञावंत काश्यप ब्राह्मण धनाचा इच्छेने राजाच्या भेटीला निघाला. तक्षकाने स्वत: वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन, त्या काश्यपाला गाठले. राजा जेवढे धन देईल त्यापेक्षा मी अधिक धन तुला आत्ताच देतो, असे म्हणून ‘मीच तक्षक आहे’ हेही कबूल केले. लोभी ब्राह्मण धनवान होऊन परतला. जाण्यापूर्वी त्या ब्राह्मणाने तक्षकाच्या विषाने पेटून भस्म झालेल्या वटवृक्षाला पालवी फुटून तो पूर्ववत जिवंत करून दाखवला! भुजंगांनी तपस्वी ब्राह्मणांचे रूप घेतले. फळे व दर्भोदक हाती घेऊन राजाला अर्पण करायला गेले. राजानेही त्या वस्तूंचा स्वीकार केला. तापस परत गेले. राजाने मधुर फळे खाल्ली. शृंगीच्या कृपेने तक्षक अळीचे रूप घेऊन फळात लपला. ‘हा कृमी आता मला तक्षक होऊन डसला तरी चालेल, कारण मी शमिकाचा अपराधी आहे.' लगेच तक्षक कडाडून डसलाच. शृंगीच्या शापाने परिक्षित मृत्यू पावला. तक्षक आकाशात झेप घेऊन अदृश्य झाला.

लेखकाचा मोबाइल क्र. - ९८२००७१९७५
बातम्या आणखी आहेत...