Home »Magazine »Rasik» Raja Patwardhan Writes Article About Brihaspati

देवगुरू बृहस्पतीचे वर्तन धर्ममान्य?

राजा पटवर्धन | Mar 21, 2017, 15:18 PM IST

  • देवगुरू बृहस्पतीचे वर्तन धर्ममान्य?
समागमासाठी बृहस्पतीने दीर असूनही ममतेशी संबंध ठेवला; तर क्षत्रिय बलीने स्वखुशीने आपली पत्नी ब्राह्मणाला अर्पण केली. भीष्म सत्यवतीला म्हणाला, ‘माते! भरतवंश चालू राहावा, त्याची भरभराट व्हावी, म्हणून विचित्रवीर्याच्या भार्यांपासून संतती निर्माण करील अशा एखाद्या गुणसंपन्न ब्राह्मणाला बोलावून घे. त्याला द्रव्य दे.’
विचित्रवीर्य वारल्यामुळे हस्तिनापूर अनाथ झाले. विधवा सुनांचे सांत्वन करून सत्यवती भीष्माजवळ गेली. म्हणाली, ‘धर्मज्ञ पुत्रा, शांतनुला पिंडदान व पित्याची वंशवेल वृद्धिंगत करण्याची जबाबदारी नियतीनेच तुझ्यावर टाकली आहे. तू राज्याभिषेक करवून पतीच्या नात्याने निपुत्रिक देखण्या दोन राण्यांच्या पोटी वीर संतती निर्माण कर. पूर्वजांना सद‌्गती मिळू दे! आणि हस्तिनापूरला वारस!’

‘माते! तुझ्या विवाहाच्या वेळी तुझ्या पित्याने माझ्या पित्याला जी अट घातली, तिचे तुला स्मरण आहेच. तू सत्यवती आहेस तसा मीही सत्यवचनीच आहे. प्रतिज्ञेच्या पूर्ततेसाठी मी इंद्रपदाचा व त्रैलोक्याचाही त्याग करीन. एक वेळ चंद्र शितलता सोडून दाहक बनेल, पाणी आपल्या रसाचा, पृथ्वी आपल्या गंधाचा, सूर्य तेजाचा व आकाश शब्द ध्वनीचा त्याग करील, पण मी सत्य-प्रतिज्ञेला कधीही त्यागणार नाही.’

‘हे वीराग्रणी भीष्मा! तू तिन्ही लोक पुन्हा निर्माण करू शकशील, याबद्दल मला शंका नाही. माझ्या पित्याने माझ्या विवाहापूर्वी घातलेल्या अटींची मी साक्षीदारच आहे. परंतु अापद््धर्म म्हणून निर्वंश टाळण्यासाठी धर्मालाही बट्टा न लावता तू माझी विनंती मान्य कर.’

‘माते! क्षत्रिय जर धर्म व सत्यच्युत झाला तर तो निंद्य होतो. शांतनुचा वंश व संतती अक्षय नांदावी म्हणून प्रज्ञावंतांनी, पुरोहितांनी जो आपद‌्धर्म जगाचा व्यवहार टिकावा म्हणून सांगितला आहे तसे कर.’

भीष्माने जमदग्नी पुत्र गुरू परशुरामाची कथाच ऐकवली. हैहय देशाच्या सहस्त्रार्जुन राजाने जमदग्नीची कामधेनू पळवल्यानंतर झालेल्या युद्धात जमदग्नीचा वध झाला. परशुरामाने सूड उगवण्यासाठी सहस्त्रार्जुनाचे सहस्र हात परशूने छाटून टाकले. नंतर हाती धनुष्य घेऊन हैहयाच्या बाजूने लढणाऱ्या सर्व क्षत्रियांचा नाश केला. पृथ्वीच नि:क्षत्रिय करून टाकली.(एकवीस वेळा?) क्षत्रिय स्त्रिया तुझ्या सुनांप्रमाणेच विधवा झाल्या. संतान प्राप्तीसाठी त्यांनी वेदसंपन्न ब्राह्मणांकडून अपत्यप्राप्ती करून घेतली. विवाहित स्त्रीचा पुत्र हा पतीचाच समजला जातो, हे वेदमान्य आहे. क्षत्रिय स्त्रियांनी क्षत्रियांचा पुनर्जन्म केल्याची अशी अनेक उदाहरणे आहेत.’

सत्यवतीच्या चेहऱ्यावर भीष्माला साशंक भाव दिसले. ‘माते, आता तुला साक्षात बृहस्पतीचीच कथा सांगतो.’ सत्यवतीने मन एकाग्र केले. देवव्रत गंगापुत्राने वसिष्ठ, शुक्राचार्य आणि खुद्द बृहस्पतींकडून धर्मज्ञानाचे धडे गिरवून घेतलेले होते. भीष्म असत्य बोलणारच नाही, याबद्दल सत्यवतीची खात्री होती.

‘परशुरामकथेच्याही पूर्वीचा हा पुरातन इतिहास आहे. उतथ्य नावाचा एक प्रज्ञावंत ऋषी होता. त्याच्या पत्नीचे नाव ममता. ती त्याची लाडकी पत्नी होती. देवांचा पुरोहित महातेजस्वी बृहस्पती हा उतथ्य ऋषीचा धाकटा भाऊ. ममता ही बृहस्पतीची (आताच्या नात्याने) वहिनी. हा बृहस्पती कामासक्त होऊन ममतेशी समागम करण्यास उद्युक्त झाला. बृहस्पती म्हणजे बुद्धिमतांमध्ये सर्वश्रेष्ठ. भेदरलेल्या ममतेने धाकट्या दिराला हात जोडून विनंती केली, ‘तुझ्या वडीलबंधू उतथ्यापासून मी गर्भवती आहे. हा अविचार तू करू नकोस. हे महाभाग, देवगुरू बृहस्पते! माझ्या उदरामध्ये उतथ्याचा पुत्र आहे. उदरात असतानाच त्याने सांग वेदांचे अध्ययन पूर्ण केले आहे. तूसुद्धा (उतथ्याप्रमाणेच) अमोघवीर्य आहेस. आता (या स्थितीत) माझ्या उदरात आणखी जागा कुठून असणार? म्हणून तू स्वत:ला आवर. ‘या’ कृत्यापासून परावृत्त हो.’ बृहस्पतीला हा उपदेश म्हणजे उपमर्दच वाटला. ही ममता आपल्याला नाकारते? झिडकारते? समागमाला अनासक्त असलेली ममता आणि उतावीळ झालेला बृहस्पती! बृहस्पतीचा आवेग पाहता ममता मूक झाली. मुकेपणाला संमती हे दुसरे नावच! बृहस्पतीचे अमोघ वीर्य स्खलित होण्याच्या अवस्थेत असता गर्भस्थ उतथ्यपुत्राचा आवाज कानी आला, ‘देवगुरू महाराज! आपण विषयासक्त होऊ नका. मातेच्या उदरात दोघांना पुरेल इतकी जागा नाही. मी अगोदरच इथे वास्तव्य करून ही जागा व्यापली आहे. आपण अमोघवीर्य आहात, हे आम्हा दोघांनाही (ममता व गर्भ) माहीत आहे. कृपा करून आपण आम्हाला पीडा देऊ नका.’

गर्भस्थाच्या वटवटीकडे बृहस्पतीने दुर्लक्षच केले. ममतेशी तो मैथुनात एकरूप होऊ लागताच गर्भस्थ उतथ्यपुत्राने बृहस्पतीच्या अमोघ वीर्याचा मार्ग कोवळ्या पायांनी अडवून ठेवला. बृहस्पतीचे वीर्य अस्थानी व्यर्थ होऊन भूमीवर पडले. त्याने गर्भस्थ उतथ्यपुत्राला शापरूपी दंश केला, ‘मी आत्यंतिक सुखाच्या अत्युच्च बिंदूवर असताना तू मला ज्या अर्थी बोललास, त्या अर्थी तुला कधीही नष्ट न होणाऱ्या अंधारात कायमचे खितपत पडावे लागेल.’ देवपुरोहित बृहस्पतीच्या शापाने उतथ्यपुत्र जन्मास आला तो आंधळाच! त्याचे नाव दीर्घतमा. उतथ्य ऋषीचा पुत्र वेदवेत्ता होताच. प्रज्ञावंतही झाला. एवढेच नव्हे, तर प्रद्वेषी नावाच्या तरुण ब्राह्मण कन्येशी त्याचा विवाहही झाला. या दीर्घतमा ऋषीचे पत्नी व मुलांशी त्याच्या विकृत वागण्यावरून भांडण झाले. ‘एखाद्या क्षत्रिय कुळात मला घेऊन जा, म्हणजे तुम्हाला मी भरपूर द्रव्य देऊ शकेन. माझ्या पोसण्याचा तुम्हाला खर्चही पडणार नाही.’ प्रद्वेषीने आपल्या पुत्रांना सांगून विकृत दीर्घतम्याला नदीत सोडून देण्याची आज्ञा दिली. बली नावाच्या एका क्षत्रिय राजाने नदीत वाहणाऱ्या होडीतून दीर्घतम्याची सुटका केली. या बलीराजाला संतती नव्हती. वेदसंपन्न अंध ब्राह्मणाने, बलीपत्नी सुदेष्णेच्या पोटी धर्मकुशल पुत्र निर्माण करण्याची विनंती खुद्द बलीराजाने केली. सुदेष्णेने ब्राह्मणऋषी वृद्ध व अंध आहे, हे पाहून आपल्या दासीला दीर्घतमाकडे पाठविले. त्या दासीला झालेल्या पुत्रांवर दीर्घतमाने हक्क सांगितला. ‘तुझ्या सुदेष्णेने मला झिडकारले व शूद्र दासीला पाठविले.’ राजाने वंशाचा दिवा हवा, म्हणून सुदेष्णेची समजूत घातली. सुदेष्णेला पुत्र प्राप्त झाले. ते पराक्रमी निपजले. या बलीचा वंश पुढे सुप्रतिष्ठित झाला.

भीष्माची कथा मूळ पदावर आली. ब्राह्मणांकडून क्षत्रिय स्त्रियांनी पुत्रप्राप्ती करून घेणे, हा इतिहास आहे. समागमासाठी बृहस्पतीने दीर असूनही ममतेशी संबंध ठेवला; तर क्षत्रिय बलीने स्वखुशीने आपली पत्नी ब्राह्मणाला अर्पण केली. भीष्म सत्यवतीला म्हणाला, ‘माते! भरतवंश चालू राहावा, त्याची भरभराट व्हावी, म्हणून विचित्रवीर्याच्या भार्यांपासून संतती निर्माण करील अशा एखाद्या गुणसंपन्न ब्राह्मणाला बोलावून घे. त्याला द्रव्य दे.’

सत्यवतीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. सत्यवतीला हसू फुटले. तिच्या चेहऱ्यावर थोडी लज्जेची छटाही उमटली. होडीत पराशराने लालूच दाखवून आपल्याला नाही का पुत्रप्राप्ती झाली? मत्स्यगंधा मी गंधवती-योजनगंधा नाही का झाले? द्वैपात जन्मलेल्या पुत्राला पराशर घेऊन गेला नाही का? कृष्ण द्वैपायनाचा आता महर्षी व्यास झाला आहे! सत्यवती भानावर आली. म्हणाली, ‘भीष्मा! मी कृष्ण द्वैपायनाला, तुझ्या भावालाच, आज्ञा करून विचित्रवीर्याच्या भार्यांच्या ठिकाणी पुत्र प्राप्ती करून घेते. मी त्याचे स्मरण केले की तो लगेच अवतीर्ण होईल. भीष्मा! माझ्या कल्पनेला तुझी संमती असेल तरच मी कृष्ण द्वैपायनाला हाक मारते, त्याचे स्मरण केले तरी पुरेसे आहे.’ (महाभारत-आदिपर्व - अध्याय १०५)

वरील सर्व कथा भांडारकरी संशोधित आवृत्तीतही समाविष्ट आहेत. त्या काळी क्षत्रिय स्त्री विवाहित अथवा विधवा असेल आणि जर ब्राह्मणाने संतती निर्माण केली तर पुत्र क्षत्रियच मानला जायचा. ब्राह्मण दीर्घतमाचे पुत्र क्षत्रिय राजे ठरले. ब्राह्मण व्यासांनी विचित्रवीर्याच्या भार्यांपोटी नियोगाने निर्माण केलेले धृतराष्ट्र-पांडूही क्षत्रिय ठरले. पराशर ऋषी व सत्यवतीचा पुत्र व्यास ब्राह्मण झाला, कारण सत्यवती क्षत्रियाची कुमारी कन्या होती. बृहस्पती-ममतेच्या कथेत जो भयंकर प्रकार आहे, त्या वेळी पती-पत्नी, स्त्री-पुरुष ही कौटुंबिक नाती काटेकोर नव्हती. दीर्घतमाने सर्वप्रथम स्त्रियांसाठी अनुल्लंघनीय मर्यादा घातल्या. म्हणजे पुरुष मोकाटच राहिले!
लेखकाचा मोबाइल क्र. - ९८२००७१९७५
patwardhanraja@hotmail.com

Next Article

Recommended