आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णाचा तेजोभंग \'पापी\' शल्‍याचा मुत्‍यू ? ( राजा पटवर्धन)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूतपुत्र कर्णाचे सारथ्य करण्यासाठी शल्य राजाने घोड्यांचे लगाम हाती घेताना ‘मातली हा सारथी इंद्राला जितका सुयोग्य आहे, तितकाच मीही आहे’, असे कर्णाला ऐकवले. दुर्जय श्रेष्ठ रथावर शल्य प्रथम आरूढ झाला. कर्ण रथ खरोखरी सनाथ झाल्याने दुर्योधन आनंदून म्हणाला, ‘कर्णा! भीष्म द्रोणांना जे जमले नाही, ते भीमार्जुनांना मारण्याचे कर्म करून पांडव सैन्याचे भार्गवास्त्राने भस्म कर.’ कर्णाच्या अंगात चैतन्य व वीर्य सळसळू लागले. ‘शल्या! घोड्यांना प्रेरणा दे. पांडवांचा विनाश करून आजच दुर्योधन विजयी होईल.’ ‘सूतपुत्र कर्णा! इंद्राच्या मनात भय निर्माण करणाऱ्या गांडीवाचा वज्रघोष ऐकलास की युद्धभूमीत तुझी वाचाच बसेल.’ शल्याकडे दुर्लक्ष करून ‘चल पुढे चल’, कर्णाने आज्ञा केली. तेवढ्यात आकाशातून उल्कापात सुरू झाला. पर्जन्यवृष्टीही नसताना विजा पडल्या. हे उत्पाती अपशकून कर्णाने जुमानले नाहीत. कर्ण निर्भयपणे हाती धनुष्य घेऊन रथात स्थिर उभा होता. ‘अर्जुनासमोर निर्भयपणे तोंड देणारा मीच एकमेव वीर असून शल्या एेक! सर्व सेना माझ्या नावाचाच जयघोष करतेय. श्रीकृष्णासह सर्व वीरांच्या समोर जाऊन त्यांना मारीन किंवा द्रोणांच्या मार्गाने जाईन. मी पर्शुरामाच्याच रथात उभा आहे. माझ्या हाती त्यांचेच ‘विजय’ धनुष्य आहे. मृत्यू जरी अर्जुनाच्या रक्षणाला आला तरी त्याला मारीन किंवा भीष्मांदेखत यमलोकी जाईन. यम, कुबेर, वरुण, इंद्र त्यांच्या शस्त्रांसह एकवटून आले तरी आज अर्जुन जिवंत राहणार नाही.’ कर्णाची आत्मस्तुती व मृत्यूलाही सामोरे जाणारी मानसिकता ऐकून शल्याची वाणी अधिक ओजस्वी झाली. ‘सूतपुत्रा, बडबड बंद कर! नरश्रेष्ठ अर्जुनाबरोबर तुझ्यासारख्या नीचाची तुलना करतोस? साक्षात महादेवाशी युद्धाचे आव्हान स्वीकारणाऱ्या अर्जुनापेक्षा तू श्रेष्ठ? प्रत्यक्ष अग्नीने त्याला वर दिला. गंधर्वाशी लढताना तू पळून गेल्यावर अर्जुनाने दुर्योधनाला सोडवला, विराट नगरात भीष्म, द्रोण, अश्वत्थामा अशांसह असलेल्या दुर्योधनाला एकट्या अर्जुनाने पराभूत केले, तेव्हा सूतपुत्रा तूही पळालास. आजही तू तसाच पळाला नाहीस तर मारलाच जाशील.’
कर्ण न ऐकल्यासारखे करून म्हणाला, ‘शल्या! रथ शत्रूसेनेेकडे ने. मला अर्जुनाचा रथ कुठेच दिसत नाही.’ श्रीकृष्ण शिष्टाईच्या दिवशी दिलेली कबुली कर्णाला अस्वस्थ करत असावी. त्याचे जन्मरहस्य त्याला चांगलेच माहीत होते. त्या वेळचे स्वत:चे शब्द त्याच्या कानात घुमू लागले. ‘श्रीकृष्णा माझे बंधू पांडव, त्यांनी माझा कोणताही अपराध केलेला नसता, केवळ दुर्योधनाला आनंद व्हावा म्हणून त्यांच्या हीनदीन अवस्थेत मी निर्दयपणे कठोर भाषा वापरली. त्या पापाचे परिमार्जन अर्जुनाने मला युद्धात ठार मारल्यानेच पूर्ण होईल. भीमार्जुनांच्या घोर प्रतिज्ञांच्या पूर्ततेने हा यज्ञ समाप्त होईल.’ (उद्योगपर्व अध्याय १४१)
शल्याच्या बडबडीने कर्णाची एकाग्रता नक्कीच भंग पावली होती. कर्ण अर्जुनाचा रथ दाखवणाऱ्यांना धनाची खैरात करत सुटला. द्रव्य, रत्ने, गाईंसह गावे इनाम द्यायला निघाला. हत्ती, घोडे देऊ केल्यावर शेवटी सोळा वर्षांच्या कन्या व तेवढ्याने भागले नाही, तर मगध देशाच्या शंभर सुंदर नवयुवती ‘दासी’ म्हणून देईन, येथपर्यंत त्याची जीभ सैल सुटली. हे कशासाठी? तर अर्जुनाचा रथ दाखवण्यासाठी! मन अस्थिर झालेल्या कर्णाला शल्य म्हणाला, ‘कुबेराच्या थाटात धन त्याग करण्याची गरज नाही. तू कधी कोल्ह्याने सिंहाला मारलेले ऐकले आहेस का? तुझी बडबड, तू कालपरिपक्व झाल्याचे द्योतक आहे.’ कर्ण उसळला, ‘मी स्वबाहुबळावर समरांगणात उतरलो आहे. मला कृष्णार्जुनासमोर घेऊन चल.’ शल्याने त्याला उंदीर-मांजर, कुत्रा-वाघ, कोल्हा-सिंह, ससा-हत्ती अशा निर्बळ-प्रबळ जोड्यांच्या तुलनेने हिणवून शेवटी ‘कर्णा! तू बेडकाप्रमाणे आवाज काढून मेघगर्जनेशी तुलना करू नकोस.’ असा वर्मी घाव घातला. कर्णाकडे एक भयंकर विषारी सर्पमुखी बाण होता. कृष्ण किंवा अर्जुन यांना ठार करण्यासाठीच जतन करून ठेवलेला बाण बाहेर काढून ‘कृष्णार्जुनांना तू मरून पडलेले पाहशील’, अशी गर्जना कर्णाने शल्याला ऐकवली. ‘गांडीव, सुदर्शन, कपिध्वज यांची भित्र्यांना चिंता वाटते, मला त्याने आनंद होतो. तू मात्र भित्र्यांप्रमाणे शत्रूंची प्रशंसा करीत आहेस. श्रीकृष्ण-अर्जुनांना मारल्यावर त्वरितच, शल्या! मी तुझाच वध करीन.’ शल्याचा अधिक उपमर्द करण्यासाठी कर्ण त्याच्या मद्रदेशावरच घसरला. ‘मद्रदेशी लोक ब्रह्मद्रोही व स्त्रिया दारूड्या, व्यभिचारी, नंगा नाच करणाऱ्या, निर्लज्ज आहेत.’ कर्णाने खालची पायरी गाठली.
‘पापी म्लेंच्छांकडून मला बोधकथा ऐकायच्या नाहीत. पांडवांनी आमच्यात तुला फितुर, फूटपाड्या म्हणून पाठवला आहे. (कर्णपर्व- अध्याय ४०) युद्धात प्राणांची आहुती देण्याची शिकवण मला पर्शुरामाने दिली आहे. तू प्राणांच्या भीतीने बडबड करून युद्धविन्मुख होऊ इच्छितोस. मी मित्रवचनाला स्मरून तुला माफ करीत आहे. शल्या, मी फक्त निंदेला घाबरतो. तू पुन्हा अशा गोष्टी बोलशील, तर माझ्या वज्रगदेने तुझा कपाळमोक्ष करीन.’ मूर्धाभिषिक्त शल्य राजा प्रथमच ‘वृषभस्वरूपा कर्णा’ असे म्हणाला. ‘कर्णा! तू मद्यप्राशनाने उन्मत्त झाल्यासारखा बोलत आहेस. मी दुर्योधनाच्या हितासाठीच सारथ्य करतोय.’ शल्याने त्याला उष्ट्या अन्नावर पोसलेल्या कावळ्याच्या व राजहंसाच्या उड्डाण स्पर्धेची बोधकथा ऐकवली. धृतराष्ट्राच्या उष्ट्या अन्नावर पोसलेला तू माझा उपमर्द करायला धजला आहेस. सर्व कौरववीर एकवटून लढले असता, विराटनगरात एकट्या अर्जुनाने तुम्हाला पराभूत केले ना? तेव्हा तुझा पराक्रम कुठे गेला होता? कोल्ह्यांच्या कळपाला एखाद्या सिंहाने पिटाळून लावावे, तशी तुमची दुर्दशा अर्जुनाने केली. कावळ्याने राजहंसाचा आधार घेऊन स्वत:चा जीव वाचवला, तसा तू कृष्णार्जुनांचा आश्रय घे. सूतपुत्रा, काजव्याने कधी सूर्याकडे बघण्याचे धाडस करू नये. शल्याचा तेजोभंग कार्यक्रम सुरूच होता.
कर्णाने, पर्शुरामाच्या ‘सौम्य’ शापाची व यज्ञीय धेणूवत्साच्या हत्येमुळे ब्राह्मणाने दिलेल्या भयंकर शापाची हकिगत सांगून शल्याच्या मनात कणव उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. अर्जुनाला मारण्याचा पुन्हा निर्धार व्यक्त केला. ‘शल्या! आज तुला कर्णाच्या दिव्यास्त्रांचे व मानुषास्त्रांचे दर्शन होईल. जर माझे चाक ब्राह्मणाच्या शापाने जमिनीत रुतले नाही तर आज अर्जुन मेलाच म्हणून समज.’ ‘मद्रदेशी राजा शल्या! हा कर्ण कधीच भयग्रस्त होत नाही. मित्र द्रोहाला मी पाप समजतो, म्हणूनच तू अजून जिवंत आहेस. तुझ्या मद्रदेशात लोक (गुळाची) दारू पिऊन गोमांस खातात. संस्कारशून्य मंदबुद्धी हे त्यांचे खास गुण. वाहिक देशातील लोकांचा तू राजा असल्याने, त्यांच्या पापाचा वाटेकरी आहेस. हे पाप्या, तू आता चूप झाला नाहीस, तर प्रथम तुला ठार करून नंतर श्रीकृष्ण, अर्जुनाचा वध करीन.’ शल्याला आपल्या देशाचा कर्णकृत अपमान गिळता आला नाही. ‘तुझ्या अंगदेशात स्त्रिया व मुलांच्या विक्रीचा बाजार भरतो. त्याचा तूही वाटेकरी आहेस. भीष्मांनी सर्वांदेखत तुला ‘अर्धरथी’ ठरवले तेही लक्षात असू दे.’ स्वकीयांचे हे वाक‌्युद्ध दुर्योधनाने बंद पाडले. शल्याने घोड्यांना प्रेरणा दिली. दोघेही कुंतीपुत्र समोरासमोर उभे ठाकले. त्यापूर्वीच शल्याने कर्णस्तुतीला आरंभ केला होता. ‘कृष्णार्जुनांना मारण्यास कौरवसैन्यात तू एकटाच समर्थ आहेस. मृत्यू असा समोर दिसल्यावर बचावासाठी शल्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. कर्णाला भीती नव्हतीच. त्याचा उत्साह वाढला. द्वैरथी युद्ध सुरूच झाले. अर्जुनाला अडवण्यासाठी कर्णपुत्र वृषसेन प्रथम सामोरा आला. कर्णादेखत अर्जुनाने वृषसेनाचे मस्तक उडवले. यानंतर सारथ्याची पाळी? शल्य मनात हादरला. कर्णाने कित्येक वर्षे पुजलेला ‘सर्पमुखी’ बाण काढला. याच बाणात योगबलाने अश्वसेन नाग घुसून बसला होता. कर्णाने अर्जुनाचे मस्तक उडवण्यासाठी संधान केले. मद्रराज शल्य कर्णाची सिद्धता पाहून म्हणाला, ‘तुझा बाण शत्रूच्या कंठाला लागणार नाही, म्हणून पुन्हा अचूक संधान कर, ज्यामुळे मस्तक कापले जाईल.’ ‘कर्ण एका बाणाचे दोन वेळा संधान करीत नाही’ शल्य गप्प बसला. तो बाण आकाशात प्रज्वलित होऊन येताना पाहून कृष्णाने अर्जुनाच्या रथाची चाकेच बळाने जमिनीत घुसवली. घोडेही वाकले. कर्णाचा बाण अर्जुनाच्या मुकुटावर आदळल्याने मुकुट खाली पडला. अर्जुनाचे शीर सलामत राहिले. त्यानंतर ब्राह्मणाचा शाप खरा ठरून पृथ्वी कर्णरथाचे चाक गिळू लागली. कर्णाला भार्गवास्त्रही स्फुरले नाही. ब्रह्मास्त्राचेही अर्जुनाने निवारण केले. कर्ण रथातून खाली उतरून रथाला वर उचलू लागला असता क्रुद्ध अर्जुनाने ‘अांजलिक’ बाणाने कर्णाचे मस्तक कापले. मृत कर्णाला सोडून शल्य राजा रथातून पळाला व संपूर्ण सैन्यही पळून गेले. शल्याने दुर्योधनाला शिबिरात नेले. युद्धाचा सतरावा दिवस संपला. कर्ण मेल्याचे ऐकून तेरा वर्षे निद्रानाश झालेला युधिष्ठिर निवांतपणे झोपी गेला.
युद्धाच्या अठराव्या दिवशी दुर्योधनाने सर्वानुमते शल्य राजाला सेनापती करून शत्रूंचा संहार करण्याची आज्ञा दिली. कर्णाला शोभणारी दर्पोक्ती शल्य राजानेही केली. खुद्द श्रीकृष्णाने कौरव-पांडवांतील महावीरांपेक्षाही शल्य पराक्रमी आहे, असे सांगितले व धर्मराजाने शल्य वध करावा, अशी मंथना केली. धर्मराजाच्या पुढे भीम; पाठीमागे अर्जुन, नकुल, सहदेव रथचक्र संरक्षक; त्याशिवाय सात्यकी व धृष्टद्युम्न जोडीला, स्वत: धर्मराजानेच रथ हाकला. तुंबळ युद्ध झाले. प्रजापतीने शंकरासाठी बनवलेली ‘ब्रह्मद्रोह्यांचा’ नाश करणारी शक्ती शल्य राजावर फेकून त्याचा वध करताना धर्मराजाने, ‘शल्या! पाप्या! आता तू मेलास’, असे म्हटले. तसेच झाले (शल्य पर्व अध्याय १७) दुर्योधनाचा मंत्री (सल्लागार) कर्णाचा तेजोभंग करणाऱ्या शल्याचा अंत झाला.
patwardhanraja@hotmail.com
लेखकाचा मोबाइल क्र. - ९८२००७१९७५
बातम्या आणखी आहेत...