आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...आणि मयसभेत नारद अवतीर्ण झाला !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मयाला अर्जुनाने दिलेल्या जीवदानाची परतफेड करायची होती. कृष्णाच्या आज्ञेप्रमाणे मयाने युधिष्ठिरासाठी सभेचा आराखडा बनविला. मयाने बांधलेली सभा रत्नखचित, तेजस्वी, सुंदर आणि दिव्य होती. संपूर्ण पृथ्वीवर अशी सभा नव्हती. मयाने अापले सारे कौशल्य पुष्करिणी निर्मितीत वापरले.

खांडववनात अग्नीचे थैमान सुरू होते. स्वत: वज्रधारी इंद्र, देवगण व असुरांनाही कृष्णार्जुनांना जिंकता आले नाही. अग्नी अधिकाधिक प्रज्वलित होऊन मनसोक्तपणे चरबीचे प्राशन करीत होता. रणभूमीकडे पाठ फिरवण्यावाचून गत्यंतर नाही, हे इंद्राला उमजले होते. तेवढ्यात आकाशवाणी झाली, ‘कृष्णार्जुनांना युद्धात पराभूत करण्यास इंद्रा तू समर्थ नाहीस. खांडववनाचा समूळ नाश हे विधिलिखित आहे.’ इंद्र स्वर्गाकडे निघून गेला. इंद्राचे भयच नष्ट झाल्यामुळे अग्नी पंधरा दिवस खांडववन जाळीत होता. या प्रदिप्त वणव्यातून नागअश्वसेन, मयासुर आणि चार शांर्गक पक्षी असे एकूण केवळ सहा जीव वाचले. (या शांर्गक पक्ष्यांची एक विलक्षण कथा महाभारतात आहे) अग्नी पूर्ण तृप्त झाल्यावर कृष्ण, अर्जुन व मयाने अग्नीला प्रदक्षिणा घातली. तिघे जण नदीतीरावर जाऊन बसले.
मयाला अर्जुनाने दिलेल्या जीवदानाची परतफेड करायची होती. ‘हे मया! अखिल जगतात कुणालाही अनुकरण करता येणार नाही, अशी सभा तू युधिष्ठिरासाठी तयार कर, म्हणजे अर्जुनाच्या जीवदानाची फेड होईल.’ कृष्णाची आज्ञा मयाने आनंदाने स्वीकारली. मयाने सभेचा आराखडा बनविला.

मयाने थेट कैलासपर्वतापलीकडच्या मैनार्क पर्वतावर असलेले बिंदुसरस सरोवर गाठले. वृषपर्व दानवाची गदा व ‘देवदत्त’ नावाचा वरुणाचा शंख त्याच सरोवरात होता. लाखोंच्या तोडीची गदा भीमाला मिळाली व तो शंख मयाने अर्जुनाला दिला. मयाने राक्षसांचे विपुल धन व रत्ने ताब्यात घेऊन स्फटिकांचे कोठारच धर्मराजासाठी इंद्रप्रस्थात आणले. मयाने बांधलेली सभा रत्नखचित, तेजस्वी, सुंदर आणि दिव्य होती. संपूर्ण पृथ्वीवर अशी सभा नव्हती. अपार धनाचा व्यय होऊन परममंगल, आश्चर्यकारक, कलाकौशल्याची परिसीमा असलेली सभा मयाने बांधून पूर्ण केली. किंकर सभेची देखरेख करीत असत. मयाने अापले सारे कौशल्य पुष्करिणी निर्मितीत वापरले. रत्नांच्या कांतीने पुष्करिणी नितळ दिसायची. ती पाण्याने भरलेली असेल, असे कुणालाही भासत नसे. दृग‌्भ्रमामुळे माणसे त्यात पडत. परिसर सुगंधाने दरवळत असे. चौदा महिन्यांनी मयाने काम पूर्ण केल्यावर धर्मराजाला तसे कळविले. धर्मराजाने आनंदाप्रित्यर्थ तूप, मध, रुचिर फळे यांची रेलचेल असलेल्या खाद्यपदार्थांबरोबर वराह (डुक्कर) व हरिण यांचे मांसही समाविष्ट करून दशसहस्र ब्राह्मणांना भोजन घातले. ब्राह्मण मांसाहारीही होते! ब्राह्मणांना कोरी वस्त्रे व धेनूही अर्पण केल्या. (सभापर्व : अध्याय ४) मयासुरनिर्मित ही अद्वितीय सभा पाहण्यासाठी कृष्णद्वैपायन त्यांच्या शुक (पुत्र), समंतु, जैमिनी, पैल आणि वैशंपायन शिष्यांसह आले. आश्चर्याची गोष्ट अशी की, वेदउपनिषदवेत्ता, इतिहास पुराणांचा ज्ञाता, धर्मज्ञ, न्याय विशारद, प्रगल्भ वक्ता, तीव्र स्मृतीने युक्त, नीतिकुशल, बृहस्पतीला प्रत्युत्तर देणारा, धर्म-अर्थ-काम तिन्ही पुरुषार्थ ज्ञानी, सुर-असुरांचा कलह लावून देणारा युद्धशास्त्राबरोबर गांधर्व वेदात रस घेणारा महातेजस्वी देवर्षी नारद मनोवेगाने मयसभा पाहण्यासाठी आला. नारदाने युधिष्ठिराचा जयजयकार करून आशीर्वाद दिला. युधिष्ठिराने भावांसमवेत नम्रतेने, प्रेमाने नारदाला अभिवादन केले. धेनू, मधुपर्क अर्पण करून त्याची पूजा केली.

‘एक द्रौपदी पाच पांडवांची पत्नी’ हा सार्वत्रिक कुजबुजीचा विषय होता. द्रौपदीच्या सहवासावरून पाचांची एकी भंगू नये, म्हणून नारदाने तिलोत्तमेसाठी नाश पावलेल्या सुंदोपसुंदाची कथा पांडवांना ऐकवली. द्रौपदीच्या सहवास वाटपाचे गणित मांडून नारदाने हा तिढा सोडविला. द्रौपदी ही बंधुकलहाचा केंद्रबिंदू न होता ऐक्याचे प्रतीक झाली!

नारदाने राज्याच्या सर्व घडामोडी तपशिलात जाऊन विचारल्या. थोडक्यात, सर्व खात्यांचे त्याने ‘ऑडीट’ केले. ‘युधिष्ठिरा, हावरट, लोभी, तुझ्याविषयी वैरभाव असणारे, व्यवहारशून्य, अप्रगल्भ तुझ्या चाकरीत नाहीत ना? आणि सर्वात महत्त्वाचे, ‘युधिष्ठिरा! तुझ्या राज्यातले शेतकरी संतुष्ट आहेत ना? तुझ्या राज्यातील विविध भागात सातत्याने काठोकाठ भरलेले विस्तीर्ण तलाव भरपूर आहेत ना? आणि शेती सर्वस्वी पावसावर अवलंबून नाही ना? शेतकरी उपाशी राहात नाहीत ना? पेरणीसाठी आवश्यक बियाण्यांचा तुटवडा पडत नाही ना? जरुरीएवढे कर्ज दरवर्षी बारा टक्के व्याजाने तू मोकळ्या हाताने देतोस ना? युधिष्ठिरा! तुझ्या राज्यात शेती, व्यापार, पशुपालन, आणि अर्थपुरवठा (सावकारी) हे चार व्यवसाय योग्य तऱ्हेने चालतात ना? प्रजेचे सुख-समाधान या चार व्यवसायांच्या यशस्वीतेमुळे होत असते. खासकरून तुझ्या राज्यातील स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दल तू दक्ष असतोस ना? त्याचप्रमाणे अंध, मूक, पंगू, अनाथ, अपंग, संन्याशांचा तू पित्याप्रमाणे सांभाळ करतोस ना? (सभापर्व अध्याय-५) सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीचे हे मार्गदर्शन, आजच्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे नाही का?

या उपदेशानंतर युधिष्ठिराने नारदाच्या चरणांना वंदन केले. ‘आपण केलेले मार्गदर्शन मी सतत लक्षात ठेवून राज्यकारभार करीन. आज माझी प्रज्ञा खऱ्या अर्थाने समृद्ध झाली.’ पण प्रश्न न विचारेल तर तो युधिष्ठिर कसला? ‘नारदमुने! तुमचा त्रिभुवन संचार सुरू असतो. माझ्या मयसभेसारखी किंवा त्याहूनही दर्शनीय अशी सभा आपण कुठे पाहिली आहे का?’ ‘हे भरतकुलोत्पन्न धर्मराजा! तुझ्या रत्नजडित सभेसारखी सभा मर्त्यलोकात (पृथ्वीवर) कुठेही अन्यत्र नाही. नारदाने यम, कुबेर, वरुण, इंद्र आणि ब्रह्मदेवाच्याही सभांची रसभरीत वर्णने केली. या सर्व सभा विश्वकर्म्यानेच निर्माण केल्या होत्या. या देवलोकात त्या त्या देवांसमवेत कोण कोण बसतात? याबद्दल युधिष्ठाराच्या मनात जिज्ञासा होती. प्रत्येक सभेचे नारदाने लांबी, रुंदी, क्षेत्रफळासह वर्णन केले. ‘इंद्र नेहमी पत्नी शचिसह बहुमोल आसनावर असतो. मरुद‌्गण, देवर्षी, देवगण इ. इंद्राची परिचर्या करतात. पराशर, दुर्वास, करालदंत इ. असंख्य ऋषीही इंद्राची परिचर्या करतात.’ या यादीत राजा हरिश्चंद्र हा एकच राजा होता. ‘अर्थात इंद्राच्या मनोरंजनाकरिता अप्सरा व गंधर्वांचे नृत्य-गायनही सुरू असते. बृहस्पती व शुक्र हेही इंद्राच्या सभेत असतात. पुष्कर मालिनी हे या सभेचे नाव.’ धर्मराजा तल्लीन होऊन ऐकत होता.

आता पाळी आली यमाची. यमाची परिचर्या करणाऱ्या मुख्यत: ययाति, पुरु, नहुष, मांधाता, बृहद्रथ (जरासंधाचा पिता), दाशरथी राम, लक्ष्मण अशी यादी सुरू असताना नारदाने असे सांगितले, शांतनु, तुझा पिता पांडू इ. यमाची परिचर्या करीत असतात. याचा अर्थ स्पष्ट होता. धर्मराजाचे स्वर्गवासी पितर इंद्राचे नव्हे तर यमाचे पाहुणे आहेत? पाहुणे कसले? ते परिचर्या करतात, म्हणजे सेवाच करतात. नारदाने धर्मराजाच्या चेहऱ्यावरचे भाव अचूक टिपले होते. नारदाने त्यानंतर वरुण, कुबेर, ब्रह्मदेवांच्या सभेची वर्णने केली. इंद्र जरी देवांचा राजा असला तरी रंभा, मेनका, उर्वशी, घृताची, विश्वाची, लता, चित्रसेना, चारुनेत्रा, इरा, वर्गा अशा अप्सराचा तांडा धनपती कुबेराच्या सेवेला हजर असताे. कुबेराची सभा त्यामुळे कायमच गजबजलेली असते. भगवती लक्ष्मीही तिथेच िनत्य वास्तव्य करते. नारदाने मीही स्वत: बहुतेक वेळ तिथेच असतो, हेही स्पष्ट केले!! ‘राजा युधिष्ठिरा! पृथ्वीवर तुझी सभा दुर्लभ आहे. तशी त्रिभुवनात ब्राह्मी सभा श्रेष्ठ आहे.’ असो.

नारदाला अचानक आठवले : ‘राजा! तुझ्या पित्याने (पांडूने) तुला निरोप दिला आहे. ‘पुत्रा! हरिश्चंद्राने ‘राजसूय’ यज्ञ करून सम्राटपद मिळवले. तो इंद्राच्या सभेत वावरतो. युधिष्ठिरा! तू बंधुंसमवेत अखिल पृथ्वी जिंकण्यास
समर्थ आहेस. तूही राजसूय यज्ञ कर. म्हणजे मीही हरिश्चंद्राप्रमाणे इंद्राच्या भवनात विनाविलंब
सुखात नांदेन.’ युधिष्ठिरा! मी तुझा पिता पांडूला ‘तुझी इच्छा पूर्ण होईल’, असा आशीर्वाद देऊनच आलो आहे. धर्मराजाने ‘राजसूय’ ‘राजसूय’ जपच सुरू केला.

राजा पटवर्धन
patwardhanraja@hotmail.com
लेखकाचा मोबाइल क्र. - ९८२००७१९७५
बातम्या आणखी आहेत...