आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मामा विरोधी पक्षाला का मिळाला?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व उपनिषदांचे सत्त्व-सार म्हणजे गीता. कुरुक्षेत्रावर हे गीतामृत गोपाळकृष्णाने बुद्धिमान अर्जुनाला पाजून त्याला युद्धार्थ सज्ज केले. संपूर्ण आसमंत शंखध्वनीने दुमदुमला. हा संहार पाहण्यासाठी देव, गंधर्व, ऋषीमुनी, सिद्ध व चारण जमा होतात न होतात तोच, धर्मराजा कवच उतरवून धनुष्य फेकून रथातून हात जोडूनच उतरला. अर्जुनाला वाटले, आता गीतामृत पिण्याची पाळी युधिष्ठिराची. मौन धारण केलेला राजा शत्रूसेनेच्या सेनापती भीष्माकडे नतमस्तक होऊन निघालेला पाहून, कृष्ण सोबत असलेल्या पांडवांना म्हणाला, ‘प्राचीन शास्त्रानुसार, विजयासाठी वडीलधाऱ्यांच्या संमतीची व आशीर्वादाची गरज असते. भीष्म, द्रोण, कृपाचार्य आणि शल्य यांच्या पायावर धर्मराजा मस्तक ठेवील. त्यांचा आशीर्वाद घेऊनच युद्धाला सुरुवात करील.’ त्याप्रमाणेच घडले. चारही ज्येष्ठांनी त्याला ‘विजयी भव’ असा आशीर्वाद दिला. त्याचप्रमाणे कौरवांच्या उपकाराचे ओझे व खाल्लेल्या अन्नामुळे आम्ही त्यांचे दासच झालो आहोत, असे भीष्म, द्रोण, कृपाचार्य यांनी मान्य करून तिघांनीही आपण षंढासारखे वागत आहोत, हेही कबूल केले. शल्याला धर्मराजाने प्रदक्षिणाच घातली. त्यानेही प्रत्यक्ष राजाश्रयाखाली नसताना ‘अर्थस्य पुरुषो दास:’ मंत्र उच्चारून स्वत:चा षंढ असाच उल्लेख केला. धर्मराजाने भीष्म व द्रोणांना त्यांच्यावर विजय मिळवण्याचा मार्गही विचारला. कृपाचार्यांना युद्धात कुणीच मारू शकणार नव्हता. (चिरंजीव) शल्याला पूर्वी ठरल्याप्रमाणे ‘कर्णाचा तेजोभंग’ करण्याची पुन्हा आठवण करून दिल्यावर ‘धर्मराजा तुझी इच्छा पूर्ण होईल’, असे वचन शल्याकडून मिळवून धर्मराजा परतला. त्यानंतर महाभारतातील कौरव-पांडव युद्धाला सुरुवात झाली.

नमनाला घडाभर तेल घालण्याचे कारण शल्य राजा. तो नकुल, सहदेव या पांडुपुत्रांचा सख्खा मामा होता. युद्धासाठी आमंत्रण घेऊन युधिष्ठिराचा दूत शल्याकडे जाऊनही शल्य कौरवपक्षात सामील झाला. शल्य हा मद्रदेशाचा राजा. पांडुच्या द्वितीय पत्नी माद्रीचा हा भाऊ. भीष्माने रक्षण केलेल्या हस्तिनापूरचा पांडुराजा सम्राटच होता. शल्यराजाकडे पांडुराजाच्या दुसऱ्या पत्नीसाठी मागणी घालण्याकरिता स्वत: भीष्म मद्रदेशी गेला. आंधळ्या धृतराष्ट्रासाठी गांधारकन्येला हस्तिनापूरची सून बनवणाऱ्या भीष्माला नकार ऐकायची सवय नव्हती. भीष्माने काशीराजाच्या तीन कन्यांना भर स्वयंवरातून पळवून आणले होते. मद्रराज शल्याने माद्रीसाठी पांडुराजा योग्य वर असल्याचे मान्य करताना कुलपरंपरेप्रमाणे कन्याशुल्क देण्याची मागणी केली. श्रीकृष्णाने या परंपरेवर ‘कन्या विक्रय’ असा शिक्का मारलेला आहे. मद्रदेश म्हणजे भारताच्या पश्चिमवायव्य दिशेकडचा लाहोर (आता पाकिस्तानात) ते जम्मूकडचा पर्वतीय डोंगराळ प्रदेश.

त्या प्रदेशाच्या विवाहपरंपरांची भीष्माला माहिती होतीच. भीष्माने त्या परंपरेचे तोंडदेखले गुणगान करून हत्तीवरून आणलेला खजिना शल्याच्या स्वाधीन केला. भीष्म पानसुपारी देऊन कन्या घेऊन जाणारा गरीब ब्राह्मण नव्हता. मिळालेल्या कन्या शुल्काने मद्रराजा वाकून गेला. ही नम्रता कायमची राहिली. शल्यराजाने माद्रीचे सालंकृत कन्यादान केले. तुलनेने पहाडी प्रदेशातली गरीब राजकन्या समृद्ध हस्तिनापूरची सून झाली. कुंतीला सुस्वरूप तरुण कनिष्ठ सवत मिळाली. कौरव-पांडवांच्या मालमत्ता, संपत्तीवरून झालेल्या लढाईत मद्रदेश व सलगची सर्व राज्ये कौरवपक्षात सामील झाली. त्यामुळे एकट्या मद्रदेशाला मामाच्या नात्याने पांडवांकडून लढणे, राजकीयदृष्ट्याही कठीण होते.

कुंतीचे पुत्र हे वयानेही व वारसाहक्कानेही हस्तिनापूरचे दावेदार राजे होते. युद्धप्रसंगी नकुल-सहदेवांची माता माद्री जिवंतही नव्हती. माद्री पांडुराजाच्या मृत्यूनंतर सती गेली होती. महाभारत कथेत शल्य राजा पांडवांकडे येण्यासाठी अक्षौहिणी सैन्यासह निघाला असता दुर्योधनाने कपटपूर्वक त्याचे राजेशाही थाटाने वाटेतच स्वागत केले. कन्याशुल्काची आठवणही शल्याच्या मनात असणारच. जोरदार स्वागताने शल्य बेहद्द खूश होऊन ‘वर’ देण्यासाठी आतुर झालेला असताना दुर्योधन शल्यापुढे हात जोडून सामोरा आला. ‘इष्ट तो वर माग’ हे शल्याचे शब्द बाहेर पडताच, ‘तू माझ्या सैन्याचा सेनापती हो, हाच वर मी मागत आहे.’ दुर्योधनाच्या प्रस्तावाला शल्य ‘तथास्तु’ म्हणाला, व लगेच धर्मराजाच्या शिबिराकडे निघाला. शल्यराजाचे स्वागत आख्यान ऐकल्यावर न चिडता वा न रागावता लोकव्यवहार जाणून धर्मराजा म्हणाला, ‘हे शल्यराजा! अकार्य असले तरी आम्हा भाच्यांच्या हितार्थ एक काम कर. कर्ण-अर्जुन यांच्यात अपरिहार्य असलेल्या द्वैरथी युद्धात तुलाच सारथ्य करावे लागेल. कौरवांकडे कृष्णाच्या तोडीचा तुझ्याशिवाय दुसरा सारथीच नाही. तू म्हणतोस तसे, माझे कल्याण चिंतित असल्यास अर्जुनाच्या संरक्षणासाठी सूतपुत्र कर्णाचा ‘तेजोभंग’ करावास. म्हणजे आम्ही कर्णावर विजय मिळवू.’ ही मंथना शल्याला पसंत पडली. ‘सूतपुत्र कर्णाला प्रतिकूल व अहितकारक ठरेल अशी वचने बोलून मी त्याचा तेजोभंग करीन. हे माझे सत्यवचन आहे.’ शल्याने धर्मराजाला समयोचित अशा काही कथा सांगून धर्मराजाच्या पूजेचाही स्वीकार केला. धर्मराजाने ‘तू अर्जुनाची प्रशंसा करून कर्णाचा तेजोभंग कर.’ हा मंत्र पुन्हा ऐकवला. ‘तसेच होईल’, असे म्हणून शल्य दुर्योधनाकडे परत गेला.

महाभारतात मद्रदेशी शल्याच्या पराक्रम कथांचा फार उल्लेख नाही. अज्ञातवासात असताना विराट राजाचा सेनापती कीचक द्रौपदीचा अभिलाष करतो. भीम द्रौपदीच्या सन्मानासाठी त्याचा चेंदामेंदा करतो. द्रौपदी सैरंध्रीच्या रूपात राणीच्या सेवेत असते. मला पाच गंधर्व पती आहेत, असे सर्वांना सांगते. कीचक वधाची बातमी दुर्योधन ऐकतो. तेव्हा ‘हे कृत्य भीमाने तर केले नसेल? शल्याशिवाय हा पराक्रम कोण करू शकेल?' असेही म्हणतो. एवढाच शल्याचा संदर्भ आहे. युद्धात स्वत:च्या एक अक्षौहिणी सेनेचा तो प्रमुख आहे. अकरांपैकी एक. भगवद््गीतेत (पहिलाच अध्याय) द्रोण, भीष्म, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण व भूरिश्रवा यांचा कौरवांचे श्रेष्ठ सेनाप्रमुख म्हणून उल्लेख आहे, यात शल्य नाही. ‘तुम्ही एकेकटे पांडवसेनेचा किती दिवसात नाश कराल?’ कृप, भीष्म, द्रोण, अश्वत्थामा व कर्ण यांनाच दुर्योधनाचा हा प्रश्न होता. कृपाने दोन महिने, भीष्म-द्रोणांनी एक महिना, अश्वत्थाम्याने दहा दिवस, कर्णाने फक्त पाच दिवसात, असे उत्तर दिले. संपूर्ण कौरव सेनेचा सेनापती करण्याचे आश्वासन मिळालेल्या शल्याला दुर्योधनाने हा प्रश्नही विचारला नाही! महाभारत युद्धात शल्याची अभिमन्यूशी एकदा गाठ पडली. शल्याने भिरकावलेली शक्ती हवेतच पकडून अभिमन्यूने उलटी फेकून शल्याच्या सारथ्याला ठार केले. क्रुद्ध शल्य गदा घेऊन कुमार अभिमन्यूकडे चालून येताना पाहिल्यावर भीमाने गदाप्रहाराने त्याला मूर्च्छित केला. पांडवांचा मामा आमच्या पक्षातून लढतो, असा टेंभा मिरवणे इतकेच याचे महत्त्व? मग शल्य चिकित्सा का? तर कर्ण सेनापती झाल्यावर शल्याने त्याचे सारथ्य करावे, अशी दुर्योधनाने मनधरणी केल्यानंतर शल्य अखेर कबूल झाला. कर्णाचा तेजोभंग करण्याचे त्याने युधिष्ठिराला वचन दिले होते. हा तेजोभंग समाजशास्त्रदृष्ट्या महत्त्वाचा आहे. कारण हा एका सूत जातीच्या योद्ध्याचा क्षत्रियाने केलेला तेजोभंग होता.
(क्रमश:)

राजा पटवर्धन
patwardhanraja@hotmail.com
लेखकाचा मोबाइल क्र. - ९८२००७१९७५
बातम्या आणखी आहेत...